तुला जपणार आहे

Submitted by rmd on 25 June, 2025 - 10:26

वाड्यावर खूपच आग्रह झाल्यामुळे या मालिकेसाठी शेप्रेट धागा काढत आहे Proud

राजश्रीच्या सगळ्या पिक्चरांचा काला करून त्यातल्या हाताला लागतील त्या गोष्टी उचलून बनवलेली ही मालिका वाटते आहे. सुरूवातीलाच एक लहान मुलाच्या आवाजात बोलणारा हरी नावाचा इरिटेटिंग पोपट आहे. हा सग्ग्ळं सग्ग्ळं बोलतो. तळी नावाच्या गावाची ओळख करून देतो. तळी मधे तळीराम आहेत की नाही ते कळलं नाही अजून. पण तळी मधे एक देवीआई आहे. या गावांमधे साधी देवी नसतेच का? देवीआईच कशी असते कंपल्सरी?

कोणी मीरा म्हणून मुलगी दाखवली आहे. ती म्हणे कशामुळे तरी गावच्या देवीचं तोंड बघत नसते पण तिची सेवा मात्र करत असते. म्हणजे डोळे बांधून गाभार्‍यात जाऊन वस्तू देणे वगैरे गोष्टी करत असते. तिची बहीण हयात नाहीये असा एक उल्लेख आलाय. ती कशी मेली आहे ते समजलं नाहीये. पण त्याचा दोष मीरा 'देवीआई' ला देत असते.

दुसरीकडे एक 'रामपुरे' नावाचं घराणं दाखवलं आहे. दोन भाऊ, त्यांच्या दोन बायका, एक आगाऊ टीनेजर मुलगी असा सरंजाम दिसला. भिंतीवरी ( कालनिर्णय नव्हते. हे ममव घर नव्हे. ) मोठ्या भावाच्या सुनेचा अर्धी भिंत झाकणारा फोटो. मोठी जाऊ धूपपात्र घेऊन घरभर फिरवत येते ( मधेच भन्साळी पण आठवला असावा ) मग या सुनेच्या फोटोसमोर तिच्या चांगुलपणाचं गुणगान होतं. बरीच बडबड झाल्यावर समजतं की मोठ्या भावाच्या मोठ्या मुलाची ही बायको आहे - अंबिका, कशाने तरी मेली आहे आणि तिच्या मृत्युला एक वर्ष होत आलं आहे. मोठ्या मुलाला एक मुलगी आहे आणि बापलेक अजूनही दु:खात आहेत. तरीही घरच्यांना आता त्याचं पुन्हा लग्न लावून द्यायचं आहे.

कट टू मोठा मुलगा - अथर्व. याचं मराठी फार कष्टाने उच्चारलेलं आहे. त्याची कसलीशी फॅक्टरी/कंपनी आहे. अर्थातच! राजश्री फॉर्म्युला असल्यामुळे फॅक्टरी वगैरे हवीच. त्याचं नाव प्रेम नाही हे आपलं नशीब. तो दु:खी दिसण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासोबत असलेले कोणी केशवकाका त्याला दुसरं लग्न करायचा आगंतुक सल्ला देतात.

फॅक्टरीमधे काम करणार्‍या एका बाईला तिथला सुपरवाइजर ती बाळाला फीड करत असताना पाहतो आणि बाळ हिसकावून घ्यायला लागतो. मुळात ती तिथे बाळ घेऊन कशी आलेली असते? आणि हा बाळ हिसकावून काय करणार असतो? एंटर अथर्व - तो सुपरवाइजरला फडाफडा मुस्काटात मारतो आणि बाईची माफी मागतो. वर फीडींगसाठी रूम बनवण्याचे आदेश देतो.

सुपरवाइजरला हाकलून दिल्यावर अथर्व त्या बाईच्या बाळाला उचलून वगैरे घेतो. सगळ्या उपस्थित कामगारांच्या चेहर्‍यावर कौतुकाचे भाव. मागून एक माणूस मान वाकडी करून तिरका चालत येतो. हा अथर्वचा भाऊ - अजित. यालाच ती फीडिंग रूम तयार करायला सांगितलेलं असतं म्हणे. पण आता अथर्व ते काम केशवकाकांना देतो. हे ऐकून अजितची मान अजून वाकडी होते आणि तो केशवकाकांना म्हणतो की अंबिका इथली चीफ सुपरवाइजिंग ऑफिसर (!) होती पण आता ती नाहीये. या कंपनीत माझा वाटा पण आहे आणि ती सीएसओ ची जागा मला हवी आहे.

पुन्हा आपण ममव नसलेल्या रामपुरेंकडे येतो. मंजिरी उर्फ मोठी जाऊ सगळ्यांना थालिपीठं वाढतेय. प्रत्येकी एक. वर घरच्या लोण्याचा गोळा. यू कॅन टेक म आऊट ऑफ मव बट यू कॅन नॉट टेक मव आऊट ऑफ म. Proud पुन्हा एकदा अथर्व आणि त्याची मुलगी वेदा कसे बिचारे झाले आहेत आणि अथर्वचं लग्न यावर चर्चा. धाकटी जाऊ कोण्या मायाची शिफारस करते. आता माया नावाची बाई आपल्याला दाखवतात. ती एकाच वेळी लोभी, हावरट आणि वेडसर दिसते. तिने एका चित्रकाराकडून तिचं अथर्वसोबत असल्याचे पेंटिंग करून घेतलेलं असतं. ते बघून ती एकदम चिडते आणि चित्रकाराच्या हातात त्याचंच एक शस्त्र खुपसते. का तर म्हणे त्याने चित्रात तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दाखवलेलं. अरे मग ते दाखव असं सांगायचं की सरळ! पण तसं नाही.

