भारत का दिल देखो (पाककृती) - भरडा का कलेवा - इन्स्टंट प्रकार

Submitted by मनिम्याऊ on 8 January, 2024 - 09:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ज्वारी / बाजरी (भरडधान्य) : २ वाट्या
ताक / फेटलेले दही : ३ कप

वाटणासाठी
लसूण : ४-५ पाकळ्या
जिरे, ओवा, मिरे : १ लहान चमचा

फोडणीसाठी
साजूक तूप
लाल सुक्या मिरच्या : २
जिरे , हिंग : पाव चमचा
कढीपत्ता : १ डहाळी

मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

'भारत का दिल देखो' या (माझ्या मध्यभारतातील लोकजीवनावर आधारित) मालिकेत एक पारंपरिक पदार्थ नव्या इन्स्टंट रूपात.
ज्वारी / बाजरी / नाचणी हि धान्ये आपल्या परंपरांगत अन्नाचा भाग आहे. आजही ग्रामीण भागांत लोक ह्या रोजच्या आहारात या भरडधान्यांचा वापर करतात.
विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील भागांत बनणार एक अतिशय साधा व रुचकर नाश्त्याचा प्रकार. दलिया / आंबिल इत्यादीचा भाऊबंद म्हणता येईल.

भरडा म्हणजे कोणतीही भरड धान्ये आणि कलेवा म्हणजे हलकी फुलकी न्याहारी. मूळ पाककृतीनुसार धान्ये २-३ दिवस भिजत घालायची असतात. पण आज मी झटपट पद्धत सांगते. (मी ज्वारीचा केला तोच येथे देते आहे. )
तर
एका भांड्यात २ वाट्या ज्वारी घेऊन त्यात पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये २ शिट्या करून घ्या.अगदी भात करतो तसंच.
शिजून थंड झाल्यावर त्यात थोडं मीठ घालून मिक्सर मधून भरड वाटून घ्या.

खलबत्यात ४-५ पाकळ्या लसूण, जिरे, मिरे आणि ओवा कुटून घ्या. एकदम बारीक नको. जरासंच ठेचायच आहे.

आता एका पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरे तडतडून घ्या. त्यात सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता आणि लसणाचं वाटण घालून खमंग फोडणी करून घ्या.
यात ज्वारीची भरड घालून दोन मिनिटे परतून घ्या. आता पातळ केलेले दही / ताक आणि चवीनुसार मीठ घालून उकळी येऊ द्या. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला. लापशी इतके पातळसर शिजवायचे. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्या. (सर्व प्रोसेस पातेल्याऐवजी लहान कुकरमध्ये (एक शिट्टी देऊन) केल्यास फारच कमी वेळात होते.

चमचाभर तूप घालून गरम गरम गट्ट करा. आवडत असल्यास वरून लिंबू पिळून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात तीन जणांचा पोटभरीचा नाश्ता होतो.
अधिक टिपा: 

पचायला हलका व पौष्टिक पदार्थ आहे.
ऋतुमानानुसार हिवाळ्यात बाजरीचा तर उन्हाळ्यात ज्वारीचा कलेवा खातात.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
आमच्याकडे आंबील करतात ज्वारीची. साधारण same पद्धत, मिरची लसूण नसतो फक्त

छान.

फोटो पाहून आधी खिचडा आठवला.
त्याचाच फोडणी, ताक घातलेला एक भाऊबंद म्हणता येईल.

खूपच छान आणि झटपट होणारा सोपा पदार्थ. यात आल्याचे आणि ओल्या नारळाचे पातळ काप टाकले तर कलेवा अजून चविष्ट होईल.

मस्त वाटते आहे रेसिपी . इथल्या इंडियन ग्रोसरीमधे ज्वारी मिळाली तर करुन बघणार .
२-३ दिवस भिजवून मग कच्चेच वाटायचे असे काही असते का मूळ पाककृतीत ?

Thanks all
@मेधा
मूळ रेसिपी नुसार धान्य कमीत कमी दीड दिवस भिजत घालायचं. म्हणजे साधारण रात्री जेवणे झाली की ज्वारी भिजत घालायची व दुसऱ्या रात्री पाणी बदलावे.

तिसऱ्या दिवशी सकाळी उपसून ठेवायची. मग पाणी निथळून गेले की जाडसर भरडायची.
पुढील रेसिपी वर म्हटल्याप्रमाणेच.

या पद्धतीत कलेव्याची चव किंचित आंबूस लागते. अर्थात कलेवा जास्त चवदार बनतो.