वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्तांत कुठंय?
फोटो आले फक्त Happy

राले gtg मध्ये वृत्तांताचा पाउस पडला
फोटो उशिरा आलेला Happy

भरत, मंजुडी, ऋतुराज, अमितव, ममो, ललिता प्रिती ह्यांना ओळखले. माझेमन बद्दल अंदाज आला.

तिथे हरपा मानव नव्हते मग व्याकरण नियम विषय का निघाला?
Happy

लिहा वृत्तांत लिहा कोणीतरी.

भरत, धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
काल सगळ्यांना भेटून फार मजा आली.
शनिवारी सकाळी मुंबईत आलो. मंजुडीकडे 'मेरा थोडा सामान गेले दोन वर्ष से पडा है' याची ती वारंवार आठवण करुन देत असल्याने तिला लगेच मेसेज केला. ती संध्याकाळी गोखले रोडला येणार आहे म्हणाली, तेव्हाच भेटू ठरलं. पण तिच्याकडे नेमके पाहुणे आले आणि आयत्यावेळी तिने टांग मारलीन. Proud ते म्हटलंच आहे ना गुलजारांनी झूट मूट के वादे भी सब याद करालो. सामान भिजवादो पण म्हटलंय... म्हणजे मिळणार.

रात्री ऋतुराजला मेसेज केलेला की कधी जमेल, तर तो उद्या सुद्धा चालेल म्हणाला. मी सोमवारी आठवड्याभरासाठी पुण्याला जाणार असल्याने लगेचच शक्य असेल तर चाचपणी चालू केली. कविनला भेटायचं होतं तिला मेसेज केला. ती हो म्हणाली. तीन मेंबर तर झाले. मग दादरला भेटू ठरलं. कारण दादर कुणालाच जवळ नसल्याने सर्वनुमताने ते ठरवलं. Happy तसंही हाडाच्या मुंबईकराला कुणाला भेटायला प्रवास केला की बरं वाटतं. मग निरु (अ'निरु'द्ध) ना मेसेज केला ते कधीही चालेल म्हणाले. ललिताप्रितीला भेटायची मला फार इच्छा होती. तिचं चौफेर वाचन, काही चांगलं वाचलं की धागा काढून लिहिणं आणि एकुण समाजविषयक पोटतिडकीने मत मांडणे हे आणि ती दिग्गज असुनही एकदम अप्रोचेबल असते आपल्यातलीच वाटते म्हणून तिला लगेच विचारलं. तिला रात्री मेसेज टाकला की उद्या भेटतोय जमेल का? तो तिने सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा उठायच्या आधीच वाचला, आणि म्हणाली उद्या कामाचा दिवस आहे पण बघते जमतं का. म्हटलं, 'अगं ते कालचं उद्या होतं, आजच भेटतोय' ती लगेच तयार झाली. ठाणे दादर कुठेही चालेल म्हणाली.
भरतना पण भेटायची इच्छा होती. एक संयत व्यक्ती. कवितांपासून राजकारणांत, माबोच्या प्रत्येक उपक्रमांत, मराठी भाषेविषयी आणि एकुणच जगण्याची काही तत्त्वे बाळगणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा माझ्या मनात होती. त्याला तडा गेला नाही. किंवा थोडा गेलाच. ते फार प्रेमळ आणि लाघवी... हा शब्द हल्ली लिहिण्याची पद्धत आहे म्हणे... आहेत. का ते समजुन घ्यायचं असेल तर सगळं झक मारत वाचा. तर त्यांचा इमेल होता त्यांना मेल केली. किल्ली कडून भरतचा नंबर ही ऋतुराजने मिळवला. त्या धांदलीत मला किल्ली म्हणाली एक माबोकरांचा व्हॉअ‍ॅ ग्रुप आहे त्यात अ‍ॅड करू का. मी आपलं हो म्हणून बसलो. किल्लीने त्या वादळाची पुसटशी कल्पना दिली होती, पण .... तर ते असो. त्या ग्रुप मध्ये अ‍ॅड केलेले लोक कधी सोडून जातील यावर तिकडे लोक पैजा लावतात. मी बहुतेक पहिला हाकललेला माणूस असणार आहे. तर ते ही असो++.

