दाणा मुठियानू शाक

Submitted by लंपन on 21 December, 2025 - 04:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य
मुठिया -
पाऊण (मोठा) कप बेसन पीठ,
त्याच कपाने पाव कप जाड गव्हाचे पीठ (दाल बाटी साठी वापरतो ते),
दीड कप बारीक चिरलेली मेथी,
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
दीड चमचा साखर,
दीड चमचा लिंबू रस,
अर्धा चमचा मिरची आणि आले ह्यांची पेस्ट,
अर्धा टी स्पून हळद,
एक टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर,
हिंग,
गरम मसाला अर्धा टी स्पून,
अर्धा टी स्पून धने जिरे पावडर,
दोन चमचे तेल,
ओवा आणि मीठ चवीप्रमाणे.

ग्रेव्ही साठी साहित्य:
एक कप तुरीचे दाणे (मीठ आणि हळद घालून दोन शिट्ट्या काढून वाफवलेले).
तीन मोठ्या टोमॅटो ची प्युरी (टोमॅटो न शिजवता मिक्सर मधून काढावेत),
तीन वाट्या गरम पाणी,
चार मुठिया गोळे कुस्करून,
अर्धा टी स्पून हळद,
अर्धा चमचा आले मिरची पेस्ट,
एक टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर,
एक टी स्पून गरम मसाला,
दोन चमचे साखर,
एक टी स्पून धने जिरे पावडर,
फोडणीसाठी दोन डाव तेल, दोन अखंड काश्मिरी मिरच्या,जिरे, हिंग.

क्रमवार पाककृती: 

मुठिया साठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र करावेत, पिठाला व्यवस्थित चोळून घ्यावेत. आता अगदी थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. पीठ मळताना पाणी अगदी हबका मारत पीठ मळावे. खूप कमी पाणी लागते. आता लगेच ह्याचे गुलाबजाम च्या आकाराचे गोळे करावेत. गरम तेलात हे गोळे एकाच बॅच मध्ये सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. एवढ्या पिठात वीस गोळे होतात.
IMG20251221133332~2.jpg
आता एका कढईत प्रथम तेल घ्यावे तेल तापले की त्यात जिरे, हिंग, दोन काश्मिरी लाल मिरच्या, आले लसूण पेस्ट घालावी आणि एक मिनिट परतावे. आता त्यात टोमॅटो प्युरी घालावी. आता लगेच हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला, मीठ आणि साखर घालावे. आता झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत वाफ काढावी. तेल सुटले की त्यात शिजवलेले तुरीचे दाणे घालावेत. तीन वाट्या गरम पाणी घालावे. दोन तीन मिनिट चांगली उकळी आणावी. आता ह्यात ग्रेव्ही मिळून येण्यासाठी कुस्करलेल्या मुठिया घालाव्या आणि इतर मुठिया गोळे पण घालावेत. परत पाच मिनिट शिजवून घ्यावे.
IMG20251221141926~2.jpgIMG20251221141126~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

गव्हाचे पीठ जाडसरच घ्यावे. मोठ्या गिरण्यात बाटीचे वेगळे पीठ मिळते ते घ्यावे.
ह्या भाजी बरोबर पुरीच हवी.
मुठिया करताना एकाच वाटीने पीठ, कोथिंबीर, मेथी प्रमाण घ्यावे. लिंबू साखर गरम मसाला पावडर ओवा वगळू नयेत. कांदा लसूण अजिबात नको.
नुसत्या मुठिया पण छान लागतात. चहा बरोबर भजीला पर्याय.
तुरीचे दाणे सध्या चांगले मिळत आहेत. भाजी खूपच चविष्ट होते, नक्की करून बघा.

माहितीचा स्रोत: 
युट्यूब, धर्मिज किचन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑटाफे

सचित्र, स्टेप बाय स्टेप कृती = 👌

मी आजच पाव किलो तुरीच्या शेंगा आणल्या आहेत. त्याचे दाणे किती निघतात बघते. पुढच्या रविवारी ही भाजी करायचा विचार आहे.
वरच्या साहित्यात किती जणांसाठी भाजी होईल. भाजीप्रेमी चार लोकं आहेत.
घरात मिरगुंडं आहेत आणि शेतावरची हळद+आवळे+आलं असं लोणचं आज केलं आहे. लंपन ह्यांच्या ताटाची कॉपी करता येईल!!

