हेच आपलं नेहमीचंच

Submitted by पाचपाटील on 8 March, 2022 - 04:40

{सूचना :- लिखाण थोडं असभ्य वाटण्याची शक्यता
आहे. तसे काही आवडत नसल्यास पुढे वाचू नये, ही विनंती.}

नावात घंटा काही नसलं तरीही नाव सांगावं लागेल,
म्हणून मी सुदर्शन लिगाडे.
फार पूर्वी कै. धोंडीसाहेब देशमुख शिक्षण संस्थेचे आदर्श मराठी विद्यालय, असे नाव असलेल्या शाळेत आम्ही शिकत होतो.

अगदीच सांगायचं झालं तर तेंडुलकरने हेन्री ओलोंगाला
चोपले, तेव्हा आम्ही नववीत वगैरे असू..
हे ही सांगायचं कारण म्हणजे साधारण त्याच सुमारास
आमच्या निरागसपणाचे बुरूज ढासळायला लागलेले..
आणि त्याजागी दुसरेच बुरूज लाजत लाजत उभे रहायला लागलेले.. आणि त्या बुरूजांचं नेमकं काय करायचं असतं, हे तेव्हा स्पष्टपणे माहित नव्हतं.

तर अशा संधिकाळात चाचपडत असताना वर्गबंधू
बबल्या जमदाडेने ही कोंडी फोडली..
झालं असं की बबल्याचा दादा संशयास्पद रितीने
काहीतरी वाचत असताना बबल्याने त्यास रंगेहाथ
पकडला..!
'बापाला नाव सांगेन' अशी धमकी देऊन त्याने
दादाला कायमचा गॅसवर ठेवला..
अशा प्रकारे हैदोस आणि बया या दोन पुस्तिका
आमच्या आयुष्यात आल्या.. आणि येतच राहिल्या..

हैदोसची थोडीशी झलक पाहिल्यानंतर सर्वांची खात्री
पटली की आपल्याला हेच हवं आहे आणि ताबडतोब
हवं आहे..

परंतु होतकरू इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे एकेक दिवसाच्या बोलीवर आळीपाळीने
घरी घेऊन जाण्याचे संधीवाटप झाले.. त्यामुळे नंबर
लागायला साधारण साताठ दिवस लागायचे..
शिवाय तेव्हाच्या आयांना पोरांच्या दप्तराची बिनधास्त
उचकापाचक करायची वाईट खोड असायची..

त्यामुळे ते उष्ण क्रांतिकारी साहित्य घरात लपवून ठेवण्याची सुरक्षित जागा शोधणे, आणि नंतर अभ्यासाच्या पुस्तकात
दुमडून रात्री जागून वाचणे, ह्यात एक थ्रिल होते..
त्यातली भाषाही कोणताही आडपडदा नसलेली..!
थेट ! आणि वर्णनांचा खुला व्यवहार..! वाचकांची
गरज पुरेपूर ओळखून, त्यांना हवं ते द्यायची भूमिका..!

कुसुमाग्रज 'त्या' प्रसिद्ध कवितेत म्हणतात की
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस...!
बाणावरती खोचलेलं वगैरे प्रेम कर..!

हैदोस च्या निनावी लेखकाची झेप त्यापुढे जायची..!
ते तुमच्या बुरूजावर डायरेक्ट जळती मशाल लावण्याचा आग्रह धरायचे..!

मला वाटतं की लेखकाने अशीच ठोस भूमिका घ्यायला
पाहिजे..! चाचपडणाऱ्या समाजाला राजमार्ग दाखवला
पाहिजे..! कारण साहित्याचा हेतू तरी दुसरा काय असतो?

अर्थात 'त्या' कृतींमध्ये फॅंटसीज् चा भीषण दुष्काळ
असायचा त्या लेखकाकडे, हे मी आज कबूल करतो..! कारण तेव्हा कंप्युटर्स नव्हते, इंटरनेट, गुगल वगैरेचा
पत्ताच नव्हता कुणाला..!
मग फॅंटसीज् काय आभाळातून पडणार का?

शिवाय त्यातील कथालेखकांची नावं समजा
वेगवेगळी असली तरी, सगळ्यांच्या मागे एकाच
माणसाचं डोकं आहे, हे तेव्हाही समजायचं..!
पण तेवढं ठीक आहे..! त्यांना कुठे साहित्य अकादमी
किंवा जीवनगौरव पाहिजे होता..??

तर हा प्रकार चालला काही महिने.. मग नंतर आणखी
एक दालन खुलं झालं.. ते हळूहळू सांगेनच..