मनीमोहोर ताईंंना मेसेज केला. त्या पण लगेच हो म्हणाल्या. म्हणाल्या की 'गाडी लागते पण मी गोळी घेऊन दादरला येईन'. मग ऋतुराजला म्हटलं ठाण्यातच भेटायचं का आणि ठाण्यातच भेटायचं ठरलं.
निरुंनी ठाणा क्लब, विवी इटालिअन बिस्ट्रो ठिकाण सुचवलं. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. पूल साईड रेस्टॉरंट आहे, कर्कश्य संगीत तिकडे वाजवत नाहीत, आम्ही सोडलो तर मोठ्याने बोलणारे लोक तिकडे येत नाहीत. आणि आलेल्या लोकांना वेटर हाकलून देत नाहीत. आम्ही चार साडेचार तास निवांत गप्पा मारू शकलो त्यात त्या जागेचा नक्कीच मोठा हात होता.
माझेमन पण येईन म्हणालेली त्यामुळे तिला विपू, संपर्क असं करुन ठेवलं. पण तिचा नंबर न्हवता. रविवारी संध्याकाळी ६ वाजता भेटायचं ठरलं .
माझेमन शी संपर्क न झाल्याने मी शेवटचा उपाय म्हणून ५ वाजता वाड्यात विपू चेक कर मेसेज लिहिला आणि तिचा लगेच रिप्लाय आला. ती दहिसरहुन अर्ध्या तासात निघते म्हणाली.
मी यातल्या कुणालाही प्रत्यक्ष भेटलेलो न्हवतो. सगळ्यांना मेसेज केल्यावर आढेवेढे सोडा सगळे एका पायावर कितीही प्रवास करुन यायला तयार होते. हाच तो माबो इफेक्ट आणि जिव्हाळा! Happy
तेच सावलीचं. मंजुडी आल्यावर म्हणाली की अरे सावली समोरच रहाते. तिला फोन करते. तिच्याशी बोललो तर १५ मिनिटांत ती ही हजर. Happy
फार श्रीमंत असल्याचा फील आला काल एकुणच. तर हे नमलाना घडाभर तेल. प्रतेक्ष गटगत काय झालं ते लिहितो थोड्यावेळात.

झकासराव एकतर माझे नाव त्या रांगेत आणि वरून खुद्द भरतनाच तुम्ही प्रश्न विचारताय!

फोटोत ऋतुराज, अमित,ओळखले, निरु, भरत, ममो आणि ललिताप्रीती अंदाज लावला.

सुरुवात छान झालीय अमित.

टिप भारी आहे भरत Lol

अरे भारीच की! छान भेट झाली असणार.

गटगसाठी व्याकरणाचा नियम म्हणजे आवरा!

झकासराव, तुम्हाला भरत इथे असताना असा प्रश्न पडू नये. हम बालवाडी में हैं, वह तो हेडमास्तर हैं! (दिवे)

झकासराव, तुम्ही वृत्तान्त हा शब्द दोनदा वृत्तांत असा लिहिल्याने, पुढचे गटग तुम्हांला आयोजित करावे लागेल. त्यात तुमच्या पसंतीच्या व्याकरणाच्या शिक्षकांना बोलवा. काही जागा रिकाम्या ठेवा. तिथे तुम्हांला अनपेक्षित शिक्षक येतील.

मी यातल्या कुणालाही प्रत्यक्ष भेटलेलो न्हवतो. सगळ्यांना मेसेज केल्यावर आढेवेढे सोडा सगळे एका पायावर कितीही प्रवास करुन यायला तयार होते. हाच तो माबो इफेक्ट आणि जिव्हाळा! >>> smiley32.gif

काल खूप मजा आली. खूप वर्षांनी असं माबो गटग अटेंड केलं ज्यात काहीजणांना पहिल्यांदा भेटणार होते.
(नाहीतर आता काही माबोकर पक्के मित्र झालेत, त्यांच्या गटगना टांग मारली जाते इतकी घनिष्ट मैत्री झाली आहे Proud असो. )
ढीगभर गप्पा हाणल्या. सर्वात बेस्ट म्हणजे बहुतेक गप्पा माबोबाह्य होत्या.
व्हॉट्सॅप वगैरे सगळं ठीकच, पण प्रत्यक्ष भेटीची आणि गप्पांची सर कशालाही नाही!

