देवदूत

Submitted by रघू आचार्य on 13 March, 2024 - 10:34

शिवचरण ने मुलाकडे एकदा कौतुकाने पाहिलं.
तो आढ्याला चेंडू बांधून त्याला नवीन बॅटने फटके मारत होता. त्याचं पदलालित मोहवून टाकणारं होतं.
रामलाल ने ओसरीवर चाललेला खेळ पाहिला आणि रस्त्यावरूनच हाळी दिला

"अरे भई शिवचरण, तेरा बेटा तो हिरा है हिरा. देखना ये दूसरा कोली बनेगा"

शिवचरणच्या अंगावर मूठभर मांस चढलं.
मुलाला घट्ट मिठी मारावी आणि त्याचे हजार पापे घ्यावेत असं त्याला होऊन गेलं.
पण दुसर्‍याच क्षणी तो भानावर आला.
एव्हढ्या छोट्याशा गावाला क्रिकेटचं स्टेडीयम सोडाच, मैदान देखील नव्हतं.
ना कोच होता.

रामलालने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहिले आणि तो रस्ता सोडून आत अंगणात आला.
शिवचरणने त्याला आपलं दु:ख सांगितलं.

रामलाल हसला आणि म्हणाला,
" भगवान ने इसीलिये उसके दूत को भेजा है. क्या तुझे खबर नही कि सिर्फ हमारे ही नही देश के छह हजार कस्बों मे दुनिया के बेहतरीन से बेहतरीन क्रिकेट स्टेडीयम बन रहे है.उनमे से एक हमारे गांव मे बन रहा है"

शिवचरण तर हरखूनच गेला.
मग तो आणि त्याचा मुलगा स्टेडीयम पहायला रामलाल सोबत गेले.
जर्मनी, चीन , जपान, कोरिया, अमेरिका, फ्रान्स अशा विकसित देशांत सुद्धा नसेल असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम समोर होते आणि समोर महेंद्रसिंग धोनी एका वहीत प्रशिक्षणार्थींची नावे लिहून घेत होता.

शिवचरण त्याच्या पायावरच लोळण घेत म्हणाला " आप महान हो"
धोनी म्हणाला " महान मै नही , वो है, देवदूत है जी वो"

**********************************************

हरीभाऊंना दिवसभर खूप त्रास व्हायचा पण दिवस असल्याने नुसतं चडफडत वेळ काढायला लागायचा,
एकदा का अंधार पडला कि रांजणातून लोटा घेऊन शंभर मीटर च्या शर्यतीत धावल्यासारखे हरिभाऊ धावत सुटायचे.
हल्ली हल्ली आपल्याला धावता येत नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.
उशीर झाला तर मात्र छातीपर्यंत दाब यायचा. जीव जातो कि काय असे होत असे.

त्यांच्या सारख्या अन्य वृद्धांची कहाणी वेगळी नव्हती.
जंगलात झुडपामागं जाऊन हलकं झालं कि दिवसभराचा शीण जात असे.
पण दोन दिवसांपूर्वी भयंकर घडलं.
सुमार अण्णा असाच अंधार व्हायच्या आधी गेलता
त्याच वेळी भरारी पथक आलं. त्यांनी सुमार अण्णाला लोटा घेऊन जाताना पाहीलं.
आणि भरारी पथकाने त्याला रंगे हाथ पकडायचंच ठेवलं होतं पण सुमार अण्णा पळाला.

अण्णा विजार ओढत नाडी बांधत पुढे आणि भरारी पथक मागे.
अण्णांचा कार्यक्रम काही पूर्ण झालेला नव्हता.
त्यामुळे पळताना दम लागत होता.
पण पथक जवळ येईल म्हणून जीव खाऊन त्याने धूम ठोकली आणि
अर्धवट कार्यक्रम, अवास्तव गती आणि कमजोर हृदय यांचा एकत्रित परिणाम म्हणून अण्णाने छातीवर हात ठेवत जीव सोडला.
पथक हादरले. पण त्याच वेळी आलेल्या तीव्र वासाने ते जवळ जाऊ शकले नाही.
आणि या घटनेमुळे लोटावाले ज्ये ना चिंतेत पडले होते.

त्यांना पाहून रामलाल जवळ आला.
"काय हरीभाऊ ? चिंता कसली करता ?"
हरिभाऊंनी सगळी कर्मकहाणी सांगितली.

हरिभाऊ म्हणाले "एव्हढंच ना ? तुमच्यासाठी आकाशातल्या बाप्पाने देवदूत पाठवला आहे. आता लांब जायला नको कि अंधार पडायची वाट बघायला नको"
हरिभाऊ न समजल्यासारखे पाहत राहीले.
रामलाल म्हणाला " हरीभाऊ आता तुमच्या घरातच आरोग्यमंदीर उभारणार आहेत देवदूतजी "
हरिभाऊंना पुन्हा समजले नाही.
मग रामलालने हाताने लोटा पकडल्याची कृती करून दाखवली तसा हरिभाऊंचा चेहरा उजळला.
अशा तीस करोड हरीभाऊंच्या जीवनात देवदूताने आरोग्यक्रांती केली.
********

यल्लमाला सरपण मिळत नव्हते. रॉकेल तर कुठं गायब व्हायचं समजायचंच नाही.
रामलालने तिला पाहीलं आणि म्हणाला "अम्मा, काळजी नको. देवदूता ने उज्वला योजना आणलीय बघ. आता तुला धूर नाही, सरपण नाही, रॉकेल नाही. कसलीच चिंता नाही"
तरी पण अम्माच्या चेहर्यावर आनंद नव्हता.
" रामलाल , उस पर बनायेगी क्या बोले तो मई ?"
"अम्मा फिकर नही, अब देवदूत तेरे को राशन भी फ्री देगा, और बिजली पानी भी"
अम्माच्या डोळ्यातून आसवं झरझर वाहू लागली.
तिने आकाशातल्या बाप्पाला हात जोडले.
रामलाल म्हणाला " उसका दूत है ना उसकु हात जोड"
अम्माने तीनदा हात जोडून नमस्कार केला.

********************************************

बोरीवलीचा राजू वडेवाला गुजरातची रोजची तीन हजार वड्यांची ऑर्डर कशी द्यायची या विचाराने चिंताक्रांत होता.
रामलाल शेठने त्याच्या कानात सांगितले.
गुजरात ते मुंबई बुलेट ट्रेनने वडे आता ताजे ताजेच अहमदाबादला पोहोचणार होते.
राजू आता तीन हजारच्या जागी तीस लाख वडे पोहोचवण्याचा विचार करू लागला.
रामलाल शेठने त्याला देवदूताच्या योजना सांगितल्या.
त्याला प्रधानमंत्री योजनेतून नऊ हजार करोड कर्ज मिळाले.
पळून न जाता त्याने वडे, पाव, भजी, मिरच्या बनवायचा व्यवसाय सुरू केला.
देवदूताचा फोटो लावला.
राजू वडेवाला आता फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक झाला होता.

*************************************************************

अंगारखान पिसाळ किती तरी वेळचा कविता लिहीत बसला होता.
छापखान्यातून परत येणार्‍या कवितांमुळे आता तो सोशल मीडीयात कविता लिहीत असे.
नुकतीच त्याने कविता पोस्ट केली होती.

" लाईन मे रहनेका. औकात मे रहनेका
एक अंगार बाकी सब भंगार कहनेका"

तास झाला पण एकही लाईक नव्हता.
रामलालने याच्या कानात काही तरी सांगितले आणि त्याचे डोळे लकाकले.
त्याने परिधानमंत्री लाईक कमेण्ट योजनेत अर्ज केला आणि तीन मिनिटात कवितेला १.६ के लाईक्स मिळाल्या.
कविता आता व्हायरल झाली.
अंगारखान पिसाळ हे नाव सर्वतोमुखी झालं.
आणि आज
देवदूताच्या हातून डिजीटल क्रियेटर अ‍ॅवॉर्ड घेताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं.
देवदूताने त्याच्या खांद्यावर हलकेच प्रेमभराने दाबले.
अंगारखान ढसाढसा रडत देवदूताच्या गळ्यात पडला.
*****************

आज हे सगळे एकत्र जमले होते.
कारण आज देवदूत येणार होता.
आणि तो क्षण आला.

शुभ्र पांढरी दाढी, तेजस्वी कांती, चेहर्‍यावर हास्य आणि नजरेत प्रेम !
सर्वांनी देवदूताला हात जोडले..

अशा कित्येकांच्या स्वप्नांना देवदूताने पंख दिले होते.
एका छोट्याशा गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून तिथे गंगव्वाला चहाचा स्टॉल काढून दिला होता.
एका वस्तीच्या ठिकाणी फाईव्ह स्टार रेल्वे स्टेशन वांधून रामकलीला तिथल्या सायकल स्टँडचा ठेका मिळवून दिला होता.

कवठेमहाकाळ गावात मेट्रो सुरू झाल्याने शेतकरी भाजी विकायला एसीतून जाऊ लागले होते.

तरीही काही जण मान्य करायला तयार नव्हते.
अखेर या सर्वांना सोहळ्यात पाहून त्यांचे डोळे उघडले.

मागच्या दाराने का होईना पण चेहरा लपवत ते देवदूताकडे कागद घेऊन गेले.

आता उदयजींचं स्वत:च सायकल पंक्चरचं दुकान आहे.
रोजचं कलेक्शन चाळीस लाख रूपये आहे. देशातूनच नाही तर विदेशातूनही लोक सायकलची पंक्चर काढायला येतात.
आता उदयजींनी दुकानातला तो एका वेडसर मुलाचा फोटो काढून देवदूताची तसवीर तिथे लावलेली आहे.

भरतजी आता एक वाचनालय चालवतात.
सकाळपासून रांग लागलेली असते वाचकांची. झुमरीतलय्यापासून ते आशिनाका फोकानाका येथून लोक मराठी पुस्तके वाचायला इथे येतात.
फक्त एक रूपया प्रवेश फी असूनही दिवसाला तीन लाख रूपये कमाई होते.
जगातले सर्वात भव्य वाचनालय म्हणून त्यांच्या वाचनालयाला लौकिक प्राप्त झालेला होता.

भ्रमर नाट्यगृहाने तर शेक्सपीअर अकादमीच्या लोकांना प्रभावित केले होते.
जगभरातले लोक ऑप्रा, लावणी, गण गवळण, संगीत नाटके पहायला येत.
बिल गेट्स, ट्रंप अशा लोकांपासून ते स्टीव्हन स्पिलबर्ग पर्यंत अनेक नामवंतांनी इथे हजेरी लावली होती.
हरचंद पालव सुद्धा येऊन गेल्याची कुजबूज होती.

अशाने आता देवदूताचे सगळेच गुणगाण गात होते.

फक्त एक सोडून.
त्याला काही केल्या चांगले दिसतच नव्हते.

टिपकागदावर शाईचा थेंब सांडला तर तो थोड्याच वेळात पसरत जातो.
तसंच याच्या मुळे वातावरण खराब होत होतं.

त्याला सैनिकांनी पकडून नेलं.
देवदूताची नाहक बदनामी केल्याचा ठपका ठेवला होता.
न्यायशास्त्री टपूणे यांनी त्या नराधमास देहांताची शिक्षा सुनावली.
किल्ल्याच्या तळघरात भिंतीत चिणून मारायचा आदेश निघाला.

उद्या शिक्षेची अंमलबजावणी असताना कोठडीचे दार किलकिले झाले.
तो साखळंदंडात बांधलेला.
आपल्या नशिबाला कोसत होता.
कुठे नकारात्मक लोकांच्या नादी लागून जीवन समाप्त करून घेतलं...

प्रकाशाची तिरीप आत आली.
त्याने डोळे चोळले.
एक शुभ्र आकृती होती,
मागे लख्ख प्रकाश असल्याने त्याला नीट दिसत नव्हतं.
डोळे दिपून गेले होते.

आणि त्याच्या कानावर तो चिरपरिचित आवाज पडला.
" जा रघू आचार्य ! अब तुम आजाद हो. इस सुरंग से चले जाओ और दोबारा कभी किसीको अपनी सूरत ना दिखाओ"
रघू आचार्यांचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.

आचार्यांनी देवदूताचे पाय धरले.
देवदूताने समोरच्या भुयारांच्या जंजाळातल्या एका भुयाराकडे बोट दाखवले.
"उसमे से चले जाओ. तुम काबूल पहुंच जाओगे. जान है तो जहान है"
रघू आचार्यांना पटले.

आणि अशा रितीने एकमेव विरोधीही बदलला.
इतक्यातच आचार्यांनी देवदूतावरचं स्तुतीपर महाकाव्य लिहून बाजूला केलं.
त्यावर सोनेरी अक्षरं झळकत होती.

देवदूत !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसून मेले.

शुभ्र पांढरी दाढी, तेजस्वी कांती, चेहर्‍यावर हास्य आणि नजरेत प्रेम !........ बंगालची निवडणूक आठवली.

अशाने आटा देवदूताचे सगळेच गुणगाण गात होते.>> देवदूताला पण आता शुद्ध लेखनाच्या चुका आवडणार नाहीत.

साधारण दुसऱ्या प्रसंगात अंदाज आला कथेची गाडी कुठे चालली आहे. मस्त जमली आहे.

Lol
‘सलिम तुम्हे मरने नही देगा और हम अनारकली तुम्हे जीने नही देंगे’ विसरलात का?
बरं तो न्यायाचा तराजुही दिसला नाही कुठे…

काय पंचेस, काय पंचेस.... मुजरा आचार्य!
अगदी 'नेक्स्ट लेव्हल' धमाल आहे. जिते रहो बेटा, ऐसेही आगे बढो.... Wink Lol

भारी जमली आहे Lol

यामागचे संदर्भ मला फार उशीरा कळले असावेत इतरांपेक्षा...

हाहा जबरी! पहिल्या कहाणीला मी विचारात पडलो, आणि काय आहे ते कळायला हरिभाऊंची कहाणी संपावी लागली. धमाल लिहिलं आहे.

माझं पण हर्पा सारखंच झालं. पहिली गोष्ट सिरीयसली वाचली नंतरचं वाचून वाटलं की हे प्रकरण काही तरी वेगळं आहे. Lol

मस्तच, सुंदर व्यंग लिहिले आहे.

उदय, भरत, भ्रमर, हपा, आणि आचार्य झाले आता पुढील भागात इतर मंडळीची नावे येऊद्या, त्यांचे काय सुरू आहे हे वाचण्याची उत्सुकता आहे.

Pages