तलत : जब जब फूल खिले तुझे याद किया हम ने ....

Submitted by झुळूझुळू on 4 July, 2023 - 16:37

अवल यांनी तलत वर धागा काढा असे माझे मन यांना सांगितले -- आणि माझे मन (म्हणजे खरेखुरे माझे चंचल मन) लगेच इकडे तिकडे बहकायला लागले, आणि धागा काढायचा मोह आवरला नाही म्हणून हा प्रपंच. @माझे मन, जर काढायचा असेल तर जरूर काढा; आपण दोन्ही धागे एकत्र बांधूयात.

असो. मला इथे तलतचा मखमली आवाज वगैरे याबद्दल बोलायचे नाही. असे आहे, समोर छान रसमलाईची चांदीची वाटी असेल तर ती कशी चविष्ट असेल वगैरे चर्चा कशाला करायची? छानपैकी वाटी उचलून खायला लागावे ना. म्हणून आता त्याच्या गाण्याच्या काही लिंक्स टाकते.

पण तरीही, अगदी बकाबका खाण्यापेक्षा जरा थोडे चवीने खाऊयात. आता तलतबरोबर दिलीपकुमार, लता, आशा, त्याचे संगीतकार वगैरे या विषयांची चर्चा अपरिहार्य आहे कारण हे सगळे पदार्थ म्हणजे रसमलाईवर घातलेले पिस्ते, केशर, वेलदोडा वगैरे (जरा जास्तच वाहवत चालले आहे नाही का मी? पण या सगळ्या लोकांना उद्देशून सामोसा, भाजी, बटाटेवडा वगैरे उपमा खूपच नीरस वाटतात).

असो, नमनालाच घडाभर तेल. तर ही माझी लाडकी त्याची काही गाणी. मी "शामे गम की कसम", "सीने में" वगैरे उल्लेख टाळले आहेत कारण त्या गाण्यांचा उल्लेख इतर धाग्यांवर झाला आहे म्हणून, नाहीतर त्या गाण्यांना माझे पूर्ण अनुमोदन.

पहिले शीर्षक गीत: जब जब फूल खिले तुझे याद किया हम ने: यावर काय बोलावे? दिलीप, नलिनी, लता, तलत -- सगळेच एकदम तगडे खिलाडी. अगदी ओमप्रकाश पण, ज्याने नेहमीप्रमाणेच हलकट व्यक्तिमत्त्व सफाईने रंगवले आहे. त्याच्या कुजकट टोमण्यावरून हे गाणे सुरु होते. चित्रपट पण अतिशय सुंदर आहे (शिकस्त - १९५३, शंकर जयकिशन ) -- तुनळीवर आहे, जरूर पहाच. हा चित्रपट पाहून मी दिलीपच्या (पुन्हा एकदा) प्रेमात पडले.

विषयांतर करण्याचा प्रमाद पत्करून सांगते की या चित्रपटातली सगळी, म्हणजे सगळी गाणी एकापेक्षा एक अप्रतिम आहेत. आणि SJ यांनी रफी, हेमंत वगैरेंचाही आवाज अत्यंत चपखल वापरला आहे. (चित्रपटाचा अल्बम इथे ऐकू शकता: https://www.youtube.com/watch?v=mhBWQbV2-Do&list=PLWxvwoJSPdCUTqInXDSBEd...). यात एक लताचे सोलो गाणे (रात जाग के निकालू तेरे इंतजार में ) हे पूर्ण वेगळ्या धाटणीचे गाणे आहे. (बाकी गाणी शंकरची, हे एक जयकिशनचे, असे तर नसेल ना?)

