DNA : आनुवंशिकतेपासून गुन्हेगाराच्या शोधापर्यंत

Submitted by कुमार१ on 9 July, 2025 - 02:28

‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली. हा नक्कीच विसाव्या शतकातील क्रांतिकारक जीवशास्त्रीय शोध होता

पुढील 70 वर्षांमध्ये या मूलभूत संशोधनाचा उपयोग जीवशास्त्रापासून न्यायवैद्यकीय शास्त्रापर्यंत अनेक शाखांमध्ये झालेला आहे त्याचा थोडक्यात हा आढावा :
१. डीएनए मधील जनुके विविध प्रथिनांचे उत्पादन नियंत्रित करतात यावर शिक्कामोर्तब झाले.
२. या शोधातूनच पुढे ‘जनुकीय अभियांत्रिकी’ या नव्या विज्ञानशाखेचा उगम झाला.

३. त्यातून पुढे जैवतंत्रज्ञान ही शाखा विकसित झाली. त्या शाखेत सूक्ष्मजीवांच्या जनुकांत फेरफार करून विविध प्रथिने, हॉर्मोन्स आणि प्रतिजैविके तयार करतात. ती विविध रोगोपचारांत वापरली जातात.
४. प्रत्येक व्यक्तीच्या डीएनएची रचना अद्वितीय (unique) असते. या मुद्द्याचा उपयोग न्याय्यवैद्यकशास्त्रात केला जातो. गुन्हेगाराची ओळख त्यामुळे पक्की होते. वादग्रस्त पितृत्वाच्या दाव्यातही त्याचा उपयोग होतो.

५. बऱ्याच अनुवांशिक आजारांत जन्मतः शरीरात एखादे प्रथिन वा एन्झाइम तयार होत नाही. अशा रुग्णांसाठी जनुकीय उपचार करता येतात. या तंत्राची घोडदौड चालू असून पुढील शतकापर्यंत ती सार्वत्रिक उपचारपद्धती झाली असेल.

आता प्रस्तुत लेखाचे प्रयोजन सांगतो.
डीएनए हा मानवी जीवनाचा मूलाधार असल्यामुळे त्याच्यावर कितीही संशोधन झाले तरी त्याच्या भोवतालचे काहीसे गूढ वलय अद्यापही कायम आहे. त्या दृष्टिकोनातून त्यावर अधिकाधिक संशोधन सतत होत असते. अशा नवीन संशोधनांची टिप्पणी करण्यासाठी हा धागा उघडून ठेवत आहे. यथावकाश त्यात संशोधनानुसार भर घालता येईल.

तूर्त दोन महत्त्वाच्या संशोधन घटनांचा उल्लेख करतो :
१. कृत्रिम डीएनएचे उत्पादन
(Synthetic Human Genome project)
याची मुहूर्तमेढ गेल्याच महिन्यात रोवली गेली. पाश्चात्य देशातील अनेक नामवंत विद्यापीठे या प्रकल्पात सहभागी झाली आहेत. या महत्त्वाकांक्षी संशोधनाचा सदुपयोग आणि दुरुपयोग देखील केला जाईल अशी टीका त्यावर होत आहे. ‘सेपियन्स’ या प्रसिद्ध पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “माणसाला देव बनण्याची घाई झालेली आहे का?’, असाही सूर या निमित्ताने माध्यमांमधून उमटला.
काही असाध्य रोगांवर उपचार ही त्याची सकारात्मक बाजू, पण 'हवा तसा' कृत्रिम मानव (?) तयार करण्याच्या दिशेने ते संशोधन गेल्यास ते तापदायक ठरेल. सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून या प्रकल्पाकडे पहावे लागणार आहे.

२. गुन्ह्याचा पोलीस तपास
गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी न्याय वैद्यकशास्त्राच्या अंतर्गत डीएनए चाचणीचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासंदर्भात डीएनएचे नमुने कसे गोळा केले जातात हे जाणून घेणे रोचक आहे. आपल्यातील अनेकांनी आतापर्यंत पोलीस/ सीआयडी आणि तत्सम मालिका व चित्रपट पाहिले असणार आणि त्यात हे सगळे रंजक पद्धतीने दाखवले जाते. पण चित्रपट हा शेवटी कल्पनेचाच खेळ असल्यामुळे तिथे कथानायकाला सगळ्या अनुकूल गोष्टी दाखवल्या जाऊन शेवटी गुन्हेगार सापडतोच व गजाआड जातो ! परंतु वास्तव दरवेळी तसे नसून कित्येकदा ते खडतर असते.

