नाचणीच्या इडल्या

Submitted by वावे on 19 April, 2024 - 09:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) - दोन वाट्या
उकडा तांदूळ - दोन वाट्या
उडीद डाळ - एक वाटी
मेथीचे दाणे- अर्धा चमचा
चवीनुसार मीठ.

नेहमीच्या इडल्यांसाठी मी एक वाटी उडीद डाळीला चार वाट्या तांदूळ घेते. काही वर्षांपूर्वी आमच्या समोर एक तमिळ कुटुंब रहात असे. त्या काकूंच्या हातच्या इडल्या 'आहाहा' कॅटेगरीतल्या होत्या. सोबत चटणी किंवा सांबार, काहीही घेतलं नाही तरीही अतिशय चविष्ट लागायच्या. त्यांनी हे प्रमाण एकदा सांगितलं होतं आणि मी निष्ठेने (आणि प्रयोग करण्याच्या आळसाने) वर्षानुवर्षे याच प्रमाणाने इडल्या करते. Happy माझ्या अर्थातच त्यांच्यासारख्या भारी होत नाहीत, पण नक्कीच चांगल्या होतात. त्यांच्याकडे वेट ग्राईंडर होता, माझ्याकडेही आहे. डाळ-तांदूळ वाटून ठेवले की त्याच पिठाचे एकदा डोसे, एकदा इडल्या, पीठ उरलंच तर उत्तप्पे करते. डोशासाठी आणि इडलीसाठी वेगवेगळं प्रमाण घेण्याचे कष्ट घेत नाही. Happy डोसे-इडल्या दोन्ही छान होतात.
मात्र वाटलेलं पीठ मुळातच वेगवेगळ्या प्रमाणात पाणी घालून वेगवेगळं ठेवते. म्हणजे डोशासाठी जरा पातळसर करून एका भांड्यात, इडलीसाठी जरा घट्ट दुसऱ्या भांड्यात.
तुम्ही मिक्सरमध्ये डाळ-तांदूळ वाटत असाल आणि वेगळं प्रमाण घेत असलात तर तसंच घ्या. फक्त तांदूळ नेहमी जेवढे घेत असाल त्याच्या निम्मे घेऊन उरलेली नाचणी घ्या.
याचेच डोसेही छान होतात.

क्रमवार पाककृती: 

तुम्ही नेहमी इडल्या करत असलात तर कृतीत नवीन काहीही नाही. Happy

डाळ, तांदूळ, नाचणी वेगवेगळ्या भांड्यात भिजवून ठेवायचे. त्यातल्याच एका भांड्यात मेथीचे दाणेही घालून ठेवायचे. मी पाच तास ठेवते. तुम्ही नेहमी जेवढा वेळ ठेवता तेवढा वेळ ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे वाटून घ्यायचं. मी तांदूळ आणि नाचणी एकत्र वाटते. त्यामुळे नाचणी चांगली वाटली जाते.
सगळं वाटून झालं की नीट एकजीव करून, चवीनुसार मीठ घालून फुगण्यासाठी ठेवून द्यायचं. शक्यतो रात्री. म्हणजे सकाळपर्यंत पीठ छान फुगतं. नाचणीमुळे पीठ लवकर फुगतं असा माझा अनुभव आहे. शिवाय सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे पुरेशा मोठ्या भांड्यात पीठ ठेवलेलं चांगलं. नाही तर सकाळी उठल्यावर पीठ उतू गेलेलं दिसतं आणि वैताग येतो असा स्वानुभव आहे Happy
तर, पीठ पुरेसं फुगलं की डावेने हलक्या हाताने ते हळूहळू ढवळायचं. आतली थोडी हवा बाहेर जाते, पण पीठ चांगलं एकजीव, सरसरीत होतं. वाफवल्यावर इडल्या व्यवस्थित फुगतात. इडलीपात्रात पुरेसं पाणी घेऊन ते गरम करत ठेवायचं. इडलीच्या साच्याला प्रत्येक खळग्यात पुसटसा तुपाचा हात लावून त्यात पीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की स्टँड आत ठेवून झाकण लावून बारा-तेरा मिनिटं इडल्या वाफवायच्या. वाफेच्या वासावरून समजतं, इडल्या झाल्या की नाही ते. झाल्या की स्टँड बाहेर काढून, तिरका करून आत साठलेलं वाफेचं पाणी काढून टाकायचं. प्रत्येक ताटली वेगळी करायची. थोड्या गार झाल्यावर इडल्या काढून घ्यायच्या. चटणी किंवा सांबाराबरोबर खायच्या Happy
फोटोत टॉमेटो चटणी आहे. नीधपची कृती आहे इथे. तशी केली आहे.
IMG20240416085543 (1).jpg

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात चौघांसाठी एकदा डोसे आणि एकदा इडल्या पोटभर होऊन शिवाय एकदा उत्तपे होतात :-)
अधिक टिपा: 

मी एकदोनदा नाचणी आणखी आदल्या दिवशी भिजवून, मग मोड आणून ती डाळ आणि तांदुळाच्या बरोबरीने वाटून बघितलं. ते बहुतेक जास्त पौष्टिक असावं. पण मग टेक्श्चर बिघडलं. चिकट झालं प्रकरण.
वर लिहिलेल्या कृतीने छान मऊ होतात. नाचणीचा विशिष्ट गावरान स्वादही लागतो.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्फेक्ट कृती आहे.
पण इथे नाचणीचं पीठ मिळतं. नाचणी मिळते का बघितलं पाहिजे. डाळ-तांदूळ वाटताना त्यात पीठच घातलं तर? कोणी केलंय का असं?

छान पाककृती
करून बघण्यासासारखी आहे.
पहिल्या photo मधल्या बाळ इडल्या cute आहेत

आ हा हा...वावे...किती सुबक आणि देखण्या इडल्या आहेत..आणि पाहूनच छान आरोग्यदायी वाटत आहेत..

लगेहात त्या सांबरची पण रेसिपी द्या...

मस्त दिसताहेत.
मी डाळ तांदूळ वाटल्यावर नाचणीचं पीठ घालतो - भिजवायच्या आधीच्या डाळ तांदळाच्या पाव भाग. पण त्या इडल्यांत नाचणीचे कण कण वेगळे दिसतात.
इथे आरती यांच्या इडली दोशाच्या कृती आहेत. त्यात वाटताना जाड पोहे घालायचे . ती सूचना पाळू लागल्यापासून इडल्या मस्त हलक्या व सच्छिद्र होऊ लागल्या.

छानच दिसतायत... हे प्रमाण वापरून नक्की करून बघते, आणि अनायसे नाचणी ही घरात आहेच आणायला नकोय.

मस्त दिसतायत इडल्या!
>>डाळ-तांदूळ वाटताना त्यात पीठच घातलं तर? कोणी केलंय का असं?>>
मी तांदूळ न वापरता नाचणीचे पीठ आणि उडदाची डाळ वापरते. प्रमाण १/३ कप उडीद डाळ+ १/२ चमचा मेथ्या : १ कप नाचणी पीठ

मस्त लुसलुशीत दिसताहेत इडल्या! इडल्या दिसल्या की पुढच्या आठवड्यात करणे मला भागच पडते. नाचणी पीठ वापरून पाहीन.

इथे मी आरती यांचा धागा फॉलो करते. शिवाय मला वाटते मी पुणेकर यांची स्टील कट ओट्स इडल्या रेसीपी ही पुष्कळ वेळेस करते.

धन्यवाद सगळ्यांना!
किल्ली, हो त्या बारक्या इडल्या क्यूट दिसतात. चौकोनी इडलीही आहे त्या ताटलीत.
स्वान्तसुखाय, सांबाराची काही वेगळी रेसिपी नाही माझी. Happy
अश्विनी, साधा तांदूळही चालतो. पूर्वी माझी आई इडल्या करायची तेव्हा साध्याच तांदुळाच्या करायची. त्याही चांगल्याच लागायच्या. आता तुलना करण्याइतकं आठवत नाही, पण उकड्या तांदुळाच्या जास्त चांगल्या होतात असं वाटतं.
भरत, हो, मीही आठवण झाली तर पोहे भिजवून घालते कधीकधी.
ममो, नक्की करून बघा. (मी लिहिलेली पाकृ तुम्ही करून बघणार म्हणजे मजाच आहे Lol )
अमित, आता नाचणी पीठ वापरून केलेल्या इडल्यांचा फोटो येऊ दे!

वेट ग्रायंडर वर वाटुन पिठ फुगत ठेवलेय.. अख्खि नाचणी वापरली तर तिचे साल्पट वाटले जात नाही, लाल ठिपके पिठात दिसतात. मीही आरतीची रेसिपि फॉलो करते, पोहे वाटताना भिजवुन घालते. इडल्या मस्त मऊ होतात.

उद्या इडल्या होतील

छान सुबक दिसताहेत..
इथे सकाळी वॉकला येणाऱ्या हेल्थ कोंशिअस लोकांमध्ये फेमस आहेत.. मी कधीच घेतली नाही. कारण मला मुळात पांढरी इडलीच फार आवडतं नाही. मी मेडूवडा घेऊन बाजूला होतो. पण इतर लोकं पांढरी सोडून नाचणी इडलीच जास्त घेतात हे बघून आदर वाटतो

>>पांढरी सोडून नाचणी इडलीच जास्त घेतात हे बघून आदर वाटतो>>
मला तांदळाच्या इडलीपेक्षा नाचणीच्या इडलीची चव आवडते. नाचणीला स्वतःची अशी एक चव आहे .

नाचणीला स्वतःची अशी एक चव आहे >> +१
किट्टु२१>> बॉइल्ड राईस किंवा इडली राईस नावाने मिळतो तो उकडा तांदूळ. पेजेसाठीचा कुठला म्हणताय तो लक्षात नाही आला. कण्या का? कण्या वेगळ्या.
साधनाताई, तांदूळ आणि नाचणी एकत्र वाटली की चांगली वाटली जाते नाचणी.
बाकी सगळ्यांना धन्यवाद Happy

छानच झाल्यात इडल्या.

वावे तळकोकणात बरेच जण पेजेसाठी लाल किंवा पांढरा उकडा तांदूळ वापरतात असं ऐकून माहिती आहे. आमच्याकडे सासरी देवगड साईडला हातसडीचा लाल तांदूळ वापरतात, उकडा वापरत नाहीत. माहेरी संगमेश्वर तालुक्यात नेहेमीच्या पांढऱ्या तांदूळ (कण्या) वापरतात. माहेरीही उकडा नाही वापरत.

अरे वाह!! सुंदर दिसतायत! चिंटू इडल्या तर भारीच !!
मला आधी वाटले ती चौकोनी इडली चुकून तशी दिसतेय म्हणजे आजूबाजूचे extra पीठ लागल्यामुळे! पण साचाच चौकोनी आहे तर !!?

मलाही असे ठिपके दिसलेले आवडत नाहीत. सालपटं तोंडात लागतात!
त्यामुळे पिठाचा वापर करुन करुन पाहीन.

आणि पूर्णच नाचणीची इडली करायला हवी ना...तर ती नाचणीची इडली.....!!
तांदूळ नको ना डायबेटीस वाल्यांना!

Pages