२ जून – तेलंगाणा दिन विशेष

Submitted by वामन राव on 2 June, 2025 - 06:34

आज २ जून २०२५, तेलंगाणा दिन. तेलंगाणात असलेल्या मायबोलीकरांना तेलंगणा राज्य स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तेलंगाणा राज्याच्या स्थापनेला आज अकरा वर्षे पूर्ण झाली!

तेलंगाणाचा इतिहास हा केवळ एका राज्यनिर्मितीपुरता मर्यादित नाही, तर तो जनतेच्या संघर्ष, संयम आणि स्वाभिमानाची कथा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात, तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकाचा काही भाग असे असलेले हैदराबाद स्टेट नावाचे निजामाचे संस्थान होते. निजामाच्या संस्थानातून मुक्त झाल्यावर, हैदराबाद स्टेटचा भाग असलेला तेलंगाणा, १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनंतर आंध्र प्रदेशात समाविष्ट झाला. मात्र वर्षानुवर्षे अनेक कारणांनी तेलंगाणातील लोकांमध्ये असंतोष वाढत गेला, स्वतंत्र तेलंगणा आंदोलन उभे राहिले.

दीर्घकाळ चाललेल्या त्या आंदोलनातून २०१४ साली तेलंगाणा राज्य निर्मिती झाली. लोकांच्या अस्मितेचा, आत्मसन्मानाचा आणि स्वराज्याच्या स्वप्नांचा नवा अध्याय सुरु झाला. या अकरा वर्षांत तेलंगाणाने अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. कृषी, सिंचन, शिक्षण, औद्योगिक गुंतवणूक, माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य – या सर्वच बाबतींत राज्याने कल्पक धोरणे राबविली आहेत.

तेलंगाणा राज्याच्या जडणघडणीत जसे तेलुगु भाषकांचे योगदान आहे, तसेच मराठी भाषकांचा सिंहाचा वाटाही आहे.

हैदराबाद हे शहर केवळ चारमिनार, बिर्ला मंदिर किंवा टेक्नॉलॉजी पार्क्सपुरतं मर्यादित नाही. हैदराबाद म्हणजे ऐतिहासिक वारसा, वर्तमानातील प्रगती उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल यांचा समतोल आहे. आणि या सगळ्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे हैदराबादी मराठी समाज!

सुरुवातीपासूनच अनेक मराठी कुटुंबं इथे वसली. निजामाच्या काळात शिक्षण, न्याय, प्रशासन या क्षेत्रांत मराठी लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे राजकारण, समाजकारण, कला, माध्यमं अशा अनेक क्षेत्रांत मराठी लोकांनी आपलं ठसा उमटविला आहे.

तेलंगाणात राहणारा मराठी समाज केवळ “बाहेरचा” नाही. तो स्थानिक आहे, भागीदार आहे, आणि निर्णय प्रक्रियेतील एक जबाबदार घटक आहे.

संस्थात्मक पातळीवर अनेक मराठी मंडळं, गणेशोत्सव मंडळं, शाळा, साहित्यविषयक संस्था तेलंगाणात सक्रीय आहेत. आधुनिकतेकडे वाटचाल करतानाही मराठी समाजाने आपली भाषा, संस्कृती, सणवार आणि मूल्यं जपली आहेत.

तेलंगाणा दिनानिमित्त मराठी समाजानं तेलंगाणाच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाचे स्मरण होणे स्वाभाविकच आहे, नाही का?

जय हिंद, जय तेलंगाणा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! छान लेख.
कालच्या मटा संवाद पुरवणीतील ‘तेलुगु अस्मितेचा अविष्कार’ हा लेख जरूर वाचावा.
त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा :
1956 मध्ये आंध्र प्रदेश मद्रास प्रांतातून वेगळा झाला आणि 2004 मध्ये तेलंगणा वेगळा झाला. या दोन्ही घटनांसाठी दोन वेगळ्या व्यक्तींची प्राणांतिक उपोषणे कारणीभूत ठरली.

धन्स्!
>>> प्राणांतिक उपोषणे

हो. त्यापैकी एक उपोषण तर मला वाटते ५६ दिवस चाललेले होते!

