
भारतीय अन्न पद्धतीत पोळी, भाकरी किंवा भात (तृणधान्य), त्यासोबत वरण (कडधान्य) आणि भाजी हे मुख्य पदार्थ असतात. त्याशिवाय चटणी, ठेचा, लोणचं, कोशिंबीर असं काहीतरी तोंडी लावणं हेही असतं. ही तोंडीलावणी बहुतेक वेळा वरण-भाजी पेक्षा अधिक चटकदार असतात.
तेलुगु खाद्य संस्कृतीत तोंडीलावणीच्या पदार्थांची रेलचेल आहे. बहुतेक पदार्थांचे स्वरुप हे हिरव्या-लाल मिरच्या , कोणती तरी फळभाजी किंवा पालेभाजी व मसाले यांचे शिजवलेले किंवा कच्चे असे मिश्रण असते.
या भागात आपण मुख्यतः पाहणार आहोत दोसकाया पच्चडी == वाळकाचं लोणचं तसेच इतर तोंडीलावणी.
मराठवाड्यात वाळकं पावसाळा संपता-संपता येऊ लागतात. आंध्र तेलंगणात मात्र वाळकं (पावसाळ्यातले काही दिवस सोडून) वर्षभर मिळतात. पिवळीजर्द, टेनिस बॉल एवढी व मोठी, गोल गरगरीत वाळकं तेलुगु अन्नपूर्णा-बल्लवाचार्यांची अगदी फेवरिट असतात! त्याशिवाय पिवळ्या-तपकिरी-हिरवट डागेल्या रंगाची, लांबट, एकेक किलोची वाळकं आणि काही प्रमाणात लहान-लहान हिरवट शन्न्या याही वापरात येतात. मला स्वतःला पहिल्या प्रकाराची गोल पिवळी वाळके आवडतात.
वाळकांचा मुख्य उपयोग सांबारात घालण्यासाठी आणि हे वाळकाचे लोणचे करण्यासाठी होतो. लग्नकार्य, अन्नप्रसाद, भंडारा अश्या उत्सव प्रसंगी वाळकाचे लोणचे तोंडी लावण्यासाठी हमखास केले जाते.
चला तर मग लागू तयारीला!
साहित्य:
लोणच्यासाठी
- वाळकं - अर्धा किलो(चिरून तीन-चार वाट्या)
- तिखट - पाऊण वाटी
- मोहरी पूड - अर्धी वाटी
- मीठ - तीन-चार चमचे (चवीनुसार)
- मेथी पूड - एक चमचा
- (ऐच्छिक) लिंबू रस - एक
फोडणीसाठी
- तेल एक वाटी
- मोहरी एक चमचा
- जिरे एक चमचा
- हिंग - अर्धा चमचा
- लाल मिरच्या - चार पाच (तुकडे करून)
- कढीपत्ता - दोन तीन काड्या
- लसूण-अद्रक पेस्ट - एक चमचा
- हळद - अर्धा चमचा
वाळकं स्वच्छ धुऊन पुसून कोरडे करून घ्या. दोन भागात चिरून, चव पाहून, कडू नाहीत याची खात्री करून घ्या. साली न काढता अगदी लहान लहान (मोठ्या शेंगदाण्याच्या आकारा एवढ्या) फोडी करून घ्या. मधून निघणारा रस व बिया ह्याही कोवळ्या असतील तर आणि आवडत असतील तर घ्या.
एका स्टीलच्या भांड्यात वाळकांच्या फोडी घाला. त्यात तिखट, मोहरी पूड, मेथी पूड, मीठ घालून नीट हलवून एकत्र करून ठेवा.
कढईत एक वाटी तेल घाला. गरम झाल्यावर मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर गॅस मंद आचेवर करून जिरे, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे करून घाला. मिनिटभर परतून लसूण-अद्रक पेस्ट घाला. अजून मिनिटभर परतून हिंग घाला. मस्त वास सुटल्यावर हळद घालून गॅस बंद करा.
फोडणी थंड झाल्यावर भांडयातील मिश्रणावर घाला. नीट हलवून एकत्र करा. आंबट चव हवी असेल तर लिंबाचा रस घालून एकत्र करा व किमान तास दोन तास, शक्यतो दहाबारा तास झाकून ठेवा.
चटकदार, चमचमीत, लालजर्द वाळकाचं लोणचं तयार आहे!
कोरड्या, हवाबंद बरणीत घालून फ्रिजमध्ये ठेवा. दोन तीन आठवडे टिकेल.
वाफळता भात आणि हे लोणचं किंवा भात वरण भाजी यासोबत तोंडी लावणी म्हणून वाढा. पोळी भाकरी यांसोबतही खायला उत्तम लागेल.
नक्की करून पहा व इथे फोटो टाका.
