ओल्या लाल मिरच्यांचा टिकाऊ ठेचा

Submitted by योकु on 10 January, 2024 - 00:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तर मिरची ठेचा उर्फ तोंपासू फॅन क्लब आणि ठेचिले अनंते - मिरच्यांच्या ठेच्याचे प्रकार या बाफांवर बरेच ठेच्यांचे प्रकार इनक्लूडिंग हा सुद्धा आहेत. पण बायजवार कृती कुठे मला तरी दिसली नाही.
या मिरच्या भारतातल्या हिवाळ्यात शक्यतो मिळतात तेव्हा करायचा प्रकार आहे. जहाल-अतीजहाल प्रकरण होऊ शकतं/असतं (मिरच्यांवर अवलंबून) पण तितकंच टेस्टीही. जरूर करून पाहा.

- एक पाव ओल्या लाल मिरच्या; धूवून, कोरड्या करून, डेखं काढून घेतलेल्या
- मिरच्यांच्या निम्मा लसूण, सोलून
- मिरच्या वाटायला लागेल तसा ताज्या लिंबांचा रस; तरी प्रमाण म्हणून पाव ते अर्धी वाटी लागतो शक्यतो
- मीठ चवीनुसार
- चमचाभर जिरे
- चमचाभर मोहोरी
- पाव चमचा चांगला हिंग
- अर्धी- पाऊण वाटी तेल

Olya laal miracheecha thechaa 1.JPG

क्रमवार पाककृती: 

कृती तशी सोपी आहे. मिरच्या, लसूण, जिरे, मीठ एकत्र करून वाटायचं. लागेल तसा लिंबाचा रस वापरायचा.
नंतर तेल मोहोरी हिंगाची फोडणी करून त्यात ठेचा परतायचा.
रंग अजून जरा डार्क होतो अन कडेनी तेल सुटतं शिजल्यावर असं झालं की गार करून घ्यायचा.
आता जरा चाखून पाहून मीठ आणि लिंबाचा रस हवा असेल तर असं करून हवाबंद बरणीत फ्रिजात ठेवायचा. १५-२० दिवस ते महिनाभर सहज टिकतो.
भाकरी, भरीत, पातीचा कांदा, हा ठेचा अन वर शेंगदाण्याच्या तेलाची धार म्हणजे स्वर्ग! नंतर ताक आणि तासभर झोप! Happy

Olya laal miracheecha thechaa 2.JPG

वाढणी/प्रमाण: 
ठेच्याप्रमाणे
अधिक टिपा: 

मिरच्यांच्या तिखटपणानुसार झणझणीत पणा अवलंबून आहे. बायडीनं केलेला जहाल झालेला आहे.
लोखंडी कढईत करण्याचा हा प्रकार नाही. तसंच तेलात सगळं प्रकरण नीट खरपूस तळल्या जाणं ही आवश्यक आहे, चव वाढते अन टिकाऊपणाही अर्थात.
या प्रकारात मीठ जरा कणीभर चढं असेल तर चव अजून चांगली लागते.
आज फटू भी है! देताय जराश्यानं.

माहितीचा स्रोत: 
नेहेमीचा प्रकार आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबाचा रस घातल्यावर परतणे जरा बरोबर वाटत नाहीये... आंबट असल्याने कळंकेल असे वाटते.
लिंबूरस नंतर घातला तर?

मस्त दिसतोय. कमी तिखट मिरच्यांचा करुन बघायला हरकत नाही.
मध्यंतरी हिरव्या शिशितो पेपरचा केला होता. तो जहाल हिरव्या मिरच्यांपेक्षा जास्त आवडला.

सायोने लिहिल्या आहेत त्या शिशितो! Happy

ईंडियन दुकानात पोपटी रंगाच्या लांब मिरच्या मिळतात त्या कमी तिखट असतात, भरल्या/ठेचा करता येईल. असा लाल चुटूक रंग नसेल पण सहन होईल Wink

wow !! कस्सलं भारी दिसतंय !! करून बघीन कधी लाल मिरच्या आणल्या तर ..
तेलात परतत असताना खकाणा उडून फटाफट शिंका येत नाहीत का ?