दशावतार – थोडे कौतुक थोडी निराशा!

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 September, 2025 - 06:55

दशावतार – थोडे कौतुक थोडी निराशा!

चित्रपट अगदी दुसर्‍या दिवशी बघायचा असेल तरी जाण्याआधी आपण त्याचा थोडा अभ्यास करून जातो. चित्रपट कुठल्या विषयावर अन कुठल्या जॉनरचा आहे, कलाकार कोण आहेत, गाणी कशी आहेत वगैरे जुजबी माहिती घेतो. त्यासाठी ट्रेलर बघतो, youtube वर गाणी ऐकतो, सोशल मीडियावर रिव्ह्यू वाचतो. यातून चित्रपट कसा असेल याचे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होते, आणि त्यातून चित्रपटाबद्दल आपल्या काही अपेक्षा निर्माण होतात.

अगदी शून्य माहिती घेऊन बहुधा एखादा वाळवीच मी बघायला गेलो असेन. आणि त्यानेही अचानक भयानक मध्ये सुखद धक्का दिला होता. पण दशावतारचा मात्र फर्स्ट टीजर जेव्हा आलेला तेव्हापासूनच याला बघायचे म्हणून शॉर्टलिस्ट केले होते. त्या टीजर मधील बॅकग्राऊंड म्युझिक प्रचंड आवडले होते. काल चित्रपट बघायला जाण्याआधी पुन्हा ट्रेलर पाहिले, एकदोन गाणी ऐकली आणि छान मूड तयार करून गेलो. पहिल्या शनिवारीच जात असल्याने रिव्ह्यू फार वाचनात आले नव्हते, पण जे काही वाचले त्यात दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यांना तश्याच ताकदीची भूमिका मिळाली तर ते काय करू शकतात याची कल्पना असल्याने त्यांना बघायची उत्सुकता दुप्पट होती.

चित्रपटाला सुरुवात झाली, प्रभावळकरांची एंट्री झाली आणि आज काही ते निराश करत नाही अशी बेअरींग त्यांनी पकडली. चुरचुरीत, हलकेफुलके आणि जगात गोड अश्या मालवणी भाषेतील संवादांसह चित्रपट पुढे सरकू लागला. मोजक्याच प्रसंगातून बापलेकाचे नाते खुलू लागले. लेकाच्या भुमिकेत सिद्धार्थ मेनन होता. दोघांतील केमिस्ट्री मस्त जुळत होती. सोबतीला कोकण होताच. कोकणातील घरे, पायवाट, मंदीर, तलाव, झाडे छान दाखवलीच, पण एका झाडाखालचा लव्हर स्पॉट फार आवडला. अरे हो, त्या भुमिकेत प्रियदर्शिनी होती. छान सुंदर दिसत होती. ईतर गावकर्‍यांमध्ये उठून दिसत होती. माझ्या एका मित्राला एवढ्यासाठीच तिचे कास्टींग ऑड वाटले. याऊलट मला चित्रपटातील आवडलेल्या गोष्टीत तो एक नेत्रसुखद भाग वाटला. कोणाचे काय तर कोणाचे काय Happy

एकीकडे दशावतार म्हणजे श्वास असलेला बाप तर दुसरीकडे उतारवयात त्याचे हे असे नाटकात काम करणे त्याच्याच जीवावर उठेल याची कल्पना असलेला मुलगा. ज्याला आपल्या बापाचे हे नाटकाचे वेड माहीत असूनही त्याच्याच काळजीपोटी मनावर दगड ठेवून त्याच्या या वेडाला विरोध करावा लागतोय.

ही जर वेबसिरीज असती तर त्या बापलेकांची थोडी हसवणारी, तर थोडी हळवी करणारी द्रुश्ये मी ब्रिन्ज वॉच करत सलग अडीच-तीन तास सहज बघितली असती. पण चित्रपटात सुरुवातीच्या आर्ध्या पाऊण तासात ही पार्श्वभूमी तयार करून नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली आणि तासाभरातच ईंटरव्हल झाला. ईथून पुढे जंगलाची/पर्यावरणाची रक्षा आणि त्याच्या जीवावर उठलेल्याविरुद्ध बदल्याचा खेळ सुरू होणार हे समजले.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच राखणदार म्हणून एक जंगली श्वापद दाखवले आहे. त्यामुळे कांतारा चित्रपटाची आठवण आल्यावाचून राहत नाही. मला कांतारा बिलकुल आवडला नव्हता म्हणून चटकन आठवण आली. तुम्ही ती काढू नका आणि काढली तरी कॉपीचा शिक्का मारू नका. कारण राखणदार ही कोकणवासीयांची ओरिजिनिअल कन्सेप्ट आहे. पुढे या लढ्यात दिलीप प्रभावळकर यांना तो राखणदार मदत करतो, की तो स्वतःच चमत्कार घडवून हे काम करतो हे चित्रपटातच बघा.

