तारा तुटला

Submitted by निशिकांत on 23 January, 2020 - 05:06

( बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर भाववश होऊन मी लिहिलेली कविता आज त्यांच्या जयंतिच्या निमित्ताने पुन्हा पोस्ट करत आहे. )

मूक रुदन आक्रोश जाहले
बांध मनाचा होता फुटला
नजरा खिळल्या लाखो ज्यावर
तोच नेमका तारा तुटला

विझलेल्या राखेत तयांनी
स्फुल्लिंगांना शोधशोधले
मरगळलेल्या तरुण पिढीला
अभिमानाचे पाठ शिकवले
मशाल हाती संघर्षाची
देता जो तो पेटुन उठला
नजरा खिळल्या लाखो ज्यावर
तोच नेमका तारा तुटला

सिंहगर्जनेहून भयानक
डरकाळी वाघाची होती
ऐकुन पाचावरती धारण
बसलेली कोल्ह्यांची होती
एक हाक अन् रस्त्यावरती
हरेक सैनिक होता लढला
नजरा खिळल्या लाखो ज्यावर
तोच नेमका तारा तुटला

मीच पुरोगामी दावाया
हिंदुत्वावर टिका करावी
झुगारून संकेत दरिद्री
हिंदुत्वाची कास धरावी
हिंदुह्रदय साम्राटांनी हा
मूलमंत्र सर्वांना दिधला
नजरा खिळल्या लाखो ज्यावर
तोच नेमका तारा तुटला

राजकारणी किती गिधाडे
शेवटच्या यात्रेत पाहिली
आज उद्याचा स्वार्थ साधण्या
प्रेतावरती फुले वाहिली
चितेवरी सत्तेचा गुंता
असेल का हो कुणास सुटला
नजरा खिळल्या लाखो ज्यावर
तोच नेमका तारा तुटला

हिमलयासम अशी माणसे
संपतात, भ्रम कधी नसावा
काम अधूरे पूर्ण कराया
पुनर्जन्म घेतला असावा
नैराश्याला पण आशेचा
नवा धुमारा असेल फुटला
नजरा खिळल्या लाखो ज्यावर
तोच नेमका तारा तुटला

( आदरणीय कै. बाळासाहेब ठाकरे यांना एका मूक चाहत्याची श्रध्दांजली )

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users