मुंबईतील किल्ले -- भाग ४

Submitted by मध्यलोक on 30 November, 2025 - 12:34

मुंबईतील किल्ले -- भाग १ - https://www.maayboli.com/node/61998
मुंबईतील किल्ले -- भाग २ - https://www.maayboli.com/node/62437
मुंबईतील किल्ले -- भाग ३ - https://madhyalok.wordpress.com/2018/08/24/forts-of-mumbai-part-3/
=========================================================================================

00. Mumbai Forts Without Name.png

हे सगळं सुरू झालं ते २०१७ साली ऑफिस मध्ये झालेल्या एका छोट्या संभाषणातून, माझा सहकारी म्हणाला होता, “मुंबईत किल्ले नाहीत!”. त्यानंतर मी आणि रुचिराने मुंबईतील सर्व किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प केला होता आणि पुढे त्याच वर्षी मी या मालिकेचा पहिला ब्लॉग प्रकाशित केला. गेल्या काही वर्षात ही गोष्ट आमच्या विस्मृतीत गेली होती आणि लिखाणांची मालिका अधुरी राहिली होती - पण हे सगळे किल्ले बघण्याच्या विचार मनातून कधीच गेला नव्हता. मनात सतत एक टोचणी लागत राहिली, की काहीतरी अपूर्ण राहिलंय. अखेर मुंबईतील सर्व ८ किल्ल्यांना भेट देण्याचं स्वतःलाच दिलेलं आव्हान पूर्ण करायला आम्हाला तब्बल ८ वर्षे लागली.
पहिली मोहीम हि “मुंबईतील किल्ले” पाहण्याच्या उद्देशाने होती. त्या मोहिमेत एकाच दिवशी आम्ही ६ किल्ले पाहिले:
1. सेंट जॉर्ज किल्ला
2. शिवडी किल्ला
3. रिवा किल्ला
4. सायन किल्ला
5. काळा (धारावी) किल्ला
6. वरळी किल्ला
या किल्ल्यांची माहिती मी दोन भागांत प्रकाशित केली होती:
मुंबईतील किल्ले -- भाग १ - https://www.maayboli.com/node/61998
मुंबईतील किल्ले -- भाग २ - https://www.maayboli.com/node/62437

दुसऱ्या वेळी मुख्य उद्देश आमच्या जवळच्या मित्राच्या लग्नाला जाण्याचा होता. त्यासाठी मी आणि रुचिरा पुण्याहून दुचाकीवर मुंबईला गेलो होतो आणि लग्न अटेंड केल्यावर दोन किल्ले पाहिले होते:
1. माहिम किल्ला
2. बांद्रा किल्ला
या दोन्ही किल्ल्याबद्दल मी या मालिकेच्या तिसऱ्या भागात लिहिले होते.
मुंबईतील किल्ले -- भाग ३ - https://madhyalok.wordpress.com/2018/08/24/forts-of-mumbai-part-3/
(हा भाग मायबोली वर द्यायचा राहिला पण “मध्यलोक” या माझ्या ब्लॉग साईट वर २०१८ मध्ये प्रकाशित केला होता, त्यामुळे या दोन किल्ल्याच्या माहितीसाठी कृपया वरील लिंकवर क्लिक करून तो भाग वाचावा. तसदी बद्दल क्षमस्व.)

या आठ किल्ल्यांपैकी सेंट जॉर्ज हा किल्ला कधी कधी “किल्ला” म्हणून गणला जात नाही, कारण तो बॉम्बे (आताची मुंबई) च्या सुरक्षाभिंतींचा एक भाग होता. आता आमच्या बघण्यात फक्त एकच किल्ला उरला होता, तो म्हणजे मढचा किल्ला, ज्याला वर्सोवा किल्ला म्हणूनही ओळखतात. २०१८ नंतर आम्ही मुंबईला जेव्हा जेव्हा गेलो, तेव्हा कामे सदैव दक्षिण किंवा मध्य मुंबईत असायची. त्यामुळे उत्तर मुंबईतील हा किल्ला आम्हाला नेहमी हुलकावणी द्यायचा. पण यावेळी नोव्हेंबर 2025 मध्ये मंत्रालयात वैयक्तिक काम निघालं आणि मुंबईला येण्याचे निम्मित मिळाले. मग मी आणि रुचिरा दोघांनी प्रथम काम करून मग आम्हाला हा हुलकावणी देणारा किल्ला पाहायचा असा प्लॅन बनवला. या कामाची माहिती मला शेवटच्या क्षणी मिळाली होती, त्यामुळे ट्रेन आरक्षण करायला देखील वेळ मिळाला नाही, तात्काळ मध्येही नाही. म्हणून आम्ही पुण्यातून प्रगती एक्स्प्रेसच्या अनारक्षित डब्यात बसलो आणि मुंबईला पोहोचलो.