पण ह्या दरम्यान पोरी वर्गातल्या जरा वेगळ्या
दिसायला लागल्या.. म्हणजे खाली मान घालून
चालताना वेगळ्या, वर्गात खिदळताना वेगळ्या, बस
पकडायला पळताना तर अत्यंत वेगळ्या...!
मग समजा ग्रुप डिस्कशनमधून काही जणींच्या
बाबतीत थोडं आणखी रसग्रहण वगैरे की बाबा हिचे एवढ्ढाले कसे आणि तिचे तेवढेच कसे? काय भानगड
काय है? इत्यादी. इत्यादी.

तर सगळ्या पोरींमध्ये एक समजा वैशाली केसकर,
की जी एकदम खल्लास टाईपमधली..!
एकदम दर्जा..! किंवा रावस किंवा समजा कंडा वगैरे..!
शिवाय सारिका डूडू म्हणून एक होती..! विद्रोही !
त्यामुळे भलतीच आकर्षक वाटणारी..!
तर मग ह्या दोघींवर आख्खी शाळाच फिदा..!

आणि आता एवढे सगळे जिथे रेसमध्ये आहेत तिथं
आपला कुठं निभाव लागणार..! म्हणून म्हटलं की
आपल्यासाठी फुलराणी समेळ आहे..!
तिथे जरा प्रयत्न केला तर मेळ लागू शकतो...
ती केसांचा कोंबडा हल्ली चांगला उडवते आणि
शिवाय अधूनमधून प्रयोगवही सुद्धा मागत असते..!

बाकी समजा त्या गावात फुलराणी नावाची पोरगी
म्हणजे जरा जास्तच झाले..! पण नंतर तिनेच सांगितले
की तिच्या शिक्षिका आईने बालकवींवरच्या वेडाच्या
भरात तिला हे नाव चिपकवून टाकले आणि हिला
आयुष्याभराचा ऑकवर्डनेस दिला.

तर मग एके सकाळी चिठ्ठी लिहून तिच्या बेंचमध्ये
ठेवली की, ''असं असं आहे..! तर तुझं काय म्हणणं
आहे ?''
यावर तिचं म्हणणं पडलं की ''तुला एक सांगू ?
मला पण तू फार आवडतोस सुदर्शन.!''

झालं ना मग भौ !! आणि काय पायजे आपल्याला !!

मग व्याकुळ भावुक चिठ्ठ्यांचा दुतर्फा प्रवास..!
पण खांडेकर फारच होते तिच्यात..!
त्यामुळे ते 'प्लेटॉनिक लव' 'दोन ध्रुव' 'पवित्र प्रेम' वगैरे
चाललेलं असायचं..!

शाळेतल्या हौदाच्या पाठीमागे आमच्यासारख्या
शाळकरी कपल्सची एक जागा होती.‌.! तिथं उभा
राहून आम्ही चिठ्ठ्यांची, गिफ्ट्सची देवाणघेवाण करायचो..! बालिश डायलॉगबाजी करायचो...!

तिथंच एकदा तिचं चिवचिवणारं तोंड बंद
करण्यासाठी मला तिचा किस घ्यायला लागला..!

तो एक चोरटा किस होता.. शिवाय त्यात एक
घाई होती... थरथर होती..!
पण तरीही पहिला-वहिला असल्यामुळे त्याचा
जादूसारखा परिणाम झाला.. म्हणजे कानाच्या
तापलेल्या पाळ्यांतून गरम रक्ताचे प्रवाह..!
शिवाय गुरूत्वाकर्षण गायब..! आणि महत्वाचं
म्हणजे फुलराणीच्या बोलण्यातून खांडेकर गायब..!

नंतर सरगम थिएटरात 'हम दिल दे चुके सनम'
बघताना मी तिला तपासलं.. आणि मग नंतर
'सिर्फ तुम'च्या वेळी तिचा धीट हात माझ्या आत
कुठे कुठे फिरत राहिला..!
परिणामी शरीराला दुनियेशी जोडणारा जो केंद्रबिंदू
असतो, त्याच्यावर होणारे आघात..!
त्यामुळेच एकमेकांच्या ओठांत ओठ घुसवण्याची
अनिवार चाह..! आणि कस्में वादें ..!
हे असं चाललेलं..

अर्थात सगळंच काही सुरळीत होतं असं नाही..
नेहमीचे काही प्रॉब्लेम्स होतेच.. म्हणजे जळकुंडे
वर्गबंधू वगैरे..! तर त्यांना काही हे सहन व्हायचं नाही..!
त्यामुळे ती क्रॉस झाली की ह्यांच्या हलकटपणाला ऊत यायचा..

"सुद्याss आलं बग तुजं फुलझाड ! चांगलं डेरेदार झालंय की बे..! मजाय भेंचो..!"
किंवा..
"सुद्याच्या घराकडं खारीक खोबरं पाठवाय लागतंय
बरं गा..! वैनींना काल उलट्या चालू झाल्या असं ऐकलं..!"

