आऊट ऑफ आफ्रिका ?

Submitted by रानभुली on 6 December, 2025 - 04:51

आउट ऑफ आफ्रिका ही थिअरी आज फेसबुकवर वाचली. विस्कळीत स्वरूपात अधून मधून समोर आलेली आहे. पण खोलात जायचे कष्ट घेतले नाहीत.
https://www.facebook.com/rupali.girme.311/posts/pfbid06tCGfGaPGbxtroKBDC...

गेम ऑफ थ्रोन्स बघताना नऊ वर्षे (कि सात) विंटर नंतर तितकाच काळ उन्हाळा हे ऐकताना हे कोणत्या काळातले आहे असे प्रश्न पडू लागले होते. पण लोखंडाची हत्यारे, अवजारे वापरताना दिसतात. सोन्याची नाणी आहेत आणि आधुनिक मानवाप्रमाणे राजवाडे आहेत. या मालिकेतली सात राज्ये ही इंग्ल्ड किंवा युरोप वाटतात. अजून दुसराच सीझन चालू आहे. बघताना प्रश्न पडत होते ( जास्त प्रश्न पडू देऊ नकोस बाई, आहे ते मुकाट्याने बघ असं मन सांगत होतं , पण दुसरं मन हिंदी पिक्चर सारखं समोर येऊन तीन तीनदा प्रश्न विचारत होतं) कि आफ्रिकेत उत्क्रांत होऊन माणूस एव्हढ्या थंडीत का मरायला आला असेल ?

तो मध्यपूर्वेत गेला असेल. तिथे खाण्याची आबाळ झाली तर भारतात आला असेल. चीन मधे गेला असेल. पण मग मरायला सर्बेरियात कशाला गेला ? माणूस जिथे आराम असेल, सुरक्षित असेल आणि खाण्यापिण्याची सोय असेल तिथेच जाईल ना ? आईसर्लंड, ग्रीनलॅंड, नॉर्वे ला गेला असेल ? ( स्थलांतर करताना जिथे जास्त सुरक्षित आणि सोयीचे वाटले तिथे ते सेटल झाले, त्यांच्यात बदल झाले, म्हणजे त्यांचा हा अधिवास त्यांना सोयीचा होता. असे होते तर अन्य प्रांतात पुन्हा स्थलांतर का केले ? कारण ते त्यांच्या अधिवासानुरूप उत्क्रांत झालेच होते. रोमन लोकांनी पाच सहा हजार वर्षांपासून आफ्रिकेतून कृष्णवर्णीय लोकांना गुलाम म्हणून तिकडे नेले. मग पाच हजार वर्षात या गुलामांमधे (संकर वगळता) बदल का झाले नाहीत ? )

बरं युरोपात गेलेले होमोसेपियन्स गोरेपान, निळ्या डोळ्यांचे, उंचे पुरे, चेहरेपट्टी, बांधा हे आधुनिक सौंदर्यशास्त्राप्रमाणे सर्वात सुंदर लाभलेले तर चीन मधल्या होमोसेपियन्सचे डोळे पिचपिचे का झाले ? त्यांचा रंग पिवळसर ( गोराच म्हणा ) आणि केसांची ठेवण वेगळीच कशी काय ? मंगोलियाच्या पलिकडे आणि रशियाच्या खाली असलेल्या प्रांतातले लोक हूणांसारखे आडदांड, पण गोरेपान आणि सुंदर कसे ? हुणांनीच सर्व जगावर आक्रमण केल्याने पर्शियात त्यांच्यासारखे लोक असतील हे खरे. पण चीन मधे माचुपिचु डोळे आणि मंगोलियाच्या पलिकडे कुर्द, राजपूत आणि पठाणांसारखे लोक कसे काय ?

ही उत्क्रांती कशी काय झाली असेल ? मला ही भानगड जटील वाटते. आधुनिक काही स्टडीज या दिशेने बोट दाखवतात.
https://www.cam.ac.uk/research/news/genetic-study-reveals-hidden-chapter...

९८% शास्त्रज्ञ आउट ऑफ आफ्रिका थिअरीला मान्यता देतात. तर थोडे शास्त्रज्ञ एम आर ओ ( मल्टिरिजन ओरिजिन) वर विश्वास ठेवतात. मी अभ्यासक नाही. संशोधक तर मुळीच नाही. आमचं गाव अर्ध्या हळकुंडाचं आहे. Happy
म्हणून उत्तरं देताना पहिलीच्या विद्यार्थ्याला पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीजच्या लेव्हलने देऊ नये ही नम्र विनंती. काही तरी समजेल असं बघा.

