तेलंगाणा पाककृती: कद्दूची खीर

Submitted by वामन राव on 23 June, 2025 - 12:12
तेलंगणा कद्दूची खीर
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेलुगु खाद्यसंस्कृती म्हटलं की डोळ्यांसमोर आधी मसालेदार पदार्थ येतात; पण या खाद्यसंस्कृतीत गोडाचेही अनेक अप्रतिम प्रकार आहेत. त्यातले काही तर फारच लोकप्रिय आहेत.

तेलंगाणातील पारंपरिक कद्दूची खीर हाही असाच एक खास पदार्थ! दूध, कद्दूचे मधुर मिश्रण आणि त्यावर सुकामेव्याची सजावट… विशेष प्रसंगी बनवली जाणारी ही खीर चवीला गोड आणि दिसायलाही देखणी असते!

चला तर मग, करायला सोपी आणि सर्वांच्या आवडेल अशी ही कद्दूची खीर करून पाहूया.

साहित्य:

  • कद्दू बारीक किसून: अंदाजे २०० ग्राम
  • साबुदाणा: २५ ग्राम
  • दूध: १ लिटर
  • साखर: १०० ग्राम
  • सुकामेवा (बदाम, काजू, पिस्ता) - जाडीभरडी पूड करून: पन्नास ग्राम
  • सुकामेवा (बदाम, काजू, पिस्ता) - सजावटीसाठी पातळ काप करून: पन्नास ग्राम
  • चेरी - सजावटीसाठी पातळ काप करून: तीन-चार
  • इलायची (बारीक पूड करून): पाच-सात नग
  • केशर: आठ-दहा काड्या
  • कंडेन्स्ड मिल्क (मिठाई मेट): ५० ग्राम
  • कस्टर्ड पावडर: दीड-दोन चमचे
  • पाणी: अंदाजे अर्धा लिटर (पाच-सहा वाट्या)

ऐच्छिक:

  • खवा: १०० ग्राम
  • टरबूज-खरबूज बिया - सजावटीसाठी: दहा ग्राम
  • चारोळी - सजावटीसाठी: दहा ग्राम
  • हिरवा रंग: तीन-चार थेंब

साहित्य १साहित्य २

त्या वरच्या फोटोत साखर ठेवायची राहिली होती!

साहित्य ३

क्रमवार पाककृती: 

साबुदाणा दोन-तीन वाट्या पाणी घालून भिजायला ठेवा.कद्दूची साल काढून, तुकडे करून आतील गर काढून टाका. बारीक किसून घ्या.

एकीकडे एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत मंद आचेवर दूध तापवायला ठेवा. अधूनमधून हलवत रहा. शक्यतो साय धरायला नको हे पहा. दुधाला उकळी येईपर्यंत पुढची कृती करा.

दुसरीकडे पातेल्यात दोन वाट्या पाणी घालून कद्दू कीस शिजवायला ठेवा. अधूनमधून हलवत रहा. वीस मिनिटांत शिजून तयार होईल. बाजूला काढून ठेवा. अजून एका पातेल्यात तासभर भिजलेला साबुदाणा शिजवायला ठेवा. पंधरा-वीस मिनिटांत शिजून तयार होईल. बाजूला काढून ठेवा.

या तिन्ही क्रिया एकाच वेळी केल्यास वेळ वाचेल.

आता खीर करायला घ्या. दूध उकळत असेल. उकळत्या दुधात इलायची पूड व साखर घाला. पुन्हा उकळी येऊ लागल्यानंतर शिजलेला कद्दू कीस त्यातील शिल्लक पाण्यासहीत घाला. शिजलेला साबुदाणा घाला. हलवून घ्या. सुकामेव्याची पूड घाला. खिरीला घट्टपणा हवा असेल तर खवा बारीक फोडून घाला. नीट हलवून घ्या. पाच मिनिटे शिजू द्या.

कस्टर्ड पावडर वाटीभर पाण्यात कालवून घ्या. खीर ढवळत हळूहळू घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. आवडत असल्यास हिरवा रंग घाला व नीट हलवून घ्या. गॅस बंद करा. आता कंडेन्स्ड मिल्क घाला व एकसारखे करून घ्या. कक्ष तापमानाला आल्यावर फ्रिजमध्ये ठेवा.

चेरी व सुकामेव्याचे काप आणि आवडत असल्यास चारोळी, टरबूज-खरबूज बिया इ घालून, सुबक सजावट करून वाढा.

