मन वढाय वढाय (भाग ८)

Submitted by nimita on 24 January, 2020 - 04:09

स्नेहाच्या मनात आधीच विचारांचा इतका गोंधळ उडाला होता आणि त्यात आई आणि मावशीची ही अशी थट्टा ...अगदी सात्विक संताप होत होता तिच्या जीवाचा ! पण तिच्या मनात चालू असलेली ही विचारांची उलथापालथ कोणासमोर मांडणंही शक्य नव्हतं. तिला स्वतःलाच हे सगळं सॉर्ट आऊट करायला लागणार होतं. 'खरं म्हणजे त्या दोघींवर कशाला चिडतीये मी ? त्यांची काहीच चूक नाहीये. त्यांच्या दृष्टीनी बघितलं तर सगळं नॉर्मलच आहे ना... ,' स्नेहाला आता आपल्या चिडण्याचा; आई आणि मावशी वर ओरडण्याचा पश्चात्ताप व्हायला लागला. जे आजपर्यंत कधीही घडलं नव्हतं ते आज झालं होतं. 'बघितलंस सलील ? तुझ्यामुळे आज मी त्या दोघींवर चिडले. पण तुला काय फरक पडतो ? तू तर मला एकटीला सोडून निघून गेलास... इतका दूर... शरीरानी आणि मनानी सुद्धा ! खरं म्हणजे मी तुझ्यावर चिडायला हवं ....पण मी माझ्या या वेड्या मनाची समजूत कशी घालू ? ते तर अजूनही तुला दोषी मानायला तयारच नाहीये. मधल्या मधे माझी अवस्था अशी विचित्र होऊन बसलीये.' ती मनातल्या मनात सलील ला म्हणाली.

स्नेहाचं असं एकदम वैतागून बोलणं तिच्या आईला आणि मावशीला पण अपेक्षित नव्हतं. त्यांच्या दृष्टीनी पाहता तिचा हा राग विनाकारण च होता. खरं तर एरवी त्यांच्या या अशा चिडवण्याला स्नेहानी पण तितकंच गमतीत घेतलं असतं; त्यांच्या या चेष्टेला तसंच काहीतरी खुमासदार प्रत्युत्तर ही दिलं असतं... पण आत्ताचा तिचा एकंदर रागरंग बघून त्या दोघीही थोड्या गोंधळात पडल्या. वंदना नी काळजीच्या सुरात स्नेहाच्या आईला विचारलं,"नीला, स्नेहा ची तब्येत ठीक आहे ना गं? आज काय झालंय हिला ? आल्यापासून बघतीये, ती गप्प गप्पच आहे. तू बोल ना एकदा तिच्याशी सविस्तर.." त्यावर स्नेहाची आई म्हणाली," हं, मी मधे एक दोन वेळा तिच्याकडे लग्नाचा विषय काढला होता गं , तेव्हा म्हणाली- सध्या तरी मला लग्न करायचं नाहीये. जेव्हा वाटेल तेव्हा सांगीन.... मग मी पण जास्त काही बोलले नाही. या आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही बाई! उगीच बिथरली तर काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायची." तिचं हे असं बोलणं ऐकून वंदना जरा काळजीत पडली आणि म्हणाली," जर का ती अजून लग्नासाठी तयार नसेल तर आपण थांबू ना ती हो म्हणेपर्यंत. पण माझ्या रजत साठी मला स्नेहापेक्षा चांगली मुलगी शोधूनही नाही सापडणार गं. हा माझ्यामधल्या आईचा स्वार्थ म्हण हवं तर, पण मी तर ठरवलंय की लवकरात लवकर स्नेहाला माझ्या घरची सून करून घ्यायचं." तिच्या या बोलण्यावर होकारार्थी मान हलवत स्नेहाची आई म्हणाली,"हो गं, same here. आणि मुख्य म्हणजे आपल्याला दोघींना हक्कानी एकमेकींवर रुसता, रागावता येईल ना...विहिणी झाल्यावर ! मी तर ते गाणं पण पाठ करून ठेवलंय....आपण लहानपणी भातुकली खेळताना म्हणायचो ते गं....