ही माया कोणाची कोण ते कळलं नाही. ती अनाथ आहे इतकं कळलं. तिला ती अंबिकाच घरात घेऊन आलेली असते म्हणे. असो. आता उद्याच्या वर्षश्राद्धाची तयारी चालू आहे. अंबिकाच्या फोटोला सोनचाफ्याचा हार आहे. माया रामपुरे मॅन्शन मधे येते. मग अथर्व येतो. मग वेदा येते. तिच्यासोबत टफीचा दूरचा भाऊ शोभेल असा एक गोल्डन रिट्रीव्हर येतो. वेदा कोणाशीच काही बोलत नाही. आईच्या गाण्यांच्या कॅसेट्स ऐकत राहते. शाळेत पण वॉकमन घेऊन जाते. त्यात फक्त एकच गाणं असतं - तुला जपणार आहे...! माया संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल तिथे अथर्वला चिकटून घेते. बाहेरून माळी असावा असा दिसणारा माणूस येतो. त्याच्याकडे पाहून माया चपापते. तिला कुठलंतरी आगीत जळणारं घर आठवतं. माळी तिला 'I know what you did last summer' वालं लूक देतो आणि त्याचवेळी अंबिकाच्या आवडीचं म्हणून सोनचाफ्याचं फूल अथर्वला देतो. बहुतेक गावातल्या सगळ्या सोनचाफ्याच्या फुलांचे वाटे यांच्या घरीच येत असावेत.

आता स्टोरी पुन्हा मीराकडे येते. हिच्याशी तो सुरूवातीचा इरिटेटिंग पोपट बोलतो आहे. तो पाहून मला 'मैं प्रेम की दिवानी हूँ' आठवला. त्या सुडो-टफीचं सीजीआयकरण का नाही केलं बरं? मीरा विवाहमधल्या अमृताच्या सीन मधे. काकाच्या घरी वाढणारी. काकू जिचा उठताबसता छळ करते अशी. काकाला विवाहमधल्यासारखीच एक मुलगी. ही बरीच छोटी आहे तरीपण काकूला तिचं लवकरच लग्न करायचंय. पण त्या आधी मीराला उजवून टाकायचंय. काकूच्या अंगात सीमा बिस्वास संचारते. मीराचे बाबा हयात आहेत. पण वेडे झालेत. स्मशानात राहतात. अपशकुनी पण असतात म्हणे असं गावकरी म्हणत असतात. मीरा बाबांसाठी भाकरी घेऊन जाते.

रामपुरी, सॉरी, रामपुर्‍यांच्या घरी माया उत्साहात. श्राद्धासाठी सगळी तयारी करते आहे. सोनचाफ्याचा हार ऑर्डर केलाय. धाकट्या जावेला मायात म्हणे अंबिका दिसते. असं म्हटल्यावर अंबिकाच्या फोटोचा हार हालायला लागतो. माया पुन्हा पुन्हा गदगदल्याची अ‍ॅक्टिंग करत अंबिकाचे गोडवे गात राहते. अथर्व कंटाळलेला आणि कन्फ्युज्ड चेहरा करून बघत राहतो. घरचे गहिवरतात. अंबिकाच्या पुढचा दिवा विझतो. मधेच ओम शांती ओम लागला की काय? अथर्वची आई दिवा लावायला जाते अंबिकाची फ्रेम वरून खाली येते आणि टेबलावर टेकते. तिथून बाजूला न होता आई फ्रेम कशी पडतेय ते पहात राहते. अथर्व मधे येतो आणि फ्रेम त्याच्या खांद्यावरून घसरत खाली पडते. तरीही मोठ्ठा स्फोट झाल्यासारख्या काचा छतापर्यंत उडतात.

पुढे काय? अंबिका कशी मेलेली असते? का तिला कोणी मारलेलं असतं? मीराचा काय संबंध? हे कळण्यासाठी देखते रहिये 'तुला जपणार आहे' झी मराठी वर Proud
मी ही मालिका यूट्यूबवर पाहाते आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा, बरं केलंस. हे काम काही सोपं नाही पण वेळोवेळी असं शिवधनुष्य पेलणारे "टिवल्याबावल्या - लव्हर्स" माबोवर आहेत ही मोठी गोष्ट आहे. Happy Wink

सुपरलोल लिहिले आहेस. Rofl
तूच देखते रहिये आणि आम्हाला सांगत रहिये. फा ने डेडली आत्याला वाऱ्यावर सोडून दिले आहे, तू अंबिकाला पदराखाली घे. शिवाय अथर्व, केशवकाका, टफी आणि वेडीबाई यांनाही.

