कच्च्या केळ्याची भाजी

Submitted by मनिम्याऊ on 11 September, 2023 - 09:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कच्ची हिरवी केळी: ३
ओल्या नारळाचा चव : अर्धी वाटी
फोडणीसाठी
२ सुक्या लाल मिरच्या, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता
लिंबू :१
हळद, मीठ, साखर : चवीनुसार.
कोथिंबीर सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

कच्च्या केळ्याचे दोन - तीन मोठे मोठे तुकडे करून घ्या.
पातेल्यात केळी बुडतील इतके पाणी घेऊन उकळी आणा. फार मऊ शिजवायचे नाही.केळ्याची साले काळपट झाली की आच बंद करून केळी पाण्याबाहेर काढून ठेवा.
जरा थंड झाली की साले काढून घ्या व आवडीप्रमाणे तुकडे/चकत्या करा किंवा जाड किसणीने किसून घ्या.

जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग, सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा.
त्यात केळ्याचे काप घाला व जरा परतून घ्या.
हळद, मीठ व किंचित साखर घालून नीट मिसळून घ्या.
गरज वाटल्यास किंचित पाणी घालून झाकण ठेवून ५ मिनिटे दणदणीत वाफ येऊ द्या.

यांनतर नारळाचा चव घाला आणि लिंबू पिळून घ्या.
परत झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटे शिजू द्या.
सजावटीसाठी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

कच्च्या केळ्याची भाजी तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
३ लोकांसाठी
अधिक टिपा: 

प्रमाण घेताना माणशी एक केळे या हिशोबाने घ्यावे.

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर (खाना खजाना)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर रेसिपी. भाजी आवडते.
जैन लोक बटाटा वडा लसूण आलं घातलेला करत नाहीत. त्याऐवजी ही केळी वापरतात. आलं लसूण नसतो. चांगला लागतो.

जैन लोक बटाटा वडा लसूण आलं घातलेला करत नाहीत. त्याऐवजी ही केळी वापरतात

+ पावभाजी, रगडा प्याटिस मधले प्याटिस, ब्रेड पकोडा असे अनेक जागी कच्ची केळी वापरतात.

छान सोपी रेसिपी

अरे वा!
कच्च्या केळ्याच्या काचर्‍याही मस्त लागतात, आणि कापही. आता अशीही करून बघेन.

छान दिसतेय भाजी

कच्या केळ्याची भाजी सासरी माहितच नव्हती. मी पहिल्यांदा केली तेव्हा कच्या केळ्याची भाजी करतात हे पाहून काना एकदम आश्चर्य चकीत झालेले. नंतर हीच भाजी कर असा १५ दिवसांनी आग्रह होतो.

माझी पद्धत सारखीच आहे .मी केळी कुकरमध्ये उकडन घेऊन हिंग , हळद. जिर, मोहरी घालून फोडणी करुन केळ्याचे तुकडे परतून घेते . एक वाफ काढून थोडे खोबरे शिवरते.

ही भाजी खोबरेल तेल घालून केल्यास साउथ इंडियन चवीसारखी होते. मस्त लागते

आम्ही बटाट्यावड्यासरखी केळ्याची भाजी करतो.
पण केळे उकडून घेत नाही आणि वरून ओले खोबरे भरपूर. त्याबरोबर भाकरी

छान रेसिपी.

आई बरेचदा उपासाची भाजी करायची, कच्ची केळी सालासकट परतून करायची भाजी, झाकण ठेवून वाफेवर शिजवायची, पाणी नव्हती घालत, तूप जिरे फोडणी, लाल तिखट किंवा मिरच्या आणि दाण्याचं कूट घालायची.

वर सायोने लिहिलेल्याच्या जवळची, आईची रेसिपी.

केळी एका वाफेवर शिजतात म्हणुन पाणी न वापरता केळी सोलुन बारीक तुकडे करुन एकदम फोडणी करुन घ्यावी व मग वरुन ओलं खोबरं, कोथीबीर घालुन झा़कण लावलं की थोड्या वेळातच भाजी होते. हिरव्या मिरच्या/हळद वापरुन करते मी.. खुप छान होते भाजी Happy

छान.
आमच्या घरीही उपासाला कच्च्या केळ्याची भाजी केली जायची. कच्च्या केळ्याचे काप करून ते खडखडीत वाळवून त्याचं पीठ करतात. मग त्या पिठाचे घावन ( धिरडी) उपासाला.
यासाठी वेगळी केळी असायची. आमच्याकडे त्याला 'पायपोशीची केळी' म्हणतात. ती पिकली की बहुधा फार चांगली लागत नसावीत म्हणून अशी वापरतात.

छान पाकृ.
कच्च्या केळीची भाजी केरळमध्ये खाल्ली आहे खूपदा. (खावीच लागायची.) बहुतेक अजून कुठल्या भाजीत व सांबार मध्येही असतात तिथे कच्ची केळी. तिथे सुद्धा भाजीसाठी वेगळ्या प्रकारची केळी वापरत असावेत, कारण दुकानात पिकली व कच्ची केळी टांगलेली असतात आणि ती कच्ची केळी इकडे मिळणाऱ्या कच्च्या केळींपेक्षा वेगळी दिसतात.

अरे वा! बऱ्याच प्रकारे करतात तर ही भाजी.

बहुतेक अजून कुठल्या भाजीत व सांबार मध्येही असतात तिथे कच्ची केळी.
Submitted by मानव पृथ्वीकर on 12 September, 2023>>>>

अवियल मधे वापरतात कच्ची केळी.

कुकरात पोपटी प्रकार करताना मी एकदा भरला कांदा, भरली वांगी, भरल्या बटाट्याबरोबर, भरली कच्ची केळी ही घातलेली. मस्त लागलेली पण एकदाच घातलेली सालीसकट. यावर्षी थंडीत करताना परत घालायला हवीत.

माहेरी पिठाची धिरडी व्हायची उपासाला.

मस्त रेसिपी , मी आधी उकडून न घेता करते आता अशी करेन, ह्या पद्धतीत सालंकाढणं सोप होईल असं वाटतयं.