सूर्यमालेपलीकडून आलेला अलीकडचा पाहुणा: 3I/ATLAS

Posted
3 आठवडे ago
शेवटचा प्रतिसाद
3 आठवडे ago

(हा लेख Jan 2026च्या BMM वृत्तात प्रसिद्ध झाला आहे.
https://bmmonline.org/wp-content/uploads/2025/12/BMMNewsletterJan2026.do... )

२०२७मध्ये व्हॉएजर-१ यान पृथ्वीपासून एक प्रकाश दिवस एवढ्या अंतरापर्यंत पोचेल. आपल्या सौरमंडळाला सर्वात जवळचा तारा चार प्रकाशवर्षांपेक्षा जास्त दूर आहे. याचाच अर्थ मानवाचे अवकाशभ्रमण अजूनही आपल्या अंगणापूरतेच मर्यादित आहे. असे असताना दुसऱ्या तारामंडळातून आलेले पाहुणे बरीच खळबळ माजवतात यात काही नवल नाही. असे मोजकेच खगोल प्रवासी आपल्या माहितीचे आहेत. कल्पना करा की आपला सूर्य एका रेसकोर्सच्या मध्यभागी आहे आणि पृथ्वी आणि इतर ग्रह त्या रेसट्रॅकवर धावणाऱ्या गाड्यांप्रमाणे त्याच्याभोवती आपापल्या ठराविक लंबवर्तुळाकार कक्षेत कोट्यावधी वर्षे फिरत आहेत. पण कधीकधी, एखाद्या अत्यंत दूरच्या, वेगळ्या ताऱ्याच्या जगातून एक खास पाहुणा आपल्या सूर्यमालेत - या रेसकोर्सवर - झेपावतो. भलत्याच दिशेने. हे पाहुणे येथे कायमचे थांबत नाहीत, कारण ते दूर अंतराळातून आलेले अनाहूत प्रवासी असतात, आणि वेगाने येऊन तेवढ्याच लगबगीने दूर जातात.

Screenshot 2026-01-04 at 3.56.45 PM.pnghttps://arxiv.org/pdf/2507.05252 या आमच्या शोधनिबंधातून घेतलेले 3I/ATLAS चा मार्ग दाखवणारे हे चित्र.

आजवर आपल्याला असे फक्त तीनच पिंड माहित आहेत, आणि त्यातील सर्वात नवा पाहुणा म्हणजे '3I/ATLAS'. 3I/ATLAS चा शोध १ जुलै २०२५ रोजी चिली येथील 'ATLAS' टेलिस्कोपद्वारे लावला गेला, म्हणूनच याच्या नावात 'ATLAS' हे नाव आहे. '3I' चा अर्थ असा की, हा आजवर ज्ञात झालेला तिसरा 'आंतरतारकीय' (Interstellar) पिंड आहे. हे 'UFO' नसून 'ISO' (Interstellar Objects) आहेत. नंतर शास्त्रज्ञांना 'ZTF' सारख्या इतर प्रकल्पांमधून १५ जून २०२५पर्यंतच्या जुन्या प्रतिमा (precovery) देखील मिळाल्या, ज्यात हा पाहुणा आधीच टिपला गेला होता. याची कक्षा सूर्यमालेच्या प्रतलाशी साधारण समांतर आहे (५ डिग्रीने कललेली); पण त्याचा मार्ग ग्रहांच्या उलट दिशेने (retrograde) आहे. यावरून हा पाहुणा आकाशगंगेच्या एका वेगळ्या भागातून आला आहे आणि त्याचा पिंड प्राचीन आहे हे लगेचच कळले.

हे पाहुणे कसे ओळखायचे?

