मन वढाय वढाय (भाग ९)

Submitted by nimita on 26 January, 2020 - 16:30

रजतच्या बोलण्याला मान देऊन म्हणा किंवा त्याला तसं वचन दिलं होतं म्हणून म्हणा- पण स्नेहाच्या घरच्यांनी आणि वंदनामावशीनी परत त्या दोघांच्या लग्नाचा विषय नाही काढला- निदान त्या दोघांसमोर तरी नाही! पण त्यामुळे स्नेहाच्या मनावरचं दडपण मात्र अजूनच वाढलं. वरवर जरी सगळे जण अगदी नेहेमीप्रमाणे स्नेहाशी बोलत असले तरी तिला प्रत्येकाच्या डोळ्यांत एकच प्रश्न दिसत होता. 'सगळे जण आपल्या उत्तराची वाट बघतायत आणि आपण मात्र काहीही न सांगून त्यांच्या भावनांशी खेळतोय' याची जाणीव सतत होत होती स्नेहाला. पण ती तरी काय करणार ? कितीही प्रयत्न केला तरी सलीलचा विचार तिच्या मनातून जातच नव्हता. कधी त्याच्या वागण्याचा त्रास होत होता, तर कधी त्याच्या आठवणींनी जीव व्याकूळ होत होता....पण स्नेहाचं मन आणि तिचे विचार राहून राहून सलील भोवतीच रुंजी घालत होते. आपलं मन कोणापाशी मोकळं करावं हेच कळत नव्हतं तिला !

शेवटी तिच्या आजीनी पुढाकार घ्यायचं ठरवलं. स्नेहाच्या मनाची होत असलेली चलबिचल आणि त्यामुळे तिची होणारी कुचंबणा त्यांच्या अनुभवी नजरेतून सुटली नव्हती. कुठेतरी पाणी मुरतंय हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्याचबरोबर नीलाची-त्यांच्या सुनेची असहायता पण त्यांना दिसत होती. त्यांनी एका दुपारी घरातल्या बाकीच्या सदस्यांना सोयीस्कररित्या काही ना काही कामानिमित्त बाहेर पाठवलं आणि स्नेहाला आपल्या खोलीत बोलावून घेतलं. तिला आपल्या शेजारी बसवून घेत त्यांनी सरळ विषयालाच हात घातला. "स्नेहा, गेल्या काही दिवसांपासून मी बघतीये- तू खूप अस्वस्थ, बेचैन असल्याचं जाणवतंय मला ! काय झालंय बाळा? काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या आईबाबांना पण किती काळजी वाटतीये तुझी ... नीला तर बिचारी रोज वाट बघते की तू स्वतःहून काहीतरी सांगशील.... हे बघ, जर तू काही सांगितलंच नाहीस तर आम्हांला कसं कळेल ? आणि जर आम्हांला कळलंच नाही तर आम्ही तुझी मदत कशी करणार गं? तेव्हा तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते स्पष्ट सांग बघू मला ! मी ते सगळं फक्त माझ्यापुरतंच ठेवीन याची खात्री बाळग ! तेवढा विश्वास आहे ना तुझा माझ्यावर ? "

आजीचा तो दिलासा देणारा स्पर्श आणि तिचं प्रेमळ बोलणं ऐकलं मात्र आणि स्नेहानी इतके दिवस मनात कोंडून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक झाला. आजीच्या कुशीत शिरून ती हमसून हमसून रडायला लागली. आजी पण काही न बोलता स्नेहाच्या डोक्यावरून हात फिरवत होती...तिचा अंदाज खरा ठरला होता. वरवर शांत दिसणाऱ्या स्नेहाच्या मनात बरंच काही साचलं होतं आणि त्याचा निचरा होणं आवश्यक होतं.

थोड्या वेळानी स्नेहा आपोआप शांत झाली. आता तिला अचानकच एकदम हलकं हलकं वाटायला लागलं होतं. जणूकाही मनात दाटलेल्या विचारांचं मळभ अश्रूंवाटे बरसून गेलं होतं. इतके दिवस ती ज्या दडपणाखाली वावरत होती ते काही क्षणांत नाहीसं झालं होतं , खूप मोकळं वाटत होतं आता तिला.

आजीच्या पदरानी डोळे पुसत ती म्हणाली,"मला खरंच काही कळत नाहीये गं. मला माहितीये, तुम्ही सगळे माझ्या उत्तराची वाट बघताय. रजतनी पण मला सांगितलंय की 'हवा तेवढा वेळ घे ; नीट विचार कर आणि मग काय ते सांग.' पण अगं, मुळात मला लग्नच करायचं नाहीये...त्यामुळे मी काय विचार करणार आणि काय सांगणार ?"

स्नेहाच्या बोलण्यावर विचार करत आजी म्हणाली," नक्की प्रॉब्लेम काय आहे...तुला लग्नच करायचं नाहीये का तुला रजतशी लग्न करायचं नाहीये?" स्नेहानी चमकून आजीकडे बघितलं- हा प्रश्न विचारून आजीनी नेमकं वर्मावर बोट ठेवलं होतं. उत्तर देण्याकरता स्नेहा शब्दांची जुळवाजुळव करत असताना आजीनी पुढचा गुगली टाकला -" नाव काय आहे त्याचं?" आता तर स्नेहा पुरती हबकली होती. तिच्या मनात पहिला प्रश्न आला, 'आजीला कसं कळलं ? आणि कोणी सांगितलं ? पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तिला नक्की काय काय माहिती आहे?" तिच्या चेहेऱ्यावर तिच्या मनातला हा सगळा गोंधळ अगदी स्पष्ट वाचता येत होता. तिचा हात हातात घेत आजी म्हणाली," म्हणजे कोणीतरी आहे ! हो ना ?" स्नेहाच्या उत्तराची वाट न बघता आजीनी विचारलं," तो मुलगा कोण आहे हे तू सांगणार आहेस का मीच अंदाज बांधू?"