निर्मल, अनिंद्य , अमित, मंजूताई, अनाया, सिमरन, सामो, प्राजक्ता धन्यवाद.
सिमरन एक बटाटा पापड आहे आणि एक हळदीचे लोणचे आहे, अनिंद्य एक गेस बरोबर. Happy
अनया, चार लोकांना पुरेल. तुरीचे दाणे हवंतर अजून अर्धा पाव घ्या. पावशेर मध्ये पन्नास ग्रॅम तर नक्कीच फेकून द्यावे लागतात. भरपूर अळ्या आणि किड असते आतून. आणि मेजरिंग कप सेट मधला सर्वात मोठावाला कप घ्या मुठिया प्रमाणासाठी म्हणजे जास्त होतील.
मंजूताई करून बघा नक्की आवडेल. घरी लहान मेंबर पासून सगळ्यांना फारच आवडली.

लंपन
मस्तच दिसतेय रेसिपी.
गव्हाचे जाडसर पीठ. Noted
तुरीच्या शेंगा बाजारात आल्यात. मसाले भातासाठी आणल्या होत्या. असाही उंधियु करायचा आहे. त्याबरोबर हे नक्की करून बघेन.
कांदा लसूण नाही. लसणीची पात घातली तर.

ऋतू, भक्ती, वावे , कृष्णा, अल्पना धन्यवाद.
भक्ती अंदाज येत नाहीये कशी चव लागेल ह्याचा. पुन्हा बाजरी ग्रेव्ही शोषून घेईल का माहीत नाही. ते मुठिया जर टणक झाले तर मजा येणार नाही. बाजरी घेतलीच तर बहुदा रवा घालावा लागेल.
ऋतुराज उंधियो आणि इतर गुजराती हिवाळी भाज्यात हिरवा लसूण असतो चांगला लागेल पण एकदा रेसिपी जशीच्या तशी करून बघ.
अल्पना चांगला लागेल हरभरा. पावटा किंवा इतर काही कडवट घेण्यापेक्षा चांगला लागेल. डबल बी पण चांगली लागेल.

अल्पना, इथे फ्रोजन तूर दाणे मिळतात. तिकडे बघू शकतेस.
तूर नाहीच मिळाली तर मी एडिमामे ( कोवळे सोयाबीन) घालून करुन बघणार आहे.

फ्रोजन कधी बघितले नाही मी ग्रोसरी मध्ये. ताजे हरभरे सहज मिळतात, फ्रोजन एडमामे पण मिळतात काही ठिकाणी.
गुज्जू दुकानदाराला विचारून बघते, कदाचित त्याला माहीत असेल.

Happy मस्तच रेसिपी. इथे फ्रोजन तूर मिळते, तिची आमटी करते बरेचदा. हेही करून बघेन. मुठिया आप्पेपात्रात करून बघता येतील. फार जड, भरीव न करता केले तर आप्पेपात्रात परतूनही बरे होतील - अशा आयडिया येत आहेत.

येडमामे नको बरं, उग्र आणि निबर असतात. कोवळे सोयाबीनच आहेत , तुरीची बरोबरी नाही. मला जरा रागच आहे येडमाम्यांचा. Lol

मस्त पाककृती.
मला नुसती तुरीच्या दाण्याची आमटी करून बघावीशी वाटतेय. पण ती मिळून येण्यासाठी मुठिया लागतीलच कृतीप्रमाणे.
त्या ऐवजी काय करायचं?

भारी दिसतंय
लंपन काहीतरी हटके रेसिपी घेउन येतो नेहमी

लंपन आजच केली ही रेसिपी. सोबत ज्वारीची भाकरी. फर्मास लागत होती. मी मुठिया थोडे चपटे बनवले व डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केले.IMG_0216.jpeg

अरे व्वा माझेमन मस्त दिसत आहे भाजी. खूप खूप धन्यवाद. आवडली हे वाचून छान वाटले.
अस्मिता, जाई , झकोबा :), स्वानंदी, सामो धन्यवाद. जाई इथे बहुदा आहे पाकृ तुरीच्या दाण्यांच्या आमटीची.

लंपन, मस्त पाककृती.
विशेष म्हणजे पाककृतीमधल्या तुमच्या सूचना अगदी नेमक्या असतात.

Pages