1. All roads in the city are fucked up.
2. सकाळी आधी अंबाबाईची सपत्नीक ओटी भरली. कुलदेवता तुळजापूरची भवानी असल्याने काही दिवसांपूर्वी तिकडेही जावे लागले होते. हाल हाल झाले. त्यामुळे भवानीस माझ्यापासून माझ्या वंशाची कुलदेवता बदलत असल्याचे सांगून आलो. जेजुरी कशीतरी मॅनेज होते नाहीतर भंडाऱ्याऐवजी गुलाल असा बदल करणार होतो. परंतु ते करावेच म्हणतो आहे. कोल्हापूरची अंबाबाई आणि जोतिबा हे कुलदैवते म्हणून मी रजिस्टर करत आहे. हा एकदम हार्ड निर्णय आहे. विशेषतः जोतिबाशी जुळवून घेणे प्रचंडच कठीण जाणार असे दिसते. खंडोबा कितीही केले तरी एकदम माणदेशी व्यक्तिमत्त्व आहे. जोतिबा थोडा समृद्ध शेतकरी असलेल्या भागातला लोकदेव. देव्यांचे काही वाटत नाही. स्त्रियांना कायमच गृहित धरण्याची मानसिकता भारतीय संस्कृतीत अगदी लहानपणासून रुजवली गेली असल्याने तसे असावे. म्हणजे भवानी काही काळ रुसू शकते. परंतु ती भक्तांच्या संख्येमुळे एकंदरीत प्रचंड ओव्हरव्हेल्म होते असे जाणवून येते. त्यामानाने अंबाबाई एकदम अप्रोचेबल आहे. अजिबात घाईगडबड होत नाही. तुळजापूरला एकदा मी सफोकेटच झालो होतो. कसाबसा तिथून सुटलो होतो. तर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन अतिशय निवांत झाले. त्यामुळे रीतसर कुलदैवते बदलून घेणे सोयीस्कर आहे.
3. श्रावण असल्याने घरच्या लोकांची जास्तच कुरकर होत असली तरी कोल्हापुरात येऊन तांबडा पांढरा न खाणे हा गुन्हाच ठरला असता. 'निलेश' नेहमीप्रमाणेच मस्त. निलेश हे consistent आहे त्यामुळे चॉइस ची जास्त झिग झिग राहत नाही. इतर आवडत्या खाणावळी हव्या असतील पोतडीतून बाहेर काढण्यात येतील.
4. इथेच कुणीतरी शेअर केलेला कोल्हापुरच्या सोन्याच्या विशेषत: ठुशी अलंकाराचा व्हिडीओ बायको यांना आधीच दाखवला असल्याने अपेक्षितरित्या एक ठुशी घ्यावीच लागली. बायकोस सोनाराच्या दुकानात उत्साहाने घेऊन जाणारा नवरा कधीही एकच ठरवलेली गोष्ट घेऊन परत येत नाही. शिवाय आत गेल्यावर तीन तास कसे उडून जातात हे त्याचे त्यालाच ठाऊक. बायको घालून दाखवत असलेल्या प्रत्येक दागिन्याला पसंत आहेही नाहीही असे न्यूट्रल भाव चेहऱ्यावर सतत बाळगणे हा एक्सर्साइज़ करुन जीव विटला. त्यात एकदम भंगार चहा त्यांनी पाजला. खिसा पूर्णपणे मोकळा होईल याची खात्रीच असली पाहिजे.
5. रात्री मामाकडे उतरलो. हा मामा माझ्याहून तीन वर्षे लहान आहे.
संध्याकाळी रंकाळ्यावर फिरायला गेलो तर प्रसन्न होण्याऐवजी हताश झालो. जुन्या मित्रांची भेट झाली. गप्पा गोष्टी झाल्या.
