भविष्यातील लढा अ-मानवी मध्यस्थाशी:-
भविष्यातील आभासी (वर्चुअल) जग किती मोठ्या प्रमाणात आक्रमण करतेय ह्याची जाणीव भारतातील १४० कोटी जनतेला करून देणे गरजेचे आहे.
सर्व समानता- सर्वाना काम- सर्वांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणार, असे सर्व राजकीय पक्ष गेल्या ७५ वर्ष्यापासुन सांगताहेत, पण हे होतेय का?
आज उदो उदो होतोय, कृत्रिम बुद्धिमत्तेचा/ मशीन लर्निंगचा . ह्याची गरज राष्ट्राच्या प्रगती साठी होणार आहे असे सर्वत्र बोलबाला आहे. नवीन नवीन फॉरिन कंपन्या, भारत हे मोठे व्यापार केंद्र असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरा करिता प्रोत्साहित करीत आहेत. रोबॉटिक्स, ड्रोन ह्याचा वापर सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणार आहे, परंतु ह्याचा फायदा फक्त उद्योजकांना आणि फटका/ नुकसान हे कामगार वर्गाचेच व मध्यम वर्गाचेच होणार असल्याचे वाटते.
आमच्या लहानपणी असलेले काही प्रकारचे सेवक (रोल्स), उदा. तार ऑपरेटर, टेलीफोन ऑपरेटर हे कधीच नाहीसे झाले. नवीन पिढीला असे रोल होते, हे माहीत देखील नाही.
बैंक एम्प्लॉयमेंट सुद्धा कमी झाली आहे. आता शेतमजूर, कंडक्टर, ड्राइवर, सॉफ्टवेयर डेव्हलपर्स, क्रिएटिव आर्टिस्ट, टीचर्स, अकाउंटस क्षेत्र, हमाल, सफाई कामगार व इतर अनेक कामाना लागणारे जॉब्स कमी होणार आहेत. अनेक लोक बेरोजगार होण्याची शक्यता आहे. हे प्रामुख्याने भारतात होणार असल्याची चिन्हे आहेत.
एकूण १४० कोटी लोकसंख्येत 90 कोटी जनता काम करणे योग्य आहे. त्यात ७०% जनता असंघटित कामगार आहे. अशा लोकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व मॅकनाइजेशन हे किती नवीन जॉब्स तयार करणार आहे, ह्या बाबत कुठेही लिहलेले आढळत नाही.
मान्य आहे की सर्वाना प्रत्येक काम लौकर पूर्ण करावयाचे आहे, कामगार योग्य प्रकारे लौकर कामे करत नाहीत, ही सार्वत्रिक तक्रार आहे. पण आज कामगारांना , तुम्ही कामाचा उरक वाढवला नाही तर यंत्र तुमचे काम काढुन घेतील, अशी स्पष्टपणे कल्पना जाहिरपणे शासन किंवा युनियन्स देतात का?
ह्या विषयावर मध्यम वर्गीय जेष्ठासोबत चर्चा केल्यानंतर, आपण फार विचार करू नये, वेगळे जॉब्स तयार होतील, आता आपले फार दिवस राहिले नाहीत, आपण का काळजी करायची, मस्त एंजॉय करूया, वेगवेगळे देश हिंडून येवुया असा सल्ला देतात व तेथील सुव्यवस्था बघुन आपण किती अस्वछ, बकाल आहोत, ह्या वर व्यक्त होत असतात.
आपल्या देशाला स्वातंत्र्य होवुन ७५ वर्ष झालीत आणि तीही लोकशाहीत. हे अतिशय उत्तम आहे, परंतु वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जॉब्स वाढताना दिसत नाहीत. अनुनयाच्या भुमिकेतून काही आर्थिक मदत ठरावीक काळासाठी केली जाते व नंतर ती बंद होते किंवा त्या करिता इतर योजनांना कात्री लागते. हे सर्व पक्ष करताहेत.
दुसऱ्या बद्दल/ प्रतिपक्षाबद्दल माहिती मिळवण्याची वृत्ती ही योग्य होती/ आहे पण आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे अनेक प्रकारचे धोके निर्माण होत आहेत. वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी असे सर्वाना वाटते, पण झाले असे गूगल, याहू, रेडीफ, व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या अनेक फुकट सेवा देणाऱ्या सेवाना आपण सगळे बळी पडलो व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवु शकलो नाही, त्यामुळेच AI सारखे सॉफ्टवेयर विकसित होत आहेत व ते आता सर्व सामान्य माणसावर ताबा घेणार आहेत. AI व मशीन लर्निंग विकसकाच्या मदतीने जगातील सर्व राज्यकर्ते एकमेकाबरोबर डिजिटल युद्ध करीत असतात व त्याचे नुकसान सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
मध्यम वर्गीय असोत की कामगार वर्ग असो, हे सर्वजण मोबाईलच्या आहारी गेले आहेत. लोकलचे टिकट ५ रूपयानी वाढवले तर आंदोलन करणारे मोबाईलचे भरमसाठ बिल देण्यास तयार असतात.
