सनकी भाग ९

Submitted by Swamini Chougule on 22 January, 2020 - 10:23

कायाने सुधीरला रिचाचा काही तरी बंदोबस्त करायचा म्हणून बोलावले होते. काया पीत हॉलमध्ये सोप्यावर बसली होती. सुधीर तिच्या समोर खुर्चीवर बसला होता. काया खुपच जास्त झाली होती. काया बोलू लागली.
काया,“ तुला थोडी घे म्हणाल तर नको म्हणतोस,राहू दे नको तर नको.”अस म्हणून तिने तिच्या हातातला ग्लास रिकामा केला.
सुधीर, “ दि तू काही तरी काम आहे म्हणून मला बोलवले होतेस आणि हे काय तू पीत बसलीस?”तो नाराजीनेच म्हणाला.
काया,“ काम आहे म्हणूनच बोलावले आहे तुला; कामाचा आणि पिण्याचा काय संबंध? बरं ऐक ती रिचा आहे ना ती माझ्या खुप डोक्यात चाललीय. सतत माझ्या शिवीनच्या मागे- मागे फिरते. एक मिनिट पण त्याला एकट सोडत नाही. शिवीन पण तिला काहीच बोलत नाही. तिचा बंदोबस्त करायचा आहे. अस कर एखादा माणूस बघ त्याला पैसे दे आणि त्या रिचाचा अपघात करायला लाव सालीचा!” काया अगदी थंडपणे बोलत होती
सुधीर,“काय? डोकं फिरलं काय तुझे? बाकी सगळं ठीक पण एखाद्याच्या जीवावर उठायचं! हे मान्य नाही मला.” असं तो मोठ्याने ओरडला.
काया शांत होती. ती शांतपणे म्हणाली.
काया,“ येsss जरा शांत हो! आणि खाली बस जरा. मी काय म्हणतेय ते ऐक! रिचाचा जीव नाही घ्यायचा आपल्याला, फक्त तिला इजा करायची हात नाही तर पाय मोडला पाहिजे तिचा; जे ने करून ती या प्रोजेक्ट पासून पर्यायाने शिवीन पासून काही दिवस लांब राहील.” ती अजून ही शांतपणे बोलत होती.
सुधीर खाली बसला व बोलू लागला.
सुधीर, “ तरी ही कोणाचा ही जीव असा धोक्यात आणणे, मला पटत नाही. बरं अपघातात तिचा हात किंवा पायाच मोडेल हे कशा वरून ;तिच्या डोक्याला मानेला लागून तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.” सुधीर काळजीच्या सुरात बोलत होता.
काया खरं तर चिडली होती सुधीरवर कारण कुठली कोण रिचा तिची काळजी याला वाटत आहे. याचा राग कायाला येत होता पण तिने तसं काही दाखवलं नाही. ती रडू लागली. हा तिचा सुधीरला इमोशनली ब्लॅकमेल करायचा डाव होता.अस अनेक वेळा कायाने सुधीरच्या मना विरुद्ध त्याच्या कडून तिची अनेक कामे करून घेतली होती. आज ही तिने तेच जाळे सुधीरवर टाकले होते. ती रडतच बोलू लागली.
काया,“ मा‍झ्या पेक्षा तुला त्या शिवीन आणि रिचाचीच काळजी आहे ना! शिवीनने मला फसवलं व रीचाला ही सगळं माहीत आहे पण पाहतोस ना कसं मला ओळखतचं नाही असा आव आणतात. तुला मी माझा भाऊ मानते आपलं मानते, त्यांना मी धडा शिकवनार आहे तर तू माझी साथ द्यायची सोडून त्यांची बाजू घेतोस. राहू दे माझं काय ते मी पाहीन, तू जा.”असं म्हणून ती आणखीच रडू लागली. कायाने जाळे टाकले होते आता ती सुधीर त्या जाळ्यात अडकतो का ते पाहत होती.
सुधीर, “ तू रडू नकोस दि, मी पाहतो काय ते सगळं तुझ्या मना सारखं होईल.” तो अगदी नाइलाजाने बोलला.
कायाच्या जाळ्यात नेहमी प्रमाणे सुधीर अलगद अडकला होता. काया मनातून सुखावली पण तिने तसं न दाखवता फक्त डोळे पुसले.सुधीर निघून गेला. काया मात्र खुष होती कारण सुधीरने एकदा काम करणार म्हणून शब्द दिला की तो लवकरच तडीस घेऊन जाणार हे निश्चित असे.
सुधीर कायाच्या घरून निघला तो त्याला माहित असलेल्या एका गुंडा कडेच गेला त्याच नाव पक्या. जो पैसे घेऊन हाफ मर्डर करण्यात कुख्यात होता. त्याला सुधीरने रिचाचा फोटो दाखवून हिचा अपघात करायचा पण तिला जास्त इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची. फक्त तिचा हात किंवा पाय मोडला पाहिजे असे त्या पक्याला बजावून सांगीतले व निम्मे पैसे द्यायचे . निम्मे काम झाल्यावर ठरले. काम उद्याच करायचे हे ही सुधीरने सांगीतले. तसेच रिचा रोज ऑफिसला साडेदहा वाजता येते व तिच्या बरोबर असणारा मुलगा(म्हणजे शिवीन) पार्किंगमध्ये कार लावत असतो तो पर्यंत ही मुलगी रोड क्रॉस करते अशी ईत्तमभूत माहिती त्याला पुरवली. पक्या एक लाख मध्ये तयार झाला. ठरल्या प्रमाणे ₹50000 सुधीरने त्याला दिले. आणि कायाला काम उद्या होईल असा फोन सुधीरने केला.
