तेलुगु पाककृती: चेक्कलु (तांदूळ-डाळीचे वडे)

Submitted by वामन राव on 19 October, 2025 - 06:49
चेक्कलु (तांदूळ-डाळीचे वडे)
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

प्रिय मायबोलीकरांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी व नववर्ष आपणांस सुख समाधान समृद्धी आरोग्य चैतन्य घेऊन येवो ही श्रीचरणी प्रार्थना.

व्यावसायिक कामामुळे तेलुगु पाककृतींच्या मालिकेत लेखन करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाहीये पण आता दिवाळीच्या निमित्ताने ही पाककृती सादर करत आहे.

मराठी खाद्य संस्कृतीत, चकल्या, शेव, शंकरपाळे, अनारसे, करंज्या, पात्या, लाडू, वड्या अशी फराळाच्या पदार्थांची विशेषतः दिवाळीला रेलचेल असते. तेलुगु खाद्य संस्कृतीतही अरीसेलु, गरीजेलु, चेक्की, बुरेलु इत्यादी गोडाचे पदार्थ तर सकिनालु, मुरुकुलु, जंतिकालु, अप्पलु, वडाप्पलु, चेक्कलु, गारेलु इत्यादी तिखटमिठाचे पदार्थ फराळात असतात. बोनालु, दसरा, संक्रांत इत्यादी सणांना हे फराळाचे पदार्थ घरोघरी केले जातात.

तेलुगु पाककृतींच्या मालिकेत आज पाहूया तिखट-मिठाच्या प्रकारांपैकी सर्वांचा आवडता पदार्थ - चेक्कलु. यालाच अप्पलु / वडाप्पलु असेही म्हणतात. सकाळचा कौटुंबिक सात्विक चहा असो, चार वाजताचे चटकमटक राजसी खाणे असो वा संध्याकाळचे धुंद तामसी पेय असो, चेक्कलु हे सोबत हवेतच!

चला तर मग, पाहूया चेक्कलुची साधी, सोपी पाककृती -

साहित्य:

  • तांदळाचे पीठ - एक किलो
  • धने - पाव वाटी
  • लसूण पाकळ्या - बारा ते पंधरा
  • जिरे - एक चमचा
  • हिरव्या मिरच्या - सहा ते आठ
  • चणाडाळ - अर्धी वाटी
  • मुगडाळ - अर्धी वाटी
  • तीळ - चार चमचे
  • कढीपत्ता - वीस पंचवीस पाने (बारीक चिरून)
  • तिखट - दोन चमचे
  • मीठ - दोन-तीन चमचे (चवीनुसार)
  • तेल, तूप किंवा लोणी - दोन-तीन चमचे
  • कोमट पाणी - अंदाजे दोन वाट्या
  • तेल - तळण्यासाठी

चेक्कलुचे साहित्य

झाडाचा कढीपत्ता तोडताना घेतलेली ही एक कोवळी काडी -

कोवळा कढीपत्ता

क्रमवार पाककृती: 

चणाडाळ दोन-तीनदा स्वच्छ धुऊन दोन-तीन तास भिजत घाला. मुगडाळ दोन-तीनदा स्वच्छ धुऊन एक-दीड तास भिजत घाला.‌

डाळींमधील पाणी काढून टाका. मिक्सरमध्ये धने, लसूण पाकळ्या, जिरे, हिरव्या मिरच्या घालून जाडे-भरडे वाटून घ्या.

एका मोठ्या भांड्यात तांदूळ पीठ घ्या. त्यात भिजवलेल्या डाळी, वरील वाटण, कढीपत्त्याची पाने, तीळ, तिखट, मीठ, आणि तेल, तूप किंवा लोणी घाला.‌ सर्व घटक चांगले मिसळून घ्या. यावेळी (चालत असल्यास) पिठाची चव घेऊन पहा व गरजेप्रमाणे मीठ अ‍ॅडजस्ट् करा. कोमट पाणी थोडे-थोडे घालत पिठाचा मऊ उंडा करून घ्या व दहा मिनिटे झाकून ठेवून द्या.‌

तळहाताला थोडे तेल लावून लिंबाएवढा गोळा घेऊन लहान लहान पुऱ्यासारखे चेक्कलु लाटून घ्या.‌ एकावेळी आठ-दहा चेक्कलु करून घेऊन बाकीचे पीठ झाकून ठेवत चला.

कढईत तळण्यासाठी तेल घालून मध्यम आचेवर तापवून घ्या.‌ तीन-चार चेक्कलु एका वेळी तळायला घाला. एक बाजू अंदाजे पन्नास टक्के तळली की दुसऱ्या बाजूने तळून घ्या. दोन-तीनदा उलट-सुलट तळून टिशू पेपरवर काढून घ्या.

पूर्णतः थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. दोनेक आठवडे टिकतील… खरंतर तोपर्यंत शिल्लकच राहणार नाहीत!