मल्टी रीजन थिअरीवर १००% विश्वास नसला तरी ती मनाला पटते. ( कसलाही अभ्यास नसताना Proud ).
प्राचीन होमे इरेक्टसचे फॉसिल एव्हिडन्स आहेत ते विविध भागात सापडले आहेत.
जावा मॅन - इंडोनेशिया
पेकिंग मॅन - चीन
जेनेटिक मिश्रण पुरावा - (Genetic Introgression): आधुनिक मानवात archaic (जसे Neanderthals आणि Denisovans) चे DNA मिसळलेले आहेत. असे एम आर ओ थिअरी चे समर्थक सांगतात. जास्त खोलात जात नाही. या क्षेत्रातल्या तज्ञांना मी सांगणे योग्य नाही. जिज्ञासू गुगळून घेऊ शकतात.

आउट ऑफ आफ्रिका ( ओ ओ ए म्हणूयात का ) थिअरीचे समर्थक पुराव्यांची संख्या हा महत्वाचा घटक पुढे करतात. जास्तीत जास्त पुरावे हे आफ्रिकेत सापडतात. एव्होल्युशन प्रमाणे जास्त प्राचीन जीवाश्म आफ्रिकेत सापडतात.

पण अशा थिअरीज मधे सुतावरून स्वर्ग गाठलाय का अशी शंका माझ्यासारख्या अडाण्यांच्या मनात घर करून असते.
म्हणजे ते स्थलांतर करू लागले आणि हवामानाप्रमाणे त्यांच्या जेनेटिक ड्रिफ्ट झाले. जेनेटिक ड्रिफ्ट हा अंदाज आहे का ? आधुनिक मेडीकल सायन्स डीएनएचा स्टडी करून हे कन्फर्म करू शकते का ? किंवा केलेले आहे का ? तसे असेल तर हे मान्य करावे लागेल.

दुसरे म्हणजे स्थलांतर होताना त्यांचे संकर झाले. तर संकर कुणाशी झाले ?
संकर होण्यासाठी वेगळ्या जेनेटिक क्वालिटीज असलेल्या समूहांची गरज आहे. पुन्हा संकर प्रमाण खूप कमी आहे.
जर मूळ होमो सेपिएन हे एकसारखे होते तर आज असलेले वैविध्य फक्त जेनेटिक ड्रिफ्ट मुळे आले का ?

ए आय ला प्रश्न विचारून फायदा नाही. कारण तो तर्का धारित उत्तरे देऊ शकत नाही (अशा केस मधे).
मी काही वर्षांपूर्वी नॅटजिओ किंवा डिस्कवरी चॅनेलच्या फिल्म्स पाहिल्या आहेत. त्यात अंटार्क्टिका मधे बर्फाखाली डायनासोर्सचे अवशेष सापडले. पण त्यानंतर विकसित झालेले काही प्राणी सापडले असेही म्हटलेले आहे. (बीबीसी ने २०२३ साली रिपोर्ट प्रकाशित केला आहे).

चीन मधे एका गुहेत डायनासोरचे अंडे सापडल्याचा उल्लेख मायबोलीवरच वाचला आहे. त्या वेळी तिथे दिलेल्या लिंकवर जाऊन पाहिले होते. ऑथेंटिक माहिती होती. (२०२४ रिपोर्ट, Nature).
https://www.quora.com/What-are-some-alternative-theories-to-the-out-of-A...

चीन मधले जीवाश्म जे आउट ऑफ आफ्रिका थिअरीला छेद देतात.
https://www.quora.com/What-are-some-alternative-theories-to-the-out-of-A...

रशियात ४५०० वर्षे जुने शहर सापडले. ही उत्क्रांती नाही. पण हा पुरावा हे सांगतो कि ही संस्कृती इथल्या लोकल मानवी समूहातून विकसित झाली असेल.
https://www.quora.com/What-are-some-alternative-theories-to-the-out-of-A...

काँटिनेन्ट ड्रिफ्ट २०० मिलियन वर्षे आणि डायनासोर्स ६५ मिलिअन वर्षे जुने. मग ६५ वर्षे मिलिअन वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले डायनासोर्स अंटार्किटाकवर कसे पोहोचले ? उडून किंवा पोहून याला आधार नाही. हा अंदाज आहे.