'विहिणबाई विहिणबाई; उठा आता उठा..

भातुकलीचा साऱ्या तुम्ही केला चट्टा मट्टा...

आता उठा...'

तिच्या या बोलण्यावर पुन्हा एकदा दोघींच्या हसण्यानी सगळं घर दणाणून सोडलं.. त्यांचं ते हसणं ऐकून स्नेहाला थोडं हायसं वाटलं ; तिच्या मनातली अपराधाची टोचणी थोडी कमी झाली ..' म्हणजे माझं बोलणं मनावर घेतलेलं दिसत नाहीये दोघींनी,' जिना चढता चढता ती स्वतःशीच हसली.

तिला असं हसत वर येताना बघून रजत मात्र जरा विचारात पडला... 'काही मिनिटांपूर्वी ही किती टेन्शन मधे वाटत होती आणि आता स्वतःशीच हसतीये... नक्की काय चाललंय हिच्या मनात ?'

थोडा वेळ दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही; दोघंही आपापल्या विचारात गुंग होते. शेवटी रजतनी पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली." स्नेहा, मला नाही माहीत तुझ्या मनात आत्ता नक्की काय चाललं आहे. पण कुठेतरी काहीतरी खटकतंय. आणि मला तेच माहित करून घ्यायचंय.आपण दोघं इतकी वर्षं एकत्र आहोत. अगदी बालवाडीपासूनची मैत्री आहे आपली. आपल्या या नात्याला एक नवीन वळण लागावं, नवी ओळख मिळावी अशी…..."

" मावशीची इच्छा आहे .. माहितीये मला ." त्याचं वाक्य मधेच तोडत स्नेहा म्हणाली, "पण केवळ तिची इच्छा आहे म्हणून तू या लग्नाला तयार आहेस का ?" तिच्या प्रश्नावर सफाई देत रजत हसून म्हणाला," छे ; तसं अजिबात नाहीये. माझं लग्न हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे...मी लग्न करायचं का नाही आणि केलंच तर ते कोणाशी करायचं हे माझ्याऐवजी दुसरं कोणी कसं ठरवणार? आणि हे फक्त मीच म्हणत नाहीये, तर माझ्या आई बाबांचं पण हेच मत आहे. त्यामुळे ते कधीच त्यांचा निर्णय माझ्यावर लादणार नाहीत. हां, आता आपल्या दोघांच्या आयांची खूप इच्छा आहे की आपलं दोघांचं लग्न व्हावं...त्यांच्या दृष्टीनी त्यांचं हे वाटणं योग्य असेलही; पण या एका निर्णयावर आपलं दोघांचं पुढचं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे स्नेहा..... तर मग हा निर्णय घ्यायचा अधिकार पण आपल्याला दोघांना असायला हवा. आपल्या आईवडिलांना नाही. आणि म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचं आहे."

रजतचं बोलणं ऐकून स्नेहाच्या मनात पहिला विचार आला तो सलीलचा आणि त्याच्या वडिलांचा ! किती विरोधाभास होता दोन्ही नात्यांत... नात्यांत म्हणण्यापेक्षा - नात्यांबद्दलच्या अपेक्षा आणि त्यांच्या समीकरणात !

स्नेहाला वंदनामावशी बद्दल वाटणारा आदर एका क्षणात दुणावला होता. तिच्या विचारांची तंद्री मोडत रजत पुढे म्हणाला," प्रत्येक मुलाप्रमाणे माझ्याही मनात माझ्या लाईफ पार्टनर बद्दल काही अपेक्षा आहेत. तिचं वागणं, स्वभाव, आवडीनिवडी, तिचे विचार वगैरे वगैरे ! आणि मी जेव्हा जेव्हा या सगळ्याचा विचार करून तिला imagine करतो तेव्हा प्रत्येक वेळी तू त्या साच्यात अगदी फिट बसतेस. पण जशा माझ्या अपेक्षा आहेत तशाच तुझ्याही अपेक्षा असतीलच ना तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ! आणि म्हणूनच जेव्हा आईनी तिची इच्छा बोलून दाखवली तेव्हा मी तिला सांगितलं की "मी तर तयार आहे पण स्नेहाशी बोलून मगच काय तो निर्णय घेऊया ."
रजतचं बोलणं ऐकून स्नेहाला काय बोलावं तेच सुचेना. तिला अशी गप्प बसलेली बघून रजतला थोडं टेन्शन आलं. 'जर हिनी नाही म्हटलं तर ?' तो पटकन म्हणाला," तू आत्ता लगेच नाही सांगितलंस तरी चालेल. Take your time. नीट विचार कर आणि मग तुझा निर्णय सांग. मी थांबायला तयार आहे."

काही क्षण तसेच अवघड शांततेत गेले. तेवढ्यात खालून स्नेहाच्या आईची हाक ऐकू आली," झालं का तुमचं बोलून? चहा वर घेऊन येऊ का तुम्हीच येताय खाली?" स्नेहा पट्कन म्हणाली," आम्हीच येतो ,थांब." आणि रजत काही म्हणायच्या आत ती पायऱ्या उतरायला लागली.

रजतला त्याच्या आई आणि मावशीच्या डोळ्यांत तो स्वाभाविक प्रश्न अगदी स्पष्ट वाचता येत होता . स्नेहाला देखील अपेक्षितच होता तो प्रश्न आणि म्हणूनच ती कोणाकडेही न बघता खालमानेनी चहाचे कप्स आणायचा बहाणा करत स्वैपाकघरात पळाली होती. पण तिचे कान मात्र बाहेर चालू असलेल्या संभाषणाकडेच लागले होते.

"काय रे, काय ठरलं मग तुमचं ? तयारी सुरू करायची का ?" त्याच्या आईनी विचारलं. 'या वंदना मावशीला सगळ्याचीच घाई असते,' तोंड वाकडं करत स्नेहा स्वतःशीच बोलत म्हणाली. आता तिला यावर रजतचं उत्तर ऐकायचं होतं. "आई, प्लीज... तू उगीच घाई नको करू. मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलंय तिला. आता स्नेहा जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे." रजतचं बोलणं ऐकून स्नेहाला 'हुश्श' झालं. पण तिच्या आईला मात्र हे फारसं पटलं नसावं... तिच्या पुढच्या प्रश्नावरून अगदी स्पष्ट कळत होतं ते..."अरे, पण कधी सांगणार आहे ती?आम्ही तरी किती दिवस वाट बघायची ? टांगती तलवार आहे नुसती!"

आपल्या आईचा हा असा उद्वेग होताना बघून स्नेहाच्या मनात कुठेतरी अपराधी भाव जागा झाला होता. पण सध्या तिला तिकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. तिला रजत काय म्हणतोय ते ऐकायचं होतं.आणि जेव्हा तिनी त्याचं उत्तर ऐकलं तेव्हा तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला. रजत म्हणाला," मावशी, अगं, तिनी पण स्वतःच्या आयुष्याबद्दल, भविष्याबद्दल काहीतरी विचार केलाच असेल ना? तिला थोडा वेळ देऊ या. असं मागे नका लागू तिच्या. आणि तसंही मी ऑलरेडी तिला सांगितलंय की 'take your time, मी थांबायला तयार आहे.' त्यामुळे आता जोपर्यंत स्नेहा स्वतः काही सांगत नाही तोपर्यंत कोणीही हा विषय काढायचा नाही. आणि तिला pressurize तर अजिबात नाही करायचं! Ok ?"

रजतचं बोलणं ऐकून दोघांच्या आया हिरमुसल्या पण शेवटी त्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं. पण स्नेहा मात्र मनोमन खूप खुश झाली- तिच्या मनावरचा मोठा ताण एक क्षणात नाहीसा केला होता रजतनी. इतके दिवस तिला जी एकटेपणाची भावना जाणवत होती ती आता थोडी कमी झाली होती. तिच्याकडे कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण न मागता रजत तिला सपोर्ट करत तिच्या पाठीशी उभा होता.आज पुन्हा एकदा रजतनी त्याची मैत्री सिद्ध केली होती .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users