बरे -- मूळ विषयाकडे परत येऊ यात. हे गाणे इथे ऐका : https://www.youtube.com/watch?v=W57wkWMUGBI

ये हवा ये रात ये चांदनी : सज्जाद हुसेन, दिलीप. मग आणखी काय पाहिजे?
https://www.youtube.com/watch?v=lw-q2pDye6o

आशाबरोबर तलतने अनेक अत्यंत सुंदर द्वंद्वगीते गायली आहेत. पण हे माझे एक अत्यंत आवडते तलत-आशा द्वंद्वगीत: अतिशय अप्रतिम सतारीचा उपयोग. विशेषतः पहिल्यांदा विलंबित आणि मग ज्या प्रकारे ही द्रुत लय सुरु होते. आणि मला वाटते कि तालवाद्य पखवाज आहे -- तोही अप्रतिम. "आल्हाददायक" याशिवाय या गाण्याला शब्द नाही. कोण म्हणतो तलत ट्रॅजेडी किंग होता म्हणून? (लालारूख १९५३, खय्याम). आशाच्या "हुस्न का फास" मध्ये जी फिरत आहे तिला काय म्हणावे!!

https://www.youtube.com/watch?v=M3iMmtanwBE

आणखी काही त्यांची दोघांची गीते: मला या गाण्यातून दुःख अगदी ओसंडून वाहते आहे असे वाटते.
https://www.youtube.com/watch?v=cKWdAtMUHJs

या गाण्यात तलतने किती वेगवेगळ्या मुरक्या घेतल्यात ते ऐका: मला तर वाटते की हे गाणे त्याला समोर ठेवून बांधले असावे:
https://www.youtube.com/watch?v=viX8leUBRO4

तलतवरच्या कुठल्याही चर्चेत जर ह्या गाण्याचा उल्लेख झाला नाही तर चर्चा अधुरी आहे:
https://www.youtube.com/watch?v=hJNlhmRg0P8

हे पण एक अत्यंत सुंदर गाणे: आगगाडीचा ठेका आणि दोन प्रेमात पडत चाललेले जीव :
https://www.youtube.com/watch?v=51hQa_msPBA

शमशाद तलत यांचीही सुंदर गाणी आहेत. एक सुंदर समूहगीत : यात रफीपण आहे. यातला कोरस अतिशय अप्रतिम आहे. रफीचा मधेच एक अत्यंत सुंदर आलाप जरूर ऐका. तलत, शमशाद, रफी यांच्या आवाजातले यिन आणि यांग असे काही सुंदर प्रकारे सांभाळले आहेत कि वा!! आणि त्यात मसाला म्हणजे कोरस. (कोरसचा विषय निघाल्यावर प्रचंड गाणी आठवली -- पण प्रचंड विषयान्तरही होईल, म्हणून मोह आवरते). हे सिलोनच्या "पुरानी ...." कार्यक्रमातले आवडते गीत.
https://www.youtube.com/watch?v=KQXMpxLFwXs

बरे, आता आटोपते घेते. सुरु होऊ द्यात!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आहा Happy
आला धागा तलतवर.
आता वाचते

>>>दिलीपच्या (पुन्हा एकदा) प्रेमात पडले.<<< हेय Wink मी तर कित्तीदा प्रेमात पडलेय. अगदी एकाच चित्रपटात अनेको सीन्सना Lol आहेच तो प्रेमात पडावं असा Blush
सॉरी आता पुढचं वाचते. काये प्रेमाचा इज़हार लग्गेच केला पाहिजे ना Lol

होय प्रेमाचा इजहार लगेच आणि जमेल तितक्या वेळा केलाच पाहिजे.
तुम्हाला माझा पूर्ण पाठिंबा. माझ्या मते देवही गोड आहे पण अभिनयात दिलीपचा हात नाही धरू शकत. आणि राज तर माझ्या मते आक्रस्ताळेपणाच करायचा.

गाण्यांवर लिहिताना त्या गाण्यांचा मुखडा तरी लिहा.
तसं न करता, हे गाणे, ह्या गाण्यामधे, असे शब्दप्रयोग लोकसत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीची आठवण करुन देतात.