रेल्वे प्रवासात दिसलेला "इर्शाळगड"
01. Irshalgad.jpg

ट्रेनमध्ये असताना रुचिराने मोबाईल सर्च करून गिरगावात एक जैन भोजनशाळा शोधली आणि आमच्या जेवणाचा प्रश्न मिटला. जेवणासाठी गिरगावात आलो. मुंबईत अनेक वेळा गेलो होतो, पण गिरगाव या आधी कधीच पाहिलं नव्हतं. त्या दिवशी मात्र आम्ही गिरगावच्या गल्ल्यांत फिरलो, फोटो काढले आणि जेवणाचा आनंद घेतला.

गिरगाव
02. Girgaon.jpgगिरगाव मधील जैन भोजनशाळेतील जेवण
03. Food.jpgनवे आणि जुने
04. Old and New.jpg

आता मंत्रालयात जाण्याची वेळ झाली होती. आम्ही मुंबईत नव्याने सुरु झालेल्या Aqua Line ने प्रवास करायचे ठरवले. हा खूपच छान अनुभव होता! ही लाईन १५ वर्षांपूर्वी सुरु झाली असती तर आज मुंबई वेगळीच दिसली असती असे मला वाटते.

मेट्रो स्टेशन मध्ये प्रवेश करताना
05. Metro Entry.jpgमेट्रो मधील व्यस्त प्रवासी
06. Inside Metro.jpg

मेट्रोमुळे आम्हाला मंत्रालयात पोहोचणे सोपं गेलं आणि मंत्रालयातील डिजिटल एंट्री प्रक्रियेमुळे आत जाणंही सहज पार पडलं. तिथल्या कामाने नेहमीप्रमाणे वेळ घेतला आणि दुर्दैवाने आमचा उरलेला दिवस मंत्रालयातच गेला. बाहेर आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. पण निदान काम एकाच भेटीत पूर्ण झालं - हेच समाधान!

मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या तोफा
07. Inside Mantralay.jpgमंत्रालयात असलेली "त्रिमूर्ती" ची प्रतिकृती
08. Mantralay Trimurti.jpg

मंत्रालयात काम करणाऱ्या माझ्या बालपणीच्या मित्राला मी मढ किल्ल्याबद्दल सांगितलं तर तो म्हणाला, “आता तिकडे पोहोचेपर्यंत अंधार होईल, उद्याच जा.” मग आम्ही ठरवलं—किल्ला उद्या सकाळी!

उंच इमारतींने व्यापलेले मुंबईचे क्षितिज
09. Mumbai Skyline.jpg

संध्याकाळ मित्रासोबत गेली, मग तिथून आत्याची घरी गेलो. रात्री भरपूर गप्पा झाल्या, झोप कधी लागली ते कळलेच नाही. सकाळी आवरून आणि जेवण करून मढ किल्ल्याकडे निघालो. मेट्रो स्टेशन आत्याच्या घरापासून अगदी जवळ असल्याने आम्ही पुन्हा एकदा मेट्रो पकडली.

वर्सोवा मेट्रो स्टेशन वर असलेले भित्तीचित्र
10. Varsova Metro Station.jpg

ही लाईन आम्हाला थेट घाटकोपर ते वर्सोवा (वेसावे) घेऊन गेली. मी सुचवेन कि तुम्ही वर्सोवा मेट्रो स्टेशनहून वर्सोवा जेट्टीसाठी “यारी रोड” बस घ्यावी, कारण पायी गेल्यास जवळपास ३ किमी चालावं लागतं. आम्ही मॅप मध्ये चुकीचे लोकेशन लावल्याने आणि छोटे अंतर दिसल्याने आम्ही चालत गेलो ☹ वर्सोवा गावात पोहोचल्यानंतर आम्ही वर्सोवा जेट्टीकडे गेलो. इथून फक्त ₹५ च्या तिकिटात फेरीने आम्ही मढ आयलंडला पोहोचलो.

वेसावे मध्ये आपले स्वागत
11. Varsova.jpgखाडीच्या या बाजूला वर्सोवा जेट्टी तर दुसऱ्या बाजूला मढ
12. Varsova Jetty.jpgफेरीत लोक आणि वाहने चढतांना
13. Bike Loading on Ferry.jpgमढ किल्ल्याचे प्रथम दर्शन
14. Madh Fort.jpg

आणि तिथून शेअर रिक्षा थेट किल्ल्याजवळ. या नंतर सुद्धा सुमारे किलोमीटरची चाल आहेच बरं का Happy साधारण १० मिनिटात आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो.

हा किल्ला पोर्तुगीजांनी इ.स. 1600 मध्ये बांधला होता. वर्सोवा आणि मढ यांच्या मध्ये असलेल्या “मार्वे” खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा आणि हा किल्ला तुरुंग म्हणुन वापरला जायचा. आज हा किल्ला भारतीय वायुदलाच्या ताब्यात आहे आणि जवळच त्यांचे स्टेशनही आहे. तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेला आणि वायुदलाच्या देखरेखीमुळे उत्तम जतन केलेला हा मुंबईतील सर्वांत सुंदर जतन केलेला किल्ला आहे. दुर्दैवाने आम्हाला आत जाण्याची परवानगी नव्हती, म्हणून आत जाणं जमलं नाही. पण जवळचं असलेलं “मुक्तेश्वर (किल्लेश्वर) महादेव मंदिर” सर्वांसाठी खुले आहे. या मंदिराच्या आतून आपल्याला किल्ल्याच्या मागच्या बाजूस जाता येतं आणि किल्ल्याचं बाहेरून सुंदर दृश्य मिळतं. किनाऱ्यालगत चालत किल्ल्याचा तट आणि बुरुज दिसतात.