खगोलशास्त्रज्ञ रात्रीच्या आकाशाचा वेध घेणाऱ्या दुर्बिणींच्या साहाय्याने या पाहुण्यांचा शोध घेतात. त्यांच्या कक्षेवरून ते सूर्यमाले बाहेरून आले आहेत हे समजते. आपल्या सूर्यमालेतील ग्रह आणि धूमकेतू सूर्याभोवती लंबवर्तुळाकार (Ellipses) कक्षेत फिरतात. पण अशा आंतरतारकीय पाहुण्यांची कक्षा 'हायपरबोलिक' (Hyperbolic) असते. याचा अर्थ असा की, त्यांचा वेग इतका प्रचंड असतो की सूर्याचे गुरुत्वाकर्षण त्यांना पकडून ठेवू शकत नाही. पृथ्वीच्या कक्षेची 'एक्सेंट्रिसिटी' (Eccentricity) सध्या ०.०१६७ इतकी आहे म्हणजेच पृथ्वीची कक्षा जवळजवळ गोलाकार आहे. त्याविरुद्ध 3I/ATLAS च्या कक्षेची एक्सेंट्रिसिटी तब्बल ६.१ आहे, म्हणजे त्याची हायपरबोलिक कक्षा अतिशय “खुली” (open) आहे; तो आत येतो, सूर्याजवळून वळतो आणि पुन्हा कायमचा बाहेर निघून जातो.

आपले आजवरचे तीन खास पाहुणे:
1I/Oumuamua (२०१७) - पहिला पाहुणा: हा आपला पहिला अधिकृत आंतरतारकीय पाहुणा होता. तो अत्यंत रहस्यमय होता. एखाद्या सिगारसारखा लांबट आकार आणि धूमकेतूंना असतात तश्या शेपटाविना. शास्त्रज्ञांच्या मते तो एक खडकाळ पदार्थ किंवा विरळ बर्फाचा बनलेला असावा.
2I/Borisov (२०१९) - धूमकेतूसदृश्य पाहुणा: हा पाहुणा अगदी आपल्याकडील धूमकेतूंसारखाच होता. सूर्याच्या जवळ आल्यावर उष्णतेमुळे त्यातील बर्फाचे वायूत रूपांतर झाले आणि त्याभोवती धूळ व वायूंचे ढग (Coma) तयार झाले. यावरून इतर तारा प्रणालींमध्येही आपल्या सूर्यमालेत असतात तसेच धूमकेतू असू शकतात या तर्काला बळ देणारा पुरावा मिळाला.
3I/ATLAS (२०२५) - मोठा आणि वेगवान पाहुणा: हा सर्वात नवीन पाहुणा आहे. हा देखील एक धूमकेतू आहे, पण त्यातील काही रासायनिक गुणधर्म लक्षवेधी आहेत. साधारण धूमकेतूंमध्ये पाण्याचे रेणू हे कार्बन-डाय-ऑक्साइडच्या रेणूंपेक्षा कितीतरी जास्त असतात. यात मात्र कार्बन डायऑक्साइड पाण्याच्या बर्फाच्या तुलनेत आठपट आहे; तसेच यात निकेल (Nickel) धातू भरपूर प्रमाणात आहे.

आपल्या अंतराळयानांपेक्षाही वेगवान

3I/ATLAS सध्या ताशी सुमारे २,२०,००० किलोमीटर (६१ किमी प्रति सेकंद) वेगाने प्रवास करत आहे. तुलना करायची झाल्यास, पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग ३० किमी प्रति सेकंद, तर मानवनिर्मित सर्वात वेगवान यान व्हॉयेजर १ ची गती केवळ १७ किमी प्रति सेकंद. म्हणजेच 3I/ATLAS व्हॉयेजर १ पेक्षा चौपट गतीने मार्ग क्रमतो आहे.

