त्यांनी हल्ला केला... आम्ही कडिनिंदा केली!

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 29 April, 2025 - 11:36

२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!

२०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!

२०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!

२०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ,
आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली.

२०१५ – गुरदासपूर, ७ ठार,
पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी !

२०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले,
कडिनिंदा नी निर्बंध….

२०१६ – उरीत १९ जवान मारले,
सर्जिकल स्ट्राईक केली, पण पुन्हा शांततेचे गीत गायले!

२०१९ – पुलवामा, ४० शहीद,
आम्ही MFN दर्जा काढला, पण व्यापार थांबवला नाही!

२०२४ – रेसी यात्रेवर हल्ला, ९ गेले,
काय कठोर शिक्षा आम्ही केली?

२०२५ – पहलगाम यात्रेवर २६ मरण पावले,
आम्ही त्यांचे ट्विटर अकाउंट बंद केले.

पुढेही हल्ले होत राहतील,
आम्ही 'कडिनिंदा' करीत राहू,
निर्बंध लादत, फाईल ढकलत,
TV debate मध्ये तावातावाने ओरडत राहू…

पण..

कधी माझ्या मायभूमीला
एक 'खरा' मुलगा मिळेल?
जो फक्त घोषणांनी नव्हे,
तर रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा सूड घेईल?

कधी जन्मेल पुन्हा एक इंदिरा?
जी ‘सर्जिकल’ नव्हे, ‘भौगोलिक’ स्ट्राईक करेल?
जी पाकिस्तानात घुसून,
जगाला दाखवेल की "भारत फक्त सहन करत नाही!"

कधी होणार माझी मान ताठ?
कधी मी गर्वाने सांगणार?
"हो, मी भारतीय आहे नी आम्ही सूड घेतला.”

कधी माझ्या हुतात्म्यांच्या घरच्यांना
श्रद्धांजली ऐवजी न्याय मिळेल?

कधी घडेल शब्दांऐवजी कृती?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users