CID_(Indian_TV_series).png
गुन्ह्याच्या ठिकाणी जेव्हा पोलीस पोचतात तेव्हा तिथे ज्या काही निर्जीव वस्तू सापडतात त्या ताब्यात घेऊन त्यांवर उमटलेले बोटांचे ठसे मानवी डीएनएसाठी तपासले जातात. परंतु या प्रकारे (trace and touch samples) मिळणारा डीएनएचा नमुना कित्येकदा किरकोळ व अपुरा असतो. तसेच या नमुन्यांमध्ये कित्येकदा अन्य गोष्टींची भेसळ (contamination) देखील झालेली असते. त्यामुळे निव्वळ अशा तपासणीतून उपलब्ध झालेला पुरावा गुन्हेगार शोधण्यासाठी तकलादू देखील ठरतो. तसेच सराईत सुशिक्षित गुन्हेगार गुन्हा करताना हातमोज्यांचा आणि शरीरभर घातलेल्या संरक्षक झग्याचा देखील वापर करतात. त्यामुळे त्यांच्या बोटांचे ठसे उमटण्याचाही संभव नसतो. नमुना मिळवण्यातली ही पण एक महत्त्वाची मर्यादा आहे.

या दृष्टीने गुन्ह्याच्या ठिकाणी काही वेगळ्या स्वरूपाचा डीएनए मिळवता येईल का? यावर अनेक वर्षे संशोधक विचार करीत होते. गेल्या काही वर्षात त्यांना एक महत्त्वाचा आशेचा किरण दिसलेला आहे आणि तो म्हणजे गुन्हास्थळाच्या वातावरणातील डीएनए अर्थात, environmental DNA (eDNA). या डीएनएचे नमुने तिथली हवा आणि आसपासची धूळ यातून गोळा केले जातात. एखाद्या बंदिस्त जागेत जर काही माणसे काही काळ वावरून गेली तर त्यांच्या शरीरातून (त्वचा, केस आणि कपड्यांमार्फत) बाहेर पडलेले डीएनए-रेणू तिथल्या हवा आणि धुळीत बराच काळ टिकून राहतात असे लक्षात आलेले आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तींच्या बोलण्या, खोकण्या आणि शिंकण्यातून देखील डीएनए-रेणू बाहेर पडत असतात. तसेच गुन्ह्याच्या स्थळी जर एखादा छोटामोठा पाण्याचा साठा असेल तर त्यातही माणसांचे डीएनए (Aquatic eDNA) साठून राहू शकतात.

या प्रकारचे डीएनए नमुने पूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात व पुरेसे मिळतील अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. किंबहुना गुन्हास्थळी पुरेसा डीएनए गोळा होईपर्यंत संबंधित नमुना गोळा करण्याचे उपकरण चालू स्थितीत ठेवता येईल. तसेच या आधुनिक चाचणीमधून एखाद्या बंदिस्त जागेत येऊन गेलेल्या एकूण माणसांचा अंदाज येईल आणि त्यांनी तिथे घालवलेला एकूण वेळ देखील काढता येईल. याखेरीज गुन्ह्याच्या ठिकाणी एखाद्या प्राण्याचा वापर झाला असल्यास त्याचीही स्वतंत्र माहिती काढता येईल.