"तेलुगु अस्मितेचा अविष्कार" नक्की वाचेन, लिंक मिळेल का?

जय तेलंगाणा!
----

तेलंगाणा राज्याच्या निर्मितीच्या आणि विकासाच्या अनुभवातून महाराष्ट्राने नक्कीच शिकण्यासारखं खूप आहे.

>>> तेलंगाणा राज्याच्या निर्मितीच्या आणि विकासाच्या अनुभवातून महाराष्ट्राने नक्कीच शिकण्यासारखं खूप आहे.

अगदी अगदी. विशेषतः ease of doing business याबाबतीत मागच्या वीस पंचवीस वर्षात तेलंगणा सारखी राज्ये महाराष्ट्राच्या खूप पुढे निघून गेली आहे.

चांगला लेख आहे.

आंध्रा च्या अनुभवामुळे (चंद्राबाबू) तेलंगणाचे easeof doing business आले असेल का?

>>>आंध्रा च्या अनुभवामुळे (चंद्राबाबू) तेलंगणाचे easeof doing business आले असेल का?

ते तर आहेच आहे. त्याशिवाय (किमान उद्योगधंद्यांच्या वाढी बाबतीत तरी) यापूर्वीचे दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेले चंद्रशेखर राव यांनीही तो वारसा पुढे चालविला होता.

सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेही त्याबाबतीत बऱ्यापैकी चांगले काम करत आहेत असे दिसते.

---

चंद्रबाबू नायडूंची (तत्कालीन संयुक्त आंध्र प्रदेशचे) मुख्यमंत्री म्हणून १९९५ ते २००४ या काळातली पहिली कारकीर्द हा बहुदा भारतातील कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत सुवर्णकाळ होता.
त्यांनी एखाद्या कंपनीच्या सीईओ सारखे काम करून आंध्र प्रदेशात, विशेषतः हैदराबादेत प्रचंड गुंतवणूक आणली.‌
केवळ हैदराबादेतीलच नव्हे तर in general भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग वाढविण्यात, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा सिंहाचा वाटा आहे. २००४ मध्ये त्यांची सत्ता गेली नसती तर कदाचित अजूनही नेत्रदीपक प्रगती झाली असती.

तेलंगाणा दिनानिमित्त मराठी समाजानं तेलंगाणाच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाचे स्मरण >>>

ह्या बद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

प्रगती शिक्षण संस्था, वैदिक धर्म प्रसार संस्था, केशव मेमोरियल, दुर्गाबाई देशमुख इस्पितळ, आंध्र महिला सभा, महाराष्ट्र मंडळ वगैरे सारख्या अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था हैद्राबादेत कार्यरत आहेत.

तेलुगु अस्मितेचा अविष्कार माहीतीपूर्ण आहे. तपशिलात थोडीशी दुरुस्ती आहे. तेलुगु देशम पक्षाने स्थापना झाल्यानंतर लढविलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत ४२ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या!

अवांतर: स्थापना झाल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांत विधानसभा निवडणूका जिंकून सत्ता प्राप्त करणारा तेलुगु देशम पक्ष हा पहिलाच असावा!

सवांतर: त्यावेळी १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते आणि त्यांना प्रचंड बहुमत (बहुधा ~४१६ जागा) मिळाले होते. भाजपाला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या, वाजपेयी सहित अनेक दिग्गज पराभूत झाले होते. एन टी आर ने मात्र ३० जागा जिंकल्या व टीडीपी सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला !

वामन राव, उत्तम माहिती बर्‍याच तेलंगणा विषयीच्या गोष्टी माहिती झाल्या काही ऐकिवात होत्या. हैद्राबदला असताना बडीचावडी भागात बर्‍याचदा जायचो. तिथे जोशी लोणचे व मसालेवाले कडे. त्या भागातील भाजी बाजारात बहुतेक भाजीवाले उत्तम मराठी जाणत बोलत. आणि तिथे मराठी माध्यमाची डावरे प्राथमिक आणि पळनीतकर प्रशाला शाळा देखिल आहे.