या रक्तरंजित खेळात आपल्याला भगवान विष्णूची दहा रुपे म्हणजे दशावतार बघायला मिळतात. हे दशावतार म्हणजेच चित्रपटाचा हाय पॉईंट. शीर्षकात उल्लेखलेली निराशा ईथे पदरी पडली. यातले काही जमले तर काही फसले, किंवा पुरेसा प्रभाव पाडू शकले नाही असे वाटले. मराठी चित्रपटात बजेट ईश्यू असू शकतो, त्याने स्पेशल ईफेक्ट द्रुश्यात मर्यादा येऊ शकतात, पण आपल्याकडे दिलीप प्रभावळकर यांच्यासारखा बहुरुपी बहुआयामी कसलेला कलाकार असताना अश्या प्रसंगात त्यांच्या अभिनयक्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायला हवे होते. पण त्यांचा चेहरा रंगवून, माती चिखलाने माखवून, अंधारात आणि क्लोजअपमध्ये चित्रित केलेली द्रुश्ये फार प्रभाव पाडू शकली नाही असे वाटले. हे आपण अभिनयाची मर्यादा असलेल्यांसोबत करतो असे वाटले.

चौकट राजामधील चारचौघांपेक्षा वेगळा नंदू, झपाटलेला मधील तात्या विंचू, पछाडलेलामध्ये सूड दुर्गे सूड, ते मराठी मालिकेतील गंगाधर टिपरे आणि हिंदी चित्रपट लगे रहो मुन्नाभाई मधील बापू अश्या कैक कॅरेक्टरना त्यांनी अजरामर करून सोडले आहे. हा चित्रपट संपता संपता यातील "बाबुली" या सर्वांच्या पलीकडे जाईल असे वाटले होते पण ती पुरेशी संधी त्यांना मिळाली नाही असे वाटले.

अर्थात, वयोमानानुसार फिजिकल एनर्जीबाबत त्यांच्या मर्यादा सुद्धा आता लक्षात घ्यायला हव्यात. हे वाक्य लिहितानाच गूगल केले तर ८१ वर्षे वय दाखवत आहेत त्यांचे. म्हणजे जिथे त्यांनी बापाचा रोल केला तिथे ते प्रत्यक्षात आजोबांच्या वयाचे होते. हे आधीच गूगल करून आणि ध्यानात ठेवून गेलो असतो तर कदाचित आदर अजून दुणावला असता.

चित्रपटात कोकणातील दशावतार दाखवला गेला. तो किती तंतोतंत जमला हे तिथले प्रेक्षकच सांगू शकतील. पण ज्यांच्यासाठी तो नवीन आहे त्यांना हे नव्याने माहीत पडलेले प्रकरण आवडेल असे वाटते. मी कोकणात गणपतीतील भजने पाहिली आहेत, त्यावेळचा माहोल अनुभवला आहे. त्यामुळे दशावतार तेथील लोकांसाठी किती जिव्हाळ्याचे प्रकरण असावे हे समजू शकतो.

शेवटचे पथनाट्य वाटावे असे सामाजिक संदेश देण्याचे द्रुश्य मात्र अनावश्यक आणि चित्रपटाची गंभीरता घालवणारे वाटले. पर्यावरणाच्या संरक्षणाचा जो विचार मार्मिक पद्धतीने सांगायची संधी या चित्रपटाने दिली होती ती अशी बाळबोध पद्धतीने सांगण्यात वाया घालवली असे वाटले. तो संदेश या चित्रपटाचा आत्मा होता तो अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या मनावर ठसायला हवा होता.