घ्या खीर

अधिक टिपा: 
  • दूध हे फुल क्रीम / फुल फॅट घ्यावे, टोन्ड दूध शक्यतो घेऊ नये.
  • कंडेन्स्ड मिल्क मध्ये साखर असते त्यानुसार साखर मर्यादित प्रमाणात घालावी.
  • खीर थंड करूनच वाढायला हवी. त्यामुळे वाढायच्या आधी किमान पाच-सहा तास किंवा आदल्या दिवशी करून ठेवावी.
  • फोटोत दिसणारा कद्दू एक किलोचा आहे. मी त्याचा एक तृतीयांश घेतला होता. बिया वगैरे काढून अंदाजे दोनशे ग्राम कीस झाला.
  • खीर करण्यासाठी ही डेगची वापरली होती -

खीर करण्याची डेगची

मायबोलीकरांसाठी तेलंगाणाची लोकप्रिय कद्दूची खीर तयार आहे!

घ्या खीर

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण, चर्चा, अनुभव
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकृ आणि फोटो छान आहेत.

पण ह्या पाकृ इथे मायबोलीवर लिहिताना तुम्ही घटकपदार्थांची नावे मराठीत लिहित जाल का?
कद्दू साठी लालभोपळा हा नेहमी वापरला जाणारा मराठी शब्द आहे. दुसर्‍या एका पाकृमध्ये "अद्रक" दिसलं. त्यालाही आलं असं म्हणतात.
बाकी भाषेत बोलताना मराठी शब्दांची अशी भेसळ करतात / चालते का?

हो, कद्दू म्हणजे लाल भोपळा ना? दुध्याला लौकी म्हणतात ना? की तेलंगणात वेगळी नावं आहेत?

मला ममव दुध्याची खीर माहीत आहे, हा फारच शाही प्रकार दिसतो आहे - खवा, कन्डेन्स्ड मिल्क, कस्टर्ड पावडर, आणि साबुदाणापण! त्रेस लेचेस खीर आहे. Happy

साध्या दुध्याचे किती लाड केलेत ! Happy अर्थात चांगलीच लागत असणार खीर.
पग्या, मराठीत इतर भाषेची भेसळ असे वाटले तरी महाराष्ट्राच्या इतर भागात पदार्थांना वेगळी नावे असतात बोली भाषेतली ( उदा. विदर्भात अद्रक, सांबार, कलमी वगैरे शब्द बोली भाषेत सर्रास वापरले जातात ) तसा तेलंगण्यात कद्दू ची खीर म्हणत असू शकतील.

तेलंगणात लाल भोपळ्याला काय म्हणतात??

फोटो झक्कास आले आहेत. ही खीर जरा घट्ट असते काय? कस्टर्ड घालुन शिजवल्यावर घट्ट होईल असे वाटतेय.

मी करुन बघेन. कद्दुचा दालचा खुपच आवडलाय.

कंडेन्स्ड मिल्क नाही घातले तर चालेल?

खिरीबरोबर तिखट द्यायची कल्पना मस्तच.. Happy

आहे छान रेसिपी. कोणत्याही प्रकारच्या खिरी मला आवडतात.
पण यात दुधीची अशी स्वतःची कितपत चव लागेल अंदाज येत नाहीये. दुधी साबुदाणा इंट्रेस्टींग काँबो. Happy

>>> कलमी म्हणजे दालचिनी
ओह ओके, धन्यवाद. Happy

>>> असो विषयांतर झाले
ते पैल्याच अभिप्रायात झाले ना. Proud Light 1

व्यक्तिश: मला आवडतात बोली लहजे वाचायला. (खेरीज घ्यायचाच आक्षेप तर कन्डेन्स्ड मिल्क, कस्टर्ड पावडर इत्यादींनाही घ्यायला हवा मग. Proud )

बाकी हलवा किंवा ममव खिरीसाठी तुपावर परतून अंगच्याच रसात शिजवून घेतात ना दुध्याचा कीस? पाण्यात घालून शिजवायचा हे निराळं वाटलं.

स्वाती, मी दुधी हलवा करते तेव्हा पाण्यात शिजवून घेऊन निथळून घेते आणि मग तुपावर परतते. त्याने रंग काळा पडत नाही.

ओह मी कच्चा कीस पाण्यात घालते, पण मग निथळून परतते. पाण्यात शिजवत नाही.
(बटाटा, रताळं वगैरेंच्या फोडी/कीस शिजवण्याआधी पाण्यात घालतो तसं.)

कंडेन्स्ड मिल्क आणि खवा आणि कस्टर्ड पावडर पण..वरून त्यात भिजलेला शिजलेला साबुदाणा!
खूपच घट्ट प्रकरण होत असणार. आणि दुध्याचे स्वत्व काय राहिले त्यात?
मला आपली ममव सरसरीत खीरच आवडते.
Happy
पण तुमचे प्रेझेंटेशन एकदम एकदम नंबर!

झकास रेसिपी. एकदम शाही

फोटो = 👌

साबुदाणा टाकल्याने स्लायमी नाही होत का ?