धन्यवाद Happy

येस Happy जमेल तसे अपडेट्स देईनच. पुढे पुढे ही मालिका भलत्याच वळणाला जाते. त्यात जादूची कवडी, चेटकीण असलं काय काय आहे म्हणे. कोणी बघायला घेतली तर भर टाकत रहा.

स्टारकास्ट मधे शर्वरी लोहोकरे, मिलिंद फाटक सारखी माणसं आहेत. अजून एक-दोन ओळखीचे चेहरे दिसले. नावं मात्र आठवली नाहीत.

मी बघते काही शॉट्स आणि एखादा एपिसोड. वाचते सवडीने. आधी लिहिते Lol

ह्यातला अंबिकाचा आत्मा फुसका वाटतो मला, मुलीला ती माया आणि इतर छळतात तेव्हा डायरेक्ट काहीच करू शकत नाही, जेव्हा तिचे बाबा तिला पॉवर देतात तेव्हा जरासे काहीतरी करू शकते. चांगल्या माणसाला उगाच मारून टाकलं असेल तर आत्म्याला एवढी power हवी की तो डायरेक्ट मारेल, उगाच हे माध्यम ते माध्यम करत खेळत बसण्यात काय अर्थ मग भूत व्हायचं कशाला.

मायाने मारलं पण कोणाच्या सांगण्यावरून, मंजिरी चांगलीच वाटतेय त्या आत्म्याला आणि ती चेटकीण आहे हे समजतच नाहीये त्या अंबिकाच्या आत्म्याला.

मनोज कोल्हटकर याना ओळखलंच नाही मी, जबरदस्त मेकअप केलाय त्यांचा.

पौर्णिमा भावे सगळीकडेच व्हिलन असते सध्या, दोन सुरू आहेत तिच्या सिरियल्स.

मी तशी उशिरा सुरू केलीय पण मला समजलेली charactors अशी आहेत. मिलिंद फाटकची दुसरी बायको शर्वरी लोहकरे तीच मंजिरी चेटकीण. त्याची बहीण पौर्णिमा भावे तळवळकर (नर्मदा), तिचा तो नवरा आणि अजित तिचा मुलगा.
अथर्व मिलिंद फटकांच्या पहिल्या बायकोचा मुलगा, मुलगी कोणाची माहिती नाही (बाबा मिलिंद फाटक पण आई नक्की कोण पहिली बायको की ही दुसरी बायको मंजिरी) म्हणजे अथर्व आणि अजित आते मामे भावंडं आहेत. अजित मामेबहिणीवर लाईन मारत असतो, वाईट वागत असतो ती अनन्या नकार देते म्हणून. मंजिरी वश करत असते सर्वांना, पण नवऱ्याचे वशीकरण मिराचे बाबा काढून टाकतात मग तिचा प्रभाव रहात नाही आणि सेन्सिबल वागतात. मिराचे बाबा चांगले योगी पण स्मशानात रहाणारे, घाणेरडे कपडे घालणारे, ते मनोज कोल्हटकर. ते तिथे का असतात माहिती नाही.

मार्जारी नावाच्या चेटकिणीला सेम पत्रिका असणारे तीन बळी हवे असतात ती मंजिरी तिला मदत करत असते. अंबिकाच्या आईचा, अंबिकाचा बळी घेतलाय, आता वेदाचा हवाय. मीरा ही अंबिकाची लहान बहीण मध्ये आल्याने बळी घेऊ शकत नाहीत असं काहीतरी आहे.

मी फार विस्कळीत लिहिलं आहे, कारण मी मीरा वेदाला पाण्यात बुडण्यापासून वाचवते, तो शॉट बघितला, मग रोज youtube वर शॉर्टस, प्रोमोज बघितले आणि मग youtube ने मला मूळ कन्नड सिरीयल शॉट्स दाखवायला सुरुवात केलं पण भाषा कळत नसल्याने त्याचा एकच शॉट बघितला Lol

मनोज कोल्हटकर >>> ओह्ह ते आहेत का? तरीच!
तो माळी झालेला माणूस पण जुन्या नाटकांमधे पाहिलाय असं वाटतंय.

बाकी कथानक जबराट आहे. फुल पोटेन्शिअल Lol
थँक्यू अन्जू! अजून लिही ना!!

मी आठवड्यातून एकदा पूर्ण एपिसोड बघते, जर प्रोमो आवडला तर. ते वशीकरण काढतात मिलिंद फाटकचं तो प्रोमो आवडलेला, त्यामुळे पूर्ण एपिसोड बघितला.

बाकी ती अंबिका अनाथआश्रमात कशी जाते, बहिणी बहिणींची लहानपणी ताटातूट कशी होते, ते काहीच माहिती नाही, घराला आग वगैरे लावते बहुतेक मंजिरी पण मी तो एपिसोड बघितला नाही.

मार्जारी झालेली म्हातारी खरोखर 70, 75 वर्षाची आहे असं परवा शर्वरीने एका मुलाखतीत सांगितलं, तो शॉट बघितला.

कवड्या तीन असतात, त्या हव्या असतात मग ती म्हातारी कायम तरुण होणार, पहिली कुठून मिळते माहिती नाही, दुसरी मीरा कडून मिळते, तिसरी मिराच्या बाबांकडे आहे.

