माझी संस्मरणीय भटकंती - न्यूयॉर्क सिटी - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 31 August, 2025 - 18:27

NYC - लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया..
न्यूयॉर्क शहराची यावेळची ही दुसरी ट्रीप.
पहिली केली होती सहा एक वर्षांपूर्वी, उन्हाळ्यात, नऊ वाजले तरी लक्ख उजेड असतो तेव्हा. त्या ट्रीप मध्येच न्यूयॉर्क शहराच्या अगदी प्रेमात नाही म्हणता येणार पण crush तर नकीच झालं होत. कारण त्याचं मुंबईच्या अगदी जवळपास सारखं असणं किंवा मला ते तस भासणं. अगदीच ठळकपणे सांगायचं तर fifth avenue म्हणजे आपला नरिमन पॉइंट /फोर्ट जवळचा परिसर एकदम चकाचक, तर टाइम्स स्क्वेअर म्हणजे जणू दादर प्लाझाचा एरिया तोच गोंधळ, गर्दी, जर्सीसिटी वॉटर फ्रंटहून दिसणारी मॅनहॅटनची skyline (क्षितिज रेषा) म्हणजे जणू मुंबईचा क्वीन्स नेकलेस, तशीच ( अमेरिकेत अतिशय दुर्मिळ अशी) माणसांची गर्दी, प्रचंड रहदारी, रेल्वे- मेट्रो - बस चे जाळे आणि हो तशीच वास - धूर - धूळ मिश्रित हवा.
ह्यावेळी ख्रिसमस मध्ये जाणार म्हणजे NYC चे प्रसिद्ध ख्रिसमस लाईट बघायला मिळतील म्हणून बोचऱ्या थंडीच्या भितीपेक्षा उत्सुकता जरा जास्त होती. तसं तर ख्रिसमस रोषणाई सगळीकडेच खूप छान असते अगदी इथल्या स्थानिक मॉल्स, गल्ल्या, SF च Ghirardelli वाल मोठ ख्रिसमस tree सगळच डोळ्यांच पारण फेडणार असतं. पण तरी NYC च्या रोषणाईच जरा जास्तच कौतुक असतं.
एक दिवस सकाळी आम्ही आमच्या राहत्या जागेपासून कार, NJT ( न्यू जर्सी ट्रान्झिट) ट्रेन घेउन साधारण एखाद तासाचा प्रवास करून हडसन यार्डला पोहचलो - गेल्या काही वर्षांत जुन्या रेल्वे यार्ड वर विकसित केलेला हा भाग. मोठमोठी ब्रँडेड दुकानं असलेला मॉल, उंचावरून शहराच दर्शन देणारी observatory, The Vessel नावाची एक आगळी वेगळी वास्तू- थोडक्यात तरुणाई, आमच्यासारखे पर्यटक, आणि अख्ख्या कुटुंबाला रमाविण्याच सामर्थ्य असलेला तो भाग ख्रिसमसच्या सजावटीने अजूनच नयन रम्य दसत होता.
लाखो दिव्यांच्या सोनेरी माळा, मध्यभागी टांगलेला अवाढव्य हॉट एअर बलून, छतापासून टांगलेली, सुंदर सजवलेली खिस्मसची झाडं सगळं जमेल तस कॅमेरात कैद करत तिकडून काढता पाय घेतला कारण अजून बरचं बघायचं होतं. The High Line - जुन्या रेल्वे लाईनवर तयार केलेले दीड मैल लांब उद्यान किंवा रस्ता, जिकडून उंचीवरून खालील शहराची रहदारी, निरनिराळी स्थळे, आर्ट गॅलरी बघता येतात - वरून रमत गमत निघालो.

पहीला थांबा - NYC प्रसिद्ध artichoke पिझ्झा - लिस्टवर वरती असल्यामुळे गड उतरून खाली गेलो. चाळीस एक मिनट रांगेत उभ राहून दुकानात जागा नसल्यामुळे ते पिझ्झा slices खोक्यात घालून परत गड चढून वर आलो आणि जवळच असलेल्या amphi theatre च्या बाकड्यावर बसून त्या जगप्रसिद्ध(?) पिझाची चव घेत असतानाच ‘नाव मोठ आणि लक्षण खोटं’ याची प्रचितीपण घेतली.
मग तिकडून मेट्रोने सेंट्रल पार्क गाठलं. तिकडची गार हवा खाईपर्यंत सूर्यास्त होऊ घातलेला. तिकडून चालतच मग न्यूयॉर्कचे लाईट्स बघायला पायी निघालो.

