तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनि गेला!

Submitted by प्रज्ञा९ on 4 May, 2024 - 11:09

आमची ओळख नक्की कधी कशी झाली हे नीट सांगता येणार नाही, पण ओळख होईल असं वातावरण मात्र
माझ्या लहानपणापासूनच होतं घरात. मोकळ्या वातावरणात वाढलो आम्ही बहिणी. मी १२वीत असताना पुण्यात ज्या घरी पेइंग गेस्ट होते तिथेच माझ्या एका रूममेटमुळे आमची - त्याची आणि माझी- ओळख झाली. ती रूममेट आणि तिची बहीण, दोघी संगीत विषयात शिक्षण घेत होत्या. तो त्यांचा मित्र, त्यामुळे त्यांच्या गाण्याच्या निमित्ताने जातायेता मीपण उगीचच जरा ओळखीचं हसू लागले. ओळख झाली. १२वीचे क्क्लासेस, अभ्यास, मेसमधून जेवून आल्यावर थकवा यायचा, तो आमच्या संवादामुळे कमी झाला. पण ते तेवढ्यापुरतंच राहिलं. पुढे मी पुन्हा रत्नागिरीत आले आणि पुन्हा अभ्यास, कॉलेज या सगळ्यांत वेळ जायला लागला. पण एव्हाना, ओळख ही फक्त ओळख नाहिये हे कुठेतरी जाणवायला लागलं होतं. आईचा विरोध नव्हताच, उलट तीही अधेमधे आमच्या संवादात सामील असायची.
मला आठवतंय, २ दिवसांनी डिप्लोमाची बोर्ड एक्झाम आणि मी आईबरोबर या कुटुंबाशी रात्री उशीरापर्यंत गप्पांत गुंगले होते! दरवेळी आईच असे असं नाही, कधीकधी माझी सखीही असायची. कारण पुण्यात जशी एक मैत्रीणच ओळख व्हायला कारण ठरली तशी इथेही मला कंपनी द्यायला माझी सखीच असायची. पण एव्हाना मला त्याच्याबद्दल वाटणारी ओढ मात्र वाढत होती. मध्यमवर्गीय मराठी घरात जसं अभ्यासू वातावरण असायचं तसंच ते आमच्याही घरी होतं. अभ्यासात हयगय नको आणि आई-बाबांचा विश्वास उडेल असं काही करायचं नाही असे संस्कार होते. मीही कधीच अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. किंबहुना, भराभर अभ्यास संपवून, थोडा जास्तीचा करून मग मला माझ्या मनासारखं करता येईल हे नक्की झालं होतं.
तसा तो एकदम दिलदार स्वभावाचाच. त्याची भाषा कळायला मला खूप वेळ, वर्षंच लागली म्हणा ना! त्याचा एक भाऊ मात्र एकदम खेळकर! आधी माझी त्याच्याशीच गट्टी झाली. मग हळूहळू सगळं कुटुंब समजायला लागलं. केवढं मोठं कुटुंब!! बापरे! आणि सगळीच मंडळी तशी भारदस्त दिसत होती! आपला अभ्यासच बरा हे माझं मनातल्या मनात नक्की झालं होतं. कारण मी अशा टप्प्यावर होते ना करिअरच्या, की आता दुसरा कुठलाही निर्णय घेणं मला परवडणारं नव्हतं.
माझं शैक्षणिक अपयश बघून अनेकांनी मला करिअरच्या बाबतीत सल्ले दिले होते, पण मला ते कधीही स्वीकारावेसे वाटले नाहीत. पण आमची इतकी मैत्री झाली होती, की हा एकच सणसणीत अपवाद म्हणावासा वाटला मला, जो माझ्या आयुष्यात लहानपणीच आला असता तर, आणि तरच, मी शिक्षणाची दिशा बदलली असती. त्याचंच ऐकलं असतं असा विचार कधीतरी आजही मनात येतो.
माझं नशीब इतकं चांगलं, की हे सगळं समजून घेणारं आणि समंजसपणे स्वीकारणारं कुटुंब मला मिळालं. मी जेव्हा प्रत्येक ठिकाणी अपयशी होत होते, समुपदेशनही घेतलं गरज वाटली तेव्हा, त्याही वेळी मला आई-बाबांनी "पुरे आता!" असं नाही म्हटलं. आमच्यातला संवाद गरजेचा आहे हे त्यांना समजलं होतं. बरेचदा तो संवाद एकतर्फीच असे. आणि एरवी मी कोणाशीही बोलताना वक्त्याच्या भूमिकेत असायची, ती इथे मात्र फक्त श्रोता होत असे. माझा मूड जरा लवकर सुधारतो असं आमच्या लक्षात आलं होतं.

मग पुढे माझं शिक्षण संपलं, नोकरीला लागले आणि इथेही त्याच्या परिवाराशी चांगली ओळख असलेले सहकारी भेटले. मी अजून खूश झाले! नात्यातली परिपक्वता म्हणजे काय हे समजायला लागलं होतं. नव्या आयुष्यासाठी मीही उत्सुक होते, माझीपण काही स्वप्नं होती. ती पूर्ण करण्यासाठी मीही धडपडत होते.
सखीशी बोलणं कमी झालं होतं, पण कधीकधी रहावलं नाही की भरपूर वेळ आम्ही बोलायचो. मला न पटणार्‍या अनेक गोष्टी मी तिला सांगायचे. तिचीही बरेचदा तशीच गत असे. पण एक आश्चर्य होतं, काही गोष्टी 'पटल्या' नाहीत, तरी त्याने त्याच्या भाषेत सांगितल्या की निदान ऐकून घेतल्या जात असत. हा काय चमत्कार होता न कळे! आणि हे बरेचदा होत असे! काहीतरी प्रचंड गूढ असं त्याने सांगूनही आणि ते न कळूनही मनात भिनायचं. बरेच दिवस भेट होत नसे, पण अवचित कधी भेट झालीच तर लपाछपीच्या खेळात मी जिंकले असं वाटायचं. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एकूणच आवाका प्रचंड होता! कधीकधी तर मला आम्च्यातला संवाद झेपत नसे! तशी आमची कधीही भेट झाली तरी दिवस मावळताना जर तो भेटला तर मला जास्त आनंद होत असे. त्याची ती मालकीचीच वेळ! तेव्हा तो जास्त प्रसन्न वाटायचा. म्हणजे इतर वेळी घेतलेलं मसाला दूध आणि कोजागिरीच्या रात्रीचं मसाला दूध यात जो फरक होता तोच याच्या इतर वेळी भेटण्यात आणि दिवस मावळल्यावर जरा निवांतपणे भेटण्यात होता. त्या खास वेळी तो तेजाळून जातोय असं वाटायचं!
हे सगळं नक्की कुठे जाणार आहे कळत नव्हतं. घरी सगळं माहिती असूनही, 'हे आयुष्य नाही' हे घरच्यांनाच काय, मलाही माहिती होतं. आईबाबांनी माझ्या लग्नाचं बघायला सुरूवात केली तेव्हा मात्र मी ठाम सांगितलं, की माझ्या या ओढीसकट त्या परिवाराशी जुळवून घेणारा मुलगा मिळेपर्यंत मी लग्नाला होकार देणार नाही!
आणि मला तसा मुलगा मिळाला तेव्हा मी प्रचंड रिलॅक्स झाले! तोही त्या परिवाराशी संबंधित होता. माझ्या 'त्या'ला ओळखत होता. त्याच्या खेळकर भावालाही ओळखत होता. आणि तोही लहान असल्यापासूनच त्याची आणि त्याच्या कुटुंबाचीही 'त्या'च्याशी ओळख होती! मी नाही म्हणण्याचा प्रश्नच निकालात निघाला!

कोण आहे 'तो'? माझ्या मनातल्या खास कप्प्यात जपलेला राग यमन! आमचं नातं काय हे आता वेगळं सांगायला नको ना? त्याचे सूर थेट मनात भिनतात. 'भय इथले.." असो की "मागे उभा मंगेश.." असो की आणि काही, मी माझी रहात नाही. त्याचे सूर माझा पूर्ण ताबा घेतात. हे माझ्या नवर्‍यालाही चांगलंच माहिती आहे. तो स्वतः लहानपणी गाणं शिकलाय, "हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत" या मोठ्या परिवाराशी त्याची ओळख आहे. कुटुंबात गाण्याची आवड आहे. माझं मैत्र फार छान फुललंय आता.
मला आठवतंय, माझी माऊ पोटात होती आणि मला ते माहिती नव्हतं, त्याहीपेक्षा तशी शंकाही मला आली नव्हती! माझं त्यावेळी पोस्टग्रॅजुएशन चालू होतं. असाईनमेंट्स आणि बाकीची कामं करून मी थकून गेले होते. तिन्हीसांजा उलटून गेल्या होत्या. मी पं. हरिप्रसादजींची बासरी लावून त्यावर यमन ऐकत होते. खोलीत दिवा लावायचा राहिला होता, पण मी त्या सुरांत इतकी हरवले की तेही भान मला राहिलं नाही. आणि एक्दम माझ्या डोळ्यांत पाणी आलं! दु:ख नक्कीच नव्हतं, उलट कसलातरी आनंदच होता तो! काहीही कळत नव्हतं काही क्षण.. मग मी शांतपणे उठून दिवा लावला. आतून शांत शांत झाल्यासारखं वाटत होतं. खूप दिवसांनी मी त्याला भेटले होते आणि मग समजलं, की माऊ पोटात असल्यामुळे सुरूवातीला होणारे मूड स्विंग्स होते म्हणून एकदम हळवी होऊन मला असं झालं.... माऊवर कुठलातरी संस्कार नक्कीच झाला होता!
माझं हे प्रेम पुढच्या पिढीत पोहोचलंय हे नक्की!
आता माऊ गाणं शिकतेय!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह सुरेख लिहीलंय, तो कोण याची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरलीयेस.
आता तुझं आणि तुझ्या माऊचं गाणं ऐकायचं आहे. Happy

सुंदर लिहिलं आहे. माझा वाचताना तो की ती यात खूप गोंधळ झाला. आधी ती आणि तिची बहीण असा उल्लेख आहे, मग तो होतो, पुन्हा मध्येच ती सखी, आणि पुन्हा तो. बहुधा हे मुद्दामून केलं आहे. शेवटी उलगडा होतो. छान. यमन आहेच तसा भुरळ पडणारा.

छान लिहिलंयस.
प्रत्येकाचा 'आपला' आपला एक राग असतो असं मला नेहमी वाटत आलंय. नुसता आवडता नाही, तर आपल्या फ्रीक्वेन्सीशी रेझोनेट होणारा, तू लिहिलंयस त्याप्रमाणे आपल्याशी संवाद साधणारा.
माझ्याशी भैरव आणि त्याचे भाऊबंद असे बोलतात असं मला जाणवतं. तो कोमल रिषभ ऐकला की आत लक्कन काहीतरी हलतं!

तुझ्या माऊला तिचे सूर आणि तिचा राग सापडो!

हपा, 'तो' कोण हा भाग वगळता बाकी सगळी खरीखुरी माणसं आहेत माझी. माझ्या सख्ख्या बहिणी, मग दोन रूममेट( ज्या एकमेकींच्या बहिणी आहेत), माझी सखी हे सगळेच.
खेळकर भाऊ म्हणजे मात्र राग केदार. बाकी काही समजत नाही मला, पण "हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत" या परिवारातला म्हणून भाऊ. आणि तोही माझा लाडका आहे. Happy

सगळ्यांचे मनापासून आभार. __/\__

मी वर जी दोन गाणी संदर्भात दिली आहेत त्याचीपण कारणं आहेत. भय इथले.. हे पहिलं. मी दहावीत असताना "महाश्वेता" कादंबरीवर आधारित मराठी मालिका सुरू झाली त्याचं हे शीर्षकगीत. ते सुरू झालं की काहीतरी भारी गूढ पण छान वाटायचं. म्हणजे गूढ असूनही नकारात्मक नव्हतं ते. आणि तेव्हा तर यमन माहिती नव्हताच. पण ग्रेस माहिती होते, आणि मंगेशकर नावातली जादू माहिती होती. नुसती कविता म्हणून समोर आली असती तर ही रचना समजलीच नसती, पण त्या चालीतलं, सुरावटीतलं चुंबकत्त्व आपल्याला खेचून घेतंय हे जाणवलं होतं.
दुसरं गाणं, "मागे उभा मंगेश..." हेही मी कॅसटवर अनेकदा ऐकलं होतं, मूळ आशाताईंचंच. मग समजलं की ते "महानंदा" या सिनेमात आहे. आणि तो सिनेमा मंगेशीच्या देवळाच्या परिसरात घडतो, एका देवदासीच्या आयुष्यावर आहे वगैरे... माझी माहेरची कुलस्वामिनी महालसा नारायणी, मंगेशी संस्थानच्या पुढे १-२ किलोमीटरवर म्हार्दोळचं श्री महालसा संस्थान. तिथेही मी दहावीनंतरच्या सुट्टीत गेले होते. दर रविवारी देवीची पालखी असते. देवळाच्या भोवती ठराविक मार्ग आहे तिथून पालखीची एक प्रदक्षिणा असते आणि पालखी पुन्हा मूळ सभामंडपात येते. दर थोड्या अंतराने पालखी थांबणार आणि तिथे दोघी आज्या देवीस्तवन म्हणणार अशी तिथली पद्धत. त्या दोघी आज्या फार गोड आवाजात, कोकणी-मराठी मिश्र पद्धतीची स्तवनं म्हणत असत. दरवेळी त्याच दोघी असत. मी आईला सहज विचारलं, की त्या संस्थानातच पूर्ण वेळ असतात का? तर आई म्हणाली, "त्या देवदासी आहेत." मी अवाक झाले! पण मग "पूर्वीसारखं नाहिये आता, पण त्या मूळ देवदासीच्या कुटुंबातून आल्या. आता सगळं नीट आहे, त्यांचं कुटुंब चांगलं आहे, मुलंही काहीतरी नोकरी करतात.." मला बरं वाटलं, पण विचित्र वाटत राहिलं. इतिहासात वाचून "सतीची प्रथा बंद" " देवदासी प्रथा बंद" इतकंच माहिती होतं. त्याला हा सरळ छेद गेलेला पचत नव्हता. पालखी झाली की तासभर रिकामा वेळ मिळायचा त्यात मग वेलिंगची शांतादुर्गा, मंगेशी किंवा मग बसने गोपाळ गणपती अशी एखादी चक्कर मारून यायची असा आमचा शिरस्ता. त्या दिवशी मात्र आम्ही कंटाळलो होतो. मग मी एकटीच देवळमागच्या नुपूरतळीपाशी बसले. (गोव्यात प्रत्येक देवस्थानाचं स्वतःच तळं असतं आणि त्यात त्या त्या देवाच्या विशेष सण-उत्सवाच्या दिवशी नौकाविहार असतो. देव आपल्या कुळांना- म्हणजे आम्हा कुटुंबांना- वर्षभर सांभाळतात, दानवांशी युद्ध करून सामान्यांचं जिणं सुकर करतात म्हणून देवांचा नौकाविहार हे कल्पनाच किती रम्य आहे!) तर त्या तळ्यापाशी बसले असताना नेमकी कोणाच्यातरी वाडीतून स्पीकरवरची गाणी ऐकू आली. माझ्यापर्यंत तो आवाज हळूच होऊन येत होता, पण नेमका मंगेशीच्याच दिशेने येत होता आणि गाणंही "मागे उभा मंगेश..' हेच होतं! आता या गाण्याचा अर्थच बदलला होता माझ्यासाठी. कारण गाण्यातही देवदासी असलेल्या दोघी मंगेशासमोर नृत्यसेवा सादर करत असतात. मला या दोन आज्यांचं गाणं आणि सिनेमातलं त्या दोघींचं नृत्य हे सगळं नीट आ़कळायला वेळ लागला. पण एकदा ते सूर मनात खूप पोचले आणि मग मात्र दोन्ही आज्यांकडे मी निर्मळ नजरेने बघू शकले.
असे खूप प्रसंग आहेत ज्यात अवचित कधीतरी, मी एकटीच असतानाच यमनाचे सूर भेटून गेलेत आणि गढुळलेलं मन निवळलंय!
सखी आणि मी जेव्हा बोलायचो तेव्हा अनेक विषय असत. मत्स्यगंधा सत्यवती आणि पराशर हा जिव्हाळ्याचा विषय. पराशर जबाबदारी झटकून गेले..सगळे पुरुष असेच... मग पुढे काहीही का महाभारत (इथे तर व्यास जन्मले आणि शब्दशः महाभारत!) होईना... असं कायकाय राग काढत बसलो होतो. पण "देवाघरचे ज्ञात कुणाला'' हे कसं आवडतं? "नको विसरू संकेत मिलनाचा" म्हणणारे पराशर हिमालयाचा मी तो यात्रिक" म्हणून हात वर करून मोकळे होऊच कसे शकतात हे आमच्या पटण्यापलिकडलं होतं. पण अगदी हल्लीच समजलं, की ती चाल यमनातली आहे म्हणून मुद्दा अजिबात नाही पटला तरी देवाघरचे ज्ञात कुणाला हे ऐकून तरी घ्यावंसं वाटलं! ते कसं आवडलं याचं उत्तर मिळालं. अशी खूप भली-बुरी उत्तरं देऊन 'त्या'ने मला घडवलंय. म्हणून ही नवी पोस्ट पुन्हा लिहिली.

बाकी, त्याच्याबद्दल जेव्हा मनात काहीही विचार येतो, मी डोळे मिटून घेते, तेव्हा एक शांत निळाई आठवते आणि अलगद फिरणारं मोरपीस डोळ्यासमोर तरळून जातं!

म्हार्दोळचं श्री महालसा संस्थान....yes मीही एकदा ही पालखी पाहिली होती.पालखीपुढे दोघीजणी नाचत होत्या.बाकी वाद्यांचा गोंगाट बराच असल्यामुळे शब्द ऐकू आले नाहीत.पण त्यांना तसे वागवले जाते हे पाहून विचित्र वाटले होते.
अवांतर लिहिलं आहे.

मार्दोळ ही आमची पण देवी. ह्या अशाच प्रकारातून "खरा वारस कोण" असा वाद होऊन तो हायकोर्टात गेला आणि देवळाला कोर्टाच्या आज्ञेने कुलूप ठोकले गेले. मला हे काही माहित नव्हते. मी आपला देवीच्या दर्शनाला म्हणून गेलो ,तर बाहेरूनच दर्शन घेऊन मग आमच्या पुरोहितांकडे गेलो. खेडेकर त्यांचे नाव. त्यानी हा सर्व कटू प्रसंग सांगितला. वाईट आहे हे सगळे.

मी सगळा लेख व्वाचला. संगीत काळजाला भिडते. का कसे वगैरे कुणी समजावून सांगितले तर अजून आनंद वाटतो. पण त्याची गरज पडली नाही . मत्स्यगंधातली रामदास कामत आणि आशालता बाईंंचे "गर्द सभोती... कैक वेळा ऐकली आहेत.
आज ह्या लेखा मुळे नवा अर्थ समजला.

असं नका म्हणु हो Light 1 . इथे प्रतिसाद दिलेल्या बाकी सगळ्यांना कळते असे वाटते याने, पण आधी प्रतिसाद दिलेल्यात मी पण आहे न कळणारा. दोन तीन राग माहित आहेत, आणि काही शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते एवढेच.

आमच्या शेजारच्या एक काकू पेटी शिकायला लागल्या. मग कधी पेटी घेउन आमच्या घरीही बैठक व्हायची. तेव्हा मी सा रे ग म वाजवायला आणि दोन तीन गाण्यांची सुरवात वाजवायला शिकलो. त्या भूपाली शिकत होत्या ते ऐकुन "इतना जोबन पर मान न करिए" वाजवायला शिकलो. मग हॉस्टेलला दुसर्‍या वर्षाला अकोल्याच्या एका ग्रुपने पेटी, तबला, बासरी वगैरे आणले आणि रात्री तिथे हौशी कलाकारा सिने संगीतासाठी जायचे. पण त्यातील काही मित्र शास्त्रीय संगीत शिकत होते. तेव्हा एक दिवस " नि रे ग रे ग रे, ग मं प मं ग रे सा" असे म्हणत पेटी वरील सूर ऐकु आले. तो जे म्हणत वाजवत होता ते पूर्ण ऐकुन छान वाटत होते. मग कळले की हा यमन (त्यातला उप प्रकार वगैरे माहीत नाही.). मग मी पण वाजवतो म्हटल्यावर मित्राने आनंदाने (त्याचं नाव ही आनंद) शिकवले व वरील सूरात म तीव्र आहे हे सांगितले. एवढे शिकलो आणि ते वाजवता वाजवता मौसम है आशिकाना हे डोक्यात वाजलं. त्याची सुरवात वाजवायला लौकर जमले, मग मी ते गाणं वाजवायला शिकायच्या मागे लागलो. मग निगाहे मिलाने को, पान खाए सैया हमारो, जिया ले गयो जी .. वगैरे जमेल तसे वाजवून झाले आणि आता आपण सुद्धा शास्त्रीय शिकायचे ठरवले पण शास्त्रीय म्हणजे काय हे नीट कळले नव्हते. मनातल्या मनात आपण "मन राम रंगी रंगले, उगवला चंद्र पुनवेचा, तुम गगन के चंद्रमा हो" ही गाणी अस्खलीत वाजवत आहोत आणि आई बाबा आजी आजोबा "वा! वा!" करत आहेत असे चित्र डोळ्यापुढे येउन मी मनातले मांडेही खाल्ले. त्या मित्रांसोबत मग मी सुद्धा क्लास लावला. पण महिना पूर्ण होण्याच्या आतच त्याकाळच्या नेहमीच्या अपरिहार्य कारणामुळे सोडावा लागला. त्यानंतर असाच एकदा हंसध्वनी आवडला.
या पोस्टमध्ये लिहिलंय तेवढंच माझं शास्त्रीय संगीताचं (अ)ज्ञान. बाकी याला अमुक राग म्हणतात वगैरे अधुन मधुन कळते आणि विसरुनही जातो.

छान लिहिलंय मानव.

त्याकाळच्या नेहमीच्या अपरिहार्य कारणामुळे >> Lol

किती सुंदर लिहीलंयस प्रज्ञा.

स्वातीचा प्रतिसादही आवडला.
.... प्रत्येकाचा 'आपला' आपला एक राग असतो असं मला नेहमी वाटत आलंय. नुसता आवडता नाही, तर आपल्या फ्रीक्वेन्सीशी रेझोनेट होणारा, तू लिहिलंयस त्याप्रमाणे आपल्याशी संवाद साधणारा.

>>>> तसं असेल तर माझे राग 'मारवा' आणि 'पुरीया धनाश्री'.

इतर प्रतिसादही छान आहेत.

मानव Happy
यमन डोंबिवली, यमन टिटवाळा एव्हढेच उडत उडत कानी पडले आहे.

मालधक्का इथे कुणी कंसराज जो राग काढतो तो मालकंस.

लोणी काढताना एका रवीनं ते घुसळतात आणि दुसरा रवी वर आलेल्या लोण्याच्या भांड्याच्या बाहेरून हळू फिरवतात. त्याला बाह्य रवी म्हणतात.
याचेच पुढे बहिरवी आणि मग भैरवी झाले. पाच तालात गायले तर पा(च) ताल भैरवी. यात च्चं सायलेंट आहे.

Pages