रमड तू मस्त चिरफाड केली आहेस, तू आणि अस्मिता बघून लिहा, मस्त कॉमिक सेन्सने लिहिता येईल तुम्हाला.

ती आग लागलेली अंबिकाला बाबा सोडवायला येतात तेव्हा आठवण करून देतात असं वाटतं. ते सर्व कंटाळून मी पूर्ण बघितलं नव्हतं. अंबिकाच्या आत्म्याला एक मांत्रिक बंदिस्त करतो, बाबा सोडवायला येतात, तीन चार एपिसोडस लागले बहुतेक सोडवायला, एवढं बोअर होतं बघायला म्हणून बघितलं नव्हतं.

माया लहान असेल ना तेव्हा, की तेव्हाही आग लावण्याचे काम मंजिरीने तिलाच दिलेलं, नाही माहिती मला.

माळीकाका आहेत त्यांचं नाव आत्ता आठवत नाहीये पण ओळखीचे आहेत.

मार्जारी आणि मंजिरीचं काय नातं आहे तेही मला नाही माहिती.

मंजिरी आणि मिराचे बाबा यांचं काय कनेक्शन आहे हे ही नाही माहिती, पण ती वाईट आहे, मीरा उगाच त्या घरात जातेय असं त्यांना लांबून समजत असतं.

बरं ती मंजिरी वशीकरण, चेटूक बिटूक करणारी असते तरी तुळस तिला पूजा कशी करू देते स्वतःची, देवी वगैरे तिच्याकडून पूजा कशी स्वीकारते काही समजत नाही मला.

रमड तू नीट बघणार असशील तर माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर लिही.

सध्या अथर्व मीराचं लग्न झालंय.

येता जात समोर लागत असेल & दिसले तर समजू शकते, पण रमड युट्युब वर जाऊन बघते म्हणजे अगदीच खाजवून खरूज प्रकार Lol
लिही गं बाई लिही, असले दिव्य लोक, नाहितर आम्हाला कळणार तरी कसे! धन्य आहेस तू & फा.

अरे या सीरिअलचा धागा आला!

एक डाव भटाचा मधे जसे वडापाव खाऊन कंटाळलेल्या ममव माधव भटला वत्सला बाई व्हरायटी म्हणून चिकन खायला घालते तसे गेली काही वर्षे झी मराठी/कलर्स मराठी/सन मराठी साहित्यिक मूल्यप्रचूर गोष्टींना कंटाळलेल्या ममव प्रेक्षकांना रिमेक्स मार्फत दाक्षिणात्य आणि बंगाली भडक डेली सोप्सची चटक लावत आहेत. ही सीरियल त्या मालिकेतील मैलाचा दगड(!) आहे. त्यात अंबिकाचं काम करणारी हिरोईन कन्नडिगा स्पेशालिस्ट (जिवाची होतिया काहीली फेम). वर आलेले मार्जारी, जादूच्या कवड्या, फुसके भूत वगैरे पॉईंट्स शोरुम में इतना तो गोडाऊन में कितना छाप झलक आहे फक्त. पूर्ण सीरिअल रॉयल अ आणि अ हॉल ऑफ फेम मेंबर आहे.

वानगीदाखल परवाच मायाने तिरामिसुसाठी कॉफीत बिस्किट भिजवावे त्या थाटात विषाने बर्बन बिस्किट भिजवलं.

एपिसोड्स ७२ आणि ७३ प्लॉट हेवी आणि चांदोबा शैलीचे आहेत. उरलेले एपिसोड बव्हंशी वेडसर नपबा + चेटकीण + खाष्ट आत्या/सीमा बिस्वास काकू + वाकडी मान यांचे घरगुती उद्योग. अधून मधून स्नायपर्स, विष प्रयोग, एकमेकांच्या कानशीलात वाजवणे. बाकीचा वेळ सणासुदीच्या सुट्ट्या. तरी अजून झी वाल्यांचा भाग्यांक ३०० म्हणावा तेवढा प्रकटलेला नाही.