जसं जसं Rockefeller Center कडे जाऊ लागलो तसतशी गर्दी अजूनच वाढायला लागली. गेल्या सात आठ वर्षात माझा गर्दीशीं संपर्क तुटल्यामुळे थोड बावरायल झालं. अगदी दादर स्टेशनवर किंवा गणपतीच्या वेळी असते तशी गर्दी. एवढी गर्दी की चक्क उकडायला झालं. असो! पण येव्हढी गर्दी काय उगाच जमली नव्हती..
जिकडे नजर जाईल तिकडे चमचमतं, चकाकतं, विलक्षण सुंदर असं काही. Rockefeller च ख्रिसमस ट्री तर इतकं भव्य, अगणित दिव्यांनी सजविलेले आणि त्यावर दिमाखात विराजमान झालेली स्वरोस्कीची चांदणी. किती फोटो काढू आणि काय काय डोळ्यात साठवू असं होऊ लागलं.

हे तर काहीच नाही आपल्याला लाईट शो बघायला थोड पुढे जावं लागेल म्हणत आम्हाला अजुन पुढे घेऊन गेले.
आणि तो लाईट शो म्हणून जे बघितलं तो अनुभव शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य. आकाशगंगा, सूर्यमाला, सूर्य राशी, नंतर पृथ्वीवर फुललेलं जीवन अशी एकंदर कालचक्र केंद्रित संकल्पना. विषयाची कल्पकता, मांडणी, दिव्यांचा अनोखा वापर, त्याची संगीताशी केलेली जुळवणी, आणि ह्या सगळ्याला न्याय देणारं अचूक execution - सगळच अप्रतिम! हे सगळं उभ करणारे कलाकार, ही संकल्पना डोक्यात येऊन अमलबजावणी करणारे कला दिग्दर्शक, आणि त्या सगळ्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे, पाठबळ पुरविणारे प्रायोजक - Christian Dior सगळ्यांचच खूप कौतुक वाटलं.

दुसऱ्या दिवशी आमच्यातील फोटो विरोधी गटाने फोटो न काढायची सक्त ताकीद देऊन फक्त फूड ट्रीप करायची असे योजिले.
त्यामुळे साहजिकच पहिला थांबा होता जगप्रसिद्ध Magnolia बेकरी, ( पुण्याप्रमाणेच बहुदा NYC तही सगळं जगप्रसिद्धच मिळत असा मला दाट संशय येऊ लागलाय, फक्त फरक इतकाच की इकडे दुकानदार जगप्रसिद्धच्या पाट्या लावत नाहीत तर सोमिवरून ते जगप्रसिध्द असल्याचे कळते) .
असो तर ह्या मॅग्नोलिया बेकरीतून त्यांची खासियत असणार रेड Velvet बनाना पुडींग, ब्राऊनीज, पेस्ट्रीज वगैरे रुपात बऱ्याच कॅलरीज घेऊन त्याचा फडशा पाडला. सगळे पदार्थ खूप ताजे आणि रुचकर होते- अगदी प्रसिद्धीची साक्ष पटविणारे.

तिकडून पुढे Joe's Pizza ला गेलो. तिकडे खूप रांग असेल असे जाणकारांनी सांगितल होतच पण म्हणून ती रांग मारुतीच्या शेपटी सारखी लांबच लांब दूकानाबाहेर येऊन, फूटपाथवरून कॉर्नरला वळून L अक्षरावरून U अक्षरपर्यंत जाईल अस अजिबात अपेक्षित नव्हतं.
पण आजकाल इतक्या वर्षांच्या अनुभवातून आम्हाला पालक म्हणून थोडंफार शहाणपण आलंय- तरुणाईचा रोष पत्करून पूर्ण मूड घालवण्यापेक्षा आपण आपला संयम वाढवणे हेच सगळ्यांच्या हिताचे असते.