इतर तोंडीलावणी:
गोंगुरा पच्चडी (अंबाडीचा ठेचा):
साहित्य:
- चटणीसाठी: एक मोठी जुडी अंबाडीची ताजी पाने स्वच्छ धुवून कोरडी करून, ८-१० लाल मिरच्या, ३-४ हिरव्या मिरच्या, दोन चमचे तेल, एक चमचा उडीदडाळ व चणाडाळ, चार पाकळ्या लसूण, चवीनुसार मीठ
- फोडणीसाठी: दोन चमचे तेल, एक मध्यम कांदा चिरून, चार लसूण पाकळ्या, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद, दोन लाल मिरच्या तुकडे करून, एक चमचा उडीदडाळ व चणाडाळ
कृती:
कढईत एक चमचा तेल गरम करून उडीदडाळ, चणाडाळ लाल-हिरव्या मिरच्या परतून घ्या. बाजूला काढून ठेवा. अजून एक चमचा तेल घालून अंबाडीची पाने घालून नीट शिजवून घ्या. बाजूला काढून ठेवा. दोन्ही थंड होऊ द्या.
मिक्सरमध्ये आधी परतलेल्या मिरच्या-डाळी, लसूण, मीठ बारीक वाटून घ्या. मग अंबाडीची शिजविलेली पाने घालून जाडसर चटणी वाटून घ्या.
त्याच कढईत दोन चमचे तेल घालून मोहरी, जिरे, कढीपत्ता, लाल मिरच्या, लसूण घालून परता. कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. हळद व वरील चटणीचे वाटण घालून नीट हलवून दोन मिनिटे परता. थंड झाल्यावर हवाबंद बरणीत घालून फ्रिजमध्ये ठेवा. महिनाभर टिकेल.
वाफळता भात, वरण, भाजी यासोबत तोंडी लावणी म्हणून वाढा. पोळी भाकरी यांसोबतही उत्तम लागेल.
अल्लम पच्चडी (अद्रकाची चटणी):
साहित्य:
- चटणीसाठी: अद्रक पाव किलो सोलून, अर्धा इंच आकाराचे तुकडे करून, चिंच पाऊण वाटी, गूळ एक वाटी, तेल, तिखट, मीठ, हळद, मेथीपूड
- फोडणीसाठी: तेल मोहरी, लसूण, कढीपत्ता, लाल मिरच्या, हिंग, चणाडाळ, उडीदडाळ
कृती:
चिंच गरम पाण्यात भिजू घाला. कढईत अद्रक थोड्या तेलात ३–४ मिनिटे परतून घ्या. थंड झाल्यावर पाणी न घालता मिक्सरमध्ये एकसारखे वाटून घ्या.चिंचेचा कोळ काढून ते पाणी घाला. लाल तिखट, हळद, गूळ, मेथीपूड घालून थोडेसे फिरवून घ्या. चव बघून पुरेसे मीठ घाला. त्याच कढईत पुन्हा तेल मोहरी, लसूण, कढीपत्ता, लाल मिरच्या, हिंग, चणाडाळ, उडीदडाळ, घालून फोडणी करा. वाटलेली चटणी गरम फोडणीत घालून हलवून एकत्र करून घ्या. थंड झाल्यावर कोरड्या, हवाबंद बरणीत भरून ठेवा. आठवडाभर टिकेल.
इडली, डोसा, उत्तप्पा यांसोबत वाढा. पोळी, भाकरी यांसोबतही उत्तम लागेल.
या फोटोत दिसणारी सर्वात चटकदार रंगाची अल्लम पच्चडी आहे!
कृती तर भारी आहेच, पण फोटो
कृती तर भारी आहेच, पण फोटो अतिशय भारी आहेत, एकदम प्रो, फूड फोटोग्राफी प्रो ने काढल्या प्रमाणे..
मस्त. इथे मिळतात ही वाळकं.
मस्त. इथे मिळतात ही वाळकं. नक्की करुन बघणार.
वाळूक (वाळकांच एकवचन? )
वाळूक (वाळकांच एकवचन? ) म्हणजे चिबूड का?
… फोटो अतिशय भारी आहेत,..
… फोटो अतिशय भारी आहेत,..
+ १
अल्लम पच्चडी + इडलीचा फोटो = Foodgasm !!!
माहितीचा स्रोत: निरीक्षण,
माहितीचा स्रोत: निरीक्षण, चर्चा, अनुभव…
हे सुद्धा चपखल 👍
काय फोटो टाकता तुम्ही राव...
काय फोटो टाकता तुम्ही राव...
मी तेच बघायला येतो..
टेन्!पमस्त्पमस्न्पमसेन्पम
टेन्!पमस्त्पमस्न्पमसेन्पम
इंटरेस्टिंग.
इंटरेस्टिंग.