●●●●
दुसऱ्या दिवशी रिचा व शिवीन साडेदहा वाजता पोहचले. नेहमी प्रमाणे रिचा कार मधून उतरून ऑफिस मध्ये जायला निघाली व शिवीन गाडी पार्क करू लागला. रिचा रोड क्रॉस करू लागली पण एकदम तिच्या कडे एक भरधाव कार येत होती पण रिचाचे तिकडे लक्ष नव्हते. पण शिवीनने कार मधून तिच्याकडे येणारी कार पाहीली व तो रिचाकडे धावला. रीचाला कार उडवणार तेव्हढ्यात शिवीनने रिचावर झेप घेऊन तिला कार पुढून हटवले दोघे ही एकदम पडले. हे सगळं पाहून काय झालं म्हणून लोक जमा झाले. त्यांनी रिचा व शिवीनला उठवले.रिचा खूप घाबरली होती. शिवीनने लोकांकडून पाणी मागून तिला दिले. रिचा जरा सावरली.शिवीन तिला ऑफिसमध्ये घेऊन गेला. काया हे सगळं खिडकीच्या कचेतून पाहत होती. ती शिवीनवर खुप चिडली होती कारण त्याच्या मुळे तिचा प्लॅन फ्लॉप झाला होता. तिने चिडून जवळच असलेला फ्लॉवर पॉट भिरकावून फोडला.कसला आवाज झाला म्हणून बाहेर बसलेला ऑफिस बॉय आत आला तर काया त्याच्यावर खेकसून म्हणाली की हात लागून हा फ्लॉवर पॉट फुटला तो साफ करून घे. ऑफिस बॉयने झाडून काचा साफ केल्या व डस्टबीनमध्ये टाकल्या. तो निमूटपणे बाहेर जाऊन बसला.
इकडे शिवीन रिचाला घेऊन ऑफिस मध्ये आला. रिचा आता बरीच सावरली व शिवीनला काळजीने कुठे लागलेय का ते पाहू लागली तिच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते. शिवीनच्या हाताला चांगलच खरचटले होते व त्यातून रक्त ही येत होते. हे पाहून रिचाने फस्ट एड बॉक्स मागवला व त्यातील मलम शिवीनच्या जखमेवर कापूसाने अलगद फुंकर मारत लावत.त्याला रागानेच म्हणाली.
रिचा,“ शिवीन तू मूर्ख आहेस का? तुला काय गरज होती तिथे कडमडायची ;तुला काही झालं असत म्हणजे?” तिच्या डोळ्यातून अश्रु वाहतच होते.
शिवीन,“ रागवायला तर मी हवं; रोड कोणी अस क्रॉस करत का? पार्क मध्ये निघाल्या सारखी निघाली रमत -गमत नालायक मुलगी! वेळीच माझं लक्ष त्या कार कडे गेले म्हणून बरं नाही तर....”मध्येच तो बोलायचा थांबला कारण रिचाला काही व्हावं याची कल्पना ही तो करू शकत नव्हता. तिला काही झालं असत तर या कल्पनेने त्याचा कंठ दाटून आला. पण त्याने आवंढा गिळला.
रिचा,“ झालं असत तर झालं असतं!” अस ती शिवीनच्या हाताला पट्टी बांधत व त्याच्या चेहऱ्यावरचे हाव-भाव टिपत बोलली.
शिवीन,“ तुझ्या बापानं मला वेठीस धरले असते ना बाई!” तो रिचाला चिडविण्याच्या सुरत म्हणाला.
रिचा काही पुढे बोलणार तोवर हे सगळं दुरून पाहत असलेली काया त्यांच्या जवळ आली. तिला रिचा आणि शिवीनची ही जवळीक पाहवत नव्हती. तिला रिचाचा खूपच राग येत होता कारण ज्या प्रकारे ती शिवीनशी बोलत होती व त्याला पट्टी करत होती. म्हणून तिने त्यांच्या या प्रेमळ संभाषणात हस्तक्षेप केला. जस काही तिला माहीतच नाही असा आव आणत ती शिवीनला म्हणाली
काया,“ हे काय झालं शिवीन? तुला हे काय लागलं आणि रिचा तुझे कपडे इतके कसे मळले? त्या दोघांकडे पाहत ती खूप काळजीत आहे अशा अविर्भावात म्हणाली.
शिवीन तिला काही उत्तर देणार तोच रिचाने त्याला थांबवून. कायाकडे जरा कुत्सितपणे पाहत म्हणाली.कारण तिला या अपघाता मागे काया असणार याचा दाट संशय होता. पण तिने तसं जाणवू दिले नाही.
रिचा,“ काही नाही ग काया छोटासा अपघात झाला पण हा शिवीन पहा ना मला काही होईल म्हणून किती घाबरलाय.मला वाचवायला जाऊन स्वतः बघ जखमी झाला. काय करणार मी त्याची वाग्दत्त वधू ना! खूप काळजी व प्रेम आहे ना त्याच माझ्यावर.”अस बोलून ती कायाचे हावभाव टिपत होती.काया काहीच बोलली नाही पण ती तिचा सगळा राग तिच्या हातात असलेल्या फाईलवर काढत होती. हे मात्र रिचाच्या नजरेतून सुटले नाही.
शिवीन मात्र रिचाकडे आश्चर्याने पाहत होता. कारण रिचा अशी का बोलतेय याचा त्याला अंदाज नव्हता. पण तो काहीच बोलला नाही.
असे बोलून रिचाने कायाला आणखिनच डिवचले. त्या मुळे काया आता पुढे काय करेल ते सांगता येत नव्हते. पण काया रिचा व शिवीनसाठी व त्यांच्या नात्या साठी आणखीन घातक होत चालली होती हे निश्चित!
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिताय.
एखाद्या डेलीसोप सारखी अनेक ट्विस्ट घेत कथा पुढे सरकतेय. पुलेशु!