' आजीपासून काहीही लपवण्यात अर्थ नाहीये' हे स्नेहाच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ती म्हणाली," मुलगा 'आहे' नको म्हणू....मुलगा 'होता' म्हण!" आणि तिनी एका दमात आजीला सगळं सगळं सांगून टाकलं....अगदी तिच्या आणि सलीलच्या पहिल्या भेटीपासून ते त्याच्या परस्पर जर्मनीला निघून जाण्यापर्यंत .... सगळं ! आजीनी शांतपणे तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. थोडा वेळ त्यावर विचार केला आणि म्हणाली, "हं, म्हणजे सलीलच्या चुकीचं प्रायश्चित्त तू करायचं ठरवलंयस तर !"

स्नेहाला एकीकडे आजीच्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटत होतं पण त्याचवेळी ती सलील बद्दल असं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. उगीचच त्याची बाजू उचलून धरत ती म्हणाली," अगं पण यात सलीलची काय चूक आहे? त्याच्या बाबांचीच चूक आहे सगळी...सलील तर तयारच आहे या लग्नासाठी . प्रॉब्लेम त्याच्या बाबांना आहे अगं ! आणि तुला सांगितलं ना मी..जर माझ्याशी लग्न होणार नसेल तर सलीलला कोणाशीच लग्न करायचं नाहीये. यावरूनच कळतंय की त्याचं किती प्रेम आहे माझ्यावर...आणि फक्त माझ्यावरच!पण त्याच्या बाबांना मात्र स्वतःच्या इच्छेपुढे दुसरं काही दिसत नाहीये- अगदी आपल्या मुलाचं सुख सुद्धा!"

स्नेहाचं हे रूप बघून आजीनी आपला पवित्रा थोडा बदलला. 'इथे आपलंच घोडं दामटून चालणार नाही. हिच्या कलाकलानी घ्यायला पाहिजे' - हे आजीच्या लक्षात आलं होतं. तिचं म्हणणं पटल्याचा आव आणत आजी म्हणाली,"हं, बरोबर आहे तुझं. तसं पाहिलं तर सलीलची काहीच चूक नाहीये. एक मुलगा या नात्यानी त्याला त्याच्या वडिलांच्या इच्छेचा मान ठेवलाच पाहिजे."

आजीच्या या बदललेल्या पवित्र्यामुळे आता स्नेहाच्या मनात आधी जो विरोध होता तो हळूहळू गळून पडायला लागला होता. 'आपल्या आजीला आपलं म्हणणं पटतंय आणि ती पण आपल्यासारखाच विचार करतीये ' असा विश्वास तिच्या मनात निर्माण होत होता. आणि तिच्या आजीला नेमकं हेच हवं होतं. स्नेहाकडे रोखून बघत आजीनी पुढचा प्रश्न केला,"पण मग 'जन्मभर लग्न न करण्याचा' त्याचा हा निर्णय त्याच्या वडिलांना मान्य आहे का? " त्यावर स्नेहा म्हणाली," ते मला नाही माहीत. पण सलीलला त्यामुळे काही फरक नाही पडत. त्यानी स्पष्टच लिहिलंय पत्रात की ' त्याचा हा निर्णय कोणीही बदलू शकणार नाही- अगदी त्याचे बाबासुद्धा '.....

आजीचा प्लॅन हळूहळू यशस्वी होत होता. आता तिनी पुढचा युक्तिवाद केला,"पण जेव्हा त्याच्या बाबांनी तुमच्या लग्नाला विरोध केला तेव्हा सलील त्यांना हेच ऐकवू शकला असता ना....की 'त्याचा हा निर्णय कोणीही बदलू शकणार नाही ...अगदी त्याचे बाबासुद्धा!' बघ ना... तुला नाही असं वाटत ? "

आजीचा हा प्रश्न ऐकून स्नेहा गोंधळात पडली.'खरंच की, आजीचा प्रश्न अगदीच चुकीचा नाहीये! पण मग आत्तापर्यंत हा विचार आपल्या मनात कसा नाही आला?" स्नेहा तिच्याही नकळत पुन्हा नव्यानी सगळ्या परिस्थितीचा विचार करायला लागली. 'जर सलील त्याच्या लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहू शकतो- अगदी त्याच्या बाबांच्या इच्छेविरुद्ध जाऊन - तर मग माझ्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर का नाही ठाम राहता आलं त्याला?"

स्नेहाच्या मनात नक्की काय चालू आहे याचा अंदाज आला होता आजीला. स्नेहाच्या सलील वरच्या अतूट विश्वासाला आणि आंधळ्या प्रेमाला हलकासा का होईना पण तडा गेला होता. आता नाण्याची दुसरी बाजू मांडायची वेळ आली होती आणि आजीनी त्या दृष्टीनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users