लाल भोपळ्याच्या सालींची किंवा दोडक्याच्या शिरांची चटणी

Submitted by स्वाती_आंबोळे on 29 September, 2025 - 17:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. गार्डनिंगची हौस असणारी मैत्रीण (मित्रही चालेल!)
२. ति(त्या)च्याबरोबर वारंवार गाठीभेटी
३. तिच्या बागेतला भोपळा किंवा दोडकी
४. त्या भोपळ्याची साल/पाठ किंवा दोडक्याच्या शिरा
५. तीळ
६. लसणीच्या पाकळ्या (ऐच्छिक आणि चवीनुसार)
७. हिरवी मिरची
८. मीठ
९. तेल
१०. लिंबूरस
११. कोथिंबीर
१२. दाण्याचं कूट

क्रमवार पाककृती: 

गार्डनिंगची हौस असणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करावी. आवड नव्हे, हौस!!
तिच्याकडे येताजाता रोपं, कलमं, बिया मागाव्यात.
क्वचित द्याव्यातही, पण त्या चवीपुरत्या. मागत राहिल्याने ही मैत्री वृद्धिंगत होणार आहे हे लक्षात ठेवावं.
तिने आठवणीने उरीपोटी वाहून आणलेल्या भाज्या ‘अगं कशाला?!’ , ‘वेळच नाही गं होत बै उस्तवार करायला!’ असे आढेवेढे घेत स्वीकाराव्यात.
भोपळ्या किंवा दोडक्याची भाजी/भरीत काय ते करावं, पण उतू नये, मातू नये, पाठी/शिरा टाकू नयेत.
तत्काळ वेळ नसेल तर फ्रिजात, लागलंच तर फ्रीजरमध्ये ठेवाव्यात.
मग सवडीने बाहेर काढून वेळ असेल तर बारीक चिरून घ्याव्यात. नसेल तर सरळ फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घ्याव्यात.
लसूण आणि मिरचीचे तुकडे करून घ्यावेत.
थोड्या तेलावर तीळ आणि हे वरचे जिन्नस परतून घ्यावेत.
आधणाचं झाकण ठेवून एखादी वाफ आणावी.
मग आंच बंद करून मिश्रण निवू द्यावं.
निवल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर, दाण्याचं कूट, मीठ आणि लिंबूरस घालून मिक्सरमध्ये तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा किंचित ओबडधोबड वाटून घ्यावं.
आवडत असेल तर चिमूटभर साखर घातलीत तरी चालेल, कोणाला सांगू नका म्हणजे झालं!
थोडी चटणी फ्रीज करून पुढच्या गटगला आठवणीने त्या हौशी मैत्रिणीसाठी न्यावी.
बाकीची पोळीशी, भाताशी, ब्रेड किंवा बेगलला लावून किंवा इतर कोणत्याही प्रकारे खावी.
तोंडाला चव आणि पोटाला फायबर न मिळाल्यास पैसे परत!

वाढणी/प्रमाण: 
हिरव्या मिरच्यांच्या संख्येवर आणि खाणार्‍याच्या क्षमतेवर अवलंबून.
अधिक टिपा: 

इथल्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये भोपळे/दोडके सहसा जून मिळतात.
हा प्रकार ताज्या/कोवळ्या सालींचाच छान लागतो.
त्यामुळे हौशी मैत्रीण मस्ट आहे!

अशीच चटणी कदाचित दुध्याच्या सालांचीही करता येईल, पण मी कधी केली/खाल्लेली नाही. तुम्ही केलीत तर कशी लागते ते जरूर सांगा.

मी सगळे घटकपदार्थ अंदाजाने घेतले, त्यामुळे प्रमाण लिहिलेलं नाही.
तसंच फोटो काढायचा राहिला या वेळी, पुन्हा केली की काढेन.
(ही माहिती नाही, हौशी मैत्रिणीसाठी हिंट आहे हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच. Proud )

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक श्रीकृती, आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख.