प्लॉट असा म्हणावा तर मार्जारीला चिरतारुण्य हवं असतं. ती निरिती नाव असलेल्या, हाडांच्या आसनावर बसलेल्या आणि कवटीदंड बाळगणार्‍या उज्ज्वला जोगची तपश्चर्या करते. उज्ज्वला जोग चिरतारुण्य देऊ शकणारी नियतीची देवी आहे पण ती स्वत: मात्र जख्ख म्हातारी आहे. ती तसे बोलूनही दाखवते - मार्जारी, अगं शक्य असूनही मला स्वत:ला वृद्धत्व पत्करावं लागलं तर तू कशी काय चिरतरुण होणार? मार्जारी म्हणते तुला जमत नसेल तर चालती हो, मी दुसरी देवी बघते. आपल्या इभ्रतीवर बेतल्याने देवी उज्ज्वला जोग उपाय सांगते की सेम कुंडली असणार्‍या आई/मुलगी/नात असे तीन बळी दिले तर तू चिरतरुण होशील.
त्या तीन दिव्य कवड्या उज्ज्वला जोगच्या असतात. त्या कवड्यांमुळे ती अमर असते. मार्जारी त्यातली एक कवडी चोरते आणि म्हणते की तुझा उपाय खरा कशावरुन? पुन्हा अशा तीन जणी मिळेपर्यंत मी जिवंत कशी राहणार? तरी हा उपाय साधत नाही तोवर या तीन कवड्या मी माझ्याकडे ठेवणार. मूर्खशिरोमणी! जोगदेवी भडकून शापवाणी उच्चारतात की आता नुसते बळी उपयोगाचे नाहीत. प्रत्येक वेळी कवडीत आत्मा कैद करून जोगदेवींना द्यायचा. तसेच मार्जारी आता तीन बळी देईपर्यंत म्हातारी होत जाणार. आणि तिचा शेवट एक मनुष्य आणि एक आत्मा मिळून करतील. ते कोण असतील ते जोगदेवी तिला १७० वर्षानंतर सांगतील. असा नॉनसेन्स शाप देऊन त्या निघून जातात. वर्तमानात या लोकांचे जे काही वात्रट प्रताप चालू आहेत त्याची ही अशी कूळकथा.

खरंतर डेली सोपला एवढा प्लॉट लागत नाही, एक केपेबल नपबा असली की कशीही वर्षानुवर्षे सीरिअल खेचता येते. इथे भरभरुन प्लॉट दिल्याने प्रेक्षकावर प्लॉटचे गहिरे पाणी ओतले आहे. एपिसोडवाईज/सीनवाईज बघितली तर खूऽऽऽऽऽपच डिटेल्स आहेत, जमेल तसे लिहीन.

आता जामच म्हणजे फारच उत्सुकता वाढली आहे Lol

टेक्निकली माया आत्ता पहिल्या एपिसोडात नपबा नाहीये. पण नंतर होत असेल हे बरोबर.

ती मार्जारी चेटकीण पाहिली परवा. ती तरंगत असताना तिच्या पदराचं का शालीचं टोक असं मागे वरती कशालातरी बांधून का ठेवलं आहे? बालनाट्यासारखा इफेक्ट वाटतोय तो. शिवाय ते टोक अधूनमधून हलवतंय पण कोणीतरी मागून. बुडत्याला काडीचा तसा उडत्याला शालीचा आधार की काय? Proud

नपबा म्हणजे काय.

अंबिकाला आग मायाने लावलेली असते, खून केलेला असतो पण मंजिरीच्या सांगण्यावरून असं बघितलं होतं.

असं होय Lol .काय माहिती पण तो दहन सीन बघताना, ती म्हणत असते अथर्ववर प्रेम आहे तिचं.

पायस, नर्मदा काकू नाहीये ना, आत्या आहे ना अथर्वची, दादासाहेबांची बहीण आहेना आणि अजित आतेभाऊ आहेना.

हो खूपच प्रेम आहे, मंजिरीने सांगितलं म्हणून अथर्वचा खून करायला निघालेली, सुपारी दिलेली, वटपौर्णिमेच्या दिवशी, अंबिका भुताने वाचवलं त्याला Lol

तेवढं एक चांगले काम करता आलं एरवी फुसक्या असणाऱ्या भुताला.

हो, नर्मदा आत्या आहे. मला काकू म्हणजे सीमा बिस्वास काकू उर्फ शैलजा काकू म्हणायचं होतं.

अजून मार्जारी आणि मंजिरीचा काय संबंध आहे क्लिअर नाही केलेलं. पण हिंट्स सोडल्यात. एपिसोड २ मध्ये जेव्हा मीराचे बाबा इंट्रोड्युस केलेत तेव्हा ते "द्रोह गुरुशी" म्हणतात. सो एक शक्यता अशी आहे की एकेकाळी मंजिरी आणि शिवनाथ (मीराचे बाबा) एकत्र विद्या शिकत असतील. मंजिरीला काहीतरी आमिष दाखवून फितवलं असेल आणि तिने काळी जादू शिकण्यासाठी या लोकांना धोका दिला असेल. ही एक थिअरी. लेखकाने अशा अजून दोन थिअरी मांडता येतील एवढ्या हिंट्स सोडल्या आहेत. कोण कलाकार किती दिवस टिकतो आहे त्यावर ते ठरवतील कोणती थिअरी अ‍ॅक्चुअली दाखवायची.

तेवढं एक चांगले काम करता आलं एरवी फुसक्या असणाऱ्या भुताला >> Lol भूत म्हणून अंबिका टोटल फेल्युअर आहे.

बुडत्याला काडीचा तसा उडत्याला शालीचा आधार की काय? >> Lol

तिनेच अंबिकाला मारलं असेल तर ती आधीपासूनच नपबा आहे म्हणायची >> मंजिरीच्या संमोहनाचा प्लॉटपॉईंट नसता तर अगदीच टेक्स्टबुक नपबा आहे ती.

मस्त थियरी मांडलीत पायस.