बॅकग्रांऊड म्युजिकबद्दल ट्रेलर बघूनच अपेक्षा फार होत्या. त्याने निराश नाही केले. ना कॅमेरा वर्क वगैरे ईतर तांत्रिक बाबींनी केले. फक्त वर उल्लेखलेली क्लोजअप द्रुश्ये यातून वगळा. उत्तरार्धात संकलन अजून चांगले होऊ शकले असते.

बापलेकाचे गाणे आवशिचो घो फार आवडले. त्यातील शब्दात चित्रपटात दाखवलेल्या बापलेकाच्या नात्याचे सार उतरले आहे. त्यामुळे चित्रपटात अजून आवडले.
रंगपूजा हे दुसरे आवडते गाणे. ते ऐकताना ज्या भावना मनात उतरतात त्या भावना चित्रपटात ज्या ज्या द्रुश्यात जाणवल्या ती द्रुश्ये आवडली.
ऋतुचक्र म्हणून जे रोमँटीक गाणे आहे त्याचा स्वानंदी सरदेसाई मुळे एक वेगळाच फॅन क्लब तयार झाला आहे.

चित्रपटात महेश मांजरेकर सुद्धा आहेत. त्यांची मध्यतरानंतर स्पेशल एंट्री आहे. त्यांना भावखाऊ भुमिका आणि संवाद दिले आहेत. त्यांची आणि प्रभावळकरांची जुगलबंदी अजून बघायला आवडली असती. ते एक कुठेतरी मिस झाले असे वाटले.

छोट्याश्या भुमिकेत भरत जाधव आहेत. आपल्या सर्वांचेच आवडते कलाकार असतील. पण यात ते नकारात्मक भुमिकेत आहेत. आता हे छान की वाईट हे तुम्हीच ठरवा. त्यांच्यासोबत सुनिल तावडे यांना मोठी भुमिका आहे हे बघून मात्र छान वाटले.

अभिनय बेर्डे देखील यात आहे हे मला आताच समजले. चित्रपटात मी त्याला ओळखलेच नाही. तसे तर नकारात्मक भुमिकेत होता, पण आधी कल्पना असती तर कदाचित लक्ष्याचा मुलगा म्हणून एक जिव्हाळा वाटला असता.

सस्पेन्स आणि थरारनाट्य असलेल्या चित्रपटात पटकथा घट्ट बांधलेली असावी आणि लूपहोल कमीत कमी असावेत अशी ढोबळमानाने अपेक्षा असते. यात त्या अनुषंगाने फार विचार केला असे वाटत नाही. त्यामुळे एखाद्याने शोधल्यास चटकन काही लूपहोल सापडतील. चित्रपट प्रेक्षकांना आवडल्यास त्यांना याचे काही घेणे देणे नसते हे ही तितकेच खरे. पण न आवडल्यास मात्र काही खरे नाही.

कोणाला कुठला चित्रपट आवडेल आणि त्यात नेमके काय आवडेल हे अगदीच वैयक्तिक असते. मला जिथे पुर्वार्ध आवडला आणि उत्तरार्धाने माझ्या अपेक्षा पुर्ण केल्या नाहीत असे वाटले तिथे माझ्यासोबत पुर्वार्ध संथ वाटून उत्तरार्ध नाट्यमय म्हणून जास्त आवडणारे देखील होते.

जर तुम्हाला दोन्हीपैकी एखादे अर्ध आवडणे पुरेसे असेल तर चित्रपट थिएटरात जाऊन बघायला हरकत नाही. किंबहुना मी म्हणतो बघूनच या. म्हणजे चर्चा करता येईल. प्रत्येकाची वेगवेगळी मते वाचायला आवडतील Happy

धन्यवाद,
- तुमचा अभिषेक

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> चित्रपट संपता संपता यातील "बाबुली" या सर्वांच्या पलीकडे जाईल असे वाटले होते पण ती पुरेशी संधी त्यांना मिळाली नाही असे वाटले.

अर्थात, वयोमानानुसार फिजिकल एनर्जीबाबत त्यांच्या मर्यादा सुद्धा आता लक्षात घ्यायला हव्यात. हे वाक्य लिहितानाच गूगल केले तर ८१ वर्षे वय दाखवत आहेत त्यांचे. म्हणजे जिथे त्यांनी बापाचा रोल केला तिथे ते प्रत्यक्षात आजोबांच्या वयाचे होते. <<

हाच तर प्रोब्लेम आहे. भूमिकेसाठी नट निवडायचा असतो. नटासाठी भूमिका नाही.