निम्मे लोक वेस्टर्न लाइनचे होते. रविवार संध्याकाळी दहिसर/बोरिवलीहून ठाण्याला यायचं म्हणजे आजकाल कौतुक वाटावं अशी ट्रॅफिकची अवस्था असते. त्या सगळ्यांना थँकयू.

पुस्तकांची, खाऊची देवाणघेवाण हे कोणत्याही माबो-गटगचं व्यवच्छेदक लक्षण. कालही या गोष्टी झाल्याच.

ती टीप-१, अनुस्वार वगैरे विषय कधी निघाला? मी मिस केला की काय?
तो संदर्भ समजला नाही.

आम्ही चार साडेचार तास निवांत गप्पा मारू शकलो त्यात त्या जागेचा नक्कीच मोठा हात होता. >>> +१

पहिलं हाय-हॅलो झाल्यावर आणखी कुणी येतंय/नाही याची वाट न बघता मी माझ्यासाठी खादाडीची ऑर्डर देऊन टाकली. कारण भूक लागली होती. त्यातही त्या जागेचा, कॉफीचा दरवळ तिथे भरून राहिला होता त्याचा मोठा हात होता. Proud

फोटोत डावीकडून भरत, अनिरुद्ध, ऋतुराज, अमितव, मनीमोहर ललिताप्रीती हे स्थायी लोक. मग पुढच्या संगीत खुर्चीवर एकदा मंजूडी आणि एकदा सावली आहे. त्याच्या पुढे माझेमन.

ललिता- प्रीति, त्याचा गप्पांमध्ये नव्हतंच ते.

गंमत म्हणून लिहिलंय. आणि हा शब्द असा लिहायचा असतो, हे कधीपासून सांगायचं होतं. हे निमित्त साधलं. Wink

माबोकरांचा व्हॉअ‍ॅ ग्रुप आहे त्यात अ‍ॅड करू का. मी आपलं हो म्हणून बसलो. किल्लीने त्या वादळाची पुसटशी कल्पना दिली होती, पण .... तर ते असो. त्या ग्रुप मध्ये अ‍ॅड केलेले लोक कधी सोडून जातील यावर तिकडे लोक पैजा लावतात. मी बहुतेक पहिला हाकललेला माणूस असणार आहे. तर ते ही असो>>>>

Lol

आधी कधी पैज लावली नव्हती….

पहिला सट्टा तुझ्यावरच लावलाय…

४ तास म्हणजे जंगी gtg झालंय. फोटो खूप छान आलेत. प्रथेप्रमाणे खाण्यापिण्याचे फोटो नाही काढले वाटतं!

लली, मंजू, सावली ह्यांना कित्येक वेळा भेटलेय. बाकीच्यांची भेट झाली असती.

आज सुद्धा सुट्टी असल्याने पाहुण्यांचा आधीपासून प्लॅन झाला होता. अमितचा साडेचारला gtg चा मेसेज आल्यावर आयत्यावेळी काही बदल करणे शक्य नव्हते.... Gtg मिस झाल्याची चुटपुट...

फोटोतल्या सगळ्यांना ओळखलं. यातल्या फक्त २/३ जणांनाच भेटले आहे, तरी सगळ्यांना ओळखता आलं.
ठाणेकर नेहेमीच एका मेसेजवर गटग करतात असा अनुभव आहे.
गटग च्या गप्पांबद्दल लिहा. नुसतेच फोटो आणि कौतुक वाचल्यावर माबो गटग चा वृत्तांत वाचण्यासारखे वाटत नाही.

काल सर्वांना भेटून खूप छान वाटले.
रुमाल टाकून ठेवतो.
टीप १ वाचली, थोडा अभ्यास करून येतो.
(जरा कामात आहे)

