एक क्षण अभिमानाचा - सामो

Submitted by सामो on 26 August, 2025 - 23:35

जनकसुता जग जननि जानकी। अतिसय प्रिय करुनानिधान की॥
ताके जुग पद कमल मनावउँ। जासु कृपाँ निरमल मति पावउँ॥

ही जनकदुहितेस अर्थात लक्ष्मीचा अवतार असणार्‍या सीतेची स्तुती करताना, गुणवर्णन करताना, तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहीलेला श्लोक. अन्य सर्व श्लोक, सिद्ध चौपाया, एका पारड्यात आणि सीतेचे श्लोक दुसर्‍या पारड्यात ठेवले असता, दुसरे पारडे जड ठरते - माझ्यापुरता.
.
यातील निरमल मति ही संकल्पना मला प्रचंड पटते, आवडते. लहानपणी आपण सारेच जण मलरहित असतो पुढे आपण छक्केपंजे शिकतो. इट्स अ लर्नेड स्किल. आपल्याला सर्व्हाइव्ह करण्याकरता गरज असलेले मुखवटे आपण धारण करावयास शिकतो. बरं फक्त सर्व्हावल नाही तर त्यांबरोबर मग रांग लागते ती खूप तामसिक गुणांची - त्यात आले - कन्फर्मिटी बायस, राजकारण, गॉसिप, खोटेपणा, लोभ, मत्सर, दंभ, दुराभिमान. या सार्‍यापासून आपल्याला वाचायचे असेल तर मग बरेचदा, एकटे रहाणे पत्करावे लागते, नोकरीत कमी पदावरती रहाणे मंजूर असावे लागते, आपल्याला न आवडणार्‍या लोकांना टाळावे लागते व रोष पत्करावा लागतो.
.
या उलट दैवी गुणसंपत्ती असते ती म्हणजे - निरलस, निरपेक्ष वृत्ती, मानसिक धैर्य, मनोबल, सद्वासना, प्रसन्न चित्त , विद्येची उपासना, श्रमप्रतिष्ठा, सचोटी. हे गुण आत्मसात करण्याकरता, कष्ट आहेत, मुख्य त्या गुणांचे महत्व पटणे, या गुणांची ओढ लागणे, निदानपक्षी आपल्याला त्याच दिशेने प्रवास करायचा आहे असा ठाम विश्वास वाटणे ही मला वाटते दैवी कॄपा असते. दान, नामस्मरण आणि सत्संगती (नॉट नेसेसरीली इन दॅट ऑर्डर) या तीन गोष्टी मतिचा मळ दूर करण्यास नक्की उपयोगी ठरतात. अखिल विश्व तुम्हाला योग्य त्या मार्गावरती जाण्यास प्रवृत्त करतच असते. तो अंतरात्मा जो की आत्माराम , प्रत्येकातच वसतोच की. तो तुम्हाला 'नज' करतच असतो (क्वचित सोनारानेही कान टोचावे लागतात.)
.
सांगायचा मुद्दा हा की ज्या ज्या वेळेस मी दुसर्‍याकरता उत्तम विचार केलेला आहे, गॉसिप टाळलेले आहे, दुरुत्तरे टाळून गप्प बसणे स्वीकारलेले आहे, स्वमुखे आपलीच स्तुती टाळलेली आहे, - त्या त्या वेळी मला वाटते माझा ऊर्ध्वगतीस प्रवास झालेला आहे. गोंदवलेकर महाराज ज्यांनी असंख्य लोकांवरती रामनामाचे महत्व बिंबविले त्यांनीच एका ठिकाणी म्हटलेले आहे - "तुमची उर्ध्व दिशेने प्रगती व्हावी म्हणुन प्रयत्न करावे लागतात." प्रत्येक क्षण हा दिलेली संधी आहे वरच्या दिशेस वा खालच्या दिशेस एक इंच सरकण्याची. त्यात वाईट, स्वार्थी, चूकीच्या सवयी तर काय पट्टकन लागतात.
.
मला स्तोत्रे म्हणावयास भयंकरच आवडते म्हणजे कोण्या जन्मीची अतृप्त वासना असल्यासारखी, आधाशासारखी मला स्तोत्रे आवडतात. त्यातही काही मागमाग केलेली स्तोत्रे ठिक वाटातात किंबहुना फलशॄती मी बरेचदा वाचतही नाही. ईश्वराचे गुणवर्णन, स्तुती, त्यातील उत्कट काव्य आवडते आणि या सुद्धा बाबीचा मला अभिमान वाटतो. आता ही प्रगती फास्ट व्हावी म्हणुन उत्तम अध्यात्मिक पुस्तके वाचणे, योग्य ते मैत्र निवडणे, आत्मपरीक्षण करणे, स्वतः च्या चूका हेड ऑन स्विकारणे, निदान त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पहाण्याचे धाडस करणे वगैरे अनेक टुल्स व टेक्निक्स आहेत. याचा अर्थ माझ्यात दुर्गुण नाहच, भल्याबुर्‍या वासना, इच्छा, आकांक्षा नाहीत असा मात्र नाही. मी माणूसच आहे. तुमच्या इतकीच. ना जास्त ना कमी. पण आत्ता विषय अभिमानाचा चालला आहे. आत्ता मी दुर्गुणांच्या रॅबिट होलमध्ये जाणार नाही.
.
माझ्या मते सांसारिक मळापासून मी अगदी मुक्त नसले (नाहीच्चे) तरी योग्य दिशेनेच मार्गरत आहे. यात मला अभिमान आहे. त्यामुळे क्षण असा सांगता येणार नाही पण एक वॉनाबी गुणांचा संच आहे.