6. दुसऱ्या दिवशी काही प्रोजेक्ट पाहिले. मला कोल्हापुरात ३ बीएचके फ्लॅट हवा होता. एक प्रोजेक्ट आवडला होता परंतु ३ बीएचके फ्लॅट काहीच्या काही लहान आहेत. रो हाऊस नावाचा एक भीषण प्रकार मला घ्यायचा नाही तरी देखिल आता तसलाच पर्याय उरला आहे असे वाटते. त्यापेक्षा हा प्लॅन ड्रॉपच करावा का असे मनात येऊ लागले आहे.
7. नंतर इचलकरंजी मार्गे खिद्रापूरला गेलो. भयंकर उकडत होते. शिजल्याप्रमाणे. सगळीकडे पुराचे पाणी साचून दमटपणा प्रचंड वाढला होता. खिद्रापूरची व्यवस्थित वाट लागायला सुरु झालेली आहे. तिथली सुंदर शांतता पूर्णपणे हरवली आहे.
8. शहाण्या माणसाने आता नदीकाठी राहू नये.
9. यावेळेस मात्र कोल्हापूर माझ्यासाठी अत्यंत वेगाने इर्रेलेवेंट होत आहे असे जाणवले. संध्याकाळी परत आलो तेव्हा एका सीनियर डॉक्टर मित्राकडे जेवायला गेलो. खूप जबरदस्त गप्पा झाल्या. रथिन रॉय हे आम्हा दोघांचे नवे ऑब्सेशन आहे. आणि आम्ही दोघेही कोल्हापुरात रथिन रॉयचे आकलन applicable आहे का ते ताडत बसलो. उदा. एका प्रोजेक्ट मधे ३ बीएचके पण होते, २ बीएचके पण होते, १ बीएचके पण होते आणि १ आरके सुद्धा होते. म्हणजे किमान तीन आर्थिक स्तरातल्या लोकांना एकत्र बांधून ठेवणे हे महत्वाकांक्षी कार्य संबंधित प्रोजेक्ट पार पाडणार होता.
10. रथिन रॉय यांच्या मते इंडियाची फसवी ग्रोथ ही टॉप १०-१५ टक्के लोकांनी घडवलेली त्याच लोकांच्या साठीच असून उर्वरित समाज मात्र गयागुजराच आहे. म्हणजे पुण्यात '२ बीएचके फक्त ६५ लाखात' हे '१५ नंबर' किंवा तत्सम outskirt जागी लावलेले होर्डिंग असते. त्यावर एक आ वासून आश्चर्यचकीत झालेला मध्यमवर्गीय पुरुषाचा फोटो असतो. त्या प्रोजेक्टच्या ब्रोशर मध्ये युरोपियन मुले त्या प्रोजेक्ट च्या बागेत खेळताना दाखवलेली असतात. इथे २ बीएचके घेणारे लोक कोण असतात? फक्त ६५ लाख? लोल. ज्या लोकांना ६५ लाख 'फक्त' वाटू शकतात अशा लोकांची एक गेटेड कम्युनिटी घडवली जाते. या आयसोलेशन पेक्षा कोल्हापुरात सगळेच एका मोठ्या इमारतीत कोंबणे जास्त सामाजिक वाटले. म्हणजे एकाच इमारतीत १ आर के मध्ये राहणाऱ्या कुटुंबातल्या एका मुलीला ३ बीचके मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबात बेबीसिटर म्हणून जॉब मिळू शकतो. गेटेड कम्युनिटी सारखे विविध सर्विस देणारे लोक हे शेजारच्या बकाल झोपडपट्टीतून येत नाहीत. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की अशा ठिकाणी राहिले तर डोके ताळ्यावर राहील. परंतु डोके ताळ्यावर राहायला माणसांची अभिरुची समान असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वाद होणार असतील तर काहीच अर्थ नाही. तसेच मी मुळातच एक रूढर्थाने माणूसघाणा माणूस असल्याने आणि मला झोपताना pindrop शांतता लागत असल्याने मी अशा ठिकाणी राहू शकत नाही. मी युनिव्हर्स २५ या प्रयोगातील वरच्या मजल्यावर राहाणारा एक उंदीर आहे.