ए फार गोड लिहिलयस. रसमलाईची उपमा एकदम चपखल. गाणी तर एक से एक निवडलीत. जियो!
प्यास कुछ और भी... आहा, यात साक्षात तलत दिसत असून फक्त ऐकू येत रहातो. आणि तेच सुरैय्याबद्दल; आशाचा लाडिकपणाच दिसत रहातो.
हरदम तुमही से प्यार... अगंगं कित्येक दिवसांनी ऐकलं हे, थँक्स ग
है सब से मधुर ये गीत: अगदी अगदी Happy
राही मतवारे- खरच या तालात हे एकमेव गाणं असेल Happy आणि तलत काय दिसलाय, अन सुरैय्याही
....
सध्या ये हवाँ बद्दल..
पहिल्या हार्मोनियम अन मग सतारीपासून जे काही ओढले जातो या गाण्यामधे आपण,!अन मग तलतच्या मधाळ आवाजात तिचे वर्णन आणि दिलिप कुमारचा प्रेमाचा इज़हार आणि जादुई नज़र... उफ् मैं मर जावाँ...असा प्रियकर असेल तर सारं जग ओवाळून टाकावं वाटेलच न..
तो म्हणतोय की तिची बात बात दिलनिशी आहे. पण मला तर त्याच्याच बाबत हे वाटत रहातं. आणि त्याची (दिलिपकुमार आणि तलत दोघांची) आरजू मनात उभ़रती रहती है|
खरं तर संगदिल चित्रपटात मधुबाला आहे. पण हे गाणं चित्रित होतय शम्मीवर. मनात हलकासा दर्द उभ़रतोच न...पण मग दिल में समाँ गये सजन: https://youtu.be/WyJBkxQKQPA
आठवतो अन जरासा सूकून मिळतो Wink
अन मग वो तो चले गये ऐ दिल: https://youtu.be/Z0IFaLCbSBU आठवतं अन पुन्हा सगळं दु:ख आसपास पसरत रहातं...
अन मग कहाँ हो कहाँ मेरे जीवन सहारे :
https://youtu.be/i4ZP8jQ09i8
हा तलतचा आर्त पुकार अन पियोनोचे तलम नोटेशन त्यावर मरहम लावत जातो...

निरुदा Lol
नवीन आहेत त्या. त्यातून तलतच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या Wink
पण यस, बात तो सच है तुम्हारी. मी आपलं लगेच दुसरी खिडकी उघडून ऐकत बसले ते ते गाणं ( सकाळची कामं टाकून Lol )

अवल, तुम्ही तर संगदिलचा पूर्ण आल्बमच उघडलात. आता मी तीच गाणी गुणगुणत बसलेय. “दिलमें समा गये सजन” अगदी लिहिणारच होते याबद्दल पण मला इतरही गायिकांना न्याय द्यायचा होता. नाहीतर लता तलत यांच्या गाण्यांची उजळणी करताना महिने निघून जातील.
कहा हो कहा हो….हे तर अगदी टिप्प्पिकल तलत गाणं. म्हणजे अशी गाणी ही त्याला समोर ठेवून बनवली आहेत असेच वाटते दुसरे म्हणजे राही मतवाले…मध्ये तलतला पाहून मीपण फिदा झाले त्याच्या गाण्यांच्या अपलोडवर त्याचा व्हायोलिन घेऊन फोटो असतो तोही काय हॅंडसम दिसतो..

आणि शेवटी, गाण्याबद्दल काहीही न लिहिता केवळ लिंक याचसाठी टाकली की जेणेकरून अवल वगैरेंसारखे नादिष्ट लोक लगेच ऐकत बसतील. Happy

झुळूझुळू - बरे झाले तुम्ही धागा काढलात.

कालच 'ये हवा ये रात ये चांदनी' ऐकत होते. शीअर रोमान्स. 'प्यास कुछ और भडका दी' पहिल्यांदाच ऐकले. सुंदर आहे.

तलतशी ओळख झाली ती आईच्या आवडीच्या गाण्याने 'जलते है जिस के लिए'.
दिल में रख लेना इसे, हांथों से ये छूटे न कहीं
गीत नाज़ूक है मेरा शीशे से भी, टूटे न कहीं
तलतशिवाय एवढ्या अर्नेस्टली कोण गाऊ शकते ?

'कैसी हसीं आज बहारों की रात हैं' हे गाणे सुरुवातीला रफी (दिलीपकुमारसाठी) आणि तलत (मनोजकुमारसाठी) यांनी गायले होते. परंतु तलतच्या आवाजात आपण (दिलीप-रफीपुढे) झाकोळून जाऊ असे वाटल्याने ते गाणे परत रफी आणि महेंद्र कपूरच्या आवाजात रेकॉर्ड झाले व चित्रपटात सामील झाले. मला तलतचे व्हर्जन जास्त आवडते.

