यशापयशगाथा - एक क्रमशः दस्तावेज

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 May, 2025 - 02:45

मी जेव्हा नवा नवा कार्पोरेट जगात रूजू झालो त्यावेळी एक मौलिक अनुभव आला. तो म्हणजे वर्ष पूर्ण झाले आणि वर्षभराच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती प्रक्रिया अशी होती:
.
१) आपल्या कामगिरीचे अवलोकन करून स्वतःच्या कामगिरीचे आढावा आणि मुल्यमापन कंपनीच्या अंकीय नोंदवहीत नोंदवायचे
२) मॅनेजर त्यांचा अभिप्रायाची नोंद करायचे
३) तुमच्या वर्षकार्याचा आढावा आणि मुल्यांकनाचे एक गुणोत्तर तयार होऊन त्यानुसार गुणांकनाची नोंद तुमच्या नावाने कायमच्या दस्तावेजांमधे जोडली जायची.
.
या प्रक्रियेमधला पहिला टप्पा म्हणजे स्वतःच्या कामाचा स्वतः घेतलेला आढावा आणि त्याबद्दल स्वतः लिहायची ती नोंद. हे करताना आपण काय काय केले आणि कधी केले हे आठवून ते लिहून काढणे ही एक किचकट गोष्ट झाली. मागच्या बारा महिन्यांमधे काय काय झाले ते आठवणे आणि त्याबद्दल लिहिणे यात बरेच काही सुटून जाण्याची शक्यता आहे. अनेकदा महत्त्वाचे काम, लहान-मोठे यश किंवा अडचणींवर मात करण्याचे प्रयत्न विसरले जातात. इतकेच नव्हे तर काही गोष्टी ज्यांचे श्रेय आपल्याला मिळायला हवे त्याच्या विस्मरणाने किंवा अनावधानाने लिहायचे राहून गेले तर त्यांचा उल्लेख न झाल्याने गुणोत्तरात त्याचा प्रभाव यायचा राहून जाऊ शकतो.
.
खरे म्हणजे आस्मादिकांची विस्मरण शक्ती अफाट आहे त्यामुळे हे काम करणे हे एक बिकट समस्या असते, इतर वाचक ज्यांना ही शक्ती नाही त्यांना कदाचित ही समस्या पण वाटणार नाही, सगळेच आठवते आणि हवे तेव्हा लिहिता येते ती सिद्धी आमच्याकडे हवी तशी नाही त्यामुळे या समस्येबद्दल आणि तिच्या मी करून पाहिलेल्या उपाययोजनेबद्दल तुमची उत्सुकता अजून टिकली असेल तर पुढे वाचायला तुमचे स्वागत आहे.
.
असा एकदा अनुभव आल्यावर साहजिकच त्यावर काही उपाय करता येतो का याचा विचार करताना, लोकांनी मांडलेल्या काही संकल्पना वाचनात आल्या. त्यातलीच एक संकल्पना होती ब्रॅग डॉक्युमेंट ची संकल्पना. ही एक अशी नोंदवही आहे, ज्यामध्ये आपण नियमितपणे आपल्या कामाची यादी, कौशल्यविकास आणि यशांची टिपणे ठेवू शकतो.
.
मी जेव्हा मराठीमध्ये अश्या नोंदवहीचे नाव काय असावे आणि याचे स्वरूप कसे असावे याचा विचार करत होतो तेव्हा असे सुचले की या नोंदवहीत आपण यश अपयश आणि घेतलेले धडे ठेवणार त्यामुळे याला फक्त ब्रॅग म्हणजे स्तुती बढाई इतकेच न म्हणता यशापयशगाथा म्हणावे. कामगिरीचे मूल्यांकन करताना केवळ यशच नव्हे, तर अपयश आणि त्यातून मिळालेले धडे हेही महत्त्वाचे असतात. "यशापयशगाथा" ही संकल्पना या दोन्ही बाजूंचे नोंदवहन करताना मला अधिक योग्य नावावली वाटले, ज्यामुळे स्वतःच्या वाढीचे एक संतुलित दर्शन घेता येईल.
.
यशापयशगाथेचे प्रमुख घटक ज्यांचा या गाथेत समावेश करायचे ते म्हणजे:
१) यश – यशस्वी प्रकल्प, कौशल्यविकास, ओळख.
२) अपयश – अडचणी, चुका, अपेक्षित निष्कर्ष न मिळणे.
३) धडे – अपयशातून शिकलेले तत्त्वज्ञान किंवा सुधारण्याचे मार्ग.
.
क्रमश: अशी गाथा जतन करणे याचे फायदे विचारात घेतले तर प्रमुख मुद्दे असे मनात येतात:
१) आत्मविश्वास आणि विनम्रता यांचा समतोल.
२) भविष्यातील निर्णयांसाठी अनुभवाचा आधार.
३) मूल्यांकनात पारदर्शकता.
.
यशापयशगाथा कशी तयार करावी?
.
खरे तर फक्त नियमित अंतराने या गाथेत नोंदी करत जाणे इतके देखील काहीच न जतन करण्यापेक्षा खूप फायद्याचे ठरते. आपण जर नियमित नोंदी करणारच असू तर एक अजून प्रभावकारी मुद्दा आपल्याला वापरता येतो. आमच्या मुल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला पाच ते सहा गोल म्हणजेच ध्येये देण्यात आलेली असतात. त्या प्रत्येक ध्येयामध्ये आपण किती विकसित झालो किंवा ते किती साध्य करू शकलो त्यांचे मुल्यांकन होत असते. माझा अनुभव असा की यशापयशगाथेमध्ये आपल्या प्रत्येक ध्येयाच्या नावाचा एक विभाग केलेला असावा. नियमित नोंदी करताना प्रत्येक विभागात एक तरी नोंद केली जावी.
.
यशापयशगाथा जतन करण्याची एक महत्वपूर्ण सहउपलब्धी
.
अश्या नियमित नोंदी आपल्याला हे देखील लक्षात येते की कोणत्या विभागात नोंद करायला काही मुद्देच नाहीत. त्या विभागासाठी आपण अधिक सतर्क होतो आणि त्या विभागात निदान पुढच्या वेळेसच्या नोंदी करताना काही मुद्दे उपलब्ध राहतील याची काळजी आणि नियोजन करायला आपल्याला पूर्व सूचना या घटनेने मिळते.
.
प्रक्रिया शब्दबद्ध करायची झाली तर अशी काही असेल:
.
1. दैनंदिन/साप्ताहिक नोंदी

१) या काळात केलेल्या कामांची ध्येय विभागशः तारीखवार नोंद
२) यशस्वीरित्या पूर्ण केलेले प्रकल्प
३) नवीन शिकलेली कौशल्ये किंवा ज्ञान

2. महत्त्वाचे यश आणि समाधान

१) कोणत्या कामात चांगली प्रगती झाली?
२) केलेले विशेष योगदान
३) अडचणीवर मात करण्याची उदाहरणे

3. स्वतःच्या वाढीचे विश्लेषण

१) कोणत्या क्षेत्रात आणखी सुधारणे आवश्यक आहे?
२) पुढील काळातील लक्ष्ये
.
अशी यशापयशगाथा मी जेव्हापासून जतन करू लागलो माझ्या मनावरचा मुल्यमापन प्रक्रियेचा सगळा ताण नाहिसा झाला. आता मला फक्त माझ्या गाथेमधल्या नोंदी यांना कॉपी करून हव्या त्या कंपनीच्या नोंदवहीत पेस्ट करायचे असते आणि माझे स्वमुल्यांकन निरंतर होत असल्याने ते मनाप्रमाणे आहे याची मला शाश्वती असते.
.
तुम्ही असे यशापयशगाथा जतन करता का? तुमच्या स्वमुल्यांकनासाठी तुम्ही अशीच एखादी पद्धत विकसित केली आहे का, याबाबत मला वाचायला आवडेल.
.
हे सगळे लिहितांना एक विचार प्रवाह जो माझ्या चर्चांमधे बरेचदा आला त्याचा उल्लेख करून ठेवतो. माझ्या काही सहकार्यांचे मत असे आहे की आपल्याला जर आपल्या कामाचे मुल्यमापन आणि त्याची गाथा ठेवावी लागली तर मग आपल्या कामाची किंमत ती काय समजायची. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण केलेले काम आपण न सांगता माहित नसेल तर मग त्याला काय अर्थ आहे. आपण काय लिहिले आणि जे काही लिहिले त्यावरच जर आपली गुणवत्ता ठरणार असेल तर ती व्यवस्थेमधली एक कमतरता आहे असे त्यांचे मत आहे. हा मुद्दा मला पूर्णपणे चुकीचा वाटत नाही, तरीही आपल्या कामाचा आढावा आपण घ्यावा आणि टप्याटप्याने घेत रहावा ही संकल्पना मला स्वमुल्यांकनासाठी महत्वाची वाटते.
.
तुमची तुमच्या वरिष्ठांना काय किंमत आहे हे त्यांच्या नोंदवहीतल्या अभिप्रायातून कळतेच आणि आपण जर आपली नोंद अशी व्यवस्थित केली तर त्यांना देखील त्यांचे अभिप्राय थातुर मातुर करता येत नाहीत आणि आपण आपल्या पद्धतशीर कामाने आजुबाजुचे वातावरण देखील पद्धतशिरपणे बदलत असतो असे मला वाटते.
.
(यशापयश गाथाकार)
तुषार
.
तुषार जोशी, नागपूर
शुक्रवार, ९ मे २०२५

Group content visibility: 
Use group defaults

खुप छान व महत्वाचे लिहिले आहे. अशा नोंदी ठेवणे कॉर्पोरेट आयुष्यात महत्वाच्या आहेतच पण दैनंदिन व्यक्तिगत आयुष्यातही खुप महत्वाच्या आहेत.