11. त्यामुळे मी डॉक्टरांशी हुज्जत घालून त्यांचे मातीचे पाय दाखवून दिले कारण डॉक्टर दूध आणायला SUV मधून जातात. त्यामुळे मीही त्यांचासारखाच (त्यांच्याइतका नसलो तरी) exclusivity पाहणारा एक क्षुद्र जीव आहे. आणि कोल्हापुरात इंडिपेंडेंट घर परवडत नाही, रो हाऊस आवडत नाहीत, मनासारखा फ्लॅट मिळत नाही, ब्लॅकचा पैसा अजिबात नाही अशा सर्व बाजूंनी पिडला गेलो आहे.
12. अशा रीतीने माझे कोल्हापूरकर होण्याचे स्वप्न भंगत आहे. आता कुलदेवता सुद्धा बदलल्या. किती त्याग करावा माणसाने?
'रॉय'ची कोल्हापूर वारी
Submitted by रॉय on 17 October, 2025 - 15:19
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळे रस्ते उदोउदो म्हणा.
सगळे रस्ते उदोउदो म्हणा.
महाराष्ट्रात मुख्य शहरांची हीच परिस्थिती आहे.
आपल्या घराजवळचे एखादे दैवत कुलदैवत करणे योग्य.
छान लिहिलंय. एकदा सांगली
छान लिहिलंय. एकदा सांगली कोल्हापूरला भेटू.
कुलदैवताला सांगा आता ऑनलाईन
कुलदैवताला सांगा आता ऑनलाईन भेटायची काहीतरी व्यवस्था कर.
आणि असे लोकप्रिय कुलदैवत का बरे घराण्याने निवडावे??? आमचे बघा.. मुधाई देवी हे कुलदैवत. कधीही जा, निवान्त शांत देवी भेटते आणि सगळी भडास निवांत ऐकुन घेते, जवळ घेऊन सांत्वन करते आणि मन शांत करुन परत पाठवते.
. खिद्रापूरची व्यवस्थित वाट लागायला सुरु झालेली आहे. तिथली सुंदर शांतता पूर्णपणे हरवली आहे>>>>>>>>
सहमत. पाच वर्षांपुर्वी गेलो होतो. कोणीही नव्हते. सहा महिन्यांपुर्वी गेलो तर गर्दी उसळलेली. तरी शनिवार-रविवार नव्हता. तेव्हा काय होत असेल देव जाणे. गर्दीमुळे मंदिर निट बघायला मिळत नाही आणि त्या गर्दीला मंदिर बघण्यात रसही नसतो. स्वतःचेच फोटो आणि रिल्स हेच सुरु.
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
परिच्छेद क्रमांक 4 ठुशी खरेदी
परिच्छेद क्रमांक 4 ठुशी खरेदी...
हा प्रसंग समजा एखाद्या पुस्तकात किंवा लेखात असता तर प्रस्तुत लेखकाची प्रतिक्रिया काहीशी अशी झाली असती का?
" प्रस्थापित, मध्यमवर्गीय(बा***) कुटुंबातल्या लटक्या चिंतांचे अतिशय cliche प्रकटन आहे हे. ठुशी घेण्याची सामाजिक आणि आर्थिक क्षमता असणाऱ्यांना असले पांचट, वरण भात लेखन सुचते. कष्टकरी समाजाच्या पै पै जमवून सोन्याचा एखादा तुकडा बाळगण्याची स्वप्ने बघणाऱ्या मनापासून कोसो दूर असलेले हे लेखन वाचण्यासारखे तरी कसे वाटते"
मी मुळातच एक रूढर्थाने
मी मुळातच एक रूढर्थाने माणूसघाणा माणूस असल्याने आणि मला झोपताना pindrop शांतता लागत असल्याने मी अशा ठिकाणी राहू शकत नाही>>> म्हणजे तुम्ही पण फक्त 65 लाख वाल्या ठिकाणीच राहणार का?
