पाकिस्तान-५

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 23 February, 2024 - 11:23

लोकशाहीचा दिवा विझण्यापूर्वी एकदाच फडफडला. भारतात प्रबळ विरोधी पक्ष उदयास यायला दशके गेली, एक पक्ष कितीतरी वर्षे विनासायास जिंकत राहिला; पाकिस्तानात मात्र विरोधी पक्ष लगेच तयार झाला. पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचे दोन्हीही संस्थापक मरण पावताच विघटन होऊ लागले.
पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर पहील्या दशकापर्यंत प्रजासत्ताक झाला नव्हता, आणि ब्रिटिश अधिराज्याचा भाग होता. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानची महाराणी एलिझाबेथ होती जशी ओस्ट्रेलिया नी कॅनडाची होती. पाकिस्तानात गव्हर्नर जनरल आणि पंतप्रधान होते, पण राष्ट्रपती नव्हते. त्यातही सत्तेचा विचित्र हिशोब होता. एक गव्हर्नर जनरल पंतप्रधान झाला. त्यानंतर अमेरिकेतील राजदूत पंतप्रधान झाले. त्यानंतर ते पंतप्रधान पुन्हा अमेरिकेत राजदूत झाले. पाच वर्षांत पाच पंतप्रधान कुठून आले आणि कुठे गेले, याबाबत जनतेलाही स्पष्टता नव्हती. मी हे तपासले आहे. लियाकत अली खान यांच्यानंतरच्या पंतप्रधानांची नावे सुशिक्षित पाकिस्तानी लोकांनाही सांगता येत नाहीत.
1956 मध्ये चौधरी मुहम्मद अली यांच्या काळात पाकिस्तान हे प्रजासत्ताक बनले. तात्पुरती राज्यघटना तयार करण्यात आली आणि इस्कंदर मिर्झा हे पहिले राष्ट्रपती झाले. त्यांनी इंग्रजी ही अधिकृत भाषा, उर्दू आणि बंगाली ह्या राजभाषा म्हणून घोषित केल्या. यासोबतच २१ वर्षांवरील नागरिकांसाठी मतदानाच्या हक्काची व्यवस्था करण्यात आली होती. पंजाब, सिंध, बलुच आणि खैबर-पख्तुन यांचे एकत्रीकरण करून पश्चिम पाकिस्तानचा प्रांत निर्माण करणे ही आणखी एक गोष्ट त्यांनी केली. लाहोर ही त्याची प्रांतीय राजधानी बनली.
खान अब्दुल जब्बार खान हे या नव्या पश्चिम पाकिस्तानचे पहिले मुख्यमंत्री झाले. खान साहेबांनी मुंबईतून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले होते आणि त्यांचे धाकटे बंधू खान अब्दुल गफार खान यांच्यासोबत खुदाई खिदमतगार चळवळीचे आयोजन केले होते. ते हजारीबाग कारागृहातही राहिले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या समर्थन पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांना पठाणांना भारताचा भाग बनवायचा होतं. त्यांनी स्वतःचा रिपब्लिकन पक्ष स्थापन केला आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीगचा पराभव केला तर पूर्व पाकिस्तानात एच.एस. सुहरावर्दी यांनी त्यांची अवामी लीग स्थापन केली होती. सुहरावर्दी हे गांधींचे सहकारी होते. मात्र, कलकत्ता येथे झालेल्या भीषण दंगलीच्या वेळी ते बंगालचे मुख्यमंत्री होते. संपूर्ण बंगालचा स्वतंत्र देश व्हावा आणि पाकिस्तान किंवा भारताचा भाग होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली नाही, पण मुस्लिम लीगचा पराभव करून ते पूर्व पाकिस्तानचे पहिले मुख्यमंत्री झाले. पुढे ते संपूर्ण पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
अशा प्रकारे संपूर्ण पाकिस्तानात मुस्लिम लीगचा पराभव झाला. लोकशाहीचे हेच सौंदर्य आहे की ज्या पक्षाने देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली त्या पक्षालाही जनता खाली आणू शकते.
अमेरिकेने या सौंदर्यावर हल्ला करायला सुरुवात केली होती. सर्वप्रथम सीआयएने 1953 मध्ये इराणमधील लोकशाहीमार्गाने जिंकलेल्या पंतप्रधानांचा तख्तापालट केला. त्यानंतर बगदादमध्ये लष्करी करार झाला, ज्यामध्ये इराण, इराक, तुर्की आणि पाकिस्तान यांनी मिळून अमेरिकेशी हातमिळवणी केली. त्याचे नाव CENTO होते. आता अमेरिकेने इस्रायलसह संपूर्ण मध्य आशियात आपले जाळे पसरवले होते. या संपूर्ण लष्करी व्यवहारात जनरल अयुब खान यांचा मोठा वाटा होता. सुहरावर्दी आणि पठाण खान अब्दुल जब्बार खान यांच्यासारखे पंतप्रधान होते.
9 मे 1958 रोजी खान साहेब लाहोरमध्ये त्यांच्या मुलाच्या घरी वर्तमानपत्र वाचत होते. त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. आता सुहरावर्दींची पाळी होती. (क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पंजाब, सिंध, बलुच आणि खैबर-पख्तुन यांचे एकत्रीकरण करून पश्चिम पाकिस्तानचा प्रांत निर्माण करणे ही आणखी एक गोष्ट त्यांनी केली.
>>>>>>>
बलोचिस्तानविषयी थोडंसं…..