ओरिजिनल गाणी तुम्हाला आवडत असतीलच. पण लाईव्ह मध्ये ती आवाजाची कंपने काय जादू करतात यासाठी लिंक देते आहे. या ठेव्यासाठी बीबीसीला मनापासून धन्यवाद.
मेरी याद में तुम ना आंसू बहाना

चित्रपट : दिल-ए-नादान
संगीतकार : Ghulam Mohammad
गीतकार : शकील बदायुनी
गायक : और कौन Happy

ज़िंदगी देने वाले सुन
तेरी दुनिया से दिल भर गया
मैं यहाँ जीते जी मर गया

रात कटती नहीं दिन गुज़रता नहीं
ज़ख़्म ऐसा दिया है के भरता नहीं
आँख वीरान है, दिल परेशान है, ग़म का सामान है
जैसे जादू कोई कर गया
ज़िंदगी देने वाले सुन ...

बेख़ता तूने मुझ से खुशी छीन ली
ज़िंदा रखा मगर ज़िंदगी छीन ली
कर दिया दिल का खूँ, चुप कहाँ तक रहूँ, साफ़ क्यूँ ना कहूँ
तू खुशी से मेरी जल गया
ज़िंदगी देने वाले सुन ...

मी सुद्धा तलत फॅन.
त्याच्या आवाजाच्या मर्यादेमुळे आनंदी असो वा दु:खी , भावना त्याच्या गाण्यातून हळुवारपणे व्यक्त होत आणि हेच त्याचे बलस्थान ठरले.

पतिता म्हटल्यावर मला याद किया दिल ने कहॉ हो तुम हेच आठवतं. है सबसे मधुर वो गीत हे ऐकलंय आणि लक्षात आहे, पण पतितामधलं आहे हे लक्षात नव्हतं. देव आनंदच्या चित्रपटाला शंकर जयकिशनचं संगीत आणि हेमंतकुमार, तलतचा आवाज हेच मुळात वेगळं आहे.

लेखात गाण्याच्या पहिल्या ओळी लिहिण्यासाठी +१. त्यातली दोन गाणी आधी ऐकली नव्हती.

आता या गाण्यांवर नजर फिरवताना लक्षात येतं की सगळ्यांचे शब्द तरल, अर्थपूर्ण, हळुवार आहेत.

मला त्याचं खूप आवडणारं गाणं -
याद रह जाती है और वक्त गुजर जाता है
फूल खिलता भी है और खिलके बिखर जाता है
सब चले जाता है कब दर्द ए जिगर जाता है?
दाग जो तूने दिया दिलसे मिटाया न गया
हमसे आया न गया तुमसे बुलाया न गया
फासला प्यार में दोनो से मिटाया न गया

देख कबीरा रोया - मदन मोहन - राजेंद्र कृष्ण

आणखी एक सॅड साँग - ऐ मेरे दिल कहीं और चल. दिलीपकुमार् साठी एस जे.!

एक हॅपी साँग - रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए

शाम ए गम कि कसम चा उल्लेख वर आलाच आहे , त्या गाण्या संबंधी ची एक छोटीशी गोष्ट . ह्या गाण्यात solo vox ह्या वाद्याचा उपयोग करण्यात आला होता. हा पीस लुसिला नावच्या musician ने वाजवला होता. हा Intro पीस ऐकला कि आपण लगेच रोमांचीत होतो.

मस्त माहिती व आठवणी. गाणी तर भारी आहेतच. आमच्याकडे Talat Mehmood in Blue Mood नाव असलेली त्याच्या गाण्यांची एक कॅसेट होती. लहानपणी ही गाणी आवडती वगैरे असायचा चान्सच नव्ह्ता. पण घरचे अधूनमधून लावत व कानावर पडत पडत आवडू लागली.

त्यातच बहुधा हे होते. रात ने क्या क्या ख्वाब दिखाए. सुंदर गाणे आहे. शैलेन्द्र आणि सलील चौधरी.

