एक वाद्य, तीन पिढ्या आणि दोन संगीतसंस्कृतीचे सीमोल्लंघन

Submitted by सुधीर कांदळकर on 16 November, 2025 - 06:58

नोव्हेंबर आला कीं थंडीची चाहूल लागते आणि चित्तवृत्तीला बहर येतो. पर्यटन, परिषदा, प्रदर्शने, महोत्सव, संगीत समारोह वगैरेंच्या आठवणी मनांत रुंजी घालूं लागतात. वयानुसार फारसे कुठे जाणेयेणे होत नाहीं. आधुनिक तंत्रज्ञानाने संगणक, महाजाल, यू-ट्यूब वगैरे साधनांचा सुंदर नजराणा दिला आणि आकास ठेंगणे झाले. जाणेयेणे नगण्य झाले तरी महाजालावरची मुशाफरी मात्र अगदी आरामखुर्चीत बसून पण करतां येते. लांबलचक घनघोर पावसाळ्यात चुकला फकीर मशिदीत तसा चुकला सुधीर यू-ट्यूबवर सापडायला लागला. वाट फुटेल तिथें फिरतांना अचानक एखादे अप्रतिम निसर्गदृश्य दिसावे तसे कधीकधी अनमोल रत्नें कानीं पडतात. इथे असेच काहीतरी अनमोल असे कानीं पडते. माझा पुरता कबजा घेते. ध्यानीं मनीं स्वप्नी ते स्वर ऐकूं येतात. असें काहींतरी अवेळीं आलेल्या पावसाने घरींच बसून यू-ट्यूब मुशाफरी करतांना सापडले. ते या लेखात सादर करतों आहे.

एक व्यक्ती कलेच्या प्रांतात उच्च स्थानावर पोहोंचली तरी त्यापुढील पिढीला त्याच कलेत स्वारस्य असतेच असे नाही. त्यातून तीनतीन पिढ्या एकाच कलेत प्राविण्य मिळवतील असे फारसे घडत नाही. संगीतात अगोदर स्वारस्य असणे! त्यातून उच्च कोटीचे प्राविण्य मिळवणे! तेही एकच वाद्य वाजवण्यात! हे फारच क्वचित घडते. एन. राजम, त्यांची कन्या संगीता शंकर आणि संगीता यांच्या दोन कन्या रागिणी आणि नंदिनी शंकर हे एक उदाहरण आहेच. असेच उदाहरण पुन्हां आढळणे हेही एक आश्चर्य.

व्यंकटेश गोडखिंडी, त्यांचे सुपुत्र प्रवीण गोडखिंडी आणि प्रवीणचे सुपुत्र षडज गोडखिंडी हे दुसरे उदाहरण. तिघेही बांसरीवादनांत नाव कमावून आहेत. परंतु यापैकी प्रवीण अणि षडज या दोन गोडखिंडींनी आणखी एक आश्चर्यकारक कामगिरी केलेली आहे. हाच मुख्य लेखविषय आहे.

दुवा क्र. १: सुमारे ८ (आठ) मिनिटे व्यंकटेश गोडखिंडी आणि त्यांचा पुत्र प्रवीण आणि बालवयातला नातू षडज गोडखिंडी: जवळजवळ १५ (पंधरा) वर्षांपूर्वींचा संपादित ध्वनीपट. बांसरीवादनाचे बाळकडू नातवाला मिळते आहे. https://www.youtube.com/watch?v=57WD29lNT60

बांसरी हे गळ्यातून निघणार्या ध्वनीच्या सर्वात जवळचे वाद्य आहे. बोलायची भाषा म्हटले की जगात बहुदा शंभरापेक्षां जास्त भाषा बोलल्या जात असतील. एका देशातली भाषा दुसर्या देशीं कळेलच असे नाही. पण संगीतातून व्यक्त होणारी भावना मात्र भाषिक मर्यादा पार करून एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पोहोचू शकते. बोलायची भाषा वेगळी असेल तर माणसे दुरावू शकतात. संगीत मात्र वेगवेगळ्या भाषा बोलणार्यांना एकत्र आणून आनंद देऊं शकते.
पंजाब ते अरुणाचल आणि कश्मीर-उत्तरांचल ते महाराष्ट्र – भाषा कमीत कमी पंधरावीस होतील. पण ख्यालसंगीत, सिनेसंगीत बहुतांशी या सर्व भाषांत सारखे. ध्रुपद धमार, ख्यालसंगीत, ठुमरी, कजरी, टप्पा वगैरे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतप्रकार सध्या भारतीय शास्त्रीय संगीत म्हणून ओळखले जाते. सोयीसाठी आपण या संगीताला रागदारी असे म्हणूयात. ही रागदारी सिनेसंगीतात येतांना विविध प्रादेशिक लोकसंगीताचा वेष परिधान करून येते आणि संपूर्ण भारतभर लोकप्रिय देखील होते. कर्नाटक संगीतातले हंसध्वनी, किरवाणी, चारुकेशी इ. राग तर केव्हांच रागदारीने आपलेसे केले आहेत.