दोघांनी त्या रांगेत उभ राहून बाकीच्यांनी फूटपाथ वरच्या चिंचोळ्या जागेत जम बसविला. ५०-६० मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर काउंटरपाशी पोहोचून ऑर्डर दिल्यावर अजून पंधरा-वीस मिनिटांनी तो तयार होऊन हातात पडला. तोपर्यंत बाकीच्यांनी NYC ची ती वीड्स, वाहनांचा धूर, धूळ, जमिनीखालून वाहणाऱ्या गटारांची दर्प मिश्रित गार हवा खात, येवढा वेळ थांबून आलेला पिझ्झा कसा बर असेल ह्याचे तर्क करण्यात घालविली. शेवटी तो बहुमूल्य ( ‘टाईम इज मनी’ ला स्मरुन) पिझ्झा आला आणि १०-१२ मिनिटांच्या आत संपलाही. अर्थात त्याची चव प्रतिक्षेला न्याय देणारी नव्हती हे सांगणे न लगे. बाकी काही नाही तरी मंडळींची सारखे फोटो घेत बसता आणि आमच्या आवडीचे स्पॉट्स करायला वेळदेत नाहीत ही भुणभुण तरी थांबली ह्याच हायस वाटलं.
आता मेट्रो ने ब्रूकलिन गाठलं. गेल्या खेपेला ब्रूकलिन ब्रीज रहायला होता. जसे चालल नदीकिनारी आलो गार वाऱ्याने, थंडीने आम्हाला वेढून टाकले. आकाशाच्या काळया पडद्यावर पलीकडची लखलखती, चमचमती मॅनहॅटनची ती विलक्षण दुनिया, आकाशरेषा अजूनच मोहक दिसत होती.

१४० वर्ष जुन्या, साधारण एक मैल लांबीच्या त्या लाकडी पुलावरून चालताना वाटलं की मॅनहॅटनची ती जगप्रसिध्द skyline जणू कवेत घेऊ पाहत होती. दूरवर दिसणारा तो स्वातंत्र्य देवीचा पुतळा, अनेक रंगांच्या प्रभा फेकणाऱ्या दिव्यामध्ये नाहून निघालेलं दिमाखदार WTC, एम्पायर स्टेट बिल्डिंग, इतर आयकॉनिक इमारती बघता बघता ते एक मैल अंतर कधी पर केलं आणि दूरवरून आकर्षक दिसणाऱ्या त्या चंदेरी, लखलखणाऱ्या रेषेत कधी बिंदू होऊन मिसळलो आम्हाला कळलही नाही.
WTC one च्या भव्य वस्तूच्या नाजिक जाऊन एक शेवटचा फोटो घेतला आणि त्या चंदेरी दुनियेचा निरोप घेऊन तेथील भूमिगत रेल्वे स्थानकात गुडूप झालो.
ही खालची दुनिया वरच्या झगमगत्या तारांकित दुनियेच्या अगदी उलट - चालून चालून थकलेले पर्यटक, लांबच्या प्रवासाला निघालेले प्रवासी, रोजी-रोटी साठी रोज NYC ची वाट धरणारे असंख्य नोकरदार, एखाद्या कोपऱ्यात आजचे काही जेवण सुटावे ह्या आशेने व्हायोलिनचे सुर छेडणारे गरजू कलाकार,तुमच्या आमच्या सारख्या अगदी साध्या-सामान्य चाकोरीच्या रहाटगाडग्यात फिरणाऱ्या माणसांनी गजबजलेली.

----
हडसन यार्ड मॉल

PXL_20231226_182847770~2.jpg

--

PXL_20231226_182751695~2.jpg

---
द वेसल

PXL_20231226_184154779~2_0.jpg

---

The High Line चा खालच्या रस्त्यावरून घेतलेला फोटो.. छोट ॲम्फिथिएटर आहे वर. तिकडून समोर गांधीजींचं एक मोठं म्युरल पण दिसतं.
PXL_20231226_194908925~2.jpg

----

Christian Dior लाईट शो

PXL_20231226_225448909.jpgव्हिडिओ क्लिप

गेल्या वर्षांपासून हा लाईट शो त्यांनी बंद केला. योगायोगाने त्याच्या आदल्या वर्षी आम्हाला अनुभवायला मिळाला.