मस्त रेसिपी आणि प्रेझेंटेशन..... साध्या दुधी भोपळ्याचे खूपच लाड केलेत . छानच लागणार खीर !!!
साबुदाण्याचे प्रयोजन सांगाल का ?

साबुदाणा शिजला तरी लगदा होत नाही. खाताना गोल दाणे दाताखाली येऊन मजा येते खायला. कोकणात मनगणां म्हणुन चणा डाळ + साबु खीर करतात ती मस्त लागते. एक केरळी पायसम आहे, सेम मनगण्याचाच अवतार त्यातही साबुदाणा असतो. तीही सुरेख लागते. एकदा करुन बघाच. Happy

वरच्या रेसिपीत खवा, कस्टर्ड, क. मि. हे आयदर ऑर कॅटेगरीत हवेत हेमावैम. कारण हे तिन्ही एकत्र वापरले तर खीर थंड झाल्यावर हलवा होईल.

सर्व वाचकांचे आणि व्यक्त-अव्यक्त प्रतिसादकांचे आभार.

>>> पाकृ आणि फोटो छान आहेत.
पण ह्या पाकृ इथे मायबोलीवर लिहिताना तुम्ही घटकपदार्थांची नावे मराठीत लिहित जाल का?

धन्स्! विनंतीचा आदर आहे.

>>> मराठीत इतर भाषेची भेसळ असे वाटले तरी महाराष्ट्राच्या इतर भागात पदार्थांना वेगळी नावे असतात

>>> घ्यायचाच आक्षेप तर कन्डेन्स्ड मिल्क, कस्टर्ड पावडर इत्यादींनाही घ्यायला हवा मग

शतशः धन्स्! Happy

>>> कद्दू म्हणजे लाल भोपळा ना? दुध्याला लौकी म्हणतात ना? की तेलंगणात वेगळी नावं आहेत?

वरील साहित्याच्या फोटोत दिसणारी हिरवट लांबट फळभाजी, तिला मराठवाड्यात, तेलंगाणात कद्दू म्हणतात. उत्तर भारतात बहुधा लौकी म्हणतात. लाल भोपळा वेगळा.

---

कद्दू, अद्रक हे शब्द मराठवाडा, विदर्भ इ प्रांतांत मराठीत बोलताना वापरले जातात. आम्ही बालपणापासून घरी, शाळेत, बाजारात इ. ठिकाणी हे शब्द ऐकलेले आहेत, बोललेले आहेत.

तरीही, यापुढे लिहिताना, मायबोलीवरच्या भाषाशैलीचा विचार करीन. Light 1

स्पष्टीकरण म्हणून कद्दू का दालचा या धाग्यावर एक प्रतिसाद लिहिलाय; मूळ धाग्यातही योग्य तो बदल करीन.

---

>>> लेखक चिडणार आहेत आता. मायबोलीवर हे असंच असतं हो, वामन राव.

चिडणार नाही हं, जालावर वावरताना चालायचंच, नाही का? Happy

कंडेन्स्ड मिल्क, कस्टर्ड पावडर, खावा, साबुदाणा यांबद्धलचे प्रतीसाद -

हं बरोबर आहे. शेवयाच्या खिरीत दुधाची जी चव प्रामुख्याने असते त्यापेक्षा या खिरीची चव निराळी असते, शाही लागते. तथापि आवडीप्रमाणे घटक कमी जास्त करता येतील.

मला स्वतःला पाककलेची आवड आहे. त्यामुळे त्यासंबंधित निरीक्षण, प्रयोग, परीक्षण वेळ मिळेल तसे सुरु असतात. आमच्या सोसाइटीत रामनवमी, गणेशोत्सव, नवरात्र, ३१ डिसेंबर वगैरे प्रसंगी सर्वांना जेवण (मराठवाडी शब्दात चूलबंद आवताण!) असते. त्यावेळी वर्षातून एकदातरी गोडाचा प्रकार म्हणून ही दुधी भोपळ्याची खीर होतेच. स्वयंपाकी बहुधा नेहमीचेच असतात. ते नेहमीच वरील सर्व घटक खिरीत वापरतात आणि खीर अगदी मधुर-मुलायम होते. सर्वांना आवडते.

ममव दुध्याची खीर == जीरा राईस
ही दुधी भोपळ्याची खीर == हैद्राबादी वेज बिर्याणी

अशी काहीशी तुलना करता येईल.

>>> साबुदाण्याचे प्रयोजन सांगाल का ?

खाताना गोल दाणे दाताखाली येऊन मजा येते खायला. (कॉपी कॅट Biggrin )

>>>एक केरळी पायसम आहे, सेम मनगण्याचाच अवतार त्यातही साबुदाणा असतो. तीही सुरेख लागते. एकदा करुन बघाच.