अर्थात हे नवे तंत्रज्ञान पूर्ण विकसित होण्यास अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. एखादी व्यक्ती संबंधित खोलीत निव्वळ येऊन गेली असेल आणि काही बोलली किंवा खोकली नसेल, तर कितपत डीएनए गोळा होईल हे पहावे लागेल. तसेच व्यक्तींच्या वावरामुळे खोलीत जमा झालेला डीएनए किती काळ चांगल्या अवस्थेत राहतो हे पण पहावे लागेल. खोली जर वातानुकूलित असेल तर त्याच्या झडपांद्वारे एका खोलीतील डीएनए दुसऱ्या खोलीत जातो का, हा पण एक महत्वाचा मुद्दा असा नमुना गोळा करण्याची उपकरणे, त्यांचे प्रमाणीकरण आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान या सर्वांमध्ये संशोधनानुसार टप्प्याटप्प्याने सुयोग्य बदल करावे लागतील. हे सगळे झाले जीवशास्त्रीय मुद्दे परंतु सरतेशेवटी, जगातील किती न्यायालये या प्रकारच्या अत्याधुनिक पुराव्याला अंतिम पुरावा मानणार हा प्रश्न देखील उरतोच.

येत्या दशकात या नवतंत्रज्ञानाचा कसा विकास होतो आणि ते गुन्ह्याच्या तपासासाठी किती प्रभावी व मान्यताप्राप्त ठरते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
**********************************************************************************

संदर्भ :

  1. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7268995/#:~:text=You%20have%20b....
  2. https://analyticalsciencejournals.onlinelibrary.wiley.com/doi/10.1002/el...
  3. https://www.sciencealert.com/first-step-towards-an-artificial-human-geno...
  4. . . .
    डीएनए संदर्भातील यापूर्वीचे लेखन :
    विमान अपघातातील मृतांची ओळख : ‘डीएनए’ आणि अन्य चाचण्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Conviction (2010) हा मूवी याच डीएनए तंंत्राचा वापर करुन एक बहिण तुरुंगात खितपत पडलेल्या आपल्या भावाला कसे सोडवते यावर आधारित आहे. ही सत्यघटना आहे असे या मूवीच्या शेवटी सांगितलेले आहे.

*Conviction
धन्यवाद !
पाहतो युट्युबवर आहे का.

The DNA evidence has been conclusive that modern humans outside of Africa are all descendants of a single population of Out of Africa (OoA) migrants who moved into Asia sometime after 70,000 years ago and then spread around the world, perhaps replacing their genetic cousins such as Homo neanderthalensis along the way.
संदर्भ
Early Indians
The Story of Our Ancestors and Where We Came From.
टोनी जोसेफ ह्यांच्या पुस्तकावरून.
DNA संशोधनाचा हा एक फायदा.
ह्याच पुस्तकावरून मला mitochondrial DNA, or mtDNA, चा CONCEPT समजला.

* The Story of Our Ancestors >> उत्तम !
neanderthalensis हा कुतूहलाचा विषय आहे खरा.

neanderthalensis हा कुतूहलाचा विषय आहे खरा.
हो. आजही आपल्या शरीरात १.7 ते १.८ % neanderthal चे DNA आहेत!

Conviction (2010) युट्युबवर बघितला.
त्यात Sir Alec Jeffreys यांनी लावलेला डीएनए प्रोफाईल चाचणीचा शोध वगैरे तपशील व्यवस्थित दिलेले आहेत.

या संशोधनापूर्वी काही संशयीतांना खोट्या आरोपावरून तुरुंगात टाकले गेलेले होते. डीएनए प्रोफाईलच्या मदतीने त्यातील काहींची सुटका करण्यात यश आले.

अवयवदान, डीएनए प्रोफाईल चाचणी आणि नैतिक प्रश्न
डिसेंबर 2024मध्ये हैदराबादमध्ये घडलेली ही एक चमत्कारिक घटना.
एका कुटुंबातील एका आजारी मुलाला शरीरातील एका नव्या अवयवाची नितांत गरज होती आणि ती तयारी त्याच्या ‘वडिलांनी’ दाखवली. मग डीएनए केंद्रात मुलगा आणि त्याचे आई-वडील अशा तिघांचे प्रोफाईल तयार केले गेले.