पुणेकार्प,
पुणेकार्प,
>> म्हणजे तुम्ही पण फक्त 65 लाख वाल्या ठिकाणीच राहणार का? <<
नाही, मला अजून महाग घर हवे आहे.
>> कष्टकरी समाजाच्या पै पै जमवून सोन्याचा एखादा तुकडा बाळगण्याची स्वप्ने बघणाऱ्या मनापासून कोसो दूर असलेले हे लेखन वाचण्यासारखे तरी कसे वाटते <<
मला कष्टकरी समाजाचा काहीही पुळका वगैरे नाही. जगाच्या अंतापर्यंत हे कष्टकरी लोक असणारच आहेत आणि त्यांचे पुळके असणारा मराठी मध्यमवर्ग देखील असणारच आहे त्यामुळे मला फारशी चिंता नाही.
अजून एक म्हणजे ठुशी दिसायला भरगच्च असली तरी महाग नसते. कारण कोल्हापुरातल्या वातवरणामुळे कोल्हापूरकडचे सोनार एका तोळ्यातून शेकडो मणी काढू शकतात त्यामुळे मी लाखो रुपये उधळले नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=YvptpGDaljI
>> वरण भात <<
हे हे, हो जोक जरा लेम आहे. मला लटकी चिंता वगैरे नाही.
मला झोपताना pindrop शांतता
मला झोपताना pindrop शांतता लागत असल्याने मी अशा ठिकाणी राहू शकत नाही.
मी मोठे कर्ज काढून मित्राच्या प्रकल्पात घर घेतले तर बाकी सर्व उत्तम आहे.
पण खालीच गावठाण असल्यामुळे पावसाळ्याचे महिने सोडले तर दर चार दिवसांनी कुणाचे तरी बारसे, लग्न हळद, संगीत असते. त्यामुळे लाऊडस्पिकर यावर बीभत्स गाणी चालू असतात.
याशिवाय भाद्रपद गणपती, नवरात्र आणि माघी गणपती या वेळेला गणपती आणणे पासून गणपती विसर्जन यासाठी चार माणसे पण मागे रिक्षा आणि त्यावर बसवलेले भोंगे आणि ढोल ताशे किंवा डी जे च्या भिन्ती यानी कानठळ्या बसवणारी गाणी लावून जाणे हे कायम चालू असते. संध्याकाळी घरी आल्यावर दहा वाजेपर्यंत असा ठणाणा चालू असला तरी फार चिडचिड होत असे.
यासाठी मी चार लाख रुपये खर्च करून पूर्ण घराला फेनेस्टा या कंपनीचे साउंड प्रूफिंग क्करून घेतले आहे. बाकी साथ सत्तर लाखांपेक्षा हे ४ लाख रुपये तुम्हाला जास्त मानसीक शांती देतात.
अनेक माणसांनी मला चा~~ र ला ~~ख ? बाप रे! असे विचारले. हा एक मानसिक अडथळा आहे.
मी एकाला विचारले तुम्ही कार घेतली त्यावर टॉप मॉडेल साठी साडे तीन लाख रुपये अधीक देऊन पॅनोरॅमिक सन रुफ घेतले त्याचा किती वेळा वापर केला? त्याचे तोंड एकदम बंद झाले.
माणसं मोटार विकत घेतात तेंव्हा सहजासहजी दीड दोन लाख रुपये अधिक टाकून 'वरचं' मॉडेल घेतात. त्याच्या उपयोगा पेक्षा रोज मिळणारी मानसिक शांतता मला जास्त महत्त्वाची वाटते.
आपल्याला हव्या त्याठिकाणी घर घ्या. घराला, निदान बेडरूमला साऊंड प्रूफ करून घ्या.