3I/ATLAS मधील नवीन शोध
जेम्स वेब टेलिस्कोप (JWST) आणि इतर प्रगत दुर्बिणींनी या पाहुण्याबद्दल काही थक्क करणारे शोध लावले आहेत:
१. कार्बन डायऑक्साइडचा 'राक्षस': 3I/ATLAS मध्ये पाण्याच्या बर्फाच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडच्या बर्फाचे प्रमाण ८:१ इतके आहे. आजवर कोणत्याही धूमकेतूंमध्ये दिसलेल्या उच्चतम मूल्यांपैकी एक आहे.
यावरून असे सूचित होते की, या धूमकेतूची निर्मिती त्याच्या मूळ ताऱ्यापासून खूप दूर, एका अत्यंत थंड आणि दीर्घकाळचा किरणोत्सर्ग/कॉस्मिक किरणांचा प्रभाव असलेल्या परिसरात झाली असावी.
२. आकाशगंगेतील एक ज्येष्ठ नागरिक: 3I/ATLAS चा प्रचंड वेग आणि त्याची दिशा लक्षात घेता, शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की हा धूमकेतू ७ ते ११ अब्ज वर्षे जुना आहे. हा आपल्या आकाशगंगेच्या 'थिक् डिस्क' (Thick Disk) या भागातून आला असावा—जेथील ताऱ्यांची वस्ती अत्यंत प्राचीन मानली जाते.
३. निकेलचे गूढ: खगोलशास्त्रज्ञांना या धूमकेतूच्या शेपटीत अणुरूपात असलेल्या निकेलचे बाष्प आढळले आहे. आपल्या सूर्यमालेतील धूमकेतूंमध्येही निकेल असते, परंतु 3I/ATLAS मध्ये लोहाच्या तुलनेत निकेलचे प्रमाण असामान्यपणे जास्त आहे. एक कयास असा आहे की या पाहुण्याची निर्मिती आकाशगंगेच्या अशा भागात झाली असावी जिथे 'टाईप १ए सुपरनोव्हा' या प्रक्रियेने सूर्याच्या जन्माआधी मरण पावलेल्या ताऱ्यांच्या स्फोटांतून बाहेर पडलेली 'राख' मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती.

हे एखादे परग्रहवासीयांचे यान (Spacecraft) आहे का?

3I/ATLAS च्या या आगळ्यावेगळ्या स्वरूपामुळे "हे एखादे परग्रहवासीयांचे तंत्रज्ञान असावे" असे दावे केले गेले आहेत. दावेकर्त्यांमध्ये हारवर्डचा एक खगोलशास्त्रज्ञही आहे. हे दावे सनसनाटी असल्याने प्रसारमाध्यमे त्यांना मोठी प्रसिद्धी देतात. परंतु, म्हणूनच आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ विज्ञानातीलच नव्हे, तर आयुष्यातील कोणत्याही 'अति-रोमांचक' दाव्याकडे संशयाने आणि तर्कशुद्ध विचाराने पाहणे. एखादा दावा परमपूज्य नेत्याकडून आला असो वा वैज्ञानिकाकडून. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे नैसर्गिक स्पष्टीकरण शक्य आहे, तोपर्यंत अनैसर्गिक निर्मिती ग्राह्य मानण्याचे कारण नाही.

अवकाशातून वाहत आलेल्या बाटलीतला संदेश

3I/ATLAS १९ डिसेंबर २०२५ रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ होता (पण तरी सूर्य-पृथ्वी अंतराच्या जवळजवळ दुप्पट हे अंतर होते: ~1.8 AU, सुमारे 270 दशलक्ष किमी). आता पुन्हा तो दूर जाऊ लागला आहे -- ताशी सुमारे २,२०,००० किलोमीटर वेगाने. हे एखादे यान नसले तरी, ते वैज्ञानिक दृष्टीने त्यापेक्षाही मौल्यवान आहे. हा एक प्राचीन, गोठलेला संदेश आहे. याला अभ्यासणे म्हणजे १० अब्ज वर्षांपूर्वीची आकाशगंगा कशी होती, हे पाहण्यासारखे आहे. तो पुन्हा कधीही न परतण्यासाठी निघून जाईल, पण दिसेनासा होईपर्यंत शास्त्रज्ञ अधिक निरीक्षणे करून याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतील. भविष्यात आकाशात अधिक दुर्बिणी नजर ठेवून असल्यामुळे, आपल्याला असे अनेक पाहुणे सापडतील अशी अपेक्षा आहे. जरी हे नैसर्गिकरित्या तयार झालेले पदार्थ आपल्या सूर्यमालेकडे वाहत आले असले, तरी भविष्यात एक दिवस आपली अंतराळयाने देखील असे अफाट आंतरतारकीय अंतर पार करून इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांपर्यंत कदाचित प्रवास करू शकतील.