आंध्र प्रदेश ते कन्याकुमारीपर्यंत अख्खा दक्षिण भारत. बोलीभाषा कमीत कमी पाचदहा तरी होतील पण संगीत बहुतांशी सारखे. कर्नाटक संगीत म्हणून प्रचलित असलेले. सारखी स्वररचना, सारखा स्वरविचार असलेले कांही राग वेगवेगळ्या नावाने रागदारी तसेच कर्नाटक या दोन्ही संगीतप्रवाहात आहेत. उदा. रागदारीतला मालकंस आणि कर्नाटक संगीतातला हिंडोलम. मग रागदारी आणि कर्नाटक संगीत एकत्र येऊं शकतील? विवाहबंधने जर दोन भिन्नभाषिक व्यक्तीच नव्हे तर कुटुंबे जोडतात तर संगीत भिन्नभाषिक रसिकांना जोडतील? असे झाले तर ते एक सीमोल्लंघनच ठरेल. म्हणूनच खरे तर सीमोल्लंघनाच्या शुभदिनीं हा लेख इथे प्रसिद्ध करणार होतो. असो. देर आये दुरुस्त आयें.

खरे तर असा निव्वळ संगीतेतर हेतू ठेवून संगीतरचना करणे अस्सल रसिकाच्या अंतरी न पटणारे आहे. पण संगीतसौंदर्यवर्धन या निकषाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या संगीतसंगम प्रयोगाचे सादरीकरण असेल तर सोन्याला सुगंध असेच म्हणावे लागेल. आणि नवनवे प्रयोग केले नाहींत तर कोणत्याही क्षेत्रात साचलेपण येईल. असे एकदोन प्रयोग पूर्वी झालेले आहेत पण अगदी थोरामोठ्यांनी केलेल्या प्रयोगात देखील सुंदर आणि छान असे काही हाती लागले नाही. तरीही फसलेल्या प्रयोगांतूनच नव्या संशोधनाचे मौल्यवान घबाड हाती लागते हे मात्र विसरून चालणार नाही. चला तर मग या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रवीण आणि षडज या गोडखिंडी पितापुत्रांनी कसा प्रयत्न करून सीमोल्लंघन केले आहे त्याचा वेध घेऊंयात.

या दोन्ही संगीतशैलींना जोडणारा आणखी एक दुवा आहे ईश्वरभक्तीचा. दोन्हींच्या रसिकांच्या देवदेवता एकच आहेत. हिंदूंच्या महादेव, पार्वती, श्रीगणेश, मातृका, दुर्गा, इ. इ. दोन्ही संगीतातल्या रसिकांची श्रद्धास्थाने समान, पूजापद्धती जवळजवळ समान, ईशस्तवने वा स्तोत्रे संस्कृतमधूनच. कर्नाटकात बेळगांव, कारवार इ. ठिकाणी गणेशोत्सव आपल्यासारखाच साजरा करतात एवढेच नव्हे तर आरत्याही आपण म्हणतो त्याच मराठी आरत्या असतात. फक्त साथीला आपल्या पखवाजाच्या बोलांऐवजी मृदंगाचे ताल ऐकू येतात. भीमसेनांनी लोकप्रिय केलेली अभंगवाणी कन्नडमध्ये गेली तीही खळेकाकांच्याच सुरावटीवर. या भक्तीसंगीतातून रागदारी आणि कर्नाटक संगीत जोडण्याचा गोडखिंडी पितापुत्रांनी कसा प्रयत्न केला आहे हे पाहूंयात आणि ऐकूंयात.