जावा सुमात्रा बेटावरचे आदिवासी एकदम वेगळे कसे ? दक्षिण भारतीयांचा डीएनए आणि रूप रंग आफ्रिकनांपेक्षा का बदलले नाहीत ? ब्राऊन रंगाची भारतीय कुठून विकसित झाले असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे फक्त आउट ऑफ थिअरी म्हणून देणे अपुरे वाटतेय.

माझा एक अंदाज आहे. हा अडाण्यांचा ठोकताळा म्हणा हवं तर, ( माझ्यासारखेच वाटणारे कुणी आहेत का ? स्वतःला अडाणी क्लबमधे सामील करून घ्यायला आवडेल का?)

आफिकेत जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वी आणि गोंडवाना किंवा पँगिया खंड एकत्रित असताना त्याच्या विविध भागात एकच अवस्था असेल का ? हा खंड विभाजित होऊन दूर गेल्यानंतर साधारण ६५ लाख वर्षांपूर्वी अंटार्क्टिका आणि चीन मधे एकाच वेळी डायनासोर उत्पन्न झाले असतील का ?
अंटार्क्टिका मधे ते प्रतिकूल हवामानामुळे नष्ट झाले असतील. ( जेव्हां अंटार्क्टिका खंड आज आहे तिथे पोहोचला आणि हवामान राहण्यायोग्य राहिले नाही. चीन मधे अन्नसाखळी विकसित न होणे असे अनेक घटक असावेत. जीवांचा विकास सगळीकडे एकसारखाच झाला आणि खंडांच्या हवामानांमूळे ते वेगवेगळे गुणधर्म घेऊन उत्क्रांत झाले असावेत का ?

या थिअरीला पुराव्यांची संख्या ही मर्यादा आहे.
पण आफ्रिका खंडात विकास नसल्याने पुरावे शाबूत राहिले असावेत. अन्य भागात संस्कुतींचे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले. शेती वगैरे मुळे जमिनीचे उत्खनन होऊन पुरावे नष्ट झाले असतील.

अंटार्क्टिका मधे बर्फामुळे जीवाश्म टिकून राहिले. इथल्या अभ्यासाचे निष्कर्ष काय आहेत ? ते क्रांतीकारी ठरतील का ?

आणखी एक शंका आहे.
समजा माणूस स्थलांतरीत झाला. स्थलांतर करताना तो कुठे सेटल होईल ? जिथे त्याला बरं वाटेल तिथेच ना ?
मग युरोपिअन्स जगभरात कशाला आक्रमणे करत फिरत होते ? हूण, कुशाण आणि शक का सगळीकडे अन्नाच्या शोधात आक्रमणे करत होते? मंगोलियन्स ( चंगेज खान) ला अन्नधान्याच्या शोधात आक्रमणे का करावी लागली ? टर्की लोक भारतात का आले ?

आक्रमणांवरून आठवलं.
इतर प्राण्यांचा स्टडी झाला आहे का ? इव्होल्युशनच्या टेबलचा नाही, अन्य प्रांतात प्राण्यांच्या जीवाश्माबाबतचा स्टडी झाला आहे का ? चीन मधे ६० मिलियन वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडणे आणि अंटार्क्टिकात ९० मिलियन वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडणे स्थलांतर थिअरीला पुष्टी देत नाहीत. अंटार्क्टिका वर स्थलांतर होणे अवघड आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व आजूबाजूच्या बेटांवर आदिम जमातींचं स्थलांतर होणे.

भारतात आर्य येण्यापूर्वी घोडा का नव्हता ? हत्ती होता. हत्ती आफ्रिकेतही आहे. भारतीय उपखंड आफ्रिकेपासून विलग होऊन तिबेटला धडकले ही ड्रिफ्टची सगळ्यात लेटेस्ट घडामोड आहे ना ? आज पुन्हा आफ्रिका खंड विभाजित होतोय. आजपासून लाखो वर्षांनी आताच्या पूर्व आफ्रिकेतले (विलग होत असलेला खंड जेव्हा रशियाच्या स्थानी जाईल तेव्हा ) लोक गोरेपान होतील का ? मेडीकल सायन्स आज हे सांगू शकते का ?
काय वाटते ?

( पाचवीतल्या विद्यार्थांनी आईनस्टाईनला तुझे म्हणणे मला पटत नाही असे म्हणण्यासारखे आहे. पण जे आहे ते आहे Proud )
सोप्प करून लिहा बरं का. कोडी घालू नका. उत्तरंच द्या, प्रतिप्रश्न करू नका Lol मजेने म्हटलंय.

