शाही फिरनी

Submitted by सायो on 13 May, 2025 - 22:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव ते अर्धा लिटर होल मिल्क, दोन तीन चमचे भिजवलेले बासमती तांदूळ, पाव ते अर्धी वाटी बारीक किसलेला खवा, तूप, दालचिनीची एक काडी, चवीप्रमाणे साखर, केशर आणि ड्रायफ्रूट्स.

क्रमवार पाककृती: 

दोन तीन चमचे बासमती तांदूळ भिजवून ठेवावेत. एक पसरट कढईत एखाद चमचा तूप घेऊन त्यात दालचिनीची छोटी काडी परतावी. त्यातच फुल फॅट दूध घेऊन मध्यम आचेवर उकळत ठेवावं. अधेमधे ढवळत रहावं. एकीकडे ते भिजवलेले तांदूळ किंचीत पाणी घालून मिक्सरला जाडसर, रवाळ फिरवून घ्यावेत आणि उकळत्या दुधात घालावेत म्हणजे शिजतील. एकीकडे खवा अगदी बारीक किसणीवर किसून घ्यावा. साधारण पाव ते अर्धी वाटी खूप होईल. तो ही दुधात मिक्स करुन अधे मधे ढवळत रहावं. ह्यात आता केशर आणि ड्रायफ्रूट्स घालावेत आणि साखरही हवी त्या प्रमाणात घालावी. घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करावा आणि जरा गार झाल्यावर हव्या त्या बोलमध्ये किंवा मातीच्या कुल्लम्मध्ये भरुन फ्रिजमध्ये गार करत ठेवावं.

वाढणी/प्रमाण: 
वरच्या चित्रात दिसतायत तसे ६ बोल्स झाले.
अधिक टिपा: 

खूप पूर्वी नंदिनीने ही रेसिपी दिली आहे. ह्यात फरक फक्त खव्याचा आहे. खव्याने छान दाटपणा आला. तिने वेगवेगळे फ्लेवर्सही लिहिले आहेत.

ज्यांना साय आवडत नसेल त्यांनी जरा गार झाल्यावर इलेक्ट्रिक बीटर किंवा एक रवी फिरवावी.

माहितीचा स्रोत: 
युट्युब
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

दालचिनीचा उपयोग गेम चेंजर.

धनि, हो, क्रिमी टेक्श्चर छान येतं. सेट केल्यावर अगदी पातळ रहात नाही.
अनिंद्य- मी वर लिहायला विसरले की एकदा दूध उकळायला लागलं की दालचिनीची काडी काढून टाकली तरी चालेल. मूळ रेसिपीत तसं दिसलं नाही पण ती ठेवायचं प्रयोजन मला दिसलं नाही.

मस्तच दिसतेय, हा रंग केशराचा का ?
खवा असेल साहित्यात तर माझा पास कारण मी खवा कधी विकत आणत नाही असो. उत्साह आला तर दूध आटवून करीन एखाद वेळेस.
फिरनी आणि खीर ह्यातला परफेक्ट पॉइंट पकडणं कठीण वाटत मला. त्या साठी काही टिप्स आहेत का ?

ममो, हो.
टिप्स म्हणजे एकतर ह्यात थोडा तांदूळ असल्यामुळे जरा दाटपणा येत जातो आणि खिरीसारखी पातळ कन्सिस्टन्सी रहात नाही. परत खवाही असल्यामुळे त्यात भर पडते.

… पण ती ठेवायचं प्रयोजन नाही….

+ १

थोडे अवांतर …

तुम्ही एक नोटिस केलयं का? दालचीनीचा सुवास आणि त्याचा स्वाद (पावडर टाकल्यास विशेष) हा गोड आणि savoury पदार्थात अगदीच वेगवेगळा लागतो.

अवांतर समाप्त.

भारी दिसते आहे फिरनी! करणेत येईल! Happy

ममो, फिरनी ही जरा रवाळ कस्टर्डसारखी असते. तांदूळ वाटल्यामुळे बर्‍यापैकी एकजीव होतात दुधात - खिरीत किती म्हटलं तरी ते दुधापासून निराळे राहातात आणि खीर गार सर्व केली तरी पळीवाढी करतो आपण.
म्हणून तर फिरनी सहसा इन्डिव्हिज्युअल बोल्समध्ये सेट करतात - (पातेल्यातून वाटीत) 'वाढत' नाहीत.
इथे हलाल रेस्टॉरन्ट्समध्ये तांदुळाऐवजी कॉर्नस्टार्च घालतात - ती पारंपरिक अफगाणी पद्धत म्हणे. म्हणजे ते कस्टर्डच झालं.

माझी एक पाकिस्तानी मैत्रीण म्हणाली की ते तांदळाऐवजी तांदळाचं पीठ घालतात. त्याने कसं टेक्श्चर येईल काही कल्पना नाही.

>>> दालचीनीचा सुवास आणि त्याचा स्वाद (पावडर टाकल्यास विशेष) हा गोड आणि savoury पदार्थात अगदीच वेगवेगळा लागतो.
हो अगदी!
आणि सिलोन दालचिनी ही जास्त गोडसर असते. इथे दोन्ही (सिलोन आणि कॅशिया) प्रकार पाहिले आहेत त्यावरून. Happy

कॅशिया म्हणजे गोल गुंडाळी केलेली ना? ती दालचिनी तब्येतीला चांगली नसते असं वाचलं आहे. अर्थात आपण रेअरली खात असू तर फार फरक पडू नये.

मस्त दिसते आहे फिरनी! तुपावर दालचिनी आणि तांदूळ परतल्याचा सुवास इमॅजिन केला वाचतानाच Happy खव्यामुळे वेगळे टेक्स्चर येत असेल. थोडे खिरीच्या जवळ वाटते आहे फोटो मधे.
नंदिनीच्या रेसिपीमधे बहुतेक तिने तांदूळ अगदी बारीक वाटायला सांगितलेत, सिल्की स्मूथ असे लिहिलेय तिने. दोन्ही करून पहायला आवडतील मला.

सहज अवांतर - रोजचा साधा भात कुकरला लावतानाही मी कधीकधी चमचाभर तूप, मिठाची चिमूट आणि एखाददुसरी लवंग घालते त्यात लाडात आले तर. मस्त वास येतो.
ही वंदनाबेनची पाहून शिकलेली सवय.

मै, तुपावर फक्त दालचिनी परतायची आहे. पण तांदूळ वाटून उकळत्या दुधात घालायचे आहेत.
मी रवाळ वाटून आणि मऊ पेस्ट दोन्ही प्रकारे घालून पाहिले दुधात. मला जरा रवाळ टेक्श्चर आवडलं.
एकदा बिघडवूनही झाली आहे. खवा पटकन थॉ करायला मावेत एखाद मिनिट जास्त ठेवला आणि तो जरा विशविशीत झाला आणि किसता येईना. मग तसाच घातला दुधात. अजिबात चांगलं टेक्श्चर आलं नाही त्याने.

मस्त दिसते आहे फिरनी! रंग पण A1....
काही कोकणी मुसलमान मित्रांकडे अनेकदा फिरनी खाल्ली आहे पण तीला दालचीनीचा स्वाद असल्याचे जाणवले नाही कधी. कदाचीत त्यांच्याकडे ही पद्धत नसावी किंवा मला दालचीनीचा स्वाद जाणवला नसावा. पुढच्यावेळी नीट लक्ष देऊन खाईन 😀

सायो या विकेंडला मी करून पाहिली हि फिरनी! फार भारी लागत होती. खरंच शाही. खवा, आटवलेलं दुध, केशर, ड्रायफ्रुट्स या सगळ्याचं अफलातून मिश्रण लागतं. मी बराच वेळ आटवलं, साय धरली की सारखं हलवून त्यात मिक्स करत होते. रबडीसारखं टेक्चर आलं. आलेल्या पाहुण्यांना फारच आवडलं. तांदुळ पण मी रवाळ कंसिस्टंसीचे वाटले आणि खवा पण किसल्याने टेक्चर चांगलं लागलं. केशर दुध उकळताना घातलं त्यामुळे सुरेख रंग पण आला. अशीच कदाचित मँगो फिरनी पण बनू शकेल.

थँक्यू फॉर शाही रेसिपी!! थोडं प्लॅनिंग करून केलं तर सहज आहे जमण्यासारखं. अर्धा पाऊण तास लागला असेल पूर्ण बनायला (तांदुळ भिजण्याचा वेळ नाही धरला यात.)

Fini.jpg