हा अट्टाहास चांगल्या चित्रपटांना मातीत घालतो.

सरळ मग दिलीप प्रभावळकरांचा दशावतार असे नाव देऊन चित्रपट काढावा. स्टोरी वगैरे लिहिण्याची भानगड करू नये.

Lena Headey लक्षात राहत नाही. लक्षात राहते ती सरसी लॅनिस्टर. हे कास्टिंग आहे.

लॉजिक नावाच्या गोष्टीला किमान कथेपुरते तरी इन्हेरिंट का असेना जागा असावी. वन लायनर पासून कथा केल्याने हा प्रॉब्लम होतो.

मला तर वाटते एखादी भूमिका दिलीप प्रभावळकरांचीच भूमिका करत असते.

कालच पहिला. काय खूप खास नाही. नाही पहिला तरी चालेल असा आहे.
मल्टिप्लेक्स मध्ये मोजून 23 जन होते सांगली मध्ये दुपारी दीड च्या खेळाला.
प्रभावळकर कधी कधी बोर होतात.
2.5/5 माझ्याकडून.

काही मर्यादा आणि poetic freedom सोडल्यास मला आवडला सिनेमा... संगीत, निसर्गरम्य कोकण आणि तिथली साधी माणसं छान दाखवली आहेत... कदाचित बालपण तिथे गेल्याने मी ते सगळं अनुभवलय... गावातलं वातावरण, राखणदार, देवाचा कोप किंवा परसातल्या विशिष्ट झाडाची पूजा, तिथे रोज संध्याकाळी दिवाबत्ती करणं हे सगळं तिथे अजूनही चालतं... कदाचित झाडाच्या, प्राण्यांच्या रक्षणासाठी ते आवश्यक असेल. त्यात सिद्धार्थ मेनन माझ्या लेकीच्या गुरूकुल शाळेतला, त्यामुळे त्याला लहान असल्यापासून पाहिलेला, त्याचं काम छान झालय... प्रियदर्शनी छानच पण त्याच्यापेक्षा मोठी दिसली. भरत जाधव, तावडे, विजय केंकरे कसलेले कलाकार... नेहमी उत्तमच अभिनय करतात. आणि मालवणी बऱ्यापैकी बरं बोललेत.

असो. तात्पर्य मला आवडला.

कांतारा बघताना अधेमधे रेंगाळलेला वाटला होता. पण तो कुठे बाळबोध, भोळसट नव्हता वाटला. आणि शेवटची ती आरोळी! ज्या टीपेला जाते ती आरोळी त्याच्याहून एक पायरी वरती सिनेमाचा शेवट जातो. सिनेमा सगळी मरगळ झटकून एका वेगळ्या पातळीवर पोहचतो. पारलौकीक पंजुर्ली आणि मानवी शीवा यांचे एकवटणे सिनेमाच्या शेवटाला एकदम तरल करून टाकते. म्हटला तर सुखान्त, म्हटला तर दु:खान्त आणि म्हटला तर काल्पनीक. तो शेवट प्रचंड आवडलेला.

त्याच कांताराचा मराठी अवतार - दशावतार ! पैशाच्या हव्यासापोटी निसर्गाची हानी करायला निघालेला खलनायक, त्याच्या विरुद्ध लढा देणारे बाप आणि मुलगा, स्थानीकांची श्रद्धा असलेली पारलौकीक शक्ती सगळे काही तसेच आहे. पण दशावतारम्ध्ये सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी वगळता काहीच छाप पाडत नाही - दिलीप प्रभावळकरांचा अभिनयही मुखवट्यांआड झाकला गेलेला आहे. आणि हो, त्यांचे वय या भूमिकेकरता खूप जास्त आहे. बाबुली जे काही करतो त्याला थोडीफार शारीरीक ताकद अभिप्रेत होती आणि प्रभावळकरांचे वय त्याला मारक ठरते.