डार्विनच्या सिद्धांताबद्दल काहीच म्हटलेलं नाही त्याचं कारण म्हणजे दोन्ही थिअरीज मधे डार्विनचा सिद्धांत सारखाच लागू होईल. ओ ओ ए मधे हवामानानुसार डीएनए मधे बदल झाले आणि मल्टी रीजन ओरिजिन मधेही सगळीकडे एकाच पद्धतीने उत्क्रांती झाली असे मानले तरी दोन्हीकडे हा सिद्धांत सारखाच लागू होईल. होमो सेपिअनमधे असलेल्या माकडाच्या डीएनएची ब्ल्युप्रिंट सारखीच राहील. वर्ण, उंची, रंग, रूप, आवाज इत्यादी गुणसूत्रे बदललेली आढळतील.

हास्यास्पद प्रश्न असेल तर इग्नोर करा (सांगायची गरजच नाही Lol )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका चिनी जोडप्याच्या मुलीचा जन्म सोनेरी केस आणि निळ्या डोळ्यांनी झाला. डीएनए चाचण्यांवरून ती त्यांचीच असल्याचे सिद्ध होत होते.

काय कारण असावे?

तर तिचे पणजोबा रशियन होते.
३ पिढ्यांसाठी लपलेले रिसेसिव्ह जीन्स...

नंतर एकदम बूम होऊन प्रकटले!

चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद, रानभुली. ‌

लेख वाचला आहे, अनेक मुद्दे माझ्याच मनातले मांडले आहेत असे वाटले. सविस्तर नंतर लिहीन.

कि आफ्रिकेत उत्क्रांत होऊन माणूस एव्हढ्या थंडीत का मरायला आला असेल ? >>>> मी काही यातला तज्ञ नाही, पण स्थलांतर हे एवढे साधे सोपे नसावे. आजही इतक्या प्रगत जगात शहरामध्ये इतक्या सोयी सुविधा असूनही काही लोक उत्तरेकडे बर्फात इग्लू मध्ये राहतात, किंवा अंदमान बेटांवर आदिम अवस्थेत राहतात.

काही स्थलांतरे दीर्घ अंतराची तर काही अगदी छोट्या अंतराची असू शकतात. (उदा. एका गावातील काही लोक नवीन शेतजमिनीच्या शोधात नदीच्या काठाने थोडे पुढे गेले व नवीन वस्ती वसवून राहू लागले.) अशी छोट्या अंतराची स्थलांतरे मोठ्या कालखंडात मोठे अंतर कापू शकतात. त्यांच्या पिढ्या हळूहळू पुढे सरकत राहतात. पुढच्या पिढ्यांना थोडेच माहित असते कि आपले पूर्वज कोठून आले व तेथील हवामान काय आहे?
स्थलांतराचा हेतू हा नवीन साधनसंपत्तीचा शोध (शेतजमीन, पाणी, पाळीव प्राणी), सुरक्षा, इत्यादी असू शकतो. (उदा. एका ठिकाणी शत्रूचे हल्ले होत असतील तर तेथील काही लोक खूप दूर राहायला जाऊ शकतात.) या रेट्यामुळे नवीन हवामानाशी जुळवून घेतले जात असावे.
नवीन ठिकाणच्या हवामानाला जुळवून घेण्याची हळूहळू सवय लागत गेली असावी. म्हणजे प्राण्याच्या फरचे, कातडीचे कपडे शिवणे, इत्यादी. किंवा ज्यांना नवीन हवामान कमी त्रासदायक आहे तेच पुढे जातात. (उदा . आजही ज्यांना थन्डी सहन होते तेच लोक इंग्लंड अमेरिकेला जातात.) ब्रिटिश भारतात आले तेंव्हा त्यांनाही भारतातील कडक उन्हाळा सहन होत नसे. पण त्यांची साधनसंपत्तीची हाव त्यांना या त्रासावर मात करून इथे २०० वर्षे ठाण मांडून बसू देऊ शकली.
खूप मोठ्या अंतरा व कालखंडानंतर परत फिरण्याचा मार्ग बंद होतो. असा काही मार्ग असतो हेच माहित नसते.
मला नॉर्वेला जायचे आहे म्हणून मानव आफ्रिकेतून बाहेर पडला नाही. तो फक्त अन्नाच्या, सुरक्षेच्या शोधात काही पावले पुढे गेला. इतकेच. आणि मग पिढ्यान पिढ्या मजल-दरमजल करीत नॉर्वेत पोचला.