बंगळुरु येथील शृंगेरी मठात प्रवीण गोडखिंडी आणि त्यांचे पुत्र षडज गोडखिंडी यांनी सप्टेंबर २०२३ मधील गणेशोत्सवात जे बांसरीवादन केले ते भारतीय संगीतातले एक महत्त्वाचे आणि मोलाचे पाऊल ठरावे. या बांसरीवादनाचा खालील दुव्यातील लांबलचक चित्रध्वनीपट तब्बल सव्वादोन तासांचा आहे. तेवढा वेळ काढूनच तबियतीत ऐकावा किंवा वेळ मिळेल तशी एकेक रचना ऐकावी. एकेक रचना ऐकणे सोयीचे जावे म्हणून मी प्रत्येक रचनेचा चित्रध्वनीपटावरची कालगणना नोंदवून पुढे दिली आहे तर ज्या रचनांचे वेगवेगळे ध्वनीपट उपलब्द आहेत त्या रचनांच्या चित्रध्वनीपटांचे वेगवेगळे दुवे देखील दिले आहेत. तबल्यावर किरण गोडखिंडी आहेत तर मृदंगम वर साथ केली आहे विनोद श्याम आनूर यांनी. पण शक्यतो रचना आहेत त्याच क्रमाने ऐकाव्यात. चित्र शक्यतो निदान सुरुवातीपुरते तरी चित्रवाणीच्या मोठ्या पडद्यावर पाहावे तर ध्वनी शक्यतो होम थिएटर वा हेडफोनवर ऐकावा म्हणजे आस्वादानंद छान मिळेल.

व्यासपीठामागील नेपथ्य वा सजावट प्रथम आपले लक्ष वेधून घेते. पुरातन ठेवा वाटावा अशा देखण्या वास्तूंच्या सजावटीतली कलात्मकता, मांडणी, वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशयोजना एक प्रसन्न, सुंदर, मनावर गारुड करणारा परिसर निर्माण करते. आपल्या सभोवतालचे घरातले दालन विरघळून जाते आणि पडद्यावर दिसणारी ही सजावट आपल्याला त्या स्थानी नेते. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटक संगीत अशा दोन्ही शैलीतली सौंदर्यस्थळे आपण या सादरीकरणात ऐकूं शकतो. एरवी आपण कर्नाटक संगीत ऐकले तर लांबलेले, चढे होत जाताहेत असे वाटणारे स्वर आणि लयीशी जास्त झटापट करीत जाणारा आपल्याला आकलन न होणारा ताल, कांहींसे अनाकलनीय, कांहीसे कर्कश वगैरे वाटते. परंतु या चित्रध्वनीपटातले – ऑडिओ व्हीज्युअल ट्रॅकमधले वादन या लोकप्रिय भक्तिगीतांच्या स्वरावली आहेत. कार्यक्रम आहे बंगळुरूला. तरीही इथे सुरुवातीच्या रचनेत रागदारीतील ख्याल अंगाने स्वरमाला ओवली जात आहे असे वाटते. फुलमाला दोर्यात ओवली जाते. इथे स्वरमाला तालात ओवली आहे.

ख्यालसंगीताची सवय असणार्यांना कर्नाटक संगीतात तालाच्या मात्रांच्या गणिती पटींचा तांत्रिक अतिरेक होतो आहे आणि त्यामुळे स्वरसौंदर्याकडे दुर्लक्ष होते आहे असे सहसा वाटून जाते. मांडणीतले सौंदर्य असे हवे की संगीताचा भक्कम तांत्रिक पाया, रियाझात केलेली मेहनत, अजिबात दिसता नये, संगीत सहज मनात सुचले तसे आले आहे असे वाटले तर ते हृदयाला भिडते असे माझे वैयक्तिक मत आहे. इथे मांडणी प्रत्यक्षात अश्शीच, सहज सुचली अशी वाटावी अशा उपज अंगाने आणि सौंदर्यपूर्ण केली आहे.

तबला आणि मृदंगम यातील बोलाक्षरे आणि तालातील मात्रा या प्रतिभावंतांनी एकमेकांशी बेमालूम जुळवल्या आहेत त्यामुळे मृदंगमवादन अनाकलनीय वाटत नाही. प्रतिभावंत तबला आणि मृदंगमवादकांनी यातही सुंदर नक्षीकाम केले आहे.