लोक काही का म्हणेनात तुमची शांत झोप जास्त महत्त्वाची आहे
सुबोधजी, बहुतेक ठिकाणी
सुबोधजी, बहुतेक ठिकाणी खिडक्या दारे बिल्डरच बसवून देतात त्यामुळे फ्लॅट अंडर कंस्ट्रक्शन असेल तर बिल्डरला सांगून स्वतः चा खर्च करून पूर्ण साउंड प्रुफिंग करावे असे मी देखील ठरवले होते. याला बिल्डर आनंदाने तयार होतात कारण त्यांचा खर्च वाचतो. कारण पुन्हा नव्याने दारे खिडक्या करायच्या तर खर्चही वाढतो शिवाय हव्या त्या क्वालिटी च्या खिडक्या दारे घेता येत नाहीत. विशेषत: ८० टक्क्यांपर्यंत नॉइज पोल्लुशन कमी करणाऱ्या डबल ग्लेझ्ड काचा किंवा मधे निर्वात किंवा वायू भरलेल्या डबल काचा असलेल्या खिडक्या बसवणे शक्य नाही. शिवाय काच देखील कोणत्या तंत्रज्ञानाने बनवली आहे त्यावर देखील बरेच अवलंबून असते. यासाठी मीही पाचेक लाखांपर्यंत बजेट ठेवले होते. मला दोन गोष्टी हव्याच होत्या एक म्हणजे पूर्ण साउंडप्रूफिंग आणि उत्तम दर्जाचे बाथरूम आणि टॉयलेट.
तुम्ही अतिशय योग्य केले. माणूस दिवसला साताठ तास झोपतो मात्र त्यासाठी इन्वेस्ट करायला तयार होत नाही त्या ऐवजी फॉल्स सिलिंग आणि हॉटेल लॉबी सारखे इंटेरियर यांच्यावर जास्त पैसे उधळतो.
कोल्हापूरच काय, सर्व
कोल्हापूरच काय, सर्व लहानमोठ्या शहरांची हीच अवस्था आहे.
Can totally relate with the abhorrence to white noice / high decibel festivities all around.
माणूस दिवसला साताठ तास झोपतो
माणूस दिवसला साताठ तास झोपतो मात्र त्यासाठी इन्वेस्ट करायला तयार होत नाही
you said it
मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सल्ला देत असे. तुमची पादत्राणे आणि तुमची गादी हि नेहमीच आरामदायक असायला हवी
कारण
दिवसातील १६ तास तुम्ही या दोनपैकी एकावर असता.
दुर्दैवाने लोक गादी पेक्षा गाडीवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करतात. कारण "जमाने को दिखाना है"
बहुसंख्य मध्यमवर्गीय लोकांच्या घरी गेल्यावर त्यांच्या गाद्या पाहिल्या तर बहुसंख्य वेळेस कापसाचे गोळे गोळे आलेले असतात.
मध्यमवर्गीय माणसे सहसा पाच वर्षांत गादी बदलत नाहीत. हा खर्च बऱ्याच लोकांना वायफळ वाटतो.
उत्तम दर्जाच्या गादीवर केलेला खर्च हा भविष्यातील पाठदुखीच्या खर्चापेक्षा साधारणपणे कमी येतो.
पण गाडी विकत घेतली तर शोरूम मधून गाडीतील मॅट किंवा परफ्युम आणि तत्सम गोष्टीवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करतात.
हे काही मुद्दे वादाचे आहेत आणि सर्वाना पटतील असे नाही.
पण तरीही ......
>> काही मुद्दे वादाचे आहेत
>> काही मुद्दे वादाचे आहेत आणि सर्वाना पटतील असे नाही...>>
पटतात पण बजेट आडवं येतं.
कुलदेवी बदलून घेण्याचा फॉर्म
कुलदेवी बदलून घेण्याचा फॉर्म कुठे मिळाला
मजेशीर वाटले मला.