आमच्याकडे जरा वेगळी करतात. मी तर खरपूस परतून चटणी न करता ठेवते. लाल भोपळा, दुधी सालं, फ्लॉवर कोवळे दांडे, पडवळ बिया, घोसाळी, शिराळी सालं सर्वांची करतो आम्ही.

शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडेही घालतो फोडणीत. आल्याचे तुकडेही घालते. बाकी बहुतेक वर दिलीय तशीच रेसिपी.

Happy ही चटणी मीही नेहमीच करते, दुधीच्या सालीचीही अगदी अशीच. पण मी तिळाऐवजी शेंगदाणे घालते थोडे. लसूण आणि हिरवी मिरची भरपूर, त्याचीच चव जास्त खरेतर.

>>> लाल भोपळा, दुधी सालं, फ्लॉवर कोवळे दांडे, पडवळ बिया, घोसाळी, शिराळी सालं
>>> दुधीच्या सालीचीही अगदी अशीच

अरे वा! आणखी आयडिया मिळाल्या की! धन्यवाद! Happy
खोबरं ओलं की सुकं, अंजूताई? तेही घालून बघेन.

हो, मी दाण्याचं कूटही घातलं होतं खरं थोडं मिळून यायला म्हणून! लिहायला विसरले! लिहिते.

सुक्या खोबऱ्याचे तुकडे. नसेल तर ओलं खोबरे घालते, फोडणीत घालून जरा परतते.

दाणे नसतील तर दाण्याचं कूटही छान लागते. जसं तू घातलंस तसंच. आई कधी मिक्सरवर चटणी करायची, कधी असंच सर्व खरपूस परतून तोंडीलावणे करायची. मला चटणी करायच्या आधीची स्टेप आवडायची म्हणून मी तसंच ठेवते. नवऱ्यालाही ते दाणे, खोबरे मध्ये मध्ये येतं ते आवडतं त्यामुळे तोही मिक्सरमध्ये चटणी कर सांगत नाही Lol

लाल भोपळा म्हणजे पंप्किन का? खुप जाड नाही का होणार त्याची सालं?
मी पण शेंगदाणे कूट घालते. आता तीळ/खोबरं घालुन करुन बघेन. लसूण्/मिरची साठी अस्मिता+१. खरं तर ठेच्या मधे ह्या साली टाकल्या जातात Happy

ही चटणी इथून तिथे कशी गेली?
आढेवेढे घेतल्यास अळूही मिळणार नाही. बाकी रेसिपी छान. मी पण दुधीच्या सालीची, पडवळाच्या सालीची केली आहे.

छान आहे रेसिपी. मी दोडक्यांच्या शिरांची केलीय पण शीरा तेलात चांगल्या कुरकुरीत करुन केलीय. हात मोडेपर्यंत परतुन कुरकुरीत कराव्याच लागतात हा भ्रम डोक्यात फिट असल्यामुळे असल्या चटण्या करायच्या ईच्छा व्हायच्या आधीच शीरांना कंपोस्टीत टाकते.

तसे करणे आवश्यक आहे असे वर कुठे लिहिलेले नसल्यामुळे ही चटणी करुन पाहिन.

पडवळाची साल काढतात हे माहित नव्हते. तितका जुन पडवळ असेल तर मी वापरतच नाही.

ही चटणी ऐकून आहे पण मी कधी केलेली नाहीये . फोटो टाकल्यास स्पेशली शिरा कश्या काढल्या तर करून बघेन

छान आहे रेसिपी. मी दोडक्यांच्या शिरांची केलीय पण शीरा तेलात चांगल्या कुरकुरीत करुन केलीय >>>> मी पण अशीच करते. आमटीभात तोंडी लावायला अशी दोडको/दुधीच्या सालीची चटणी … हा हा हा

अग सोल्याने काढायच्या आणि मग कापायच्या. त्या काढलेल्या शिरा चटणीची आठवण करुन देतात तसे मी घाईत दोघांनाही टाकुन देते. उगीच कामे वाढवायची नाह्वेत. फ्रिजात ठेवल्या तर पुढच्या वेळेस फ्रिज पुसतानाच त्या बाहेर पडायची १०० टक्के खात्री आहे.