गप्पांमध्ये प्रीतीने लिहिलंय तसं माबोबाह्य गप्पाच बहुतेक झाल्या. माबो बद्दल म्हणजे लेख लिहिणं सोपं पण प्रकाशचित्र टाकणं किती अवघड आहे यावर खडे फोडणे इ. वर यथाशक्ती पिंका टाकल्या. निरुचे बरेच लेख तयार आहेत पण प्रवास विषयक असल्याने चित्रांशिवाय मजा नाही यावर, मी गूगल फोटो लिंका करून देतो ही त्यांना ऑफर दिली आहे. पब्लिक गूगल फोटो अल्बम द्या आणि मोफत लिंका घ्या. पिंकांवर लिंका असा फ्लेक्स लावणारे.
निरू स्थापत्यविषारद आहेत ठाण्यातील लोकसंख्या वाढ निवारण्यात त्यांचा मोठा हात आहे. Lol इतके दिवस बिल्डर आर्किटेक्ट इमारत आराखडा मंजूर करणे यात पैसे वगैरे बद्दल ऐकलेले पण नसबंदी आणि आर्किटेक्ट याचा परस्पर संबंध कधी लक्षातच आला न्हवता.
ऋतुराजने क्लिनिकल ट्रायल, भारतातील परिस्थिती, आपलं जबाबदार नागरिक म्हणून असलेलं कर्तव्य इ बद्दल पोटतिडकीने आम्हाला बरंच काही शहाणे करून सोडले. ते ऐकून प्रीतीमधला संपादक जगा झाला आणि ती खुर्ची सोडून (जेवणाची प्लेट घेऊन) आमच्या इथे येऊन बसली. ऋतुराजला बरेच प्रश्न विचारून बोलते केले ( आणि भंडावून सोडले) मग बकरा मिळाल्याच्या आनंदात त्याचा संपर्क ही घेतला.

छान झालंय गटग!! यातल्या कोणालाच भेटले नाहीये .पण फोटोवरून केलेले अंदाज काही अंशी बरोबर आले. आधीच्या फोटोपेक्षा पुढच्या फोटोत एक एक जण वाढत गेलं आहे.

मस्त लिहिलंय अमित
बाकीच्यांनी हातभार लावा आता

भरत सर बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत की.
माबोवर जिथे व्याकरण चालते तिकडे मी फिरकत नाही.
त्यामुळे हा पैलू माहीत नव्हता. त्याबद्दल एकडाव माफी द्या.
वाडयावर दंगा करताना केव्हातरी हरपा आणि मानव ह्यांचे ह्या बाबतीतले ज्ञान बघून घेरी आलेली मला.
आता माबोवर व्याकरण धागा बघून चार हात लांब राहिलेले बरे.

सट्टा Lol

स्वगत: पुणे gtg ला ह्यापेक्षा जास्त मेंबर आणावे लागणार तर.

भरत,
वृतान्त हा शब्द कसा लिहायचा हे सांगायचं होतं म्हणून काढला हा धागा ! जबरीच!

फोटोंमुळे काही आयडींना चेहरा मिळाला.

गटग च्या गप्पांबद्दल लिहा. नुसतेच फोटो आणि कौतुक वाचल्यावर माबो गटग चा वृत्तांत वाचण्यासारखे वाटत नाही. >>> ह्याला +१

अमित व्यतिरिक्त बाकीच्यांनीही लिहा बरं.

अरे वाह भारी झालेला दिसतोय गटग.. माझा मिस झाला.. माझे बॅडलक.. पण इतके दिग्गज बघून ते बरेच झाले असेही वाटतेय Happy कधीतरी बारक्या पोरांचाही गटग काढायला हवा.

वाचतोय वृत्तांत येऊ द्या अजून..

बाकी फोटो टाकणं इतके अवघड वाटते लोकांना की त्यावर गटग मध्ये चर्चा व्हावी याची कल्पना नव्हती. माझे एव्हाना चार प्रोफाईल भरलेत. साईड बिजनेस सुरू करायला हरकत नाही Happy

वाचतेय... मस्त ...
आज बाल संगोपनाची जबाबदारी माझ्यावर असल्याने रुमाल टाकून ठेवते. रात्रीच वेळ मिळेल लिहायला.

back to back. गटग मुळे एकदम happening झाली आहे माबो:)
छान वृत्तांत आणि फोटो.. मंजू,सावली , म मो ताई ना ओळखले...ऋतुराज ना पूर्वी एका गटग फोटो t पाहिले आहे त्यामुळे ते पण ओळखले..