>>>>टेन्!पमस्त्पमस्न्पमसेन्पम
>>>>टेन्!पमस्त्पमस्न्पमसेन्पम
हाहाहा कॅप्स लॉक ऑन मंजूताई.
आमच्याकडे लांब हिरव्या
आमच्याकडे लांब हिरव्या काकड्या असतात त्यांना वाळके म्हणतात, डोंबिवलीत सहज मिळतात, तिखट मीठ लावून खातो.
ह्या प्रकारची काकडी मद्रासी काकडी म्हणून ओळखतो, काही विशिष्ट लोकांकडे पण बऱ्याच ठिकाणी विकायला असते, त्यांच्याकडे सुरण, ही काकडी, कच्ची केळी असं मिळतं.
भन्नाट, केवळ भन्नाट
भन्नाट, केवळ भन्नाट
सर्व वाचकांचे आणि व्यक्त
सर्व वाचकांचे आणि व्यक्त-अव्यक्त प्रतिसादकांचे आभार.
>>>वाळूक (वाळकांच एकवचन? ) म्हणजे चिबूड का?
चिबूड माहित नाही. वाळकं ही खाली दिल्यासारखी असतात.
>>>टेन्!पमस्त्पमस्न्पमसेन्पम
म्हणजे काय?
>>>आमच्याकडे लांब हिरव्या काकड्या असतात त्यांना वाळके म्हणतात,
वाळकं ही गोलसर, पिवळी व आंबटसर असतात आणि (आम्ही ज्याला काकडी म्हणतो ती) काकडी लांब, हिरवी, पांढरट असते व आंबट नसते.
आमच्याकडची वाळकं
आमच्याकडच्या काकड्या
मस्त फोटो सगळे.
मस्त फोटो सगळे.
रेसिपीलेखन आणि फोटो दोन्ही
रेसिपीलेखन आणि फोटो दोन्ही आवडले. आल्याची चटणी तर नक्कीच करून पाहणार.
अंबाडी आणून कधीतरी गोंगुरा चिकन करायचा विचार आहे. बघू कधी मुहूर्त लागतोय.
मत दिसतंय लोणचं.
मत दिसतंय लोणचं.
वाळकं पाहिलं नाही. लिंबकाकडू आहे का हे ?
लाळ गळून कीबोर्ड भिजला ..
लाळ गळून कीबोर्ड भिजला ..
लोणचं अप्रतिम दिसतय.
प्लीज ईंग्रजी शब्द द्या ना वाळकू साठी. मी शोधून करते नक्की लोणचं.
रेसिपी तो रेसिपी... फोटोज
रेसिपी तो रेसिपी... फोटोज सुभानल्लाह!
मस्तच एकदम 👍
वाळकांची व्यावसायीक शेती होते की नाही ह्याची कल्पना नाही पण तुम्ही म्हणता तशी पावसाळ्यानंतर माळरानावर आपोआप उगवलेली वाळके वेचणारी ठाकरं, कातकरी मंडळी रायगड जिल्ह्यात पाहिली आहेत आणि ती दिसायला तपकिरी-हिरवट डागेल्या रंगाची, लांबट व नावाप्रमाणेच काहिशी वाळल्यासारखी सुरकुतलेली असतात. त्यांची चव मात्र अद्याप चाखली नाहिये पण आता ट्राय करणे हे ओघाने आलेच 😀
फोटो आणि रेसिपी मस्तच.
फोटो आणि रेसिपी मस्तच.
प्लेटिंग अत्युच्च...
नक्की करून पाहणार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
>>> वाळकांची व्यावसायीक शेती होते की नाही ह्याची कल्पना नाही
आंध्र तेलंगाणात वाळकांची व्यावसायीक शेती होते.
>>> नावाप्रमाणेच काहिशी वाळल्यासारखी सुरकुतलेली असतात.
सुरकुतलेली वाळकं लोणच्याच्या कामाची नाहीत. ती पिकून गोड झालेली असतात. ती नुसतीच चिरून खायची. लोणच्यासाठी ताजी रसरशीत वाळकं हवीत.
>>> वाळकं पाहिलं नाही. लिंबकाकडू आहे का हे ?
>>> प्लीज ईंग्रजी शब्द द्या ना वाळकू साठी
मराठी - एकवचन: वाळूक अनेकवचन: वाळकं
याला तेलुगुत बुडमकाया / दोसकाया म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहीत नाही. yellow cucumber हा शब्द कदाचित फसवा होईल.