चित्रध्वनीपट सुरू झाला की बांसरीचे सूर अवघा आसमंत व्यापून टाकतात. आपल्याला हवा आहे तो मात्र हे सारे अनुभवण्यासाठी लागणारा निवांत वेळ. एकीकडे नित्याची कामे करीत जमेल तसे ऐकावे की एखादी मैफ़ल अनुभवावी तसे बारकाईने लक्षपूर्वक ऐकावे ही निवड मात्र आपली आपणच करायची आहे. काहींना जमेल तसे वेळ मिळाला की एकेक रचना वेगवेगळ्या वेळी ऐकणे जास्त आवडेल. म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचा सव्वादोन तासांचा एक दुवा तसेच त्यातल्या प्रत्येक रचनेचा चित्रध्वनीपटावरील वेगवेगळा तपशील आणि वेगळे दुवे देखील देतो आहे. परंतु सुरुवातीला पडद्यावरील देखण्या वास्तूचे दर्शन घडले की आपण मनाने त्या स्थळीं जातों. मग नित्यकर्मे करतांना देखील आपण मनाने तिथेंच असतों आणि स्वरास्वाद दुणावतो.

रचना १: सुमारे ५६ मिनिटे: सुरुवातीची ही रचना सात मात्रांच्या रूपक तालातील आहे. बरोब्बर, ’शुक्रतारा मंद वारा’ गाण्यातला, तोच, मनाला ठेक्याच्या झोपाळ्यावर बसवून आभाळात नेणारा रूपक ताल. शुक्र मधल्या ’शु ….’ आणि मंद मधल्या ’मं ….’ वर किंचित थबकून आकर्षक पॉझ घेणारा. पण वेगळ्याच नवीन, आकर्षक रूपातला वा ठेक्यातला. आलापीनंतर ठेका सुरू झाल्यावर लगेच मग ‘तितीत’ सारख्या बोलाक्षरांपाठोपाठ येणार्या नाट्यपूर्ण पॉझची मजा ऐकू येते. रागदारी आणि कर्नाटक संगीताचा हा संगम सौंदर्यपूर्ण आणि मोहमयी बनल्यामुळे आपण त्यात गुंतून जातों.

आलापी सुरू असतांना १५व्या मिनिटाला प्रवीणजींनी अल्टो बांसरी नावाची एक कृत्रिम पदार्थापासून बनविलेली गंभीर स्वराची वेगळ्या आकाराची बांसरी प्रयोगादाखल वाजवून दाखवली आहे. नंतर पुन्हा नेहमीची नैसर्गिक बांसरी.
आलापीनंतर गणेशस्तवन. मनाची पकड घेणारा राग यमन. त्यातून रूपक ताल. या राग-ताल जोडगोळीचे गारुड वेगळेच.
श्री गणेशा…य पार्वतीसुत
मोदकप्रिय गणपती

यमनातील या रूपक तालातील मध्यलयीतल्या गणेशस्तुतीच्या सुरावटीने सुरू झालेले बांसरीवादन जसे उत्तरोत्तर रंगत जाते तसा तबल्यावरचा रूपक किती मोहमयी आणि वेगवेगळ्या रूपात वा ठेक्यात मृदंगमवर वाजतो हे ऐकून आपण विस्मयचकित होतो. सुरुवातीला संयत चलनात वाजणारा, फारशी कलाकारी न दाखवणारा तबला हळूहळू आपल्या प्रतिभेचे रंगदर्शन करीत जातो. रागदारीत न आढळणारे वेगळे असे अभिजात मृदंगमवादनाचे कलात्मक रंग मिसळल्यामुळे आपण निखळ श्रवणानंदाची लयलूट करतो. उत्कट भावाभिव्यक्ती करणारा यमन भक्तिगीताच्या सुरावटीतून आणखीनच उत्कटतेने ईश्वराराधना करतो.

रूपक तालातल्या मध्यलयीतल्या रचनेनंतर ‘शाम बजाये आज मुरलिया’ ही तीनतालातली रचना बांसर्यांवर सुरु होते. बरोब्बर! भारतरत्न भीमसेनजींनी डॉ. बालमुरलीकृष्णजींबरोबरच्या जुन्या मैफ़िलीत म्हटलेली हीच ती चीज.
दोन बांसर्यांनी एकमेकींशी केलेल्या सवालजबाबांना तश्शाच तोलामोलाची साथ दिली आहे तबला आणि मृदंगाच्या सवालजबाबांनी. त्याचप्रमाणे बांसरी आणि तबला तसेच बांसरी आणि मृदंगम यांचेही सवालजबाब मस्त रंगले आहेत. ४५व्या मिनिटाला प्रवीणजी शाम बजाये ……. म्हणायला श्रोत्यांना सामील करून घेतात. आतां सारा आसमंत भक्तीमय स्वरांनी व्यापून जातो.