शैलजा काकू म्हणजे मंजिरीची का, तिचाही छळतानाचा शॉट बघितला. मी पहिल्यापासून नाही बघितली, मंजिरी वेदाला बुडताना वाचवते तो शॉट बघून मी प्रोमोज आणि शॉर्टस बघते youtube वर. मधेच एखादा एपिसोड. अथर्वला मारणार असतात, तो प्रोमो बघून फुल एपिसोड बघितलेला. दादासाहेबांच्या आणि मीराच्या बाबांचा शॉट बघून तो एपिसोड बघितला.

मार्जारीच्या हातातले बाहुले मंजिरी, मंजिरीच्या माया. फक्त मायाला चेटूक, जादू वगैरे येत नाही.

माया एकाच typeची acting करते, एकसुरी, जाम बोअर.

Btw रामपूरे यांच्या घरी नोकरांनाही कट कारस्थान काम असतं, बाकी काही करायचं नसतं बहुतेक. केर काढायला केरसुणी नसेलच, मोठ्या मालकीणबाई उर्फ मंजिरीसाहेब आपल्या पदराने आख्खा बंगला झाडून पुसून काढतात.

स्वयंपाकाला एक ताई आणि मीरा आहे.

त्या मार्जारीचं शूटिंग कसं, कुठे होतं, त्या एजेड कलाकार आहेत आणि पेहराव काय असतो अशी सर्व माहिती सांगणारी शर्वरी लोहकरेची मुलाखत घेतली आहे एकीने, तो व्हिडीओ मिळाला तर शेअर करेन इथे.

मंजिरी, मीराच्या बाबांकडे कसलीशी विद्या शिकण्यासाठी आली होती व तेव्हा ती त्यांचे घर जाळते ज्यात मीराची आई जळून मरते , मंजिरी राधा (अंबिका ) ला सोबत घेऊन जाते तिची आठवण पुसून टाकते व तिला आपल्या अनाथ आश्रमात ठेवते तिथे तिचे पालन पोषण करते आश्रमात तिला माया भेटते जी तिच्यासोबत मोठी होते . मोठेपणी अथर्व अंबिका (राधा) सोबत लग्न करतो घरी एकदम फील गुड वातावरण पण माया काहीतरी बहाण्याने अंबिकाला आऊट हाऊस मध्ये बोलावून आगीत जाळून मारते स्पेशली तिच्या डोक्यात काठीने वार करते. अश्याप्रकारे मंजिरीचे दोन बळी पूर्ण झालेत पण आता वेदा बाकी आहे पण बहुदा मीरा तिसरी बळी असणार हे अजून मंजिरीला कळलेले नाही .

माया चा मेकअप आवडतो तिच्या साड्या ह्या बहुदा रेडी तो वेअर वाल्या आहेत छान आहेत . तिला सूट होतात . आम्हाला त्या दोन हिरवीणीपेक्षा माया आवडते (दिसण्यात)

धन्यवाद अजनबी. काही प्रश्नांची उत्तरं मिळाली.

तसं कोणीच आवडत नाही फिमेल chara मला यात, अनन्या आणि वेदा सोडून. अथर्व, त्याचे बाबा आणि मिराचे बाबा आवडतात.

मायाची डार्क लिपस्टिक अति वाटते आणि एकसुरी वेडसर अभिनय वाटतो. मीरा एकतर मूर्ख किंवा आगाऊ वाटते. भुताला काही powerच नाही.

धन्यवाद अजनबी Happy

अन्जू - शैलजा काकू म्हणजे मीराची काकू. वर मेन पोस्टीत rmd ने जिच्या अंगात सीमा बिस्वास संचारते लिहिलं आहे ते पात्र.

हो हो आलं लक्षात, मीच जरा उशिरा शॉर्ट व्हिडीओज बघायला घेतल्याने त्या कजाग काकूचं लक्षात नाही आलं.

धागा काढल्याबद्दल आभार Happy

पायस म्हणतो तशा या मालिका मूळच्या नॉर्थ/बंगाली असल्याने देवी माँ चे देवीआई होत असावे मराठीत. स्टार प्रवाह वरच्या एक दोन मालिकांमधेही मी ऐकले.

हा सग्ग्ळं सग्ग्ळं बोलतो >>>
याचं मराठी फार कष्टाने उच्चारलेलं आहे >>>
यू कॅन टेक म आऊट ऑफ मव बट यू कॅन नॉट टेक मव आऊट ऑफ म >>> Lol

का तर म्हणे त्याने चित्रात तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दाखवलेलं. अरे मग ते दाखव असं सांगायचं की सरळ! पण तसं नाही. >>> Lol आणि ते चित्र असे आहे की तिच्या गळ्यात वरून फोटोशॉप केल्यासारखे ते मंगळसूत्र सहज अ‍ॅड करता येईल एखाद्या चित्रकाराला.

माया ही स्लीवलेसबाई आहे अशी मला शंका आलीच होती. तिच्या एन्ट्रीला उगाच शंका नको म्हणून तिला स्लीवलेसच दाखवली आहे.