मुक्तेश्वर (किल्लेश्वर) महादेव मंदिर
15. Killeshwar Mandir.jpg

एक सूचना भरतीच्या वेळी पाणी तटापर्यंत पोहोचतं आणि हि पायवाट पूर्णपणे बंद होऊ शकतो. सुदैवाने त्या दिवशी ओहोटी होती, म्हणून आम्ही सहज किनाऱ्यावरून पुढे जाऊ शकलो आणि किल्ला अगदी जवळून पाहू शकलो. काही फोटो काढले आणि परत मंदिरात आलो.

मंदिर परिसरातून दिसणारा मढ किल्ला आणि खडकाळ किनारा
16. Madh Fort Closer View.jpgमढ किल्ल्याच्या बुरुज
17. Madh Fort Bastion.jpgया बुरुजाच्या फक्त इतकेच जवळ जाता आले
18. Madh Fort Bastion Other View.jpg

तेथून पुन्हा रिक्षा → फेरी → मेट्रो असा प्रवास करून आम्ही CSMTला पोहोचलो. तिथून पुण्याची ट्रेन पकडली आणि अशा रीतीने मुंबईतील सर्व किल्ले पाहण्याचं आमचं दीर्घकाळ प्रलंबित राहिलेलं उद्दिष्ट अखेर पूर्ण झालं.

मुंबईच्या नकाशावर प्लॉट केलेले मुंबईतील सगळे किल्ले
19. All Mumbai Forts Plotted on The Map.jpg

आता आमच्या मनात काही नवीन योजना आधीच तयार झाल्या आहेत, काही नवी आव्हाने पूर्ण करण्यासाठी आधीच स्वीकारली आहेत, पण तोपर्यंत निरोप आणि धन्यवाद.
Direction Details:
Fort Location on GPS: https://maps.app.goo.gl/454HYVawdBtBJtb26
Location: 19.134836224964477, 72.7939544615855 (19°08'05.4"N 72°47'38.2"E)
Nearest Suburban station: मालाड (पश्चिम रेल्वेमार्ग)
Nearest Metro station: वर्सोवा (ब्लू लाईन – मुंबई मेट्रो लाईन 1)

आपलाच,
मध्यलोक (विराग)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती संकलन.
अंतरे कळण्यासाठी आणि आपण कसे कुठून कुठे गेलो यासाठी OsmAnd app ला पर्याय नाही. Offline काम करते..
गूगल मॅप मात्र शोधण्यासाठी उत्तम.
.....
वसई मुंबईत येत नाही परंतू वसईचा किल्ला पहाच. हे एक किल्लाबंदरच होते. पूर्वी त्याला वखार म्हणत. हल्ली ज्याला logistics म्हणतात ते इंग्रज लोक वापरत असत. इथून इंग्लंडला न्यायचा माल या ठिकाणी साठवून ठेवत. मग त्यांची बोट आली की त्यातील कापड , यंत्रे उतरवून हा माझा चढवला जायचा. शिवाय प्रवासी होतेच.

मध्यलोक,
मस्तच. छान संकलन.
माहितीपूर्ण आणि उपयुक्त.

मध्यलोक छानच
आव्हान घेउन पाहिले आणि माहिती लिहून काढली हे ही महत्वाचं.
मुंबईत येत नसले तरी बरेच किल्ले आहेत की
कल्याण ला गेलो तेव्हाही एक भुईकोट किल्ला दिसला होता.

धन्यवाद Srd, ऋतुराज, झकासराव आणि Sparkle

अंतरे कळण्यासाठी आणि आपण कसे कुठून कुठे गेलो यासाठी OsmAnd app ला पर्याय नाही >>> धन्यवाद, अँप वापरून बघतो. ऑफलाईन आहे म्हणजे जबरदस्त उपयोगी Happy
वसई मुंबईत येत नाही परंतू वसईचा किल्ला पहाच.>>> किल्ला बघितला आहे. वखार (फॅक्टरी) म्हणून या आणि अश्या बऱ्याच जागांचा उपयोग व्हायचा. आपल्या महाराष्ट्रात पोर्तुगीज आणि डच वखारी सुद्धा आहेत.
आव्हान घेउन पाहिले आणि माहिती लिहून काढली हे ही महत्वाचं >>> हो, यापैकी काही किल्ले विस्मृतीत गेलेले आहेत. या लेख मालिकेत फक्त मुंबई शहरातील किल्ले, नंतर पुढे कधी मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील किल्ले या बद्दल लिहू.