कैरी चिली सॉस

Submitted by अवल on 25 April, 2025 - 08:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मोठी कैरी सोलून बारीक तुकडे करून
५ चमचे साखर
दोन चमचे तिखट
एक चमचा बडिशेप
एक चमचा जिरे
एक चमचा मिरे पावडर
अर्धा चमचा मीठ
४ चमचे पाणी

क्रमवार पाककृती: 

सर्व साहित्य जाड बुडाच्या कढईत ठेवून मंद आचेवर ठेवावे. सारखे हलवत रहावं. साखर विरघळली की गॅस बारीक करून झाकण ठेवून एक वाफ काढावी. लगेच गॅस बंद करावा.

२ मिनिटांनी झाकण काढून सगळे हलवावं. पूर्ण गार होऊ द्यावे. मग मिक्सरमधे फिरवून एकजीव करावे.

काचेच्या बरणीत ठेवावे. हा कैरी चिली सॉस आंबट,तिखट, गोड चवीचा - कशाही बरोबर खाऊ शकता. गुजराथी छुंद्याच्या जवळपास जाणारी चव. तिखट साखर याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार आणि कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करू शकता. बडिशेप अन मिरे यामुळे एक वेगळी चव येते.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह बडिशेपेचा स्वाद छान लागत असेल. करून बघणेत येईल.
मी बहुधा बडिशोप, जिरं आणि मिरं तिन्हीची पावडर घालेन आणि शिजवल्यावर ब्लेन्ड नाही करणार. कैरी थोडी दाताखाली आलेलीच छान वाटेल बहुतेक. Happy
(रेसिपीत दोष नाही, आम्ही कुठलीच रेसिपी 'जशी आहे तशी' करू शकत नाही हा आमचा दोष आहे. Proud )

मस्त रेसिपी!
मला वाटते बाहेर टिकण्यासाठी व्हिनेगर घालावे लागेल.

करून बघणार.

ही सॉस कशाबरोबर खायला छान लागेल तो विचार करतो आहे.

छान वाटतोय. करुन बघेन.
मला पण कटलेट, समोसे.. इव्हन चिकन नगीज बरोबर आवडेल असं वाटलं.