माबो वाचक भारी लिहिलंय. तुम्ही वाचक असल्याने जास्त माहिती आहे तुम्हाला.
लेखक वरून वाचक पदी प्रमोशन झाले तर एव्हढे सगळे वाचावे लागेल. नकोत ते.

मी या विषयातला तज्ज्ञ नाही, पण सामान्य माणूस म्हणून विचार करताना “मानव फक्त आफ्रिकेतच उत्पन्न झाला आणि नंतर सगळ्या जगात पसरला” ही कल्पना मला पूर्णपणे पटत नाही. निसर्गाचा मूलभूत नियमच वैविध्याचा आहे. झाडं-प्राणी प्रत्येक भागात वेगळे दिसतात, तर मानवही वेगवेगळ्या भागात स्वतंत्रपणे उत्क्रांत झाला असावा, असं वाटणं चूक आहे का?

माझ्या माहितीनुसार व समजुतीनुसार जगभरात पाच प्रकारचे त्वचा रंग (व इतर शरीरवैशिष्ट्ये) असलेले लोक दिसतात; गोरे - युरोपिअन, काळे - आफ्रिकन, तांबडे - मूळ अमेरिकन, पिंगट - चिनी, कोरियन, सावळे - भारतीय. हा फरक केवळ ५०-६० हजार वर्षांच्या स्थलांतरात झाला, हे मनाला पटायला जरा अवघड वाटतं. “हवामानामुळे फरक पडला” हे उत्तर शास्त्रीय असू शकतं, पण सामान्य बुद्धीला ते अपुरं वाटतं.

डायनासोर अंटार्क्टिका, चीन अशा ठिकाणी सापडतात; खंड एकेकाळी जोडलेले होते. त्यामुळे जीवसृष्टी वेगवेगळ्या भागांत स्वतंत्रपणे विकसित झाली असावी, ही कल्पनाही अशक्य वाटत नाही.

स्थलांतर जर फक्त “सुरक्षा व अन्न म्हणून” असतं, तर हूण, मंगोल, तुर्क, युरोपियन लोकांनी जग जिंकायला आक्रमणं का केली? यावरून असं वाटतं की मानवाचा इतिहास केवळ गरजेचा नाही, तर सत्तेचाही आहे.

“९८% शास्त्रज्ञ Out of Africa मानतात” हे महत्त्वाचं आहे, पण विज्ञान इतिहासात अनेकदा आधीचे सिद्धांत बदललेलेही आहेत. म्हणून प्रश्न विचारणं चुकीचं नाही.

माबो वाचक आणि वामन राव दोघांचे प्रतिसाद आवडले. विचार प्रवर्तक आहेत.
हा प्रश्न वेडगळ असेल म्हणून अनैक वर्षे मनात घोळत असूनही कुठेच विचारले नव्हते. शेवटी हिय्या करून इथे विचारला. किमान कुणाला तरी असे वाटते याचे समाधान आहे.
पुन्हा येईन वाचायला आणि बोलायला. Happy

मला नॉर्वेला जायचे आहे म्हणून मानव आफ्रिकेतून बाहेर पडला नाही. >> हे मान्य आहे. स्थलांतराच्या थिअरीवर मला जे म्हणायचं आहे ते असं कि माणूस त्या त्या प्रांतात राहून उत्क्रांत झाला. जीन उत्क्रांती कधी होते या प्रश्नाचं उत्तर मला कमीत कमी दहा हजार वर्षे असं मिळालं आहे. म्हणजे सैबेरियात गेलेला माणूस त्या हवामानाला सरावला, त्याचा डीएनए उत्क्रांत झाला, त्याच्यात जनुकीय बदल झाले. या गोष्टीला किमान दहा हजार वर्षे होऊन गेली आहेत. म्हणजे त्याचा हा अधिवास झाला. तो इथे सेटल झाला. याचा अर्थ तिथे त्याला अनुकूल वातावरण मिळाल्याशिवाय का तो तिथे इतकी वर्षे राहीला ?

मग युरोपियन्सना युरोप मधे अनुकूल प्रदेश असताना त्यांनी पुन्हा स्थलांतर का केले हा प्रश्न होता. भूक, सत्ता हू उत्तरे पण आली आहेत.
भूक हे उत्तर असेल तर दहा हजार वर्षे तिथे त्यांची भूक भागली असेलच ना ?

बाळबोध शंका:
असं, म्हणजे पृथ्वीवर एकाच ठिकाणी उत्पन्न होऊन मग जगभर पसरणं हे फक्त मानव जातीतच झालं का इतरही प्राण्यांमध्ये झालं?