सिनेमाच्या ट्रेलरने तो काहीसा हॉरर, गेलाबाजार थरारपट असेल अशी अपेक्षा सेट केली होती. पण सिनेमात तसे काही नाही हे रिव्ह्यू वाचून कळले होते. तरी बघायचा होताच. पण सिनेमा इतका सरधोपट आहे की पुढे काय होणार याचा अंदाज माधवला नोकरी लागते तेंव्हाच येतो आणि दिग्दर्शक आपला अंदाज चुकू देत नाही. राखणदारापुढे जंगलबुकमधला बगीरा १०० पट सरस वाटावा इतके ते व्हीएफेक्सीकरण गंडलेले आहे. डिकास्टा आणि ती भूमिका करणारे महेश मांजरेकर दोघेही बेगडी वाटले (कांतारातला मुरली खूप खरा वाटला होता).

पण तरी सिनेमाचा पहिला अर्धा भाग मस्त आहे. कोकणातली हिरवाई (काजव्यांच्या vfx सहीत), ती टिपीकल कोकणी माणसे (सोन्याने मढलेला तांडेल खास आवडला) आणि त्यांचे दशावतारावरचे प्रेम हे सगळे येते त्या पहिल्या भागात. बापाने आईच्या मागे किती कष्टाने आपल्याला वाढवले आहे याची जाण असलेला आणि त्याची काही अंशी तरी परतफेड करण्याकरता आसुसलेला माधव आणि बाबुली यांचे नाते खूप सुंदर उभे केले आहे. सिद्धार्थ मेनन आणि माधव हे दोन्ही वेगळे वाटत नाहीत. प्रियदर्शनीची वंदू अनेकांना आवडली नाही. पण मला सॉलीड आवडली. थोडी बिनधास्त आहे पण कोकणातल्या मुली लाजर्‍या-बुजर्‍या असतात असे का वाटावे? वाटत असल्यास रत्नांग्रीची मधू सप्रे आठवा आणि मग वंदूला बिनधास्त म्हणण्याचे धाडस करा.

कांताराचा शेवटचा सीन जेवढा आवडला होता तेवढाच दशावतारातला पहिला सीन आवडला --- रात्रीच्या किर्र काळोखात बाबुली जंगलातून चालला आहे. सोबत ना कंदिल ना अजून काही. दाट जंगलामुळे चांदण्याचा प्रकाशही नाही, आहे तो काजव्यांचा मिणमिणता प्रकाश! पण ते जूनं जाणतं खोड, त्याच्या पायांनाही रस्ता दिसतोय आणि कानांना शांतता ऐकू येतेय. ती शांतता त्याला संगते, ओढ्याच्या पलीलडच्या काठाला राखणदार पाणी पितोय. तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून बाबुली पायाखाली येणारी काटकीही चुकवतो आणि रस्त्याला लागतो ---- इतका अफलातून झालाय तो संपूर्ण प्रसंग! मारुती चितमपल्लींचे पुस्तक वाचतोय असे वाटत होते. त्यामुळेच सिनेमाबद्दल अपेक्षा वाढल्या होत्या पण पुढे त्या लेव्हलचा एकही प्रसंग नाही.

एकंदरीत थोडेसे कौतुक आणि बरीचशी निराशा अशी अवस्था झाली माझी. नाही बघितला तरी चालेल पण बघणार असाल तर थिएटरमध्येच बघा. OTT वर ना तो निसर्ग दिसेल ना ते साउंडस्केप्स जाणवतील. आणि त्यांच्याशिवाय सिनेमा अजूनच सरधोपट बनेल.

@ माधव,
जवळपास तंतोतंत आहेत आपल्या आवडीच्या नावडीच्या गोष्टी..

खरे तर चित्रपटाच्या सुरुवातीला वाढलेल्या अपेक्षा नंतर तसे झाले नाही म्हणून लिहिणार नव्हतोच. पण व्हॉटसॲप स्टेटस टाकल्यावर काही मित्र रिव्ह्यूसाठी मागे लागले म्हणून आणि मराठी चित्रपट आहे तर चर्चेला धागा असावा म्हणून लिहिले.

@ abhishruti,
तुम्ही लिहिलेल्या गोष्टींसाठी चित्रपट आवडला आहेच Happy

@ धनवन्ती
अजून चार ठिकाणी वाचून घ्या निर्णय. मला चित्रपट आवडलेले सुद्धा भेटले आहेत. कदाचित तुम्हाला आवडूही शकतो, आणि नाहीच आवडला तरी सगळेच गंडले आहे अशातला भाग नाही.

हम्म!
मराठी चांगला चित्रपट मिळणे दुरापास्त! याच्याकडून अपेक्षा होत्या.