एक लताबरोबरचे "ओ दिलदार बोलो एकबार" सुद्धा चांगले आहे. त्यात चक्क राजा गोसावी आहे Happy

बाकी तलत नेहमी कोठेतरी जाण्याबद्दल का गात असतो असा मला नेहमी प्रश्न पडे. जाये तो जाये कहाँ हेच दोन तीन वेगवेगळ्या तर्‍हेने गाउन झाले. मग ऐ मेरे दिल कहीं और चल झाले. अजूनही असतील Happy

फा :
ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल..
हमसे आया ना गया (हे उलटं आहे. Happy )

सामी, नुसतं लिरिक नको, सोबत लिही न तुझ्या आठवणी, गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल> नक्की प्रयत्न करते लिहायचा Happy

'मैं दिल हूँ इक अरमानभरा, तू आके मुझे पहचान जरा' हे त्याहीपुढचं म्हणता येईल मग - मी हलत नाही इथून, तूच ये. Proud

http://misalpav.com/comment/845921#comment-845921

दुसर्‍या संस्थळावर याच लेखावर ही प्रतिक्रिया दिली होती तीच इथे देतोय.

पुण्यात टिळक स्मारक मंदिराकडून पेरूगेटकडे जायला लागलं की डाव्या हाताला फ्रेंड्स म्युझिक नावाचं एक दुकान होतं. आता आहे की नाही माहिती नाही. त्यांच्याकडे जुन्या/नव्या गाण्यांचं मोठं कलेक्षन होतं आणि ते कॅसेट्वर ती टेप करून देत असत.

११-१२वीत असताना तलत नुकता आवडू लागला होता. त्या फेजमध्ये असताना त्यांच्याकडे असलेल्या गाण्यांच्या जाडजूड बाईंडरमधून तलतची गाणी शोधून काढली होती. काल अडगळीमध्ये काहीतरी शोधत असताना जुन्या कॅसेट्सचं खोकं आणि त्यातली ती तलतची कॅसेट्पण सापडली. आणि आज हा लेख वाचला.

त्या कॅसेट्वरची गाणी कोणती होती हे सहज बघितलं. सगळी आज आवडतातच असं नाही. पण एकत्र यादी राहावी म्हणून इथे लिहितोय.

ये हवा ये रात ये चांदनी - संगदिल
मैं दिल हूं एक अरमानभरा - अनहोनी
शाम ए गम की कसम - फूट्पाथ
मेरी यादमें तुम ना आंसू बहाना - मदहोश
आंसू समझके - छाया
देखली तेरी खुदाई - किनारें किनारें
मैं पागल मेरा मनवा पागल - आशियाना
सब कुछ लुटाके होशमें - इक साल
मुहब्बतही न जो समझे - परछाई
जलते है जिसके लिये - सुजाता
तस्वीर बनाता हूं - बारादरी
इतना ना मुझसे तू प्यार बढा - छाया
ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल - आरझू
जली जो शाखे चमन - तराना
ऐ मेरे दिल कहीं और चल - दाग
जिंदगी देने वाले सुन - दिल-ए-नादान
चल दिया कारवां - लैला मजनू
फिर मुझे दीदारे तर - मिर्झा गालिब
जायें तो जायें कहां - टॅक्सी ड्रायव्हर
रात ने क्या क्या ख्वाब दिखाये - एक गांव की कहानी
दो दिनकी मुहब्बत में हमने - छोटे बाबू
अश्कोने जो पाया है - चांदी की दीवार
टिम टिम टिम तारोके दिप जले
अन्धे जहाके अन्धे रास्ते जाये तो जाये कहा - दाग
सच बता तु मुझपे फिदा - लालारुख

यात मी एक गाण्यांचा जुडगा टाकू इच्छिते. तो म्हणजे जहॅाआरामधील तीन गजला. कुठली काढू आणि कुठली झाकू. त्यावरून आठवले. ३-४ वर्षांपूर्वी आग्र्याच्या किल्ल्याला भेट दिली तेव्हा शहाजहानच्या तुरुंगापाशी मी हीच गाणी गुणगुणत होते. गाईड चेहऱ्यावर “काय वेडे लोक येतात इकडे” असे भाव ठेवून चेहरा गंभीर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. असो.