गार्डनिंगप्रेमी मैत्रिणीकडून दोडकी मागवणे किंवा तिने ते पाठवणे या खर्चात इथे पाटीभर दोडकी मिळतील.
त्यामुळे बाजारातून आणलेल्या दोडका-भोपळ्यासोबत तुम्ही डिस्क्रिमिनेशन करताय हे सखेद नमूद करावं लागतंय.
ऑल दोडके-भोपळे मॅटर...
जय हिंद, जय महाराष्ट्र!!!

ता. क. : या शिरा परतवून घ्यायची किचकट स्टेप पाकृमध्ये लिहिली नसल्याने पाकृ करून बघण्यात येईल.

माझी आजी दोडक्याच्या शिरांची चटणी तुम्ही लिहिलंय तशी करायची.छान लागते. श्रीकृती वाचून lol. बाकी दोडके वाचून अस्मिता ची आठवण आली.

“श्रीकृती” 😀

हा खोडकरपणा आवडतो. तो कायम रहावा यासाठी सदिच्छा.

लसूण घालत नव्हते.आता लसूण घालून करेन

पडवळच्या बियांची पण .. .... पडवळच्या कोवळ्या बिया तिखट, हळद मीठ लावून तांदळाच्या पिठात घोळवून शॅलो फ्राय करायच्या.अशक्य लागतात.

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार. Happy

अदिती, मी बटरनट स्क्वाशच्या सालींची केली होती, पण आई लाल भोपळा कोवळा मिळाला तर त्याच्या पाठींची अशीच करते.

सायो, बरंबरं, आढेवेढे नाही घेत - अळूचा सप्लाय बंद करू नका प्लीज! Proud
चटणी व्हाया न्यूयॉर्क गेली. Proud

माझेमन,
>>> ऑल दोडके-भोपळे मॅटर...
हो हो! होलहार्टेडली अग्री! पण ताजे, कोवळे, ब्याकयार्डातून अस्से खुडून आणलेले आर मोअर इक्वल. Proud

साधना आणि मंजूताई, मला दोडक्याच्या शिरांची तशी कोरडी चटणीही आवडते - नुसती फोडणीवर तीळ + मिरच्या + मीठ घालून खरपूस परतलेली.

देवकी, आता पडवळ आणायलाच हवं मला! Happy

अनिंद्य Happy

लेखन मस्तच. ही चटणी मस्त होते फक्त आम्ही कधी वाटत नाही , तशीच ठेवतो कुरकुरीत.
पडवळाच्या बियांचा विषय आलाय म्हणून सांगते चटणी करायचा कंटाळा आला तर बिया फोडणीत परतायच्या अगदी दोन मिनिटं आणि तिखट मीठ घालायचं आणि खायच्या मस्त लागतात.
किंवा वेळ असेल आणि मूड ही असेल तर त्या बियांमध्ये डाळीचं पीठ, थोडी कणिक ,तिखट मीठ घालून त्याचं छोटंसं थालीपीठ लावायचं. एकदम मस्त लागतं पण फारच लिमिटेड होतं.
माठाची ,अळूची देठी, पडवळच्या बिया, भोपळ्याची साल, शिराळ्याच्या शिरा वगैरे फार क्वचित् फेकून दिल्या जातात. असो.

नवीन प्रतिसादकांचे आभार.

ममो, ही कोरडी चटणी नाही - सालं वाफवून त्यात वाटताना कोथिंबीरही घातल्यामुळे आपल्या खोबर्‍याच्या चटणी / स्प्रेडसारखी होते ही.
थालिपिठाची आयडिया मस्त आहे, करून बघेन. Happy

ममो, ही कोरडी चटणी नाही - सालं वाफवून त्यात वाटताना कोथिंबीरही घातल्यामुळे आपल्या खोबर्‍याच्या चटणी / स्प्रेडसारखी होते ही. >> ओके स्वाती.