भरली भेंडी -- न भरता ;)

Submitted by योकु on 1 September, 2023 - 03:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो भेंड्या
दोन कांदे
एक मध्यम मोठा टोमॅटो
पाच सहा लसणाच्या पाकळ्या
बोटाच्या दोन पेरांएवढं आलं
सात-आठ काजू
दोन चिमूट जिरं
पाच ते सहा टेबलस्पून तेल
अर्धा चमचा कश्मिरी लाल तिखट
अर्धा चमचा नेहेमीचं लाल तिखट
एक चमचा धणे पूड
अर्धा चमचा जिर्‍याची पूड
अर्धा चमचा हळद
दीड-दोन चमचे रेडीमेड पनीर टि़क्का मसाला (सुहाना वगैरे ब्रँड चा)
मोठी चिमूटभर कसूरी मेथी
अगदी जाणवेल-न जाणवेल अशी - दोन चिमूट भर मिरपूड
चवीनुसार मीठ
जराशी गोडसर चव येइल अशी साखर, तरी प्रमाण म्हणून - अर्धा चमचा
दोन-तीन चमचे साधं दही
अर्ध्याकपापेक्षा जरासं कमी असं दूध

क्रमवार पाककृती: 

अशीच कुठंतरी पाहिलेली ही रेस्पी. नेहेमी भेंडीची भाजी चोरटी होत्ये तशी ही अजिबात होत नाही. चवीला फारच उत्तम आणि पुरवठ्याचीही होते.
करून पाहा.
भेंड्या धूवून पुसून कोरड्या करायच्या. नंतर बोटाच्या दोन पेरांएवढे तुकडे करायचे.
आलं लसूण कांदा आणि काजू यांचं कच्चंच वाटण करायचं. टोमॅटो निराळा वाटायचा.

एका मोठ्या कढईत भेंडी कोरडीच परतायला घ्यायची. चार-पाच मिनिटं कोरडीच मंद आचेवर परतली आणि जरासे भाजल्याचे डाग दिसायला लागले की दोन चमचे तेल त्यावर घालायचं. लगेच त्या प्रकरणाला रंग चढेल, आणि खरपूस व्हायला सुरुवात होईल. भेंडी मस्त खरपूस परतून बाजूला ठेवायची. ही बहुतेक शिजली असेल या स्टेज ला.
आता त्याच किंवा दुसर्‍या कढईत उरलेलं तेल तापवून जिर्‍याची फोडणी करायची आणि कांदा आलं लसूण काजू यांची पेस्ट परतायला घ्यायची. चांगली परतली गेली की टोमॅटो पेस्टही परतायची. यात आता दोन्ही प्रकारचे तिखट, हळद, जिरेपूड आणि पनीर मसाला घालून मसाल्यांचा कच्चा वास जाईतो परतायचं. यातच नंतर दही घालून तेल सुटेस्तो भूनो!
मसाल्याला चांगलं तेल सुटलं की आता यात दूध घालून सतत हलवत उकळी येऊ द्यायची आणि मग आधी परतून ठेवलेल्या भेंड्या यात घालायच्या.
मीठ साखर घालून भेंडी चांगली शिजेस्तो भाजी आचेवर असू द्यावी. भेंडी न भरता भरली भेंडी तयार आहे.
शेवटी कसूरी मेथी आणि मिरपूड घालून सजवावी आणि गरमच खायला घ्यावी.
पराठा, घडीची पोळी यांसोबत ही भाजी फार सुरेख लागते.
फारशी तिखट नसल्यानी (हवं असेल तर मिरपूड अन नेहेमीचं लाल तिखट वगळून फक्त काश्मिरी तिखट वापरणे) लहान मुलंही आवडीने खातात उदा. आमचं!

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

दही घातल्यानंतर गॅसजवळून हलू नये आणि परतणे थांबवू नये. नाहीतर दही-दूध फाटेल एखादवेळी... वाटणात काजू असल्यानी ही कढईच्या तळाशी लागण्याची शक्यता असते.
पनीर टि़क्का मसाला वापरला असला तरी चांगली चव येते. त्याऐवजी गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल.

माहितीचा स्रोत: 
कुठलंतरी युट्यूब चॅनल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली आहे पाकृ. पण घरात मेम्बरांना काचऱ्या सोडून भेंडीचे इतर काही आवडत नाही. बघू कधी योग येतोय ही भाजी करायचा.
फोटूही टाका.

मी या पद्धतीने १,२ वेळा केली आहे. मला आवडली होती. बहुतेक युट्युबवर पाहिली होती.
ममो- पनीर मखनी, मटर पनीर वगैरेची जशी ग्रेव्ही असते तशीच दिसते.

कढई आणि photo ह्या दोन गोष्टींची मागणी समस्त जनता करत आहे. मनावर घ्या त्याचं!
पाकृ आवडली, करून बघेन Happy

छान. नका नका आमच्या भेंडीची पनीर ग्रेव्ही करू!
सायो, पुढच्या वेळी करशील तेव्हा उगाच इतकुशी टेस्ट करून बघेन.
फोटोचं काय ते सगळ्यांनी वर लिहिलंच आहे, तेव्हा पुन्हा लिहीत नाही.
Proud

मस्त पाकृ. फोटू हवा होता रे पण. ह्यात दही आणि दूध दोन्ही घालायचं आहे का? युट्यूब वरच्या दूधवाल्या काही भेंडी भाजीत दूध पार आटल की भेंडी घातली आहे, ते किती आळवल हे लक्षात आले असते फोटोवरून. दूध किंवा दही घालताना मी तर गॅस बंद करतो, एकदा फाटले होते दही त्यामुळे मिळालेला / घेतलेला धडा.

धीर नसतो ओ फोटो काढायला बाकी काय नाय…
भेंडी आधी तेलावर चांगली फ्राय केलेली असल्यांनी पुढे ती अगदी पाण्यात घातली तरी काही फरक पडत नाही. सो, दोन्त वरी Happy

ही रेसिपी आवडली.आमच्याकडे साधी दाणेकूट वाली भेंडी बनते.
अशी ग्रेव्ही वाली भेंडी एकदोन वेळा बनवली होती ती टिपिकल छोले बिले भाज्या बनवतो तशी.
यातली भेंडी डाग पडेपर्यंत परतायची स्टेप प्रचंड आवडली आहे.
फोटोची आठवण येते.अगदी फूड डेकोर नसलेला, कढईत भाजी असलेला टाकला तरी चालेल.आम्ही चुका न काढण्याचं (आश्वासन) वचन देतो.