पण एकुणात गर्दी बघून वैताग येतो खरा
आमचे कुलदैवत जोतिबा
गाव कोल्हापूर
मुळ गाव पन्हाळा तालुक्यातच
तिथून तर चालतच जायचे लोकं
देवी मात्र तुळजापूरची
हे इतक्या लांब का आणि कसे ते देव जाणे.
देवी आहे हे ही माहीत नव्हते.
आमच्याकडे लिखापढी नाही
मौखिक पद्धतीने सासूबाई पुढे सुनांना सांगेल ते.
आमच्या आज्जीने अचानकच माझे लग्न ठरल्यावर तुळजाभवानी नाव लिवा पत्रिकेत असे सांगितल्यावर कळालं.
तोवर देवी काय कधी रुसली नव्हती.
आताही 3 वर्षात एकदा डोकं टेकवून येतात.
जोतिबा मात्र जवळ.
कुठल्याही गावी त्या त्या देवाला / देवीला त्यांच्या उत्सवावेळी गेले की फार गर्दी असते हे फिक्स.
हल्ली जोडून सुट्ट्या
उन्हाळी सुट्ट्या वै असेल तर कोपुतही अंबाबाईला तुफान गर्दी असतेच.
कोपुत फ्लॅट संस्कृती तितकी रुळली नाहैये
तुम्ही म्हणताय तश्या प्रोजेक्ट मध्ये सोसायटी मेंटनांस वरून बरीच कुरबुर होते
असो
लिहिण्याची शैली आवडते
लिहीत रहा
मलाही अनिंद्यंसारखं वाटलं.
मलाही अनिंद्यंसारखं वाटलं. सगळीकडचीच कथा आहे. लहान शहरांच्या बाबतीत तर असा "रेलेव्हंस न राहणे" वगैरेचा अनुभव आहे. मला तर आपल्याच शहरातील रस्ते ओळखू येत नाहीत दरवेळी. बाकी गर्दीच्या मंदिरांमधे जाणं जवळजवळ सोडून दिले आहे. देवाधर्माबाबत स्वतःची सोय पाहून जितका शॉर्ट कट मारता येईल तितका मारण्याकडे कल आहे. असेही पापपुण्याच्या पलीकडे गेलो आहोत.
चांगल्या मॅट्रेसना मम.
अस्मिता कसे आहे, भारतीय
अस्मिता कसे आहे, भारतीय माणसाच्या आयुष्याचे केंद्र कुटुंब असते. आता कुटुंब म्हंटले की प्रथा परंपरा पाळाव्या लागतात. कारण तोच एकमेव असा धागा असतो जो सगळ्यांना सेम पेज वर आणू शकतो. त्यामुळे कुळाचार वगैरे करावे लागतात.
कुलदैवत बदलता नक्कीच यायला पाहिजे.
प्रश्न टेक्निकलिटीचा नाही.
झकासराव,
एकदा सगुण रूपाला सामोरे गेले की, सगळे सगुण. देवांची व्यक्तिमत्वे तुमच्या मनात वास करतात. मग तुम्ही आस्तिक असा किंवा झालेले नास्तिक असा. आपल्या देवांची फिक्शनल का होईना व्यक्तिमत्त्वे तुमच्या मनात नांदू लागतात. टेक्निकली काय लोकांनी विठ्ठलाची मूळ मूर्ती ही नाहीच यावर हयात घातली असेल. पण शेवटी लाखो लोकांच्या मनात नांदणारी विठ्ठलप्रतिमा तीच जी आता कंटेम्पररी आहे.
त्यामुळे कुलदैवत बदलणे हा प्रश्न इमोशनल आहे. दर वेळेस तुळजापूरला जाणे अशक्य आहे आणि धोक्याचेही झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरकर व्हायचे असेल तर लोकल देवांना कुलदैवत केले की काम व्हायला पाहिजे पण इमोशनल अटैचमेंट चे काय?
कारण आपले देव रुसतात सुद्धा. त्यामुळे हे एक निगोशिएशन आहे. अर्थात घरातल्यांना ते टेक्निकली देखील पटवून देता येते उदाहरणार्थ अधिकारी आध्यात्मिक व्यक्तीने परवानगी दिली की घरचे ऐकतात.
लोक तसेही लांबवर जायला लागू नये म्हणून देवांच्या रेप्लिका तयार करतातच. (वरती त्याला एक मिथककथा देखील देतात : की देवी स्वप्नात आली आनी म्हणाली की मी तुया मागोमाग येते पण तू मागे वळून पाहिलास तर मी तिथेच थांबते वगैरे) त्यामुळे कुलदैवत बदलून घेणे काही फार अवघड नाही. फक्त अटॅचमेंट चा प्रश्न मार्गी लावावा लागतो. त्यासाठी लोकल प्रथा परंपरा पाळल्या की पुरेसे आहे.
भारतीय माणसाच्या आयुष्याचे
भारतीय माणसाच्या आयुष्याचे केंद्र कुटुंब असते. आता कुटुंब म्हंटले की प्रथा परंपरा पाळाव्या लागतात. कारण तोच एकमेव असा धागा असतो जो सगळ्यांना सेम पेज वर आणू शकतो. त्यामुळे कुळाचार वगैरे करावे लागतात.
>>>>
मला एकदम वाटले खंडेराव आला की काय रॉयच्या अन्गात
१ बीएचके पण होते आणि १ आरके
१ बीएचके पण होते आणि १ आरके सुद्धा होते. म्हणजे किमान तीन आर्थिक स्तरातल्या लोकांना एकत्र बांधून ठेवणे हे महत्वाकांक्षी कार्य संबंधित प्रोजेक्ट पार पाडणार होता.
>>> वाटत नाही. बहुतांश सुस्थित लोक आजूबाजूचे वेगवेगळ्या कॉंबिनेशनचे फ्लॅट घेऊन जोडी फ्लॅट म्हणून वापरतील. मुलांची भविष्यातली सोय करतील किंवा इन्वेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवतील.
ठुशीबद्दल सहमत. कमी खर्चात भारदस्त दिसणारा दागिना. कोपु साजही चांदीचा घेऊन सोन्याचं पाणी चढवता येतं. जवळच अथणीला चांदीचं काम होत असल्याने ती व्हरायटीही भारी असते.
तुमच्या लेखाच्या निमित्ताने तुळजाभवानीला किमान एकदा तरी सुट्ट्यांचे दिवस टाळून जायचे आहे हे आठवले. पण बाबांनी सांगितलेली तिथल्या बडव्यांनी एका गरीब शेतकरी माणसाला देवीपुढे नारळ वाढवल्यामुळे लाथा बुक्क्यांनी तुडवल्याची गोष्ट आठवत राहते.
@सुबोध खरेः एक्झॅक्टली याच त्रासाने मला बेडरुमच्या विंडो साउंडप्रुफ करवून घ्याव्या लागल्या. अख्ख्या घराला परवडल्या नसत्या. फेनेस्टा वर्क्स…
तुळजाभवानीची पूजा बडव्यांकडे
तुळजाभवानीची पूजा बडव्यांकडे नसते तर मराठा जातीच्या लोकांकडे – भोपे लोकांकडे असते. म्हणजे त्यांना भोपे म्हणतात आणि त्यांचे आडनाव माझ्या माहितीप्रमाणे "कदम" असते.
राजांनी किल्ले, प्रदेश जिंकून
राजांनी किल्ले, प्रदेश जिंकून घेतल्यावर तिकडे कुलकर्णी वगैरे मंडळाला पाठवले आणि कायम इथेच राहा सांगितले. मग त्या नव्या कुटुंबांनी आपली कुलदैवते तिकडे वर्ग केली. तुळजापूर, अंबेजोगाई ही उदाहरणे. त्या कुटुंबातील पुढच्या पिढ्या मुंबई पुण्याकडे परत आल्या आणि त्यांना प्रश्न पडतो की इतके दूरवर कुलदैवत कसे.