शाळेत पण वॉकमन घेऊन जाते >>> ते कॉव्हेण्ट दिसत आहे. कारण तेथे नन वगैरे आहेत. मी म्यूट करून पाहिले पण तेथे ती नन व टीचर इंग्रजी बोलत असावेत. कारण अचानक सबटायटल्स आले. "शिक्षक कोणत्याही विशिष्ट मुलासाठी उदार राहू शकत नाहीत" असे मराठीसारखे वाटणारे भाषांतरित वाक्य यात आले. मुलासाठी उदार म्हणजे काय? आणि "विशिष्ठ" असते वगैरे तर सोडाच. हिंदीतून भाषांतरित केलेल्या सिरीयलसाठी इंग्रजीतील संवाद भाषांतरित केले आहेत सबटायटल्स मधे.

पण एका नन पेक्षा साधी टीचर जास्त दयाळू आहे हे पाहून सर्व बॉलीवूड नन्स डिसअ‍ॅप्रूवल ने मान हलवतील. त्यात ती मुलगी शाळेच्या आवारात वॉकमन घेउन येते व कोणाशी मिळून मिसळून राहात नाही याचा "गांभीर्याने" काय विचार करणार? यांना त्यात इंटरेस्ट असता तर या संवादाची गरजच लागली नसती.

'I know what you did last summer' वालं लूक देतो >>> Lol मी तो पिक्चर पाहिलेला नाही पण ऐकले आहे त्यावरून हे परफेक्ट वाटते Happy

त्या मीराचे काका गरीब बापाच्या रोलमधे टाइपकास्ट झालेत. साधी माणसंमधेही तशाच रोल मधे आहेत. अशा सिरीयल्स मधे कोणत्याही चालू प्रसंगात काहीही करू न शकणारा एक गरीब बिचारा बाप असतो तसा रोल. काही पैशाने गरीब, पण सगळेच स्वभावाने गरीब.

बाहेर अथर्व आलाय हे त्याच्या आईला आत "शाखा-हेलिकॉप्टर" लॉजिकने समजते बहुतेक. पण त्या पिक्चर मधे ही पॉवर फक्त थोरल्या मुलाकरता चालते. मॉलमधे धाकटा जवळ असला तरी तिला पत्ता नसतो. या सिरीज मधे बघू आई कडे तितकीच पॉवर आहे, की जास्त.

या सिरीजमधे सर्वांचे कॉस्च्युम "शाल-बेस्ड" आहेत. देवळातील पुजारी असो, घरातील ज्येष्ठ व्यक्ती असो किंवा इतर कोणी. सर्वांच्या अंगावर उत्तरीय/उपरणे किंवा तत्सम काहीतरी आहे.

अ‍ॅक्टर लोकांचे सोडा, यात फॅक्टरीही "एण्ट्री" मारते. वरून सर्रकन कॅमेरा पॅन वगैरे होत फॅक्टरीचा एण्ट्रन्स आपल्याला दाखवतो. तो फीडिंग वाला नाट्यमय प्रसंग घडत असताना, त्यानंतरचे संवाद सुरू होत असताना फॅक्टरीतील सर्व कामगारवर्ग काम सोडून प्रेक्षकाची भूमिका बजावत आहेत. या रेटने यांचे उत्पादन काय होत असेल बघायला पाहिजे.

आत्ता चक्क मी लेटेस्ट एपिसोड पूर्ण बघितला. ईला भाटेची एंट्री झालेली आहे. ही अथर्वची अजून एक आत्या असावी. दादा दादा करते येते घरात पण positive असावी. थोड्या वेळासाठी आलेली असावी.

भूताला कमीतकमी अथर्वच्या स्वप्नात जाऊन मायाबद्दल सांगता येत नाही का, अगदीच पॉवरहीन. त्या मीरालाच जपायला लागतंय वेदाला आणि अंबिका भूताला. उगाच अधूनमधून अंबिकाला डायलॉगज मी तुला जपणार आहे, मी तुम्हा दोघींना जपणार आहे.

लहानपणी भूताच्या गोष्टी ऐकताना आणि भुताचे पिक्चर बघताना मजा यायची. यात काही मजाच येत नाही.

तुम्हा सगळ्यांच्या मानाने मी खूपच संथपणे ही मालिका बघते आहे Proud

काल दुसरा एपिसोड पाहिला. आईचा खाली पडलेला फोटो पाहून वेदा फिशटँकमधल्या गोल्डफिशसारखे तोंड करून रडते आहे. छोटी मुलगी आहे बिचारी. आपण तिला नावं नको ठेवूया. फ्रेम अथर्वच्या खांद्याला लागून खाली पडल्यामुळे मायाबाई तिथल्या तिथे त्याचा सदरा काढून त्याला पेंटिंग केल्यागत मलम लावत आहेत. अंबिकाचा पडलेला फोटो घेऊन नोकर चाललेत. फोटोमधे दाराला लावलेले कस्लेतरी जाड दोरखंड अडकतात. ते दिक्बंधन आहे असं आपल्याला समजतं. मधेच आता 'भुलभुलैय्या' सुरू झालेला आहे. ते दिक्बंधन तुटले तर संकटं येतील म्हणे. मीरा बाहेर गेल्यावर माळीबुवा पुन्हा तिला IKWYDLS वालं लूक देतात. मीरा दुर्लक्ष करून चालत जाते. घरासमोर मोठ्ठी रांगोळी काढलीये. त्यावर थुकते. मग त्या रांगोळीवरून चालत जाते. रांगोळी काढलेलं (बहुधा लाकडी) पॅनल तिथे ठेवलेलं आपल्याला ती त्यावरून चालत जाताना दिसतं. असा गरीबपणा का करावा? कोणाकडून तरी फरशीवर काढून घ्यायची रांगोळी. रामपुरेंचं 'बडा घर पोकळ रांगोळी पॅनल' दिसतंय.