तर्कशुद्ध विचारांची शिदोरी: दावे मोठे असतांना विचारायचे साधे प्रश्न

एखाद्या गोष्टीसाठी “अतिप्रगत तंत्रज्ञान”, “परग्रहावरून आलेले यान”, किंवा “नैसर्गिक नियमांमध्ये न बसणारे” अशी लेबले लावली जातात, तेव्हा बहुतेक वेळा काही ठराविक मुद्दे पुढे केले जातात. 3I/ATLAS बाबतही तसेच झाले. पण अशा दाव्यांकडे पाहताना, केवळ खगोलशास्त्रातच नव्हे तर आयुष्याच्या इतर अनेक क्षेत्रांतही, काही सोपे प्रश्न फार उपयुक्त ठरतात.
१. हे नैसर्गिकरीत्या होऊ शकते का?
3I/ATLAS बाबत सांगितले जाते की त्याची रचना “विचित्र” आहे—त्यात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त आहे, निकेल आढळते, आणि त्याचा वेग प्रचंड आहे.
पण प्रश्न असा विचारायचा: या सगळ्याचे नैसर्गिक स्पष्टीकरणे शक्य आहे का?
उत्तर होकारार्थी असेल, तर कृत्रिम तंत्रज्ञानाचा निष्कर्ष काढण्याची गरज उरत नाही.
इथेही तसेच आहे—धूमकेतूंचे रसायनशास्त्र, किरणोत्सर्गाचा दीर्घ परिणाम, आणि ताऱ्यांच्या स्फोटांतून आलेली द्रव्ये या सगळ्यांतून हे गुणधर्म सहज समजावता येतात.
साधा नियम: जोपर्यंत नैसर्गिक स्पष्टीकरण अपुरे ठरत नाही, तोपर्यंत असामान्य निष्कर्ष पुढे आणू नयेत.
२. यामागे उद्देश दिसतो का?
अतिप्रगत तंत्रज्ञानाचा दावा बहुतेक वेळा एखादा “हेतू” गृहित धरतो—कोणीतरी बनवले आहे, आणि त्याच्या हालचाली हेतुपूर्वक नियंत्रित केल्या जात आहेत.
म्हणून विचारायचा प्रश्न असा: या वस्तूच्या वर्तनातून असा कोणताही उद्देश दिसतो का?
3I/ATLAS कुठेही थांबत नाही, दिशा बदलण्यासाठी इंजिन वापरत नाही, कोणत्याही ग्रहाशी संवाद साधत नाही. त्याचा मार्ग गुरुत्वाकर्षण आणि सूर्याच्या उष्णतेमुळे होणाऱ्या वायू-उत्सर्जनाने जितका बदलू शकतो, तितकाच बदलतो.
साधा नियम: जर एखाद्या वस्तूचे वर्तन ज्ञात भौतिक प्रक्रियांतून पूर्णपणे समजावता येत असेल, तर त्यामागे अतिरिक्त, हेतुपूर्वक हस्तक्षेप गृहित धरण्याचे कारण उरत नाही.
३. पुरावे काय दर्शवतात?
काही वेळा एखादा घटक—इथे निकेल—पाहून लगेच निष्कर्ष काढले जातात: “हे तर औद्योगिक अवशेष असू शकतात.”
पण प्रश्न असा हवा: हा पुरावा स्वतंत्रपणे पाहिला, तर तो काय दर्शवतो?
निकेल हा ताऱ्यांमधील एक सामान्य घटक आहे. तो धूमकेतूंमध्ये अणुरूपात आढळतो, आणि तो आपल्याला अब्जावधी वर्षांपूर्वीच्या ताऱ्यांच्या स्फोटांची आठवण करून देतो.
तो कृत्रिम आहे, असे म्हणण्यासाठी अतिरिक्त, स्वतंत्र पुरावे लागतात—फक्त “अनोखा वाटतो” इतके कारण पुरेसे नसते.
साधा नियम: पुरावे स्वतः काय सांगतात ते पहावे; आपल्याला काय वाटते ते त्यांच्यावर लादू नये.
४. सगळे गुणधर्म एकत्र पाहिल्यावर काय दिसते?
शेवटचा, पण महत्त्वाचा प्रश्न: सगळे गुणधर्म एकत्र पाहिल्यावर ही वस्तू कशासारखी दिसते?
3I/ATLAS ला कोमा आहे, शेपटी आहे, बर्फ वितळून वायू बाहेर पडतो, त्याची कक्षा हायपरबोलिक आहे—हे सगळे धूमकेतूंचेच गुणधर्म आहेत.
मग ती वस्तू धूमकेतू आहे, असे मानणे हा सर्वात साधा, सुसंगत आणि पुराव्यांशी जुळणारा निष्कर्ष ठरतो.
साधा नियम: जेव्हा एखादी गोष्ट सर्व लक्षणांनी एखाद्याच वर्गात बसते, तेव्हा तिला वेगळ्या, अदृश्य वर्गात ढकलण्याची गरज नसते.