वाळूक वाळकं हे असे दिसतात -
(या प्रतिसादातले फोटो जालावरून)
इथली वाळके टोटली वेगळी,
इथली वाळके टोटली वेगळी, ह्यांना चिबुड म्हणतो बहुतेक आम्ही. इथली लांबसर हिरवी वाळके घेऊन त्या गाडीवाल्याकडून तिखट मीठ लावून घेऊन खात खात चालताना मजा येते. टिटवाळा वगैरेहून येताना स्टेशनवर बायका टोपलीत घेऊन विकायला बसतात, ती त्यांच्याकडून तिखट मीठ लावून घेऊन ट्रेनमध्ये खात खात डोंबिवलीपर्यंत यायची मजा काही और असायची, शाळा कॉलेजातल्या सुट्टीच्या दिवसात विशेषतः ह्याच्या आठवणी जास्त.
चिबूड... एखादा फोटो टाका की!
चिबूड... एखादा फोटो टाका की! तिकडे आल्यावर चाखून पाहीन.
तुम्ही फोटो टाकला आहेना
तुम्ही आत्ता फोटो टाकले आहेतना त्याला कोकणात चिबुड म्हणतात, आणि मी लिहिलं ते इथल्या वाळक्या काकडीचं. म्हणजे तुमच्या इथलं वाळूक ते आमच्याकडे चिबुड.
आधीच्या पोस्टमध्ये फोटो टाकलाय 18 जूनला, त्याला मद्रासी काकड्याही म्हणतो.
आमच्याइथल्या काकडी वाळक्याचे फोटो, गाडीवर दिसल्या की टाकेन.
हं. आलं लक्षात! ठेवीन लक्षात!
हं. आलं लक्षात! ठेवीन लक्षात!
अवांतरः:
एकाच वस्तूला वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळी नवे असतात त्यामुळे अनेकदा गोंधळ उडतो. पुणे-कोकणात ज्या पालेभाजीला अळू म्हणतात तिला मराठवाड्यात चमकोरा म्हणतात. अर्थात यावर तेलुगुचा प्रभाव आहे. अळूला तेलुगुत चामकुरा म्हणतात.
तेलुगुत फळे-भाज्यांच्या नावांत साधारणतः एक logic असते.
वाह मस्त माहिती.
वाह मस्त माहिती.
एकाच गोष्टीला वेगवेगळी नावं अगदी इथे जवळपासही आहेत, आम्ही खरबूज म्हणतो त्याला इथे काहीजण चिबुड म्हणतात.
तेलुगुत फळे-भाज्यांच्या
तेलुगुत फळे-भाज्यांच्या नावांत साधारणतः एक logic असते.>>>>> व्वा, मस्त माहिती. थोडी ज्ञानात भर पडली.
मस्त रेसिपी, फोटो छान ...
मस्त रेसिपी, फोटो छान ... कोणी नोटीस केलंय की नाही ? पण फोटोतली सुरी छानच दिसते. धार ही छान असेल असं वाटतय.
वाळकं चिबुड च्या बाबतीत अंजू ला मम ..
सुरी आहे का सुरा, जबरी आहे.
सुरी आहे का सुरा, जबरी आहे. हेमाताई आपकी पारखी नजर, मी आत्ता बघितलं तुम्ही लिहिल्यावर.
वेगळाच प्रकार आहे आणि छान
वेगळाच प्रकार आहे आणि छान दिसतोय.
अंजू, मला ते चिबूड वाटत नाही. चिबुडाची साल जाड आणि खरबरीत असते. याची गुळगुळीत वाटतेय. हे आत पांढुरके आहे, चिबूड पिवळसर असते.
चिबूड = muskmelon = खरबुजा
अहाहा ! तुमच्या रेस्पिच्या
अहाहा ! तुमच्या रेस्पिच्या धाग्यावर आलं की एवढं मस्त वाटतं. मला तुमची लिहीण्याची स्टाईल, प्रेझेंटेशन सगळंच आवडतं. माझंही लक्षं त्या सुऱ्या कडे गेलं. देखणा सुरा आहे. भन्नाट पाकृ असते, वेगळीच. कधी करीन का माहीत नाही. पण वाचूनच छान वाटतं.
चिबूड आणि खरबूज (muskmelon)
चिबूड आणि खरबूज (muskmelon) वेगळं आहे.

आता चिबूड आणि वाळकं वेगळं की एक माहिती नाही. इथे लोक म्हणतायत त्याप्रमाणे एकच दिसतंय, पण चव वेगळी असेल असं वाटतंय. इथे वाळकाचा फोटो जो दिलाय त्याला आमचा भाजीवाला सांबारकाकडी म्हणतो. आणि मी सांबारकाकडी अॅक्चुअली दाक्षिणात्य सांबारात खाल्ली आहे त्यामुळे फोटो बघून वाळूक म्हणजे तीच असावी असं मला वाटत होतं.
धागा हळूहळू जवस-फ्लॅक्स सीड्स किंवा फरसबी-श्रावणघेवड्याकडे चाललाय का
Pages