अमेरिकेत सोपी मेथी मटर मलई

Submitted by धनि on 22 December, 2021 - 12:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्रोझन मेथी (आर्धा पॅक)
फ्रोझन मटार (१ वाटी)
सावर क्रीम (डेझी च्या छोट्या पॅकचा आर्धा)
कांदा (पाव)
लसूण (२ पाकळ्या)
टोमॅटो (१ रोमा)
धणे पूड ( १ चमचा)
जीरे पूड ( १/२ चमचा)
( बाकी सगळे तुमच्या चवी आणि आवडीनुसार)
तेल
मीठ
साखर
गरम मसाला
तिखट
हळद
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

ही आमची फास्टात मेथी मटर मलई करायची कृती होती फारगावात असताना. फ्रीज मध्ये बरेच दिवस फ्रोझन मेथीचा आर्धा पॅक शिल्लक होता. तेव्हा विचार केला की बर्‍याच दिवसांत मेथी मटर मलई नाही केली आणि विकांताला सावर क्रीमचा छोटा पॅक घेऊन आलो आणि काल केली. तशी फारशी पूर्वतयारी लागत नाही फक्त आपला कांदा , लसूण, आणि टोमॅटो बारीक कापून घ्या. मेथी आणि मटार थोडे थॉ करून घ्या.
१) तेल गरम करून त्यात जीर्‍यांची फोडणी करून घ्या.
२) त्यात कांदा घालून तो परतून घ्या.
३) त्यात आता लसूण घालून कांदा-लसूण ब्राऊन होईपर्यंत परता.
४) मग टोमॅटो घालून तो शिजेपर्यंत ठेवा.
५) टोमॅटो पूर्ण शिजल्यावर त्यात धणे पूड , जीरे पूड , तिखट , हळद , मीठ , आणि थोडा गरम मसाला घाला.
६) हे सगळे परतून त्याला तेल सुटले की मग मेथी घालून परता.
७) मेथी चांगली परतली गेली की थोडे थोडे पाणी घालून वाफ काढा म्हणजे खाली लागणार नाही.
८) मेथी शिजल्यासारखी झाली की मग त्यात मटार घाला.
९) एक ४-५ मिनीटे हे शिजू द्या.
१०) साखर घाला आणि एक परतून गॅस बंद करा.
११) एका मिनीटानी सावर क्रीम घाला आणि झाकण लावून २ मिनीटे ठेवा.
१२) वाढताना आधी थोडा गरम मसाला घालून मिक्स करा आणि कोथिंबीर घाला.
१३) ही कुठल्याही पराठा / नान बरोबर मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना भरपूर होते
अधिक टिपा: 

१) बाकीच्या देशांमध्ये तुम्हाला हे सगळे घटक मिळाले तर जरूर करून बघा - एकदम नो टेन्शन कृती आहे.
२) फ्रोझन मेथी ऐवजी कसूरी मेथी पण घालू शकता पण ती फ्रोझन मेथीच्या प्रमाणात घालू नका Lol दोन ते तीन चमचे घाला - बहुतेक पुरे होईल.
३) साखर नक्की घाला पण मटार कसे आहेत ते पाहून कमी जास्ती करा. काही वेळेस फ्रोझन मटार एकदम गोड निघतात.
४) आम्हाला सुरतीची मेथी आवडली. स्वाद च्या मेथीत काड्याच जास्ती वाटतात.
५) बाकी काय वाढवायचं आहे ते तुमच्या जवाबदारीवर.
६) उरलेल्या सावर क्रीम चे बटर चिकन करता येईल

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे आणि मित्रांचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाककृती आवडली. करून बघण्यात येईल. सध्या ताजी मेथी मिळतेय.
फोटो असेल तर द्यावा.
स्वाद च्या मेथीत काड्याच जास्ती वाटतात.>>>+१

छान!
(एक रोमा... अहो, जगभरातले लोक्स वाचतात. लावायचे बेताब स्ट्रीमिंगला... )

छान, क्विक पण वाटतेय रेसिपी. टोमॅटो नव्हता घातला मी कधी. बघेन आता अशी करुन.
अन हो सुरतीच्या फ्रोझन भाज्या आवडतात मलाही.

बाकीच्या देशांमध्ये तुम्हाला हे सगळे घटक मिळाले तर जरूर करून बघा -
>>> धन्यवाद .. मी 31 डिसेंबर ला अंटार्तिका जातो आहे.. नक्की try करेन ...

31 डिसेंबर ला अंटार्तिका जातो आहे. >> तिथे डायरेक्ट पॅकबंद घेऊन जा.

वरती लिहील्याप्रमाणे उरलेले सावर क्रीम वापरून विकांताला बचि केले. झकास झाले होते.