हीच शंका मलाही आहे. अंटार्क्टिका वर सापडलेल्या जीवाश्मांबद्दल काय संशोधन झालं हे शोधायला हवं.

पृथ्वीवर एकाच ठिकाणी उत्पन्न होऊन मग जगभर पसरणं हे फक्त मानव जातीतच झालं का इतरही प्राण्यांमध्ये झालं? >>> इतरही प्राण्यांत झाले असावे. झुरळ, मुंग्या, पक्षी हि नावे पटकन माझ्या डोळ्यासमोर येतात. माझ्या माहितीप्रमाणे हे अंटार्क्टिका वगळता सर्वत्र आहेत. हत्ती, सिंह सुद्धा आफ्रिकेत आणि भारतात आहेत. अमेरिकेत सुद्धा हत्तीचा मॅमथ नावाचा प्रकार होता जो आता नष्ट झाला आहे. वाघ भारतात आहेत, सैबेरियामध्ये पांढरा वाघ आहे.
माणूस सुद्धा आपल्याबरोबर इतरांना घेऊन गेला. उदा. गहू, गुरेढोरे, कोंबड्या, अनेक आजारांचे जंतू.

या विषयावर युवाल नोव्हा हरिरि यांचे सेपियन्स नावाचे खूप सुंदर गाजलेले पुस्तक आहे. मराठीतही भाषांतर झाले आहे.

या विषयावर युवाल नोव्हा हरिरि यांचे सेपियन्स नावाचे खूप सुंदर गाजलेले पुस्तक आहे. >> हे वाचायचे राहिले आहे. पण यातला थॉट आवडतो. बरेचदा मलाही हाच प्रश्न पडतो कि माणूस आधुनिक होत गेला तसा जगाचा विनाश व्हायला सुरूवात झाली. शेतीने वन नष्ट होत गेलं. आगीने वातावरण. पण गेल्या साठ सत्तर वर्षात सर्वात जास्त विध्वंस झाला आहे.

पुस्तक वाचलेले नाही. पण यात Cognitive Revolution वर भर आहे का ? होमो सेपिअन्सचे स्थलांतर आणि आधुनिक मानव. तो स्वतःच कसा कांतीचा गुलाम होत गेला ही थीम आहे असं ऐकलंय. आईस एजच्या सुरूवातीपासून आहे का ?

Neanderthals – Homo neanderthalensis चा उल्लेख आहे कि नाही कल्पना नाही. पण ही प्रजाती होमो सेपिअन्सपेक्षा जुनी आहे. १,४०,००० ते ७०,००० वर्षे. यांचा अधिवास युरोप, आशिया खंडात होता. आईस एज मधे ते नष्ट झाले. माझा अभ्यास नाही.
पन एक शंका आहे. कि होमो सेपिअन्स आईस एज मधे टिकले आणि Homo neanderthalensis जे थंड हवामानासाठी अनुकूल होते ते नष्ट कसे झाले ? त्यांचा डीएनए आजच्या २०% मानवामधे आहे. कदाचित खोल अभ्यास नसल्याने गोंधळ उडत असेल.

आकलन असं होतंय कि Homo neanderthalensis आणि सेपिअन्स यांचा संकर झाला हा निष्कर्ष काढण्याइतका पुरेसा पुरावा आहे का ?
अंटार्क्टिका आणि चीन मधल्या गुहेबद्दल पण असंच आहे. संदर्भ सापडले कि येईन पुन्हा.

आकलन असं होतंय कि Homo neanderthalensis आणि सेपिअन्स यांचा संकर झाला हा निष्कर्ष काढण्याइतका पुरेसा पुरावा आहे का ? >>>> कुठेतरी वाचल्याचं आठवतंय कि युरोपीय लोकांमध्ये निअँडर्थल चे काही जनुके सापडली आहेत. त्यामुळे संकर झाला होता असा निष्कर्ष काढायला जागा आहे. पण तो संकर खूप छोट्या प्रमाणात असावा. बहुसंख्य निअँडर्थल हे सिपियन शी झालेल्या संघर्षात नष्ट झाले का??

मी हि बरेच दिवस झाले पुस्तक वाचून. त्यामुळे नेमके आठवत नाही. पण त्यात माणूस काल्पनिक कथा कशा तयार करतो आणि त्यावर विश्वास ठेऊन कसा वागतो आणि त्यामुळे त्याची भरभराट कशी झाली हे वाचल्याचे आठवतेय.