पाकिस्तान-८

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 15 March, 2024 - 11:19

“आम्ही काश्मीरसाठी हजार वर्षे लढू. आम्हाला गवत खावे लागले तरी चालेल. आम्ही अणुबॉम्ब बनवू.”

- झुल्फिकार अली भुट्टो.

युध्द सैन्याला नाही तर राजकारणाला हवं असतं. अयुबखान येताच युद्धाची शक्यता दिसू लागली. अखेर पाकिस्तानात लष्करी राजवट आली होती. पण जवळपास दशकभर मोठे युद्ध झाले नाही. संधी होत्या, तरीही झाले नाही. असू शकतं की अयुब खान अमेरिकेकडून पुरेश्या शस्त्रांचा जुगाड करत असेल त्यामुळे झाले नाही किंवा अमेरिकेने त्यांना रोखल्यामुळे झाले नाही. पण एका सैनिकाला दहा वर्षे काश्मीर जिंकावेसे वाटले नसेल का? युद्ध लढावेसे वाटले नसेल का? सैन्य हात बांधून कसे बसेल?  
    झुल्फिकार अली भुट्टो नसते तर कदाचित पुढेसुध्दा युद्ध झाले नसते. त्यांना पाकिस्तानातील लोकशाहीचा मसिहा म्हटले जाते तरी भारतासोबतच्या चिरंतन लढ्यातील त्यांची बुध्दी नाकारता येणार नाही. तेल-खनिज खात्यानंतर अयुब खानांच्या सरकारात परराष्ट्रमंत्री होताच त्यांनी पद्धतशीरपणे या दिशेने साम दाम दंड भेद लावून प्रयत्न सुरू केले. ते नसते तर कदाचित पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, तसेच काश्मीर युद्धाच्या निमित्ताने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा बळी गेला नसता. आज जगात त्यांची प्रतिमा जागतिक नेत्यासारखी असूनही, कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला याबाबत विचारले असता, तो त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो. तरीही ते कायद-ए-आझमप्रमाणेच कायद-ए-आवाम म्हणवले जातातच. तेही मोहम्मद अली जिनांसारखेच शिया मुस्लिम होते आणि एके काळी त्यांचाही तसाच रूबाब होता. तेही सैनिक नव्हते, राजकीय व्यक्ति होते.
जर हा सिध्दांत बरोबर असेल की लष्कराला युद्ध नको असते राजकारणाला हवे असते तर राजकारण्यांनीच भारतावर नेहमीच राज्य केलेय. इथे तर सतत युद्धाचीच योजना चालू असायला हवी. मी भारताला या आरोपातून मुक्त करणार नाही. भारतानेही नियोजनबद्ध पद्धतीने युद्धाच्या हालचाली केल्या. तिकडे एक भुट्टो असेल तर इथेही अनेक भुट्टो होते. पाकिस्तानी ऊघडपणे सांगतात की भारताच्या “चालबाज” राजकारणानेच फाळणीत पाकिस्तानला न्याय्य वाटा दिला नाही, काश्मीरही बळकावले आणि पूर्व पाकिस्तानही तोडला.

कच्छच्या रणमधील भारतीय छावणीतील लोकांचे सांगतात की पाकिस्तान आपल्या सीमेहून पुढे सरकत होता. तर पाकिस्तानचे म्हणणे आहे की हा त्यांचाच भाग होता. जगातील सर्वात मोठ्या खारट वाळवंटांपैकी एक, हा परिसर ओसाड आणि निर्जन होता. फाळणी झाली तेव्हा या सीमेबाबत स्पष्टता नव्हती आणि कोणाला गरजही वाटली नाही. ती जमीन आहे की समुद्राचा भाग आहे हेही स्पष्ट नव्हते. संपूर्ण जगात अशा दलदलीचे विभाजन करणे कठीण असते जिथे भौतिक सीमारेषा काढणे शक्य नसते. दुर्दैवाने भारताच्या एका बाजूला सुंदरबन होते आणि दुसऱ्या बाजूला कच्छची दलदल आणि दोन्ही बाजूला होता पाकिस्तान.
.
पण भारत खरंच आपली चाल एक पाऊल पुढे ठेऊन चालत होता. 1956 मध्येच भारतीय सैन्याने उत्तरेकडील रण ताब्यात घेतले होते. फाळणीनंतर कराची बंदर पाकिस्तानात जाताच भारताने गुजरातमध्ये कांडला बंदर बांधले. तोपर्यंत पाकिस्तान या दलदलीला फारसे महत्त्व देत नव्हता. झुल्फिकार अली भुट्टो तेल आणि खनिज मंत्री असताना त्यांना कळले की कच्छच्या दलदलीत तेल आणि खनिजे आहेत. पण, तोपर्यंत ते भारताच्या हाती जाऊ लागले होते.   
.
सगळ्यात मोठी गोष्ट पाकिस्तानच्या लक्षात थोडी उशिरा आली. हे एकमेव ठिकाण होते जिथून नौदल, लष्कर आणि हवाई दल एकाच वेळी हल्ला करू शकत होते आणि कराचीला उर्वरित पाकिस्तानपासून एका झटक्यात तोडू शकत होते. ही गोष्ट तेव्हा स्पष्ट दिसली जेव्हा मार्च 1965 मध्ये आयएनएस विक्रांत कच्छमध्ये गेली आणि भारतीय लष्कराचे गुप्त ऑपरेशन 'ॲरो-हेड' सुरू झाले.
..
या संपूर्ण ऑपरेशनबद्दल लाल बहादूर शास्त्री हैदराबादमध्ये म्हणाले, "पाकिस्तान फक्त काही एकर जमिनीसाठी भांडण ऊकरून काढतोय… जर त्यांचे सैन्य पुढे सरकले, तर मग आपल्याला लढावेच लागेल.”
.
या वक्तव्यानंतर भांडण कोण ऊकरून काढतंय असा प्रश्न पाकिस्तानला पडला होता. हा सारा गोंधळ भारतानेच निर्माण केला आहे नी भारतीयच पुढे सरकले नी सिंधमध्ये घुसले असे त्यांचे म्हणणे होते.

अमेरिकन राजदूताकडून विधान आले, “ही लढाई अशी सुरू झालीय जशी एखाद्या शाळकरी मुलाने खेळताना दुसऱ्याला ढकलल्यावर सुरू होते.”
ब्रिटीश राजदूत म्हणाले, “हा मुद्दा गंभीर असला तरी कोणालाही एकाला दोष देता येणार नाही. पण, पूर्णपणे नसले तरी, सत्याचे प्रमाण भारताकडे झुकलेले दिसते. “

या संपूर्ण प्रकरणाचे मूल्यमापन अभारतीय दृष्टिकोनातून निरपेक्षपणे व वस्तुनिष्ठपणे केले, तर भारतीय मुत्सद्देगिरी ‘टाॅप क्लास’ मध्ये होती. कच्छ हे एक असे युद्ध होते ज्यात पाकिस्तानला ते जिंकले असे वाटते. पण युद्धबंदीनंतर संपूर्ण रणातील फक्त दहा टक्के पाकिस्तानात गेले, नव्वद टक्के भारतात आले.     
कदाचित भुट्टो यांची शंका बरोबर असावी. हे दलदल खरोखर तेलाचा खजिना असू शकते. बरं, त्या वेळी पाकिस्तानला वाटलं असेल की ही दलदली गेली तर गेली पण काश्मीर जिंकलं पाहिजे. झुल्फिकार अली भुट्टो यांनी एक नवीन हालचाल केली - ऑपरेशन जिब्राल्टर.
(क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझे चार आणे…

७ वर्षांच्या अयुबखानांच्या सत्ताकाळात पाकिस्तानची म्हणण्याजोगी काहीही प्रगती झाली नव्हती. त्यामुळे जनतेच्या समाधानासाठी काहीतरी लक्षवेधी करण्याची अयुबखानांची इच्छा होती. खरंतर काश्मिरवर हल्ला चढवायचा होता पण त्यापूर्वी भारताचा अंदाज घेण्यासाठी कच्छ व कारगिल येथे हल्ला चढवण्याची योजना आखली गेली.

कागदोपत्री कच्छ भारताचे असले तरी पाकिस्तानने ५०% भागावर दावा ठोकला. डिंग खेडे व तिथपासून १ किमीवरची सरदार पोस्ट, कंजरकोट किल्ला याच्यावर टिक्का खान (तोच, बचर ऑफ बांग्लादेश) याच्या नेतृत्वाखालील डिव्हिजनने हल्ला चढवला. तेथिल सीमा सुरक्षा दलाचा पाकिस्तानी हल्ल्यापुढे निभाव लागला नाही. पण नंतर मेजर डनच्या नेतृत्वाखाली भारतिय सैन्याने हा प्रदेश जिंकून घेतला. पाकिस्तानी भूभाग टणक जमिनीचा होता त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या मुवमेंटला अडचण येत नव्हती. भारतिय भूभाग मात्र दलदलीचा होता त्यामुळे भारताला लष्करी हालचाली व रसदपुरवठा यांत अडथळा येत होता. तरी भारत हटला नाही.

लाल बहादूर शास्त्रींनी हल्ले थांबले नाहीत तर भारताला स्वसंक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत पंजाब सीमेवर हालचाल सुरू केली. व अखेर पाकिस्तानचा जोश थंडावला. ब्रिटीश पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांची मध्यस्ती स्वीकारून युद्धबंदी झाली.

अर्थात आंतरराष्ट्रीय मध्यस्थी स्वीकारल्याने भारताने हा प्रदेश विवादास्पद असल्याची एकप्रकारे चुकीची कबुली दिली.
सीमा सुरक्षादलाच्या पराभवामुळे अयुबखान यांनी पाकिस्तानी शस्त्रे (१९५४ साली अमेरीकेने दिलेली लष्करी मदत) व सैन्य भारतापेक्षा श्रेष्ठ असल्याची, भारताने दुसरी लष्करी आघाडी न उघडल्याने भारत पुढचे युद्ध त्या स्थानापर्यंत मर्यादित ठेवेल अशी व पं. नेहरूनंतरचे भारतिय नेतृत्व लेचेपेचे आहे अश्या कित्येक गैरसमजुती करून घेतल्या.

पुढच्या धाडसात पाकिस्तानचा धुव्वा उडाला ते याचमुळे.

छान