आपण वाचलेल्या अणि आपल्याला आवडलेल्या एखाद्या कादंबरीवर काढलेला चित्रपट आपण जेव्हां पाहतों तेव्हा त्यातला आत्मा हरवलेला आहे असे वाटते. कादंबरी वाचतांना आपल्या मनश्चक्षूंना चित्रपट दिसतो. लेखकाचे शब्दांकन आणि आपले मनश्चक्षू यांमध्ये तिसरे कोणी नसते. चित्रपटात मात्र दिग्दर्शक, कला दिग्दर्शक नट वगैरे अनेक मध्यस्थ येतात आणि आपल्या मनःचित्राला वाकवून पिरगाळून त्याचा चोळामोळा करून टाकतात. मग आपल्याला हा चित्रपट कादंबरीच्या मानाने सुमार दर्जाचा वाटूं लागतो.

शास्त्रीय संगीतात ख्याल ऐकतांना आपल्या मनांत एखाद्या रागाचे सुंदर चित्र उभे राहते आणि प्रत्येक स्वरावर्तन आपल्याला त्या रागाचे वा स्वरचित्राचे एकेक मोहक रूप दाखवत जाते. म्हणूनच बहुधा बंदिशीच्या शब्दांना गौणत्त्व मिळालेले असावे. परंतु हा बंदिशीच्या शब्दांचा हा अस्पष्ट मध्यस्थ वाद्यसंगीतात मात्र आगाऊपणा करायला नसतो. असतात ते केवळ एकमेकांशीं आणि तालाशीं नाते जोडणारे विलोभनीय स्वर. स्वरमाला आपल्या कल्पनेत्रांचा वारू मुक्तापणे चौखूर उधळत स्वरचित्रसफर घडवतात याचा एक सुंदर अनुभव येतो. चला तर मग आपल्या पुढील स्वरप्रवासाला. पुढील चित्रध्वनीपट सलग २ तास १४ मि. चा आहे. परंतु ५५ मि. नंतर पुढील रचनांचे वेगळे वेगळे चित्रध्वनीपट सोयीसाटी पुढे दिलेले आहेत.

दुवा क्र. २: वर उल्लेखिलेली पहिली आणि खाली वर्णन केलेल्या २ ते ७ संगीतरचना: https://www.youtube.com/watch?v=lZWCkrBTb8U

रचना २: सुमारे १५ मिनिटे: सुरुवातीपासून सुमारे ५५ (पंचावन्न) मिनिटांनी यमन संपन्न होतो आणि कर्नाटक शैलीतील नवीन स्वरावली सुरू होतात. कर्नाटक शैलीतला राग रविचंद्रिका. पिता प्रवीण यांनी उंच स्वरातली छोटी बांसरी घेतली आहे तर पुत्र षडजने खालच्या स्वरातली, मोठी बांसरी घेतली आहे. केहरव्याचा ठेका जरी कर्नाटक शैलीतल्या ठसक्यात रंगलेला असला तरी आपल्याला जवळचा वाटतो. रचना सुरू होतांच ती लोकप्रिय का झाली हे उमजते.

विजयनगर साम्राज्याच्या वैभवाच्या कथा आपण शिवरायांच्या पराक्रमाच्या कथांबरोबरच ऐकत आलो आहोत. विजयनगर साम्राज्यात विद्वानांचा अणि कलावंतांचा यथोचित आदर केला जात असे असेच आपण बालपणापासून वाचीत आलो आहोंत. राजा कृष्णदेवरायाच्या वैभवशाली दरबाराचे सुंदर चित्र अनेकांनी पाहिले असेल.

शृन्गेरी मठातल्या सुंदर सजावटीतल्या वीजदीपमालामंडित देखण्या मंदीरवास्तूंचे दर्शन पडद्यावर होते. बांसरीवरचे दाक्षिणात्य सुरावटीचे गारुड अजूनही मनावर. वाटते की मंदिरापलीकडे राजा कृष्णदेवरायाच्या प्रशस्त, वैभवशाली दरबारात टपोर्या फ़ुलमालांच्या भरगच्च, सुंदर रंगसंगती दाखवणार्या कलापूर्ण सजावटीत कोणता तरी संगीत-नृत्य सोहळा सुरू आहे. दोन बांसर्यांचे तसेच बांसरी-तबला, बांसरी-मृदंगम असे सवाल जबाब, मध्यलयीचा ताजेपणा, उपज अंगाने केलेले वादन, मध्येच घेतलेले नाट्यमय पॉझ, यामुळे ही पुढील १५ मिनिटे कशी गेली ते कळत नाही.
नीरवधी सुखदा : कर्नाटक शैलीतला राग रविचंद्रिका: मूळ रचना प्रख्यात संतकवी संगीतज्ञ त्यागराज यांची.

दुवा क्र. ३ सुमारे १५ मिनिटे: https://www.youtube.com/watch?v=_f0oWCO85tw

रचना ३: सुरुवातीपासून (१ तास ११) मिनिटांनी सुमारे १२ (बारा) मिनिटे: निवेदन कन्नडमध्ये आहे. वेगवेगळ्या दुव्यात मात्र निवेदन गाळले आहे. ही राग हंसध्वनीमधील अभंगशैलीतली धून कर्नाटक रंगात आहे. या रचनेतही प्रवीण यांनी उंच स्वरातली छोटी बांसरी घेतली आहे तर षडजने खालच्या स्वरातली, मोठी बांसरी घेतली आहे. रचना द्रुत लयीत आणि सुंदर सुरावटीत आहे. एका लोकप्रिय कन्नड अभंगाची ही स्वररचना आहे. तबला आणि मृदंगमच्या भजनी ठेक्यात आपण रंगून जाऊन तल्लीन होतो.

दुवा क्र. ४: नम्मम्मा शारदे: राग हंसध्वनी: https://www.youtube.com/watch?v=dI6SzSSEFLI
यातच पुढे तीनतालातली द्रुत स्वररचना आहे. इथे भाषा स्वरतालाची. बांसरी हे वायुवाद्य आहे. सनई हे देखील वायुवाद्यच आहे. दोन्हींच्या वादनपद्धतीत विलक्षण साम्य आहे. या हंसध्वनी रागातील अभंगस्वरावलीत १ तास १७ व्या मिनिटाला सुरू होणारी लयकारी खास अप्रतिम जमली आहे. आठवण होते ती बिस्मिल्ला खांसाहेब यांच्या शहनाईवरच्या लयकारीची. दहा मिनिटे कशी गेली कळत नाही.
मूळ रचना संत कवी कनक दास यांची आहे. हीच रचना श्रीधर सागर यांनी सॅक्सोफोनवर वाजवली आहे.

रचना ४: १ तास २३व्या मिनिटांनी सुमारे १० (दहा) मिनिटे: मिश्र पिलू सुरू होतो. याही रचनेत प्रवीण यांनी उंच स्वरातली छोटी बांसरी घेतली अहे तर षडजने खालच्या स्वरातली, मोठी बांसरी घेतली आहे. आपल्या ओळखीच्या ठेक्यातच प्रवीण यांच्या बासरीतून निघालेला भक्तीगीताच्या स्वरावलीचा हिंदुस्तानी शैलीचा देखणा मुखडा १.३० ला अचानक मृदंगमच्या सुंदर तालप्रवाहात दाक्षिणात्य वेष धारण करतो. क्षणाक्षणाला रंग बदलणार्या प्रकाशयोजनेसारखी ही सुरावट कधी रागदारीचा तर कधी कर्नाटकी वेष लेऊन येते आणि ही देखील दहा मिनिटे कधी जातात कळत नाहीत.
दुवा क्र. ५:मिश्र पिलू:सुमारे १० मिनिटे https://www.youtube.com/watch?v=6Pn9tRLdkcc

रचना ५: ज्या भक्तीगीतावर यापुढील रचना सादर केली ते कर्नाटकी राग मोहनम मधील मूळ कन्नड भक्तीगीत: सुमारे ६ मिनिटे: https://www.youtube.com/watch?v=gdB8N0_0Y3o