कुठल्याही कार्यक्रमात, जेवताना एकमेकांशी गप्पा न मारता व्हॉट्सअप, फेसबुक ह्यावर दंग असतात, त्यांची मुले सुद्धा मोबाईलच्या आहारी गेले आहेत, असे दिसते.
ह्या सर्व प्रकारात फक्त मनोरंजन नसुन ह्या अप्लिकेशन्स द्वारे उपयोगकर्त्याच्या फुकट मिळत असलेल्या माहितीवर मशीन लर्निंग व आर्टिफीसियल इंटेलिजेंसचा वापर करून त्यानुसार उपयोगकर्त्यास पुढील काळात कमकुवत बनवत आर्थिक लाभ विकसक व राज्यकर्ते मिळवतील, हे सर्व सामान्य लोकांच्या लक्षातच येत नाही.
उपयोगकर्तेना विविध जाती-जमातीत विभागुन, वांशिक-उच्छेदाच्या मोहिमा राबवुन, त्यांना मूलभूत प्रश्नापासुन दुर ठेवण्याचा सतत प्रयत्न केला जातोय .
कॉम्प्युटर्स (AI व मशीन लर्निंग च्या सहाय्याने) हे विविध फुकट / स्वस्त प्रोग्रामद्वारे लोकांच्या ताबा घेतील, त्यांच्या मनावर राज्य करतील व अश्या विकासकांना राजकारणी हाताशी धरून राज्यकर्ते होण्याची धडपड करतील त्यामुळे लोकशाही-एकाधिकारशाही चे अजब मिश्रण होईल.
ए आय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार होणाऱ्या अ-मानवी मध्यस्थाशी लढताना ग्रामीण भागात येत्या ५ वर्षात काय परिणाम होवु शकतो ह्यावर एक काव्यात्मिक चिंतन असे आहे
ए आय , आता त्यायच्या हातालेच काम नाय …
शेती गहाण टाकून शिकवलं होत पोट्ट्याले, केलं व्हत विंजेनियर,
वाटलं करन हापिसात काम, येतील संसाराच्या कामी,
पर ए आय, केलं तुयामुळेच त्यायले कामावरून कमी, मशीनच उरकतया सारं काम.
आता नाई दिसत, शेत नांगरणी, रोवणी, फवारनि, निंदन, वेचन करणारे हात,
आता नाई दिसत डायवर, कंडक्टर, बाबू अन् मास्तर,
कारन, हाताशी आलंय ए आय येक यगळच शास्तर
अवव!!! सगळ्याच गावाचं वाजतंय कि बारा, बिघडली त्यायचीच मती, अन् कुटल्या बी मानसाच्या रोजंदारिले नाही आता गती.
दिवसभर, पोट्टे-पोट्ट्या हाती धरते मोबाईलंच बेनं
अन् होतेत भलत्याच ईशयात शानं,
रात्र रात्र जागतेत अन् दिवसा उशिरा उठतेत, कारण ए आय , आता त्यायच्या हाताले काम नाय…
शहरात पण नाही मिळत चाकरी, हमाली,
पण आता दिसतेत, जागोजागी मवाली,
एक मशीन करतय चार चार जनाचं काम,
आणि, घरातील तीन लोकायले करते बेकाम
म्हाया देशात आहेत 90 कोट कष्टकरी,
ए आय, तुझ्यामुले मिळलं का त्याईल रोज भाकरी,
की करावी लागलं त्यासाठी गुंडगिरी.
ए आय, तुझी आणि तुझ्या मशीनची गरज हाय त्या गोऱ्याच्या देशात, जिथं माणसच हाय कमी, जिथं बोलायले माणूस नाय, त्याले संसार कसा कढला लावायचा हेही कळत नाय,
ते वापरतेत मशीन, संसार करायला, अन मंग , जातेत मनाच्या डॉक्टरांकडे शांती मिळवायला.
तेचा, देश देतो लोकाले बेकारी भत्ता, पन इथ निवडणुकीपुरता करत्यात काही ज्यांगड गुत्ता, अन् मंग ठेवतात हाती भुट्टा .
…ए आय , आता त्यायच्या हातालेच काम नाय, हातालेच काम नाय..
… विवेकानंद घारे ( जुलै 2025 )