त्या रिपोर्टमधून आई व मुलगा यांचे नाते जीवशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले परंतु त्या वडिलांच्या प्रोफाइलवरून ते या मुलाचे जीवशास्त्रीय वडील नाहीत हे सुद्धा अचानक उजेडात आले ! अधिक विश्लेषण करता वैज्ञानिकांनी मत दिले की ते अवयव देऊ इच्छिणारे “वडील” (donor) हे जीवशास्त्रीय वडील नसून बहुधा जीवशास्त्रीय वडिलांचे भाऊ आहेत.

(काही समाजात विवाहित स्त्रीचा नवरा जर मूल देण्यासाठी सक्षम नसेल तर तिला दीराकडून अपत्य मिळवण्याची परवानगी असते. या प्रथेला Levirate Marriage असे म्हणतात).

डीएनए चाचणीतून अशी काही गुपिते अचानक समोर येतात हा विचारात घेण्याजोगा मुद्दा.

https://upscgspedia.com/ethical-dilemmas-dna-testing-organ-donation/#:~:...'s%20brother.

पण चित्रपट हा शेवटी कल्पनेचाच खेळ असल्यामुळे तिथे कथानायकाला सगळ्या अनुकूल गोष्टी दाखवल्या जाऊन शेवटी गुन्हेगार सापडतोच व गजाआड जातो ! परंतु वास्तव दरवेळी तसे नसून कित्येकदा ते खडतर असते.

अगदी खरे. विज्ञान आणि वैज्ञानिक आपले काम प्रामाणिकपणे आणि चोख करतील. परंतु भारतातली न्यायप्रक्रिया अशी आहे की तिथे सत्याची डाळ शिजणार नाही. त्यातून ही प्रक्रिया इतकी दीर्घकाळ चालणारी आहे की कालौघात सत्य पुसले गेल्यानंतर न्यायालयात सत्याचा शोध घेतला जातो. कालच यूट्यूबवरील एका बातमीत माहिती मिळाली की महाराष्ट्राची लोकसंख्या आहे जवळजवळ ११ लाख. आणि महाराष्ट्रात एकूण खटले प्रलंबित आहेत ५६ लाख. खरेखोटे कोण जाणे.

आपण काही यावर बोलू शकत नाही तेव्हा माझी हाताची घडी तोंडावर बोट.

* कालौघात सत्य पुसले गेल्यानंतर न्यायालयात सत्याचा शोध >>> होय, हे दुर्दैवी आहे.

* महाराष्ट्राची लोकसंख्या आहे जवळजवळ ११ लाख. >>> 'कोटी' हवे. ( नजरचूक).

छान लेख....
कॉग्रेसचे उत्तर प्रदेश, झारखंडचे मुख्यमंत्री, काही काळ केंद्रातही मंत्री असलेल्या नारायण दत्त तिवारी यांनी एका मुलाला नाकारले. नाव रोहित शेखर. DNA चाचणीत तेच biological वडील असल्याचे सिद्ध झाले.

तुम्हाला DNA याच देही याच डोळा बघायचे आहेत का?
स्ट्राबेरीचे DNA तुम्ही घरातल्या घरात बघू शकता.
https://www.genome.gov/about-genomics/teaching-tools/strawberry-dna-extr...
अशाच प्रकारे केल्याचे DNA पण काढू शकता.

सम लैगिक जोडप्यांना SAME SEX COUPLE स्वतःच्या बाळाचे आई वडील होणे नजीकच्या भविष्यात शक्य होईल. ह्या बद्दल जोरदार संशोधन चालू आहे.
HOW SAME SEX COUPLE CAN HAVE THEIR CHILD GOOGLE करा.

डीएनए : लसनिर्मितीसाठी

आयसीएमआरने भारतात तयार केलेली नवी मलेरियाविरोधी लस संबंधित जंतूच्या डीएनएपासून तयार केलेली आहे. ही लस रोगप्रतिबंधक तर आहेच आणि त्याचबरोबर रोगप्रसार थांबवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल. सध्या या लशीच्या बाजारात येण्याची व्यापारी प्रक्रिया सुरू आहे :

https://indianexpress.com/article/india/icmr-invites-partners-to-launch-...

>>>>जंतूच्या डीएनएपासून तयार केलेली आहे
अरे खरच की जंतूनांही डीएनए असू शकतो Proud आय मीन जस्ट आत्ता स्ट्राईक झाले.