बांसरीवर वाजविलेली ही रचना आहे सुमारे २२ (बावीस) मिनिटांची: चित्रध्वनीपटावरील सुरुवातीपासून १ तास ३३ मिनिटांनी: राग भूप: याही स्वरावलीत दोन वेगळ्य़ा पिचच्या बांसर्यांचा प्रयोग आहे. सुरुवातीला आलापीतच जलद हरकती, मुरक्या, कणस्वर स्वरावली, यांचे एकल नक्षीकाम प्रवीणजी दाखवतात. मग तसेच नक्षीकाम चि. षडज दाखवतो. नंतर दोघांचे सवालजबाब. नंतर दोन्ही बांसर्या एकसाथ वाजतात. सुरावटही देखणी. बर्यापैकी जलद लयीतली. दाक्षिणात्य ठसक्याच्या ठेक्यात नाट्यपूर्ण पॉज घेत दाक्षिणात्य रंगात बांधलेली. नंतर द्रुत लयीतली सुरावट सुरू होते. बहुधा लोकप्रिय कन्नड कृष्णस्तुती. यात रॉकस्टार करतात तसा श्रोत्यांना सामील करण्याचा प्रयोग केला आहे. शेवटची १.४६ ला सुरु होणारी लयकारी छान जमली आहे. मृदंगमच्या साथीने केलेली लयकारी मला जास्त रंजक वाटली.

दुवा क्र. ६: पिल्लनगोविंद: राग भूप: सुमारे २२ मिनिटे. https://www.youtube.com/watch?v=m0-qWumEWKs

मूळ कर्नाटकी राग मोहनम मधील पुढील कन्नड रचनेवर भरतनाट्यम नृत्य देखील सादर केले जाते.
https://www.youtube.com/watch?v=h0YUcnubaVY

जालविहार अर्थात नेटसर्फिंग करतां करतां माजी मुख्यमंत्री एनटीआर आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे एक नृत्याधारित सिने युगलगीत सापडले.
https://www.youtube.com/watch?v=Ve3ls542kfo

रचना ६: सुमारे १० (दहा मिनिटे) सुरुवातीपासून १.५५ मिनिटांनी तबला मृदंगम जुगलबंदी आहे. या जुगलबंदीचा वेगळा दुवा मात्र सापडला नाही. दुवा क्र. २ वरच कर्सर १ तास ५५ मि. पर्यंत पुढे नेऊन ही जुगलबंदी ऐकावी लागेल.

रचना ७: सुमारे ९ (नऊ मिनिटे) २.१० पासून आपल्या परिचयाचे भारतरत्न भीमसेनजींनी लोकप्रिय केलेले भाग्यदा लक्ष्मी बारम्मा.
https://www.youtube.com/watch?v=BODfXsUYiog

या गीतावर देखील नृत्य केले जाते. वरील पिल्लन गोविंद नृत्य एकल नृत्य आहे. या भाग्यदा लक्श्मी भक्तीगीतावर समूहनृत्य देखील केले जाते. सुमारे १० मिनिटे:
https://www.youtube.com/watch?v=m2Owp5gsELw

बांसरीवादनाच्या दर्जा, कलात्मकता, स्वरविचाराची रंजक मांडणी, तबला अणि मृदंगम यांची साथ, ध्वनीसंयोजन, सारे काही उंचावर गेलेले, मोहून टाकणारे. तबला आणि मृदंगम यांचा नाद वेगळा, आस वेगळी, तालमांडणी वेगळी. हा फरक स्पष्ट करणारे सादरीकरण. पण या वेगवेगळेपणानेच सादरीकरणात वैविध्य आणले हेही खरे. मुख्य म्हणजे कर्नाटक संगीताला कलात्मक, सौंदर्यपूर्ण, मार्दवयुक्त ख्यालगायकीचा आणि ख्यालगायकीला आकर्षक आणि नाट्यपूर्ण असा कर्नाटकी साजशृंगार चढविण्यात गोडखिंडी पितापुत्र यशस्वी झाले आहेत. कार्यक्रम संपन्न होतो पण मनांतली बांसरी गुंजन करीतच राहते.

अर्थातच ही सारी मते माझी आहेत. प्रत्येक व्यक्तीचे मत वेगळे असूं शकते.

रसिक बांसरीच्या स्वरांच्या आणि तबलामृदंगाच्या मोहजालात हरवलेले असतांनाच लेख वाचल्याबद्दल धन्यवाद देत पुढे काहीही न लिहिता रसिकांचा निरोप घेतो.
- X – X – X –

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सीमोल्लंघन >>> खूप गोड आणि नादमय वर्णन !
शास्त्रीय संगीतातले काही समजत नाही परंतु आपण दिलेले एक दोन दुवे जरूर ऐकेन.