खमंग चवदार खुसखुशीत चेक्कलु तयार आहेत. चार वाजताच्या चहासोबत द्या किंवा दिवाळीच्या फराळात वाढा.

चेक्कलुनक्की करून पहा व इथे फोटो टाकायला विसरू नका.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 
  • फोटोतील घटक पदार्थ दिलेल्या प्रमाणात नाहीत. तसेच त्यात तळणाचे तेल दिलेले नाही.
  • वरील कृतीत तळण्यासाठी रिफाइंड सूर्यफूल तेल वापरले आहे. ते किंवा उच्च उत्कलनांक असलेले इतर कोणतेही तेल वापरता येईल.‌
  • चणाडाळ, मुगडाळ, हे दोन्ही घटक यात नको असतील तर कोणताही एक घटक घेतला तरी चालेल.
  • आवडत असल्यास वरील डाळींशिवाय / डाळींऐवजी शेंगदाणे भाजून, पाचोळा काढून, द्विदले फोडून चार-पाच तास भिजवून घातले तरी चालेल.
  • पिठीचे तांदूळ शक्यतो जुने, उपलब्ध असल्यास रेशनचे घ्या. एचएमटी, सोना मसूरी वगैरे नको.
  • चेक्कलु पुरीसारखे फुगणे अपेक्षित नाही. तसे होत असल्यास उंड्यात किंचित तांदूळपिठी मिसळून दहा मिनिटे झाकून ठेवावे.
  • चेक्कलु मध्यम आचेवर तळावेत. वेळ लागला तरी नंतर चव उत्कृष्ट होते.
  • पीठ भिजवायला कोमटपेक्षा शक्यतो गरमच पाणी वापरावे. खुसखुशीत होण्याची ही pro-tip समजावी.

चेक्कलुशिवाय अरिसेलु (मराठी अनारश्याचे तेलुगु भावंड) हा पदार्थही आन्ध्र-तेलंगणात लोकप्रिय आहे.

शेजाऱ्यांनी दिलेले अरिसेलु व घरचे चेक्कलु -
चेक्कलु व अरिसेलु

तेलुगु चेक्कलु व मराठी शंकरपाळे -

चेक्कलु व शंकरपाळे

चेक्कलु, अरिसेलु व विकतची खारी बुंदी -

चेक्कलु, अरिसेलु व खारी बुंदी

चेक्कलुशिवाय मुरुकुलु (मराठी चकली-शेवेचे तेलुगु भावंड) हा पदार्थही आन्ध्र-तेलंगणात लोकप्रिय आहे.

चेक्कलु व मुरुकुलु (पूर्वी काढलेला फोटो ) -

चेक्कलु मुरुकुलु

नवीन मायबोलीकरांसाठी - पाककृती व सादरीकरण आवडलं असेल तर खाली वामन राव यांचे चाहते व्हा! हे बटन दाबा! 😜

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण, चर्चा, अनुभव
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! चेक्कलु फेवरेट आमच्याकडे. मुरुकुलु / मुरक्कूही. 🤤

फोटो तर तुमचे नेहमीच टॉपनॉच असतात, an absolute delight for the eyes. 😍

Batter तयार करतांना त्यात मोहन म्हणून लोणी घालणे ही game changer स्टेप तुमच्यासारखे पाकनिपुण सत्पुरुष सहजतेनी सांगून टाकतात. चवीतला फरक पहिल्या तुकड्यातच समजतो. डिट्टो फॉर बेन्ने मुरक्कू

तमिळ थलैवांकडचे मेलगु वडै (MILAGU VADAI) ही आवडतात, थोडे(च) वेगळे असतात. सालीची + बिन सालीची उडिद डाळ+ काळे मिरे वापरून केलेले. तमिलनाडूत अंजनैय्यार वडै सुद्धा म्हणतात कारण सगळ्याच फेमस मंदिरातून अंजनैय्या/हनुमंताला हाच नैवेद्य असतो.

अरिसेलुची मजा मात्र मकर संक्रांतीला - तीळ लावून नटवलेले ❤

धन्यवाद, Srd, अनिंद्य.

डिट्टो फॉर बेन्ने मुरक्कू
>>> अगदी अगदी! चकली, पप्पु चेक्कलु, बेन्ने मुरक्कु या सर्वांमध्ये खुसखुशीतपणाचे महत्त्वाचे कारण म्हणजे पिठामध्ये घातलेला स्निग्ध घटक - तेल तूप किंवा लोणी.

मेलगु वडै (MILAGU VADAI)
>>> संदर्भासाठी धन्यवाद. नक्की करून पाहीन.

छान पाककृती
फोटोज तर नेहमीप्रमाणे सुंदर आणि अगदी प्रोफेशनल

मस्त फोटो आणि लेखन. माझ्या तेलुगू शेजारणीच्या कृपेने मी भरपूर वेळा खाल्लेली आहे. ती हैदराबादहून आली की आम्हाला मिळतेच. Happy

मस्त फोटो आणी क्रुती छान लिहता तुम्ही.
शन्करपाळे आणी चेक्कलु असलेली प्लेट फार युनिक आहे.