हे असलं जातायेता ऐकायला लागत असेल तर कोण शहाणी पोरगी ह्या रस्त्यानं पुढं जाणार?
त्यामुळे ते हळूहळू कमी होत गेलं.
दहावीनंतर जवळपास थांबलंच.‌.
परंतु ईश्वर महान आहे..!
तो एक दरवाजा बंद करतो तेव्हा दुसरा उघडतोच ना !!
नाय का?

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
आपल्यावर काही गोष्टी असभ्य समजण्याचे "संस्कार" झालेत अस अलीकडे फार जाणवत (वर टिंब ;)) .

ते नसते तर आपल्याला काय वाटल(वर टिंब ;)) असतं आणि आपण कसे वागलो असतो ह्या बद्दल कुतूहल वाटत(वर टिंब ;))

काय राव पाचपाटील ,,,,, तुम्ही पण ??? माझ्या मनातील तुमच्या प्रतिमेला .... bla bla bla ,, Wink Lol Lol

@फिल्मी , हेच ते
पुढच्या पुढच्या भागात अजून मजा येत गेली

मस्त! Lol

मोद, सामो, अजिंक्यराव, वावे, SharmilaR, नानबा, Sharadg, सिम्बा, मैत्रेयी, Filmy
अभिप्रायाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद Happy Wink

भाग्यश्री१२३ आणि म्हाळसा,
बघा...!!! तरी मी लिहिण्यातून अधूनमधून इशारे देत होतो सगळ्यांना, की ह्या पाचपाटील नावाच्या "छुप्या चावट पुरूष-ईगोईस्ट ईच्छाधारी नागाला" उगाचच दूध पाजून पाजून मोठा करू नका म्हणून...! Lol Wink

पण काय हे दुर्दैव !! माझं कुण्णीच ऐकलं नाही हो इथं..!
भोगा आता आपल्या कर्माची फळं..! कारण ह्या नागाला आता खरे पंख फुटायला लागलेत, असं दिसायला लागलंय.! Wink

{{ तुमच्या मनातल्या माझ्या प्रतिमेला गेलेला तडा भरून निघावा म्हणून, तुमच्यासाठी ओंजळभर दिलगीरी या प्रतिसादातून पाठवत आहे..! स्वीकार व्हावा, ही विनंती..!
आणि ही कथा जशी लाईटली घेतलीत, तसेच आगामी काही मजकूरही हळूच घ्याल ही अपेक्षा }} Happy _/\_

पाटीलबुवा लै झ्याक जमलय

गावाकडे शिकलो नसलो तरी अनुभूती सगळ्या पोरांना सेमच असाव्यात हे जाणवलं
Happy

प्रतिसाद सगळेच असे आहेत की आता पुढच्या भागात पाचपाटील अजून सुटणार... येऊ द्या च्यायला Lol

मी तर हैदोसलाच दहात अकरा मार्क देऊन टाकले..
एक स्पेशल धागा तर हैदोससाठी हवा... बरेच आठवणी आहेत त्याच्या.. हे वाचल्यावर त्या लिहिणे भाग आहे Happy

शिवाय तेव्हाच्या आयांना पोरांच्या दप्तराची बिनधास्त
उचकापाचक करायची वाईट खोड असायची>> नुसती आयांनाच नव्हे तर लहान भावंडांना देखिल उचकापाचक करायची खोड असते.. अनुभवाचे बोल, मला मोठा भाऊ आहे Proud

तरी मी लिहिण्यातून अधूनमधून इशारे देत होतो सगळ्यांना>> पण तुमच्या धाडसाबद्दल कौतुकच केलंय Happy

Rofl
काही काही वाक्यं वाचून सॉलिड फुटलो आत्ता!

म्हणजे कानाच्या
तापलेल्या पाळ्यांतून गरम रक्ताचे प्रवाह..!
शिवाय गुरूत्वाकर्षण गायब..! आणि महत्वाचं
म्हणजे फुलराणीच्या बोलण्यातून खांडेकर गायब..!>>>>>>>>>> Rofl

"मी तिला तपासलं" काय अरे? Rofl
खुप दिवसांनी अगदी हमसून हमसून हसायला आलं असं वाचलं! येऊ द्या भौ अजून!
म्हणजे कृती एक विनोदी आहेच पण त्यात तुम्ही वर्णन जसं केलं अगदी ओघावतं त्या डिलिवरीमुळे प्रचंड हसायला आलं! Lol

मग व्याकुळ भावुक चिठ्ठ्यांचा दुतर्फा प्रवास..!
पण खांडेकर फारच होते तिच्यात..!
त्यामुळे ते 'प्लेटॉनिक लव' 'दोन ध्रुव' 'पवित्र प्रेम' वगैरे
चाललेलं असायचं..!>>
Lol
मस्त लिहिले आहे एकदम.

Pages