मलाही हा बघावा असं वाटत होतं. अर्थात ट्रेलर वगैरे काही पाहिलेला नाही त्यामुळे स्टोरी काय असावी वगैरे कल्पना नव्हती. दिलीप प्रभावळकर फार आवडत वगैरे नाहीत. आता बघू नये असं वाटतंय.

दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी बघायचा ठरवलेला. संमिश्र रिव्ह्यू येतायत. तिकीट आधीच काढलंय. त्यामुळे बघणार !

दिलीप प्रभावळकरांनी आता आराम करावा.
त्यांचे कोकणातील पात्र खुपच चित्रपटात आले आहे. त्यामुळे नाविन्य असे कमी पडतेय.

आत्ताच बघितला.
मला एकदम आवडला.
प्रभावळकरांचे काम, वंदू, माधव, गावावल्यानू, दशावतारातील पेरलेले संदर्भ आणि पोहोचवण्याचा संदेश सगळं जमलेलं वाटलं. मराठी सिनेमा असल्याने जनरली थोडं पदरात घेतो, तसा मांजरेकराना केलं सहन, पण बाकी मजा आली. आता रात्रीचे दोन वाजत आलेत, त्यामुळे उरलेलं उद्या लिहीन. पण इतका जागून बघितला तरी झोप सोडून बघावा वाटला यातच काय ते आलं. Happy

अगदीच नाही आवडला, अक्चुअली काही रुल ऑफ थंब माझ्याकडून इग्नोर झाले पाहायला जायचे ठरवण्यापूर्वी.

१ - चित्रपट हा तितकाच चांगला बनू शकतो, जितका प्रतिभावान त्या चित्रपटाचा डायरेक्टर असतो, बाकी सर्व घटक दुय्यम असतात.
२ - कोणत्याही उत्पादनाची वारेमाप जाहिरात तेंव्हाच केली जाते जेंव्हा खरोखरीच त्या उत्पादनात अंगभूत असा काही दम नसतो.

इतका अफलातून झालाय तो संपूर्ण प्रसंग! मारुती चितमपल्लींचे पुस्तक वाचतोय असे वाटत होते. त्यामुळेच सिनेमाबद्दल अपेक्षा वाढल्या होत्या पण पुढे त्या लेव्हलचा एकही प्रसंग नाही. >>> +१००

संपुर्ण लेखाला अनुमोदन , ऋ .
माझ्या ही अपेक्षा जास्त होत्या त्यामानाने बराच निघाला. पण आवडला.
पण दिप्र मात्र फारच आवडले.
इतका अफलातून झालाय तो संपूर्ण प्रसंग! >>> चपलेखाली विंंचुपण येतो. Happy

संमिश्र रिव्ह्यू येतायत ही चांगली गोष्ट आहे.
याने चित्रपट जास्त काळ चर्चेत राहतो, जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि बॉक्स ऑफिसवर जास्त फायदा होतो.

हा बघायला एकटे न जाता मुलीसोबत जायला हवे होते असे आता वाटत आहे. स्पेशली पहिल्या भागात आवडलेली कोकणची माती तिच्यासोबत बघायला आणखी मजा आली असती. आणि दुसरा भाग तिला नक्कीच आवडला असता. तिच्या आवडीचा जॉनर आहे.

पिक्चर चांगला चालतोय आणि पैसे वसूल झाले हेही खूप झालं..
कारण अनुदान मिळावं यासाठी काहीही असा नाहीये, निदान प्रयत्न चांगला वाटतोय

कारण अनुदान मिळावं यासाठी काहीही असा नाहीये,
>>>>>>>

मराठी चित्रपट याच्या पलीकडे जात आहे गेल्या काही काळात..

आता थांबायचे नाही, गुलकंद, एप्रिल मे ९९ आणि जारण हे चार चित्रपट मी एका महिन्यात थिएटरमध्ये पाहिलेले. आणि चारही आवडलेले. आयुष्यात कधी असे हिंदी चित्रपटाबाबत सुद्धा झाले नव्हते. आणि आता हा अजून एक चित्रपट ज्याला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

झिम्मा, बाई पण भारी देवा सारखे सुमार दर्जाचे चित्रपट पाहिल्यानंतर नवीन मराठी चित्रपट बघणे बंद केले होते. दिलीप प्रभावळकर आणि चित्रपटाच्या ट्रेलरमुळे निर्माण झालेली उत्सुकता... त्यामुळे चित्रपट पाहिला, परंतु भयानक निराशा झाली. महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना असल्या अनुदान देणे बंद केले पाहिजे.