एक विज्ञानाचा चमत्कार म्हणावा अशी बातमी वाचनात आली. श्रेया सिद्दनागौडर नावाच्या अठरा वर्षे वयाच्या मुलीचे हात एका अपघातामुळे कोपरापासून amputate करावे लागले होते. ते एक मॅचिंग डोनर मिळाल्याने पुन्हा जोडले गेले. आशियातील ही पहिली अशी सर्जरी आहे. ते तिच्या शरीराने ॲडाप्ट तर केलेच, पण आता ते हात तिच्या शरीराच्या रंगाशी मॅच होत आहेत आणि फेमिनिन होत आहेत. डोनरची त्वचा गडद होती व तो पुरुष होता. तिच्या DNA सुद्धा स्विकारले हे नवीन हात. मला फार अमेझिंग वाटली बातमी म्हणून शेअर केली. ह्याच बातमीची आणखी एक लिंक.
Shreya Siddanagowder – Asia’s first bilateral above elbow hand transplant recipient

अस्मिता
वरील उत्तम दुव्यांबद्दल धन्यवाद ! माहिती अतिशय प्रेरणादायी !
श्रेयाच्या जिद्दीचे कौतुक तसेच डॉ. अय्यर आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन.
तसेच सचिनचे हात तिला दिल्याबद्दल त्याच्या पालकांचे कौतुक.

वरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तिला बसवलेले पुरुषाचे हात आता हळूहळू स्त्री देहाला अनुकूल होत आहेत हीदेखील आनंदाची गोष्ट आहे. एखाद्या स्त्रीला पुरुषाच्या हातांचे प्रत्यारोपण करण्याची ही जगातली पहिली घटना असावी हे खरोखर स्तिमित करणारे आहे.

श्रेयाला मनापासून शुभेच्छा !!

* मृत्यूपश्चातच नाही.
सचिन जिवंत आहे असे त्या बातमीत म्हटलेले आहे. परंतु या व्यतिरिक्त त्याच्या शारीरिक स्थितीबद्दल काही लिहिलेले नाही. त्याची अन्य अंतर्गत इंद्रिये देखील आतापर्यंत दान केलेली आहेत.

"I've met his parents quite a few times and all they have ever said is that they've willingly and whole- heartedly donated most of his organs. Sachin is still alive in 6 people today".

भविष्यात
तुम्ही Blade Runner किंवा Gattaca हे सिनेमे बघितले नसतील तर अवश्य पहा. DNA मध्ये मानवी हस्तक्षेप करून आपण देवांच्या पंगतीत बसणार आहोत.
काही अनुवांशिक रोगांचे gene ओळखण्यात आले आहेत. उदा. स्तनांचा कर्क रोग. BRCA1 (official name “breast cancer 1, early onset”), Angelina Jolie ह्या अभिनेत्रीचा DNA प्रोफाईल मध्ये हा gene मिळाल्यावर तिने शस्त्रक्रिया करून त्यापासून सुटका करून घेतली.
पुढच्या दशकात आपण आपले बाळ तुम्हाला जसे पाहिजे तसे निळे डोळे सोनेरी केस दिसायला स्मार्ट उत्तम दर्जाचा खेळाडू वगैरे order करू शकाल. पुढचे युग हे "Designer Babies" चे असणार आहे.
bioprinting भविष्य काळात आपण आपल्याला पाहिले तो अवयव organ ऑर्डर करू शकू. म्हणजे हृदय, किडनी, पॅनक्रिअस इत्यादि. सध्या कातडी छापण्यात यश आले आहे. शास्त्रज्ञ अठरा वर्षे वयाच्या तरुण/तरुणी 3d printing करण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणजे अठरा वर्षे वाट पहायची गरज पडणार नाही.
Genetic Engineering मधले हे प्रयोग नैतिक आहेत की अनैतिक आहेत, त्याचे काही भीषण परिणाम होणार आहेत की हे मानवाला वरदान ठरणार हे तंत्र मानव कसे वापरणार आहे ह्यावर अवलंबून आहे.
पण एक निश्चित आहे की हे आपले भविष्य आहे.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा