अखंड भक्ती : भाग १

Submitted by शब्दब्रम्ह on 22 April, 2024 - 05:49

।। राम कृष्ण हरी।।

" यशापयशाच्या विचारांचा पूर्णपणे त्याग करून हे अर्जुना तू तुझे कर्म कर. या पृथ्वीचे अखंड राज्य मिळवण्यासाठी अथवा सती द्रौपदीला न्याय मिळवून देण्यासाठी अथवा युधिष्ठिराला राजसिंहासनी बसवण्यासाठी हे धर्मयुद्ध लढूच नकोस मुळी, फक्त मी सांगतोय म्हणुन, फक्त माझी आज्ञा आहे म्हणून, हे धनंजया तुझे कर्तव्य निभावण्यासाठी तू हे युद्ध कर अन्यथा हे अनघ अर्जुना तू नाहक अधम गतीला प्राप्त होशील, येणाऱ्या हजारो पिढ्या तुला शौर्यहीन ठरवतील. इंद्रालाही लाजवणारे पराक्रम करणाऱ्या तुझ्या महान धर्मनिष्ठ भरतादी पूर्वजांच्या पुरुषार्थावरचा तू कलंक बनशील.”

रखरखत्या कुरुक्षेत्रावर घनश्याम श्रीहरी आपले नीलकमलासारखे नेत्र ढळलेल्या अर्जुनावर रोखून, गांडिव गळालेल्या, धीर सुटलेल्या, भयभीत झालेल्या कुंतीपुत्राला कर्मयोगाचे गंभीर रहस्य सांगत होते.

सारी सृष्टी जीवाचा कान करून ते अद्भुत रहस्य ऐकत होती. आकाश घुसळणारा चंचल वायु सुद्धा स्तब्ध राहून भगवंतांचा शब्द न शब्द टिपत होता.

मग जलपूर्ण मेघाप्रमाणे कांती असलेल्या भगवंतांनी दोन्ही पक्षाच्या सैन्यांमध्ये मेरू पर्वताप्रमाणे उभे राहून आपल्या दुदुंभीसम गंभीर आवाजात मोठ मोठी अगम्य रहस्य खुली करायला सुरवात केली. प्रकृती, पुरुष, ब्रम्ह, माया, मोक्ष, भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, दैवी गुण, राक्षसी गुण, सत्व, रज, तम, यज्ञ ,दान, तप, सत्य, अहिंसा,निरहांकार, कर्मबंधन, धर्म, अधर्म, वैराग्य, वेद, नाना दिव्य लोक, पुण्यकर्म, पापकर्म, यज्ञकर्म, धर्मकर्म,आदी सगळं सगळं सांगून भगवंतांनी अवघ्या ब्रम्हांडीच्या ज्ञानराशी त्या कुरुक्षेत्रावर मुक्तहस्ते रित्या केल्या. या साऱ्या नाना धर्मांचा उपदेश केल्यानंतर भगवंतांनी त्या अथांग ज्ञानसागराचं सार काढून धनंजय अर्जूनासमोर अंतिम निष्कर्ष ठेवला,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।(18.66)

“ हे कुंतीपुत्रा, मी तुला आता ज्या ज्या धर्माचा उपदेश केला ते सर्व विसरून जा.

विसरून जा धर्म अधर्म प्रकृति पुरुष स्वर्ग नरक अन् पाप पुण्य. विसरून जा तप, दान, यज्ञ, शास्त्र, अन् नाना तर्क. विसरून जा चार युगं, चार वर्ण, चार वेद अन् चार आश्रम. आणि विसरून जा सत्व, रज, तम, ब्रम्ह, माया, आणि आत्मज्ञान. विसरून जा कर्म, अकर्म, दम, नियम सारं सारं काही. आणि सगळ्या जगताचा आश्रय सोडू फक्त मला शरण ये.

मला तुझी सर्व कर्मे अर्पण कर. मला परमलक्ष्य जाण, फक्त माझं चिंतन कर, माझी अनन्य भक्ती करून माझ्याशी अखंड एकरूप हो तुझं सर्वस्व मला अर्पण कर, मी तुझी सर्व पापांपासून मूक्ती करीन. मी जाळून टाकीन तुझी समस्त पापकर्मे, दुःख यातना भय अन् शोक आणि देशोधडीला लावेन तुझ्या गर्भयातना अन् पातकांना. फक्त मला शरण ये माझ्या वैकुंठतुल्य चरणांवर तुझं डोकं ठेवून त्यांना उराशी घट्ट धरून ठेव. माझ्या भक्तीच्या अथांग सागरात आकंठ बुडून जा मी म्हणायला तुझं स्वतःचं अस्तित्व शिल्लक ठेऊच नकोस. अखंड समर्पणाने माझ्याशी एकरूप हो.”

गीतेमध्ये भगवंत अनेक ठिकाणी अर्जुनाला सांगतात कि निष्काम कर्म कर, निष्काम कर्म कर, पण प्रश्न असा पडतो की निष्कम कर्म करायचे म्हणजे काय? तर वरच्या श्लोकात भगवंतांनी म्हटल्या प्रमाणे मनुष्याने भगवंतांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे आपली सर्व कर्मे त्यांना अर्पण केली पाहिजेत पण हे करायचं कसं? आपण हे तुकोबांच्या एका अभंगातून समजून घेऊ. तुकोबा म्हातात :

पाषाणाचे पोटीं बैसला दुर्दुर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥ पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥2॥ तुका ह्मणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥3॥

‘तर या जगताचा एकमेव आधार म्हणजे भगवंत. या चराचराचा गाडा हाकणारा तो म्हणजे भगवंत, चिमणीला चोच देण्याआधी दाण्याची व्यवस्था करणाराही भगवंतच. बेडूक जमिनीखाली, पाषाण म्हणजे खडकामध्ये दगडांच्या लहान कपारींमध्ये दिर्घकाळासाठी राहतो पण त्याही दुर्गम भागात आणि अगदीच खडतर परिस्थितित दिर्घकाळासाठी राहूनही बेडूक कधीच उपाशी मरत नाही. पक्षी कधीही ‘’ उद्या मला, माझ्या पिलांना चारा मिळेल का? याची काळजी करत नाहीत पण तरीही भगवंत त्यांना उपाशी ठेवत नाही अगदी अजगरही अन्न शोधण्यासाठी फिरत नाही तो एकाच ठिकाणी आपला जबडा उघडून बसतो आणि त्यात जो प्राणी प्रवेश करेल त्याचे भक्षण करून आपलं पोट भरतो. पण आजपर्यंत भगवंताने त्यालाही कधी उपाशी ठेवलं नाही. मग जर असा हा कृपाळू भगवंत जर या अवाढव्य सृष्टितल्या प्रत्येक जीवाची काळजी घोत असेल तर मग मी ही जर माझा भार त्याच्यावर सोपवला तर त्याला माझं ओझं थोडीच होणार आहे?

प्रचंड गोवर्धन आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर धुळीच्या कणाप्रमाणे धारण करणाऱ्या भगवंताला मज क्षुद्राचा भार थोडीच जड होणार आहे? म्हणून तुकोबा म्हणतात जर त्या भगवंताला पूर्णपणे शरण जाऊन म्हणजे आपल्या सर्व चिंता, काळज्या, समस्या, त्याच्या चरणावर वाहून अनन्य भावाने फक्त त्याची भक्ती केली तर माझा दयासिंधू भगवंत मुळीच कोणाचीही उपेक्षा करत नाही.’ पण असं समर्पण करायला सुद्धा त्या भगवंतावर अखंड विश्वास असावा लागतो त्याच्या चरणाशी दृढ निष्ठा असावी लागते. “ भक्ती ,वैगरे काय तरुणपणात करायच्या गोष्टी आहेत? म्हातारपणात बघू.” अशांच्या हातून असे समर्पण मुळीच शक्य नाही.

खरंतर द्युतसभेतल्या द्रौपदी समान आपली कायम अवस्था असते आपण ज्या आपल्या सग्यासोयऱ्यांना आपलं आपलं म्हणत असतो ते आपले आपले म्हणणारे काही काळा नंतर त्यांच्या फायद्यासाठी आपला वापर करून घेतात त्यांच्या फायद्याच्या जुगारात आपल्याला डावावर लावतात आपल्यासाठी सर्वस्व असणाऱ्या आपल्या इच्छा, आपला लोभ, मोह, लालसा, क्रोध आदि कधी ना कधी आपले वस्त्रहरण करतातच अन् आपण आकांत करत राहतो पण अजूनही आपल्याला आपल्या भगवंताची आठवण होत नाही आपण आपल्या जवळच्या माणसांकडून मदतीची आपेक्षा करतो त्यांनीही हात वर केले की मग कशीबशी आपली वस्त्रं आपल्या हातांनी धरून ठेवण्याचा आटोकाट निर्थक प्रयत्न करतो, पण तरीही त्या भगवंताचे स्मरण करत नाही. शेवटी स्वतःचीही शक्ती संपली, सगळे मार्ग खुंटले की मग ‘शेवटचा मार्ग देवाचा ’ म्हणून भगवंताला साद घालतो तेव्हा तो चक्रपाणि क्षणाचाही विलंब न लावता धावत येतो आणि आपल्या उध्वस्त होण्यापासून आपल्याला वाचवतो.

पण शोकांतिका तर त्या लोकांची आहे जे शेवटपर्यंत त्याला साद घालत नाहीत अन् देशोधडीला लागून आपलं जीवन संपवतात. असो.

पण असं गरजेपुरतं भगवंताला साद घालून द्रौपदी होण्यापेक्षा सदासर्वदा त्यालाच समर्पित होवून, त्याच्या चरणांवर दुढ निष्ठा ठेऊन त्याला शरण जाणारा भक्तरत्न प्रल्हाद का होवू नये? द्रौपदीप्रमाणे अगदी शेवटी आणि कामापुरतच भगवंताला शरण गेलात तर त्याआधी तुम्हाला फरपटलं जाईल, यातना सहन कराव्या लागतील पण जर प्रल्हादाप्रमाणे तुम्ही सदैव त्याच्या चरणाशी समर्पित राहिलात तर तो तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मग ते तुम्हाला तेलाच्या कढईत टाकोत अथवा कड्यावरून फेकून देवोत.

म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्पण.

समर्पण म्हणजे आपला सगळा भार भगवंतावर टाकून सर्व चिंता, काळज्या, व्यथा,गरजा त्या भगवंतावर सोपवून फक्त त्याची भक्ती, स्मरण, चिंतन करत राहणे. आणि फक्त एवढंच करणे तेही आपल्या भल्यासाठी काही खूप मोठं काम थोडीच आहे?

।। राम कृष्ण हरी ।।

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

छान ओघवत लिहिलय

>>>> मला तुझी सर्व कर्मे अर्पण कर. मला परमलक्ष्य जाण, फक्त माझं चिंतन कर, <<<<
यातील पहिले विधान, माझ्या सत्य निष्ठतेमुळे मला शक्य नाही,
दुसरे विधान.... परम लक्ष्य, पण सांसारिक भौतिक कर्तव्याण्मुळे ते देखिल शक्य नाही
तिसरे विधान... तुझेच चिंतन.... ते शक्य आहे, करतो आहे, इतकेच काय, रोजच्या जेवणातील स्वादिष्ट घास चावता येत नसताना चघळून चघळून खाताना, त्यातील चवही , हे देवा, तुलाच अर्पण!, बाकी सर्व सुखेही तुझीच!

>>>> माझी अनन्य भक्ती करून माझ्याशी अखंड एकरूप हो तुझं सर्वस्व मला अर्पण कर, <<<<
हे जरा जास्तच होत नाही का? असेच जर आहे, तर मला निर्माण तरी का केलेस? तुझ्याशी एकरुप आहेच, प्रत्यक्षात माझ्या हृदयाचे प्रत्येक स्पंदन, तुझ्याच एकरुपतेमुळे होते आहे! पण स्वतंत्र मानव म्हणून मला जन्माला घातल्यानंतर, सर्वस्व अर्पण करुन घेण्याचा हा कुठला तुझा
अतिरेकी हट्ट ?
पण आतुन मला माहीत आहे, माझ्या देहातील अब्जावधी पेशी, त्यांचे ज्ञान, त्यांच्यातील चेतना, ही केवळ तुझीच करामत आहे, तेव्हा हे देवा, हा देहही तुझीच देणगी आहे, हे मला मान्य आहे... इतकेच नाही, जेव्हा जेव्हा मी जीवावरच्या संकटातून वाचलो आहे, तेव्हा तूच माझ्या आगेमागेपुढे माझ्यातही होतास ....!
पण मग केवळ मानवी मनातील "मृत्युची भिती घालविण्याकरीता हे तत्वज्ञान आहे का?"
तरीही असोच , तूच दिलेल्या दैहिक बुद्धिमत्तेच्या सहाय्याने मी याची उत्तरे शोधुन काढीन.

तुमच्या शंका तुम्ही मोकळे पणाने मांडल्या हे पाहून छान वाटलं.

मला तुझी सर्व कर्मे अर्पण कर. मला परमलक्ष्य जाण, फक्त माझं चिंतन कर,यातील पहिले विधान, माझ्या सत्य निष्ठतेमुळे मला शक्य नाही,

का शक्य नाही? कोणत्या सत्यानिष्ठ्तेची गोष्ट करताय तुम्ही? जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुमच्या मते त्याचं अस्तित्व हे सत्य असलंच पाहिजे. आणि वेदांमध्ये उपनिषादांमध्ये भगवंताला परमसत्य म्हटलं गेलंय, आणि जर तुम्ही सत्यनिष्ठ असाल तर हे तर परमसत्य आहे याच्या बाबतीत तर तुम्ही परम निष्ठावान असले पाहिजे.
परम लक्ष्य, पण सांसारिक भौतिक कर्तव्याण्मुळे ते देखिल शक्य नाही.
का शक्य नाही? शास्त्रांनुसार हीच मानसिकता मनुष्याला अडकवून ठेवते. आणि भगवद्गीतेत भगवंत असं म्हणत नाहीत की मला परमलक्ष्य मान, ते म्हणतात मला परमलक्ष्य जाण. प्रत्येक जीवाचे परमलक्ष्य ते आहेतच, फक्त आपण ते जाणायचे आहे. नाहीतर आपलं हे आयुष्य जेमतेम ८० वर्षांचं पण त्यानंतर काय? या विश्वाची उत्पत्ती होवून अब्जावधी वर्ष झाली तेव्हा आपण कुठे होतो? आणि आपल्या मृत्यूनंतर ही अब्जावधी वर्षे हे विश्व असेल तेव्हा आपण कुठे असू? आणि जर एकदा नीट विचार केला तर लक्षात येईल की आपल्या जन्मा आधीची अब्जावधी वर्षे आणि आपल्या मृत्यूनंतर ची अब्जावधी वर्षे या दोघांच्या मध्ये असणारं आपलं उणंपुरं 70- 80 वर्षांचं आयुष्य म्हणजे अगदीच तोकडा काळ आहे. पण या 70-80 वर्षांच्या उण्यापुऱ्या काळामध्ये आपण काय करतो याच्यावर आपलं पुढचं अब्जावधी वर्षांचं भविष्य कसे असेल हे ठरतं. खरंतर या गोष्टी मी तुम्हाला कितीही सांगितल्या तरी तुम्हाला त्या बाष्कळच वाटणार हे सहाजिकच आहे मला सुदधा असं कोणी सांगितलं तरी ते बाष्कळच वाटायचं पण नंतर मी स्वतः सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मी स्वतः धर्मग्रंथांचं अध्ययन केलं आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या गोष्टी मला पटू लागल्या अशाप्रकारे काय खरं काय खोटं याचा शोध प्रत्येकाने आपला आपणच घ्यायचा असतो दुसऱ्याने ते सांगून ते मनाला मुळीच पटत नाही.