इकडे मीरा तिच्या बाबांना भाकरी देते. गावकर्‍यांनी मारलेल्या दगडाने तिला जखम झाली आहे त्यावर बाबा कसलातरी मंत्र म्हणून कंबरमोडीचा पाला लावतात. मधेच ते अचानक 'श्राद्ध आहे' असं म्हणतात. मीरा म्हणते मला तुम्ही केलेलं कर्ज फेडण्यासाठी शहरात जाऊन पैसे कमवायचेत. ते म्हणतात कवडीला विचार. तर कवडी 'नाही' म्हणते असं आपल्याला समजतं. मीरा रागाने एक कवडी जमिनीवर टाकते. त्यात एलईडी लावल्यागत ती उजळते. बाबा कवडी तिला परत देतात आणि म्हणतात 'ती येणार'. मीरा म्हणते ताईचं काय झालं? बाबांच्या डोळ्यात आगीचं रिफ्लेक्शन दिसतं. बाबांना पूर्वीची एक आग आठवते जिथे खूप किंकाळ्या ऐकू येतात आणि बाबा आगीच्या रिंगणात उभे असतात. बाबा अचानक म्हणतात 'गुरूद्रोह!'. आपण एव्हानापर्यंत भंजाळलेले असतो. नुसतेच क्लूज पण कोडंच नाही अशी आपली गत होते.

इकडे वेदा तेच रटाळ गाणं ऐकत झोपते. अथर्व तिचं स्केचबुक पाहतो. त्यात एक आगीत जळणारी बाई असते आणि लिहिलेलं असतं my father killed my mother. यावेळी अथर्वला आग आठवते. तश्याच किंकाळ्या. तो आणि वेदा आगीच्या रिंगणात उभे राहून आग बघत असतात. ही आगीची रिंगणं कुठून येतायत?

इकडे माया अंबिकाचा तो मोठा फोटो रॉकेल टकून जाळतेय. हे लोकेशन अथर्वच्या घरासारखंच वाटतंय. कारंजं सेम आहे. मग ही काय त्यांच्याच अंगणात जाळपोळ करतेय? आणि ते लास्ट समरवाले माळीबुवा कुठे गेले? मीरा म्हणते की अंबिका तू माझ्यापासून अथर्वला हिरावून घेतलं म्हणून मी तुला जिवंत जाळलं. आता माझं त्याच्याशी लग्न झालं की मी वेदाला पण तुझ्याकडे पाठवेन.

आता मीराला स्वप्नात एक बाई जळताना दिसते. सीजिआय पोपट तिथेच असतो. हा काय झोपत नाही का? तो म्हणतो तू तुझे प्रश्न देवळातल्या कुंडाला विचार. म्हणजे अजून एक जादू बघायला मिळणार. 'कुलवधू' मालिकेत त्या बहिणी घरासमोरच्या तळ्याला 'तळोबा' म्हणत असतात आणि त्याच्याशी बोलत असतात तसा काही प्रकार इथे आहे की काय?

मंजिरी म्हणजेच अथर्वची सावत्र आई अंबाड्यावर गजरा माळून नटते. अथर्वचे बाबा लाडात येतात. मंजिरीच्या डोळ्यातून किरण बाहेर पडतात आणि बाबांचे डोळे पांढरे होतात - म्हणजे लिटरली पांढरे होतात Proud आणि ते तिला तुम्ही जाऊ शकता असं म्हणतात. मंजिरी घराबाहेर येते. आकाशातला पूर्णचंद्र पाहते आणि सट्कन अंबाडा सोडून गजरा फेकून देते. मग इतका वेळ कशाला घालवला मगाशी? दोन पावलं चालल्यागत करून ती थेट एका जळक्या घराशी येते. दाराची काच डिट्टो ओम शांती ओम सारखी तडकलेली असते. आतल्या खोलीतून लाल उजेड येतोय. मंजिरी तिथे जाते. आत एक गुहासदृश प्रकार आहे. त्यात एक म्हातारी जीर्ण लाल फडकी नेसून तरंगते आहे. तिची नखं चेटकीणीसारखी लांब आहेत. अधूनमधून 'आह' असे उसासे सोडत बाकीचा वेळ म्हातारी उगाच जुन्या सिनेमातल्या व्हिलनसारखी हसतेय. तिच्या पदराचं टोक मागून कुठेतरी अडकवून ठेवलंय. हाच तो बालनाट्य इफेक्ट! श्राद्धाच्या विधीमधे चूक केलीस तर तुला सोडणार नाही असं म्हातारी आधी एक श्लोक म्हणून आणि मग त्याचं ट्रान्सलेशन करून मंजिरीला सांगते.

इतक्या आगी आणि इतकी जळकी घरं कुठून येत असतात? म्हातारीचा पदर मागे लपून कोणी धरून ठेवलेला असतो? जानने के लिए देखते रहिए...

Pages