धन्यवाद, स्वाती_आंबोळे, ऋतुराज., Sparkle, maitreyee, अस्मिता., प्राजक्ता, अन्जू, धनश्री-, झंपी, स्वाती२

---

अहोंनी हे चेक्कलु आज दुपारी पुन्हा केले.
चेक्कलु
त्यातल्या चुकार चकलीकडे दुर्लक्ष करा! Wink
चेक्कलुत चकली
चेक्कलु मोडल्यावर असा चुरा व्हायला हवा!
चेक्कलु

मी करायचा "विचार" करतेय.
आता, नक्की करणं आणि विचार असणं ह्या दरम्यान माशी शिंकली नाही म्हणजे मिळवलं. Proud
पन मला चहा बरोबर असं कुरकुरीत खुप आवडतं खायला.
दुकानात गेले की रिबन पकोडा, चकली, शेव असे उचलायची पण आता बाहेरची तेलं कशी काय माहित नाही म्हणून असे उचलून आणणं कमी केलय.
बघते एखाद्या छोट्या वाटीचं करून आणि टाकते फोटो. ..

(अजुन शेव करायचा विचार पण आहे डोक्यात)...

सौदिंडियन लोकांचे अधिरसम(तामिळ) / अरीसेलु (तेलुगु) आपल्या अनारश्याची चुलत भावंडं आहेत. ते जरा जाड असतात आणि आंबवण्याची क्रिया नसते.

वामन राव, तुम्ही सोलापुर बॉर्डरवरचे मूळचे मराठी पण तेलुगु (समजणारे) आहात का? असेच कुतुहलाने विचारतेय. कारण अर्धी अधिक मित्र जे तिथे रहातात, त्यांच्यावर तेलुगु खाद्य संस्कृतीचा प्रभाव आहे. वरच्या ताटात ली करंजी मस्त दिसतेय. घरी केलेली आहे का?

@ झंपी, धन्स्

नक्की करणं आणि विचार असणं ह्या दरम्यान माशी शिंकली नाही म्हणजे मिळवलं.
>>> There are many slips between a cup and a lip! Lol

बघते एखाद्या छोट्या वाटीचं करून आणि टाकते फोटो. ..
>>> नक्की करून पहा.

तुम्ही सोलापुर बॉर्डरवरचे मूळचे मराठी पण तेलुगु (समजणारे) आहात का?
>>> आमचा नांदेड जिल्हा

वरच्या ताटात ली करंजी मस्त दिसतेय. घरी केलेली आहे का?
>>> काजू कतली बाहेरची, अरिसेलु शेजारचे, बाकी घरचं.

>> There are many slips between a cup and a lip!<<
हाहा.

वो ऐसा है न, हम जरासे मिझाज है, हवा भी हमारे मनसुबे खराब कर सकती है…

मस्त रेसिपी आणि फोटो .पहिलाच फोटो इतका सुंदर अगदी प्रोफेशनल आलाय. चेक्कलु तोपासू दिसतायत ,करून बघणार तसंही दिवाळीचे गोडापेक्षा तिखटाचेच पदार्थ जास्त आवडतात.

रेसिपी लिखाण नेहमीप्रमाणेच सुंदर..
एकदम सिस्टिमॅटिक.

एक शंका आहे, डाळी मिक्सर मध्ये थोड्या वाटायच्या की नुसत्या भिजवून पिठात मिसळायचे ?

ही देखील कृती मस्त.
भिंग घेऊन शोधल्यावर मला एक चूक मिळाली.
साहित्यात तांदळाचं पीठ म्हटलंय आणि फोटोत तांदूळ दिसताहेत Light 1

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार व उशिरा प्रतिसादासाठी क्षमस्व.

डाळी मिक्सर मध्ये थोड्या वाटायच्या की नुसत्या भिजवून पिठात मिसळायचे ?

>>> डाळी (वा शेंगदाणे) वाटायचे नाहीत, नुसते भिजवून पुठात मिसळायचे. पुऱ्या लाटताना ते चपटे होतात. खाताना खुसखुशीत लागतात.

साहित्यात तांदळाचं पीठ म्हटलंय आणि फोटोत तांदूळ दिसताहेत.

>>> व्हय, व्हय. आधी पीठ ठेवून पाहिलं होतं, पण ते फोटोत फारसं चांगलं दिसत नव्हतं, म्हणून मग तांदूळ ठेवले. त्याशिवाय, फोटोतील तांदूळ हे चांगल्या प्रतीचे कर्नुल सोना मसुरी तांदूळ आहेत. प्रत्यक्ष पीठ हे जुन्या रग्गड तांदुळाचे घेतले. त्याचेच चेक्कलु चांगले होतात,

भिंग घेऊन शोधल्यावर मला एक चूक मिळाली.

आप की पारखी नज़र और निरमा सुपर