सद्यस्थितीत फेरनिवडणूका झाल्या तर कोण सरस ठरेल? कोणाची वाट लागेल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2019 - 22:42

रारा उर्फ राष्ट्रपती राजवट लागू झालीच आहे. येत्या काळात जर सेनेला कोणी मुख्यमंत्रीपद बहाल केले नाही, वा भाजपाला फोडाफोडी जमली नाही आणि सत्तेची कोंडी फुटली नाही तर फेरनिवडणूकांची वेळ येईल. हे म्हणजे अगदी त्या ईंग्लंड-न्यूझीलंड क्रिकेट वर्ल्डकप फायनलसारखे मॅच टाय, सुपरओवर टाय, मग कोणाचे चौक्के छक्के जास्त बघण्यासारखे रोचक प्रकरण वाटतेय. फक्त ईथे कोणाचे छक्के पंजे जास्त तो सरस ठरेल असे दिसतेय. तर ते एक असो, देव न करो अशी वेळ पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेवर येवो. पण पुन्हा एकदा मतदानाची सुट्टी आणि ड्राय डे जनतेच्या नशिबी आलेच तर ते सत्तेचे पारडे कोणाकडे झुकवतील??
सेनेलाच या परिस्थितीचे जबाबदार ठरवत फटका बसेल का?
भाजपाचे मताधिक्य वाढेल का?
सेना भाजप पुन्हा पराभवाच्या भितीने निवडणूकपूर्व युती करतील का?
राष्ट्रवादीचे निखळलेले काटे घड्याळाचाच अच्छा वक्त आला म्हणत घरट्यात परततील का?
सेना झाल्या प्रकाराने फुटून उद्धव ठाकरेंवर "गेले ते कावळे अन राहिले ते मावळे" बोलायची वेळ येईल का?
भाजप फोडाफोडीचा आणखी जोर लावत स्वबळावर एकहाती सत्ता मिळवायचा प्रयत्न करेल का?
केल्यास ती मिळेल का?

एकंदरीत कोणत्या पक्षाची फेरनिवडणूकांत चांदी होईल वा कोणत्या पक्षाला फटका बसेल? तुम्हाला काय वाटते??

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सद्यस्थितीत निवडणुका होणार की नाही तेच माहित नाही. कदाचित कुणीतरी सरकार बनवेलही. निदान ४ महिने तरी थांबा...

मी-माझा, तेवढेच बुद्धीला खाद्य
बाकी फेर निवडणूका झाल्याच तर काय आणि आपण त्यात कुठे हा विचार आता प्रत्येक पक्ष करून त्यानुसारच पुढचे डावपेच आखत असेल.

आत्ता निवडनुका झाल्या तर सर्वांनाच थोडा-थोडा फटका बसेल आणि ५०(बिजेपी)- ५०(शिवसेना) -५०(कॉंग्रेस) -५०(राष्ट्रवादी) -४८(अपक्ष, मनसे, एमायेम, स्वाभिमानी, जनसुराज्य ई.ई.) अशा जागा मिळतील असे मला वाटते.

फेरनिवडणुकीत सर्वाधिक तडाखा सेनेला व त्याखालोखाल भाजपला बसेल. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला फायदा होईल. कदाचित नवीन सरकार त्यांचे असेल.

@पुरोगामी यांच्या मताशी सहमत. काँग्रेस - राष्ट्रवादीला - शिवसेनेला शॉर्ट टर्म फायदा मिळू शकेल व त्यांचे बहुमतातील नाही, पण छोट्या पक्षांच्या टेकुवरचे कडबोळे सरकार बनू शकेल.

तसा सगळ्याच पक्षांचा मतदार ठरलेला असतो.... पण आत्ता सेनेला मिळालेल्या सीट्स मधल्या निम्म्यापेक्षा जास्त सीट्स ते केवळ युतीत असल्याने आणि भाजपाच्या मतदारांनी दिलेल्या वोट्स मुळे आहेत.... एकटे लढले तर वीसेक येतील फार तर फार Wink

१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्क झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे.

अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो.

२. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे.

३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची निती यशस्वी होते म्हणल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.
त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात प्रविण आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणल्यावर त्यात फूट पाडणे हेच महाआघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.
थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणूकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रीत लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो महाआघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.

जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही.

४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रीत लढवू नयेत एवढीच महाआघाडीची इच्छा किंवा धेय्य असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज यांना बाजूला केले. या राजच्या त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कबजा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय.