Group content visibility: 
Use group defaults

कन्फर्मिटी बायस, राजकारण, गॉसिप, खोटेपणा, लोभ, मत्सर, दंभ, दुराभिमान. या सार्‍यापासून आपल्याला वाचायचे असेल तर मग बरेचदा, एकटे रहाणे पत्करावे लागते, नोकरीत कमी पदावरती रहाणे मंजूर असावे लागते, आपल्याला न आवडणार्‍या लोकांना टाळावे लागते व रोष पत्करावा लागतो.>> खरं आहे.
गुणांचे महत्व पटणे, या गुणांची ओढ लागणे, निदानपक्षी आपल्याला त्याच दिशेने प्रवास करायचा आहे असा ठाम विश्वास वाटणे ही मला वाटते दैवी कॄपा असते.>> आवडलं.

छान लिहिलं आहे. जज ऐवजी नज शब्द वापरला आहे - तो विचार आवडला. मी शेवटपर्यंत कुठला अभिमानाचा क्षण ते शोधत होतो, पण << क्षण असा सांगता येणार नाही पण एक वॉनाबी गुणांचा संच आहे >> हा प्रामाणिकपणा आवडला. तरी क्षण कुठला असता तर त्याबद्दल वाचायला जास्त आवडलं असतं हे मी प्रामाणिकपणे सांगतो. Happy

वा! फार सुंदर लिहिले आहे सामो.
प्रामाणिकपणा आवडला. तरी क्षण कुठला असता तर त्याबद्दल वाचायला जास्त आवडलं असतं +1

सुंदर लिहिले आहे सामो.
तुमचा या विषयावरचा लेख म्हणजे आध्यात्माचा टच असणारच हे वाटले होतेच Happy

पण मलाही एखादा क्षण वाचायला आवडले असते किंबहुना आवडेल Happy

काही क्षण आहेत पण ते आप्तस्वकियांबद्दल वाटणार्‍या अभिमानाचे आहेत व त्या त्या क्षणां मधील उत्कटता, कॄतार्थता, कौतुक, अभिमान - हे मला शब्दांत पकडता येत नाहीये. काल एक लेख लिहून, मिटवला.
.
सूर्याच्या रथास एकच चाक आहे, त्याच्या रथाचा सारथी - अरुण जो की पांगळा आहे. आणि तरी कोणतीही कारणे, सबबी न देत बसता सूर्य सहस्र योजने निमिषार्धात, त्वरेने, कापतो. अ-व्या-ह-त!! असे प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पुढे पुढे जाणारे लोक मला आप्तस्वकिय म्हणुन लाभले हे माझे भाग्य आहे. मला नाही लिहीता येत. Happy
------------------------
सर्वांचे प्रतिसादाबद्दल, खूप आभार.

लेखन आवडले!
'दान, नामस्मरण आणि सत्संगती = वैराग्य?'
'या सार्‍यापासून आपल्याला वाचायचे असेल तर मग बरेचदा, एकटे रहाणे पत्करावे लागते, नोकरीत कमी पदावरती रहाणे मंजूर असावे लागते, आपल्याला न आवडणार्‍या लोकांना टाळावे लागते व रोष पत्करावा लागतो.,,'
मी हाच मार्ग अनुसरला...म्हणून हे वाक्य लगेच connect झाले.

वैकुंठ स्मशानभुमी इथे तुकाराम महाराजांचा एक अभंग तेथे उधृत केला आहे....तो त्यठिकाणी वाचल्यावर त्याची सत्यता मनाला अगदी भिडते.

अगं किती सुंदर लिहिलं आहेस!

कन्फर्मिटी बायस, राजकारण, गॉसिप, खोटेपणा, लोभ, मत्सर, दंभ, दुराभिमान. या सार्‍यापासून आपल्याला वाचायचे असेल तर मग बरेचदा, एकटे रहाणे पत्करावे लागते, नोकरीत कमी पदावरती रहाणे मंजूर असावे लागते, आपल्याला न आवडणार्‍या लोकांना टाळावे लागते व रोष पत्करावा लागतो.>> हे तर निव्वळ जगते आहे. नुकतेच प्रमोशन नको आता म्हटल्यावर घरच्या, ऑफीसमधल्या लोकांना बसलेला धका आठवला.
प्रयत्न करते आहे की आता बास! वानप्रस्थ फार फार महत्वाचा आहे असे वाटते आहे सारखे. असो धागा भरकटत नाही.

आवडले लिखाण!

सामो,किती सुंदर लिहिले आहेस!

माझ्या मते सांसारिक मळापासून मी अगदी मुक्त नसले (नाहीच्चे) तरी योग्य दिशेनेच मार्गरत आहे. यात मला अभिमान आहे. .... जियो.