इस्लाम भारताच्या हद्दीत शिरण्यापूर्वी बलोच प्रांतावर प्रतिहार गुर्जर राज्य करत होते. त्याचीच निशाणी गुजरात सिंध बॉर्डरवर असलेल्या अनेकांची कुलदेवता हिंगलाजमाता. हे एक शक्तीपीठ आहे.

इस्लामीकरणानंतर बलोचिस्तानात वेगवेगळे खानेटस् होते. खानेटस् म्हणजे खान ( मंगोलियन चंगेझ खान व त्याचे वंशज हे एकेकाळी) राज्यकर्ते असलेला प्रदेश. अर्थात त्यांचे स्वरूप हे टोळीचे किंवा आपल्या फिल्मी भाषेत कबिलेवाले. त्यातही कलातच्या खानाचा मान मोठा. तर मकरान, ख/खोरान हे त्या खालोखाल. बुगती, मर्री, बलोच वगैरे आडनावे असलेले खान भयंकर फिअर्स.
भारतात प्रवेश करण्याच्या २ मार्गांपैकी एक बोलन खिंड ही बलोचिस्तानात येते. पण टोळीवाल्यांच्या भितीने आजही लोक हिंदूकुश पर्वतातील खैबर खिंडीचा वापर करतात. परवा बीएलएने वेढा घालून पाक लष्कराला नामुश्की आणली तो दर्रा-ए-बोलन हाच प्रदेश. (दर्रा म्हणजे लिटरली व्हॅली)

१८५४मध्ये इंग्रजानी बलोचिस्तानला भारताचा हिस्सा बनवले.

पाकिस्तानच्या निर्मितीच्यावेळी बलोचिस्तान पाकिस्तानात सामील नव्हता. बलोच स्वतःला स्वतंत्र मानत होते. कलातच्या खानाने सर्व खानेटस्तर्फे भारतात सामिल व्हायची इच्छा व्यक्त केली होती. पण ती नाकारली गेली. पाकिस्तानला याचा सुगावा लागल्यावर पाकिस्तानने बलोचिस्तानवर हल्ला करून ताबा मिळवला. आज ज्या ग्वादर वरून गदारोळ सुरू आहे ते कलातच्या खानाने ओमानला विकले होते. व स्वातंत्र्यानंतर ओमानी राज्यकर्त्यांनी ते भारताला विकायची तयारी दाखवली होती. पण भारताने ते घेतले नाही. १९५५ला बलोचिस्तान कानावर बंदूक ठेवलेल्या अवस्थेत पाकिस्तानात सामिल झाले. व १९५८ला ग्वादर बंदर पाकिस्तानने विकत घेतले. अर्थात लढवय्या बलोचांना सामिलीकरण मान्य नव्हतेच व पाकिस्तानने बलोचांना इतर एथनिक ग्रुप्सप्रमाणे दाबून ठेवले. त्याची परिणीती म्हणजे आजचा बलोचांचा स्वातंत्र्यलढा.

बलोचांशी मराठी लोकांचे अजून एक खास खरं तर दूःखद नाते आहे. पानपतावर हरलेल्या मराठ्यांची जशी कत्लेआम झाली तशीच कित्येकांना बायकामुलांसह गुलाम बनवण्यात आले. अब्दालीने परतीचा मार्ग धरल्यावर शिखांनी हल्ले करून त्या जेरीस आणले होते. त्यात काहींची सुटकाही झाली. त्यातल्या काही स्त्रिया शिख सैनिकांशी लग्न करून पंजाबात सेटल झाल्या. खुशवंत सिंग यांच्या पूर्वजांपैकी एक स्त्री मराठी होती असे म्हणतात.
अब्दालीच्या परतीचा मार्ग मला नीटसा समजला नाही. पण काही मराठी गुलाम बलोचिस्तानात विकले गेले. धर्मपरीवर्तन अर्थातच झाले. तरीही बुगतीमध्ये शाहू/ऊ नावाची जमात आहे. तसेच एक पेशवानी ही जमातही आहे, ज्यांच्या लग्नकार्यात हळद लावणे, माप ओलांडणे वगैरे रिती स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत पाळल्या जात होत्या.

आपल्या विशिष्ट संवादफेकीसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता कुलभूषण पंडीत उर्फ राजकुमार हाही बलोचिस्तानातल्या क्वेट्याचा.

सिंध प्रांताविषयी थोडसं… कराची हा मुंबई प्रेसिडन्सीचा भाग होता. मराठी लोक जसे मुंबईत नोकरीला यायचे तसेच बोटीने कराचीतही जायचे.
थार, उमरकोट, शिकारपूर (आजच्या रहेजा वगैरे बिझनेस फॅमिली शिकारपूरी भाटिया आहेत) वगैरे हिंदू बहूल भाग होते. उमरकोटच्या हिंदू राजाकडे पडत्या काळात हुमायुनच्या गर्भवती बेगमेने आसरा घेतला होता व अकबराचा जन्म उमरकोटला झाला.
सिंधी मुस्लिमांनी इतर मुस्लिमांचे पाहून फाळणीची मागणी केली. पण जेव्हा कत्तली सुरू झाल्या तेव्हा सिंधी मुस्लिमांनी सहभागी व्हायला नकार दिला.
पंजाबमधून फाळणी डिक्लेअर झाल्या झाल्या लोक निर्वासित झाले पण सिंध प्रांतात ही प्रक्रिया सुमारे १९५० पर्यंत सुरू होती. सिंधमधल्या मुस्लिम लीगच्या काही नेत्यांना फाळणीपूर्वी उपरती होऊन त्यांनी लीगचा राजीनामाही दिला. सिंधच्या पहिल्या गव्हर्नरला हिंदूनी सिंध प्रांत सोडून जावे असे वाटत नव्हते. हिंदूंची मालमत्ता लुटणार्यांना अटक करून मालमत्ताही परत घेतली या गव्हर्नरने. याच कारणावरून लियाकत अलीशी वाद होऊन गव्हर्नरला पोस्टवरून हटवले गेले.
सिंध प्रांतात दलित/आदिवासी लोकांचे प्रमाणही जास्त होते. त्यांना सिंधमधून जाण्याची परमिशन दिली गेली नाही. कारण आम्ही राज्यकर्ते होतो, आमची शौचालय सफाई वगैरे कामं कोण करणार हा नवपाकिस्तान्यांचा अजेंडा. आजही तिथे मागे राहिलेल्या हिंदूंची अवस्था व त्यांच्यावर विशेषतः स्त्रियांवर होणारे अत्याचार सर्वश्रूत आहेत.
तसेच बिहार, युपीमधून आलेल्या मुस्लिंमाना सिंधी मुस्लिंमानी प्रांतिक अस्मितेशी जोडून घेतले नाही. त्यांना मोहाजिर ठरवले गेले. पाकिस्तानच्या लष्करशहा बननेले परवेझ मुशर्रफही या टॅगपासून वाचले नाहीत. अशाच मोहाजिरांनी मग मोहाजिर कौमी मुव्हमेंट (एम क्यू एम)ची स्थापना केली. आजही कराची शहरात एम क्यू एमचा दबदबा आहे.
सिंध्यांच्या या अस्मितेला जोजावत इंदिरा गांधीनी ८०च्या दशकात सिंधमधले प्रभावी व्यक्तिमत्व जी एम सय्यद यांच्या ‘जिये सिंध’ चळवळीला छुपा पाठिंबा दिला होता.

फाळणीपूर्व प्रांतिक निवडणूकीत खान अब्दूल गफार खान यांची लोकप्रियता पाहता त्यांना हरवण्यासाठी निवणूकीत प्रचंड गैरव्यवहार झाला. केवळ मुस्लीम लीग धार्जिण्या मतदारांना मतदान करता यावं हे पाहिले गेले. मुस्लीम लीग जिंकली. जेव्हा सरहद्द प्रांत पाकिस्तानात जाणार हे निश्चित झाले तेव्हा ‘सरहद गांधी’ म्हणून ओळखला जाणारा हा पठाण आम्हांला लांडग्यांच्या तोंडी दिलंत म्हणून रडला.
1987 साली भारताच्या या सच्च्या मित्राचा भारतरत्नाने गौरव केला गेला.

खुप छान माहीची माझेमन.
खुशवंत सिंग यांच्या पूर्वजांपैकी एक स्त्री मराठी होती असे म्हणतात. >>>> प्रिती झिंटाचे पुर्वज मराठी आहेत. झींटे त्यांचे खरे आडनाव.

छान माहिती माझेमन! कराचीमध्ये मराठी शाळा होत्या खरे खाडिलकर,लागू त्रयी स्थापन केलेल्या त्याबद्दल काही माहिती आहे का?