एक मत फॉरवर्ड करतोय....

दशावतार? A क्लास भिक्कार!

माझी वैयक्तिक मते - कारणमीमांसा किंवा समीक्षा - पॉईंट बाय पॉईंट.
- [ ] कथेत दम नाही
- [ ] दिग्दर्शन काहीही नाही
- [ ] मराठी भाषा असल्याने हा 'मराठी दे मार' चित्रपट झाला आहे.
- [ ] संगीत आणि गाणी - ओढूनताणून सादरीकरण
- [ ] दिलीप प्रभावळकर यांनी आता 'थांबलं' तरी चालेल. उगाच अट्टाहास नको.
- [ ] पोट सुटलेल्या महेश यांनी तर 'चित्रपटात चेहरा ( तोंड ) आणि पोट दाखवूच नये.
- [ ] AI जमान्यातील मुलांना हा चित्रपट अपील होणार नाही.
- [ ] प्रौढ लोक सिनेमा कधी संपेल याची वाट बघत होते.
- [ ] आशय शून्य चित्रपट
- [ ] मनोरंजन सुद्धा नीट होत नाही. सगळंच लॉजिकच्या बाहेर.
- [ ] अनुदान मिळावे म्हणून विषय निवडला असावा.
- [ ] मराठी आणि कोकण च्या भाषेची बंडल सरमिसळ.

माझं नशीब चांगलं - आज मंगळवार होता म्हणून तिकीट फक्त रुपये ९९. अन्यथा रुपये १९९ वाया गेले असते - प्लस मानसिक छळ. हा सिनेमा सुमार असल्याने खूप चालेल याची खात्री वाटते मला. आजचा शो हाऊसफुल्ल होता - सर्व वयोगटातील रसिक उपस्थित होते.

आपण सुज्ञ आहात. विचार करून ठरवा - जायचे की नाही. मला अजूनही कळले नाही की दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे.

नाही बघितला तरी चालेल पण बघणार असाल तर थिएटरमध्येच बघा. OTT वर ना तो निसर्ग दिसेल ना ते साउंडस्केप्स जाणवतील. .. .. +१.
या मुव्हीला सगळे थिएटर भरलेले पहिल्यांदा पाहिले.कदाचित मुव्ही लागून तिसरा दिवस असल्यामुळे असेल.
प्रिया इंदलकर अजिबात आवडली नाही.एकतर सिद्धार्थपेक्षा थोराड दिसत होती आणि गावाच्या मानाने खूपच सोफिस्टिकेटड .

या मुव्हीला सगळे थिएटर भरलेले पहिल्यांदा पाहिले.कदाचित मुव्ही लागून तिसरा दिवस असल्यामुळे असेल.
>>>>>>>>

मराठी चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात थिएटर भरणे हे चांगले लक्षण आहे. याचा अर्थ पूर्वप्रसिद्धी मिळाली आहे, चांगले मार्केटिंग झाले आहे.

चांगले मार्केटिंग झाले आहे.>>>> मार्केटिंग म्हणण्यापेक्षा, चित्रपटाच्या ट्रेलरचा आणि दिलीप प्रभावळकरांच्या ट्रॅक रेकॉर्डचा जॉईंट ब्लफ बेमालूमपणे खेळला गेला.

मार्केटिंग त्यालाच म्हणतात ना..>>> कदाचीत.... शॉर्ट टर्म साठी हे फायदेशीर असूही शकते....पण अशा मार्केटिंगवर सुमार चित्रपटांचा रतीब घातल्याने मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग चित्रपट सिनेमगृहात पहायला जाण्याबाबत अधिकाधिक कंजर्वेटीव्ह बनेल. फक्त ब्लफ होण्याच्या विचाराने जर पहील्या आठवड्यात प्रेक्षकवर्ग सिनेमागृहात यायला हेझिटंट बनला तर पुढचे पैशाचे सर्व गणितच कोलमडेल...याचे दुरगामी तोटे अधिक संभवतात.

Pages