12th Fail हा चित्रपट शंभर मार्कांनी पास!

Submitted by निमिष_सोनार on 21 February, 2024 - 06:22

"12th FAIL" हा ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज झालेला आणि परवा "डिस्ने + हॉटस्टार" वर रिलीज झालेला चित्रपट, मनोज कुमार शर्मा, IPS आणि श्रद्धा जोशी- शर्मा, IRS यांच्या जीवनावर आधारित "अनुराग पाठक" यांच्या 2019 च्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. थोडेफार या चित्रपटाबद्दल मी ऐकून होतो आणि IMDB वर त्याला 10 पैकी 9 रेटिंग आहे हे बघितले आणि इंटरनेटवर वाचण्यात आले की मर्यादित चित्रपटगृहात रिलीज होऊनही माऊथ पब्लिसिटी मिळाल्याने याचे शो वाढवण्यात आले होते आणि डायरेक्टर "विधू विनोद चोप्रा" असल्याने चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढत गेली. (थ्री इडीयट्स, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, मिशन काश्मीर, परिणीता, 1942: लव स्टोरी, परिंदा आणि अगदी अलीकडचा डंकी वगैरे)

मी चित्रपट बघितल्यावर त्याबद्दल खूप काही बोलावेसे वाटले, ज्यांनी बघितला त्यांच्याशी मी जरूर चर्चा ही करेनच. पण हा चांगला चित्रपट इतर चित्रपटप्रेमीपर्यंत पोहोचावा म्हणून परीक्षण लिहिल्यावाचून राहवले गेले नाही.

आता अशा कथेवर चित्रपट बनवायचा तर विधू विनोद चोप्रा पेक्षा कोण चांगला बनवू शकेल? चेतन भगत च्या "फाईव्ह पॉईंट समवन" या कादंबरीवर त्यांनी खूप छान असा "थ्री इडियट्स" बनवला होता. हा चित्रपटसुद्धा अगदीच चांगला चित्रपट झाला आहे. थ्री इडियट्स मेलोड्रामाटिक घटनांनी भरलेला होता, मात्र 12th Fail हा चित्रपट अगदी "वास्तवातील मेलोड्रामाटिक घटनांना" सुद्धा साधे आणि सिम्पल रूप देतो. ते कसे हे कळण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.

हृतिकचां "सुपर 30" पण थोड्याफार अशाच कथानकावर आधारित होता पण त्यात स्टारडम होते, ग्लॅमर होते. हृतिक त्या भूमिकेत शोभत नव्हता. हृतिक रोशन याला फळ्यावर शिकवणारा शिक्षक अशा रुपात बघणे डोळ्यांना पचत नाही. मात्र एखाद्या ट्रेनवर हेलिकॉप्टरमधून उडी मारून बंदूकधारी सुरक्षा रक्षक असताना, कडा पहारा असताना डब्यात शिरून महाराणीचां वेष धारण करून मुकुट चोरून नेतो, हे डोळ्यांना सहज पचते. असो!

तर 12th फेल ह्या चित्रपटात फारसा ग्लॅमर नसलेला पण उत्कृष्ट कलाकार "विक्रांत मेस्सी" तसेच जास्त ग्लॅमर नसलेली अभिनेत्री "मेधा शंकर" (जी खरेच सामान्य मुलगी दिसते आणि अभिनयाने ती तसे आपल्या डोळ्यांना पटवते सुद्धा!) असल्याने आपल्याला अगदी डोळ्यासमोर खरोखर सर्व प्रसंग घडत असून आपण मनोज कुमार शर्मा यांच्या जीवन वाटेवरचे एक साक्षीदार आहोत असे चित्रपट बघताना जाणवत रहाते.

दिग्दर्शन, लेखन, अभिनय, वेशभूषा आणि शूटिंगची विविध खरी लोकेशन्स तसेच अगदी गरज असेल तिथेच गाणे हे सगळे असल्याने हा चित्रपट अतिशय छान झाला आहे. हा चित्रपट म्हणजे एक सत्य कथा आहे. प्रामाणिक राहून आपले ध्येय साध्य करता येते हे अतिशय प्रेरणादायी पद्धतीने चित्रपटात मांडले आहे. अधूनमधून थोडी थोडी "थ्री इडियट्स" ची झलक जाणवते, पण ती ओढून ताणून आणलेली वाटत नाही.

चंबळ खोऱ्यातील एका छोट्या गावात एक अशी शाळा असते तिथे शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी करू देतात. त्यामागे त्यांचा "उदात्त" हेतू असा असतो की, कमीत कमी बारावी पास होऊन मुलांना छोटी मोठी नोकरी तरी मिळेल. असाच आपला मनोज वीस पंचवीस कॉप्या जवळ घेऊन बसलेला असतो. बारावीची परीक्षा असते. शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना फळ्यावर मस्तपैकी परीक्षेतील गणित सोडवून देतात. आणि अचानक डीएसपी दुष्यंत सिंगची धाड पडते. शिक्षक मुख्याध्यापक त्याला लाच देण्याचा प्रयत्न करतात परंतु तो ती लाच धुडकावून लावतो आणि मुख्याध्यापकाला अटक होते. बारावीचे सर्वचे सर्व विद्यार्थी फेल होतात. यानंतर एक घटना घडते आणि दुष्यंत सिंगची काही कारणास्तव मनोजशी भेट होते. दुष्यंत सिंग मनोजला जो एक सल्ला देतो, त्या एका सल्ल्याने मनोजच्या पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते आणि मग त्यानंतर जे घडतं म्हणजेच हा चित्रपट आहे. चित्रपटातील अगदी एक एक प्रसंग खूप छान आणि लक्षात राहतो.

तसेच चित्रपटातील शेवटचा इंटरव्यूचा जो प्रसंग आहे तो खरच अगदी बघण्यासारखा आणि बोध घेण्यासारखा आहे. मला तर "The Pursuit of Happyness" चित्रपटातील " विल स्मिथ" च्या इंटरव्ह्यूची आठवण झाली.

फार काही कथेबद्दल सांगत नाही कारण संपूर्ण चित्रपट बघून ही कथा स्वतः अनुभवायची गोष्ट आहे. हा चित्रपट आपल्याला रडवतो, हसवतो आणि अंतर्मुख करतो आणि प्रेरणा सुद्धा देतो. हा चित्रपट अगदी चुकवू नये असाच आहे. वेळ काढून हा चित्रपट नक्की बघा.

- निमिष सोनार
(एक सर्वभाषिक चित्रपटप्रेमी)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विधु विनोद ने तुम्ही दिलेल्या जंत्री पैकी 1942, मिशन काश्मीर, Parinda, आणि खामोश ह्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. बाकी सगळ्यांची निर्मिती त्याची आहे.

सहमत. मलाही फार आवडला हा चित्रपट. विक्रांत मेसी चे काम फार सुंदर. परिस्थीतीचे भयानक चित्रण किंवा दुर्दैवाचे दशवतार न दाखवताही गोष्ट फार छान सांगीतली आहे.