मैं तेरी नजर का सुरूर हूं. “सुरूर” शब्द जरूर ऐका.
https://youtu.be/UV5h1jXB5iM

तेरी ॲाखके आंसू पी जाऊः मला वाटते की शहाजहानच्या तुरुंगकोठडीच्या बाहेर खंदकापाशी चित्रण आहे.
https://youtu.be/jDt5SBo68N0

फिर वही शाम…..काय टेंपो आहे या गाण्याला.
https://youtu.be/LUnx-zw6LPU

वा वा
सुरूर बद्दल सहमतच
फिर वही, ... Happy
आणि बरोबरे ही गाणी आठवलीच पाहिजेत तिथे Wink
मलाही प्रत्येक सिच्युएशनला ती ती गाणी आठवतात; शांत तळं, खळखळ वाहणारी नदी, हिमालय, प्राचीन देऊळ, सुंदर बाग, शिकारा,... प्रत्येकासाठी वेगवेगळी गाणी तयार करून दिली आहेत हिंदी चित्रपट सृष्टीने Happy

>दिलीपच्या (पुन्हा एकदा) प्रेमात पडले.<<< हेय Wink मी तर कित्तीदा प्रेमात पडलेय. अगदी एकाच चित्रपटात अनेको सीन्सना Lol आहेच तो प्रेमात पडावं असा Blush
सॉरी आता पुढचं वाचते. काये प्रेमाचा इज़हार लग्गेच केला पाहिजे ना!

https://youtu.be/-qr-bPDlStY

जर खरोखरच हे लोक पाकिस्तानी गुप्तहेर असतील तर मग! पाळत ठेवून उलटा त्यांचाच उपयोग करून घेता आला असता की ! मलाही देशभक्ती देशप्रेम वगैरे भरपूर आहे पण केवळ मुस्लिम म्हणून कुणाच्या हेतूंवर शंका घ्यायला माझा विरोध आहे , आणि कुणीही सोम्या हल्ली यूट्यूबवर व्हीड्यो टाकतो त्या लिंकांना काही रॅाच्या फाइलींचा दर्जा प्राप्त होत नाही

ही मानसिकता इतकी बोकाळलीये की एका ओळखीच्या व्यक्तीनेतर दिलिपपेक्शा राज जास्त नैसर्गिक अभिनय करतो असे प्रतिपादन केले होते - हे जरा अतीच झालेय. मुळात राज अभिनय करतो हेही नव्यानेच कळले मला !

मागे अशाच एका लेखात मधुबाला, दिलिप, मीना वगैरेंनी हिंदू नावे घेऊन लोकांना फसवले या आशयाची तणतण वाचली होती . तेही वाचून कपाळावर हात मारून घेतला होता. मुळात हिंदू व्यक्तिरेखा रंगवताना यांनी कुंकू लाले,देवळात हात जोडले तरी त्यांच्यातले कर्मठ त्यांना काफीर ठरवतात तेव्हा हे कलाकार आहेत आणि कलेसाठी त्यांनी स्वतःचे धार्मिक आग्रह सोडून दिलेत हे का पहात नाही? याचा अर्थ असा नाही की यांना कायम डोक्यावर घेऊन नाचावे, पण जिथे श्रेय द्यायला हवे तिथे द्यावेच .
ता . क. ः जर मीनाकडे पाहून तिच्या अभिनयाला सोडून तिचा धर्म जाणवत असेल तर देवा या कोकरांना माफ कर . जरा आरती, साहिब बिबी….वगैरे चित्रपट पाहून विचार बदलतात का ते पहावे.

तलतची काही गाणी मला आवडणारी, वरती बहुतेक दिसली नाहीत म्हणून देत आहे.

दिले नादान मधील 'ये रात सुहानी रात नही, ए चांद सितारो सो जाओ' आणि छाया मधील 'आखोमे मस्ती शराबकी'. परछाईमधील लताबरोबरचे 'अपनी कहो कुछ मेरी सुनो' ही मस्त आहे.