अमितवने तो भारतात येणार आणि त्याला जमेल तेवढ्या माबोकरांना भेटायचे आहे हे डिक्लेअर केल्यापासून गटगचे पडघम वाजायला लागले होते. अमितव भारतात पोहोचला आणि शनिवारी त्याने विपू केली होती की उद्या भेटायचा प्लान आहे. पण मी फक्त युद्ध आणि राले गटगचे धागे वाचत होते.

शेवटी त्याने वाड्यावर निरोप आणि फोन नंबर दिला आणि सुदैवाने मी तो ५ वाजायच्या सुमारास पाहिला आणि अमितवला काँटॅक्ट केला तेव्हा समजले की ठाण्याला ६ वाजता भेटायचे ठरले आहे.

रविवार आळसात घालवल्यामुळे माझी चांगलीच पंचाईत झाली पण गटगला जायची इच्छा तर होतीच. अमितवही म्हणाला की लेट जमणार असेल तरी चालेल. खरं तर त्याने शनिवारीच विपू केली होती. मग जायचंच ठरवलं.

४ वाजता वामकुक्षी सुरु केलेल्या नवऱ्याला नवीन घडामोडींची माहिती देण्यासाठी हलवल्यावर त्याने नेहमीप्रमाणे बायको उठवायला आली हे वाटून ‘नाही’ म्हटले. मग ठेवणीतला आवाज लावून 'नाही काय? मी जातेय' हे सांगितल्यावर प्रकरण काही तरी वेगळे आहे हे समजून झोपी गेलेला जागा झाला.

२० मिनिटात निघते असे सांगून ठाण्याची २० मिनिटे दहिसरमध्ये साधारण ४५ मिनिटे होतात असा Time Warp theory चा मी प्रत्यय आणून दिला पण माबोकरांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. Indian Standard Time ची राष्ट्रीय परंपरा जीवित राखण्यासाठी उबर ड्रायव्हर्सनीही मोलाची साथ दिल्याचे मी इथे नम्रपणे नमूद करू इच्छिते. शेवटी अडचणीच्या वेळी मार्ग दाखवणाराच खरा साथीदार या उक्तीला जागत नवऱ्याने गाडी बूक केली व मी मार्गस्थ झाले.

सीझफायर झाल्यामुळे वीकेंडला डीमार्ट, स्टार बाजार आणि तत्सम दुकानात गर्दी करून वाणसामान व स्नॅक्सची साठेबाजी करण्याची तसेच वाहिन्यांना ‘सबसे तेज खबर’ देण्याची गरज न उरल्याने रस्त्यावरून सामान्य नागरिक व ओबी व्हॅन्स गायब होत्या.

आपल्यातल्या काहींनी डी-एस्कलेटचा धोशा लावला असताना सीझफायर झाल्यामुळे श्रेय घ्यावे की सरकारला दोष द्यावा या विवंचनेत असलेल्या विरोधी पक्षाच्या आणि मनाने लाहोर किंवा कराचीला पोहोचलेल्या पण मुंबईत हल्ला झाला तर काय करायचे याचे गणित न सुटलेल्या सत्तारूढ पक्षाच्या समर्थकांनी कोणतीही निदर्शने, मोर्चे, सभा इत्यादी प्रकार केले नाहीत. त्यामुळे कुठेही न अडकता अत्यंत कमी वेळात ठाण्याला पोहोचले.

ठाणे क्लबचा परिसर पाहताक्षणीच आवडला. त्यात दरवानाने मराठीत उत्तर दिल्याने आनंद द्विगुणित झाला. मोठ्या स्विमिंगपूलच्या शेजारी काचेच्या एनक्लोजरमध्ये वेताच्या खुर्च्या असलेला कॅफे असे सुंदर ठिकाण निवडण्यासाठी निरू सरांचे विशेष आभार. वीकेंडला मोठे टेबल ३-४ तास अडवुनही आम्हाला कुणी हटकले नाही.

मी पोहोचताक्षणीच अमितवने डीपी पाहून मला ओळखलं नी ऋतुराजचा फोन आला. नेमके किती जण येणार आहेत हे माहीत नसलं तरी टेबलापाशी मोठा ग्रुप पाहून आनंद झाला. सगळ्यांना भेटण्याच्या नादात डायसकडे दुर्लक्ष झाल्याने मी साष्टांग नमस्कार घालता घालता राहिला.