---
Rockefeller चे ख्रिसमस ट्री

PXL_20231226_230011004~2.jpg

---

PXL_20231226_222050923.MP~2.jpg

----
Manhattan स्काय लाईन

PXL_20231229_224844503.jpg

----
ब्रूकलिन ब्रीज

PXL_20231229_233740905.jpg

---
सिटी व्ह्यू

PXL_20231229_234856090.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पण फोटो न काढता फूड ट्रिप केली हे फार वाईट केले. खाण्याचेच तर लोकं हल्ली जास्त फोटो काढतात. त्यातही तुम्ही तर जगप्रसिद्ध गोष्टी खाल्ल्या होत्या Happy

छान लिहिलं आहे. फोटो पण सुंदरच आलेत.
गेल्या वर्षीच न्यूयॉर्क ला येऊन गेल्यामुळे relate झालं.

पण फोटो न काढता फूड ट्रिप केली हे फार वाईट केले. तुम्ही तर
जगप्रसिद्ध गोष्टी खाल्ल्या होत्या Happy >>> Lol

Teenager मुलं आणि मुली यातील हा मुख्य फरक.. मुलं (स्वानुभवाने)फोटोंच प्रमाण वाढलं (?) की अत्यंत अस्वस्थ होतात. .. त्याच पर्यवसान असहकारात होते.

९ जणांचा ग्रुप.होता ( वय वर्षे १४ ते ५८) त्यामुळेही फोटो काढण्यावर थोडी मर्यादा आली..

शब्दचित्र जास्त सुंदर की प्रकाशचित्रे जास्त सुंदर असा प्रश्न पडावा. फारच सुंदर, ओघवते शैलीदार लेखन आणि चमकदार, झगझगीत प्रकाशचित्रे. प्रकाशचित्रात काय टिपावे हेही छान जमलेले. धन्यवाद.

आवडलं.
तुमच्याबरोबर आम्हालाही प्रत्यक्ष भटकंती न करतादेखील नेत्रसुख घेता आलं.

हो हायलाइन च लिहिलंय वरती. फोटो नाही काढले जास्त. Amphi थिएटरच्या इकडून गांधीजींचं म्युरल दिसतं. त्याचा फिट वाटलेला घेतला पण बहुदा राहून गेला.

मस्त लिहिलेय !
न्यूयॉर्क हे डोळे भरून पहायाचे ठिकाण आहे.
जोज पिज्झा व मॅग्नोलिया बेकरी हे उगाच हाईप केलेले आहेत.
माझ्या शिफारशी :
वीकडेज ना मिडटाऊन मध्ये ठिक ठिकाणी लागलेल्या स्टॉल्स मधून फलाफेल सारखे पदार्थ.
ज्यांना बीफ चे वावडे नाही त्यांनी एकदा तरी टिपिकल स्टेक हाऊस चा अनुभव घेणे.
काट्झ डेली मध्ये पास्त्रामी.

न्यूयॉर्क मध्ये फिरायला मस्त मजा येते. उन्हाळ्यात छान असतंच pan भर थंडीतली मजाही वेगळीच. पुढच्यावेळी युएस ओपन बघायला जा. Happy

बादवे, पुण्यात कुठे जगप्रसिध्द असल्याच्या पाट्या असतात? उलट पुण्यातल्या दुकानदारांना ते जगप्रसिध्द आहेत की नाही ह्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं!

जो'ज पिझ्झा मलाही आवडला नव्हता. म्हणजे अगदी रांगेत खूपवेळ उभ राहून वगैरे घेण्याइतका वर्थ वाटला नाही. पण कदाचित त्यांचे नॉनवेज पिझे लौकिकाला जागणारे असतील असे समजून गप बसले. माझा आवडता पिझ्झा म्हणजे लिटिल इटली चेनमध्ये मिळणारा पिझ्झा. आणि हो भरपूर व्हेज टॉपिंग ऑप्शन्स असलेले पिझ्झे असतात.
न्यूयॉर्क खादाडीबद्दल एकंदरीत सोमी इन्फ्ल्युएन्सर्सचे फार न ऐकणे उत्तम. मलातर रस्त्यावरचे कुठल्याही गाडीवरचे फलाफल ओवर राईसही फार आवडते.
मॅग्नोलियाचं बनाना पुडींग मात्र नॉट टू मिस!

फोटो भारी. ते बघून पुन्हा जावेसे वाटले. (ऑगस्टमध्ये न्यूयॉर्कमध्ये राहूनच परत आले आहे तरीही. डिसेंबरात जावे का परत?!)
चायना टाऊनला गेली नव्हतीस का?