चणाडाळीचा हयग्रीव नावाचा एक कन्नड पदार्थ (पुरणाची खीर असे समजा) असतो. पण त्यात साबुदाणा नसतो. मनगणा नक्की करून बघीन.

>>> खिरीबरोबर तिखट द्यायची कल्पना मस्तच..

हा प्रकार नांदेडच्या काही रेस्टॉरंटांत असायचा. मिठाई मागवली तर सोबत थोडेसे सॅम्पल म्हणून खारा द्यायचे. आम्हीही तसेच करतो. कद्दू खीर, बासुंदी, कुबानी का मीठा वगैरे पाहुण्यांना दिले की सोबत थोडासा चिवडा देतो.

बोनस रेसिपी:

इथे सांगितले होते त्या प्रमाणे कद्दूच्या मधला गर, किसाचा जाडसर राहिलेला भाग, आठ-दहा हिरव्या मिरच्या, पाच-सात पाकळ्या लसूण, तेल, मीठ, जिरे यांचा झणझणीत ठेचा करता येईल.

कद्दूचा ठेचा

हो तो ठेचाही करुन पाहायचाय. आता दुधी आणेन तेव्हा (परत एकदा) कद्दु दालचा व खीर करेन. तेव्हा ठेच्याचाही नंबर लागेल.

जबरदस्त प्रेझेंटेशन.

वरची चटणीही (ठेचा) मस्त. आमच्याकडे दुधीच्या सालीची चटणी करतात. पण त्याआधी फोडणीवर परतून खरपूस करते, दाणे, मिरच्या, कढीलिंब, तीळ, सुकं खोबरं किस, कोथिंबीर घालते त्यात. कधी कधी ती मिक्सरला न लावता अशीच फस्त होते, तीच जास्त छान लागते. सेम पडवळ बिया, लाल भोपळा साल, फ्लॉवर कोवळे दांडे, कलींगड साल ह्याची करता येते.

साबुदाणा आणि दुधीची खीर? इंटरेस्टिंग! Happy साबुदाणा खीर्/लापशी आवडीची.
दुधीचा फक्त हलवा खाल्ला आहे गोडात. तो प्रचंड आवडतो. खीर करून पहायला हवी आता.

तसा तेलंगण्यात कद्दू ची खीर म्हणत असू शकतील. >>>> ही तेलंगणाबोली आहे का ? Wink

कन्डेन्स्ड मिल्क, कस्टर्ड पावडर >>>> हे पदार्थ ऐकले आहेत तेव्हापासून ह्याच नावाने ऐकले आहेत. कदाचित भारतात वापरायला सुरुवात झाली तेव्हा पासून कस्टर्ड पावडरला कस्टर्ड पावडरच म्हणतात म्हणत असावेत. त्यामुळे त्यांच्यावर माझातरी आक्षेप नाही.

हे सगळं दुधी भोपळ्याबद्दल चाललय हे आत्ता प्रतिसाद वाचून कळलं. बघा, कद्दू न समजल्याने मी लाल भोपळ्याची खीर केली असती ! म्हणून मराठीत लिहायचं. Wink

लौकी म्हणजे दुधी आणि कद्दू म्हणजे लाल भोपळा असं माझ्याकडून घटवून घेतलं गेलंय काही दिवसांपूर्वी, आणि आता इथे येऊन बघते तर तसं नाही. मग नक्की काय?
खीर छान दिसतेय. आयती मिळायला हवी.

पाकक्रुती आणी फोटो नेहमिप्रमाणेच उत्तम.
हिरवट लांबट फळभाजी, तिला मराठवाड्यात, तेलंगाणात कद्दू म्हणतात.>>> मग लाल भोपऴ्याला काय म्हणतात?
आमच्याकदे साबा नागपुरच्या त्या लाल भोपळ्याला गन्गाफळ म्हणत आणी कोहळ्याला (व्हाइट पम्पकिन) भुर-कोवळा.
दुधीला मात्र दुधीच.

प्रांतानुसार बोलीभाषा बदलते, पदार्थांची नावे बदलतात. खाद्यसंस्कृती बदलते. प्रांतिक वैशिष्ट्ये टिकून राहायला हवी असतील तर ते आवश्यक ही आहे. उदा. कोकणात तांदुळाच्या पीठाची ताकातली उकड करतात , देशावर त्यासाठी ज्वारीचं पीठ वापरतात. कोकणात चिमटा, सांडाशिला गावी म्हणतात, विदर्भात कोथिंबिरीला सांबार म्हणतात. तर साखि ला साबुदाण्याची उसळ म्हणतात. असो.
त्यांनी साहित्याच्या फोटोमध्येच लांबलचक दुधी ही दाखवला आहे त्यामुळे कद्दू म्हणजे काय ते तो फोटो बघून समजणे अगदीच सोपे आहे.
खीर छान दिसतेय हे सांगायचं राहिलं.

Pages