सगळ्यांशी ओळख झाल्यावर आपण यांना पहिल्यांदा भेटतो आहोत असा विचारही मनात आला नाही. त्यामुळे अमितवने दिलेल्या चॉकलेटवर मी 'कशाला उगाच?' वगैरे म्हणण्याचे कष्ट घेतले नाहीत. ऋतुराजने आणलेल्या काजू कतलीलाही नाकारले नाही. पुढच्या गटगसाठी येणाऱ्या मेम्बरांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी.

ललिता प्रीतीला त्यांच्या व्यापातून वेळ मिळाला तर 'मेरी त्वचासे मेरी उमर का पताही नही चलता' म्हणत संतूरची जाहिरात करण्याचा खूपच स्कोप आहे. त्यांना लग्न झालेला मुलगा आहे हे ऐकून आणि सावलीची विविध प्रांतातील मुशाफिरी ऐकून मी आ वासला.

सावलीमुळे भारतात रिदमिक जिमनॅस्ट असतं याचा मला पत्ता लागला. मुलांना (ऐकली तर) त्यांना गुंतवून ठेवण्याचा हा चांगला मार्ग आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे.

ऋतुराजने एकंदरीत क्लिनिकल ड्रग ट्रायल त्याविषयीचे कायदे आणि प्रत्यक्षात येणारे अनुभव याविषयी इतकी छान माहिती पुरवली की मी त्यांच्याकडे माबोवर याविषयी सविस्तर लेख लिहिण्याचा आग्रह धरला. पाठपुरावा करण्याची जबाबदारी तुम्हां सर्वांची. ललिता प्रीतीने ऑलरेडी त्या संपादित करत असलेल्या अंकासाठीही ऋतुराज यांना लिहितं करण्याचा वसा घेतला आहे.

निरू सरांनी याच गप्पांच्या दरम्यान आर्किटेक्ट आणि नसबंदीचा किस्सा सांगून आम्हांला अवाक केले. यापुढे कुठल्याही सरकारी धोरणाचा विचार करताना मला आश्चर्य वाटणार नाही.

ललिता प्रीती जेवढ्या उत्साहात पुस्तकांविषयी लिहितात तेवढ्याच उत्साहात त्यांनी पुस्तकांमागच्या लेखकांच्या कहाण्या सांगितल्या.

मनीमोहोर आणि ऋतुराज यांची साताऱ्याचे हवामान याविषयीच्या गप्पा ऐकून मला साताऱ्याला जावेसे वाटू लागले आहे.

निरू सरांच्या फार्महाऊसचे फोटो व त्यांनी दिलेलं गिफ्ट पाहता एकंदरीत त्यांच्या रसिकतेचा परिचय झाला.

मंजूडीबरोबर गप्पा मारायला फारसा वेळ मिळाला नाही.

भरत सरांनी इंदूरमधली सरकारी कामाची पद्धत वगैरे विषय मांडले.

अमितही आईस हॉकी ते पेटी आणि मुलांचे मराठी वाचन असा चौफेर विहरत होता. मोजक्या दिवसांच्या भारतवारीत पहिल्यांदाच भेटणाऱ्या लोकांसाठी अख्खी संध्याकाळ राखून ठेवल्याबद्दल त्याचे विशेष आभार.

गप्पांच्या दरम्यान खाणे पिणे सुरूच होते पण फोटो काढले नाहीत.

गप्पांनी पोट भरलं नसलं तरी १० वाजल्यावर आवरतं घेतलं. परत येताना आम्ही दहिसर, बोरिवलीकर एकत्र होतो त्यामुळे मग ऋतुराज यांनी केलेला संस्कृत, खंडकाव्य वगैरेचा अभ्यास, भरत सरांशी मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणावर चर्चा, माझे काश्मीरमधले काही अनुभव वगैरे गप्पा गोष्टी झाल्या.

पोस्टी जंपलेल्या दिसताहेत >>> थँक यु.

फोटोत डावीकडून भरत, अनिरुद्ध, ऋतुराज, अमितव, मनीमोहर ललिताप्रीती हे स्थायी लोक. मग पुढच्या संगीत खुर्चीवर एकदा मंजूडी आणि एकदा सावली आहे. त्याच्या पुढे माझेमन. >>> हो ही जंपली गेलेली खरंच.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा