स्व -शोधताना

Submitted by विश्राम कुलकर्णी on 27 September, 2023 - 23:05

आटपाट नगर होत. आपल्या घरट्यात सर्वाना खाऊ पिऊ घालण्यासाठी ती वणवण भटकायची. पण सर्वच जीवांना सुखी जगता यावं यासाठी तिची धडपड सुरु असायची. दुखणी खुपणी , राग लोभ , स्वभाव विशेष, आवडी निवडी सगळंच जपता जपता स्वतः एक जीव आहोत हेच कधी कधी विसरून जायची . काळ पुढे जात होता. मनातील एक पोकळी मात्र कायम असायची . हे सार कुणासाठी . जाणीव नसलेल्यांसाठी? म्हणतात ना जी नाती सहज उपलब्ध होतात ती हळू हळू बोथट होत जातात. त्याची जाणीवच नाही राहत .  आणि एक भीतीही असायचीच. आपल्या माघारी यांचं काय होईल .  मग तीन ठरवलं घरटं सोडायचं .. हो सोडायचं .. आणि काही काळ का होईना इतरांना स्वावलंबी बनायला शिकवायचं .. घरटं तीन सोडलं .. मनावर दगड ठेवून .. ! 
आता आता काय होईल .. !! मग काय झालं असेल ???

प्रश्न सर्वानाच पडला असेल ना ?  हे एक प्रतीक आहे. यातील "ती" कदाचित तुमच्या आमच्यातील एक असेल. पण आयुष्यात असे निर्णय कधी कधी घ्यावेच लागतात . आपणच आपल्याला घातलेली बंधन तोडून बाहेर पडावं लागत. जस एखाद अंतराळयान बाहेर पडताना त्यांना गुरुत्वाकर्षण संपेपर्यंत करावा लागणारा संघर्ष मोठा असतो पण त्या नंतर जी उंची मिळते ती सर्वोच्च असते .. !! ( हे वाक्य माझं नाही , व. पु. म्हणतात असं ,श्रेय असेल तर त्यांचं )

जग फार मोठं आहे .. आयुष्य पण एकदाच आहे .  आपण आपल्या सोयीसाठी , सुखासाठी काहि मर्यादा ठरवून आयुष्य जगत असतो . आणि कळत नकळत आपण एका भीतीमध्येही वावरत असतो. असं केलं तर काय होईल, तस केलं तर काय होईल .. हि भीती चुकीची नसतेच. पण ती आपल्याला दुबळं करायला पुरेशी असते. त्यात समाजानेही काही अलिखित नियम घातलेले असतात , त्याचंही ओझं घेऊन आपण वावरत असतो.  वय जस जस वाढत तस तस आपण आपल्यातील लवचिकता गमावून बसतो . कुठेतरी वाचलं होत , वय वाढलं कि झाड झुकत नाही , मोडून पडत .. तसंच आपलंही होत असत . आपण आपल्याला लवचिक नाही बनवलं तर प्रवाहासोबत राहूच असं नाही
माझं म्हणणं असं  नाही कि आपल्यावर अवलंबून राहणाऱ्यांचा आपण विचार करू नये , तो हवाच , पण फक्त या सगळ्यात एक व्यक्ती म्हणून जर आपली घुसमट चालली आहे असं वाटत असेल तर काही काळ यापासून थोडं दूर जावं . "दंगल" नावाचा अमिर खान यांचा एक चित्रपट सर्वानाच माहित आहे . यात आपल्या मुलींनी स्वावलंबी बनाव यासाठी आपल्या मुलींना पुलावरून खाली ढकलून पोहण्यासाठी तो बाप तयार होतो. त्यांना मुलींची काळजी नाही असं नाही , पण पाण्यात पडलं कि पोहायच कस हे शिकतच. आणि नाही जमलं तर आपण वाचवायचं कि . पण म्हणून त्याला पोहायलाच पाठवायचा नाही असं नाही म्हणून चालणार . त्यात एक संवाद असा आहे 
"एक बात याद रखना बेटा , हर बार तन्ने बचाने तेरा पापा नहीं आवेगा , मैं तन्ने सिर्फ लढ़ना सीखा सकू , लढ़ना तो तुझे खुद हि है .."
खुप महत्वाचं वाक्य आहे हे . प्रत्येकाला त्याच्या अस्तित्वाची आणि शक्तीची जाणीव करून द्यायची असेल तर काही निर्णय घ्यावेच लागतील. 
वर सांगितलेल्या कहाणीचा पुढचा भाग काय होतो या उत्कंठेपेक्षा तो काय होणार याची खात्री तुम्हा सर्वाना असेलच .. 
त्या घरट्यातले जीव आता स्वतःचा चारा स्वतः गोळा करू लागले . स्वावलंबी बनले . आपल्यातील चूक त्यांच्या लक्षात आली आणि पुन्हा काही दिवसांनी बाहेर पडलेली "ती" एका नव्या जाणिवेने घरट्यात आली . पण एक निश्चय करून.. बदलत्या जगासोबत बदलत राहायचं .. स्वतःमध्ये बदल करून घ्यायचा .. आणि स्वतःच आयुष्य कणा कणाने आणि क्षणा-क्षणाने आनंदानं जगायचं ..!!

Group content visibility: 
Use group defaults