हा विचार इथेच थांबत नाही

हे प्रश्न केवळ 3I/ATLAS साठी नाहीत. ते कोणत्याही अतिरोमांचक दाव्यासाठी लागू होतात—वैद्यकीय चमत्कार, AI बद्दलचे दावे, राजकीय कटसिद्धांत, किंवा रोजच्या आयुष्यातील अफवा. विज्ञान म्हणजे उत्तरांची यादी नाही; योग्य प्रश्न विचारण्याची शिस्त असते.

=============================

माझ्या इतर लेखनासाठी पहा: https://ashishmahabal.github.io/writings/index.html

विषय: 
प्रकार: 

छान माहिती. ह्या असल्या पाहुण्याबद्दल आजवर काहीच वाचले नसल्याने प्रथम प्रतिक्रिया सावधपणाची होती, म्हणजे जे नैसर्गिक नसुन कृत्रिम असावे ही.

शेवटचा भाग व शेवटचे वाक्य विचारात पाडणारे आहे.

केवळ दुर्बिणीतुन पाहुन यात किती पाणी बर्फ कार्बन ओक्सिजन निकेल आहे हे कसे कळते?

धन्यवाद आश्चिग. मराठीतून खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.

>१. कार्बन डायऑक्साइडचा 'राक्षस': 3I/ATLAS मध्ये पाण्याच्या बर्फाच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडच्या बर्फाचे प्रमाण ८:१ इतके आहे. आजवर कोणत्याही धूमकेतूंमध्ये दिसलेल्या उच्चतम मूल्यांपैकी एक आहे.
यावरून असे सूचित होते की, या धूमकेतूची निर्मिती त्याच्या मूळ ताऱ्यापासून खूप दूर,

याबद्दल थोडे उलगडून सांगणार का? मूळात धूमकेतू म्हणजे त्याला कक्षा आहे आणि कुठल्या तरी तार्‍याभोवती तो वेगात फिरत आहे. जर त्याची निर्मिती तार्‍यापासून दूर झाली असेल तर त्याला कुठल्यातरी कक्षेत इतक्या वेगात फिरण्यासाठी उर्जा कुठून मिळाली?
असे शक्य आहे का दोन खूप मोठ्या तार्‍यांची टक्कर झाली आणि त्यातून बाहेर पडलेले वस्तूमान भलत्याच दिशेत खूप जोराने बाहेर पडले आणि आता ते 3I/ATLAS बनून कुठल्याच तार्‍याभोवती न फिरता भलत्याच दिशेने आणि कक्षेत फिरू लागले आहे ?