५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.

भाजपकडे यावेळेस इच्छूक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खुष झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनिती आहे.

६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत महाआघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. ध्रुविकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.

काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूष होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते.

७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले.

राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे.

८. पण
जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते.
दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. यावेळेसही हे होऊशकते.
यावेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत.

९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवनणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो.

भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही.

अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुषार असणार म्हणा. या वाक्याशी तरी सगळे नक्कीच सहमत होतील. Happy

६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत महाआघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. ध्रुविकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.

काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूष होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते.

भागवतजी,

जेव्हा जेव्हा भाजपाने मोठं यश मिळवलं आहे तेव्हा तेव्हा हिंदुत्व (कट्टर) हा मुद्दा पुढे होता आणि कोणीतरी जनाधार असलेला, लोकांशी कनेक्ट होऊ शकणारा नेता पुढे होऊन नेतृत्व करत होता. वाजपेयी, मोदी हे देशपातळीवर किंवा योगी, शिवराज मामा, गोपीनाथ मुंडे, पर्रीकर, कल्याण सिंग, वसुंधरा ही राज्य पातळीवर उदाहरणे आहेत.
फडणविस म्हणूनच भाजपाने आता रिप्लेस करावे असं वाटतं. एकतर ते हिंदुत्ववादी अजिबातच नाहीत. डेविड फर्नांडिस हे नाव त्यांना मोदीभक्तांनी दिलेलं आहे, विरोधकांनी नव्हे. दुसरं, ते फार कोणाशी कनेक्ट होऊ शकले नाहीत. नागपुरातही यावेळी कमी वोट शेअर घेऊन निवडून आले. बॉलिवुड , ग्लॅमर, फॅशन , मिडिया यात ते सपत्नीक जास्त रमतात. भाजपच्या वोटर्सना हे रुचत नाही. म्हणजे इतर राजकारणी ऐश करत नाहीत असं नाही पण निदान त्याचं उघड प्रदर्शन करत नाहीत किंवा मुंबईला बॉलिवुड पार्टी अटेंड करुन पुन्हा कुर्ता पायजमा घालून गावाकडेही फिरकतात, लोकांना भेटतात.
फडणविस इज मोअर लाईक प्रमोद महाजन ऑर जेटली मायनस द शार्पनेस.

हिंदुत्व वगैरेबाबत मला फारस कळत नाही. माझा त्याबाबत अभ्यासही नाही. त्यामुळे हा प्रश्न शहा व मोदी जसा सोडवतील ते मला मान्य असेल. त्यामुळे माझा पास.

फक्त फडणवीसांची तसेच त्यांच्या सग्यासोयऱ्यांची मालमत्ता ५ वर्षात ॲबनाॅर्मलपणे वाढल्याचे कुठे वाचनात आले नाही म्हणून मला ते आवडतात. मोदीही निव्वळ या एकाच गोष्टीमुळे आवडतात.
भारताची प्रगती व्हायची असेल तर पंतप्रधान पद तसेच मुख्यमंत्री पद हे निस्पृह माणसाकडे असले पाहिजे असे मला वाटते.

>>> नागपुरातही यावेळी कमी वोट शेअर घेऊन निवडून आले. >>>

२०१४ मध्ये ५७,००० मताधिक्य होते. यावेळी ४९,००० आहे व हा फरक खूप मोठा आहे.

त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अजून तरी आरोप नाहीत. परंतु त्यांचं हिंदी प्रेम चीड आणणारं आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीविषयी त्यांनी एक निवेदन १० मिनिटे आधी मराठीत व नंतर हिंदीत वाचून दाखवले. राजीनामा दिल्यानंतरच्या पत्रकार परीषदेत ३० मिनिटे मराठीत स्वत:ची भूमिका सांगितली व नंतरची ३० मिनिटे तेच हिंदीत सांगितले. काही पत्रकारांनी यावर विचारल्यानंतर हिंदी वाहिन्यांसाठी मी हिंदीत सांगतो असं समर्थन केले. मग इंग्लिश, कन्नड, तेलगू, गुजराती अशा भाषेतूनही सांगायला हवे होते. हिंदी वाहिन्यांमध्ये मराठी येणारे पत्रकार नसतात का? शेतकऱ्यांना मदतीविषयी निवेदन हिंदीत सांगण्याची गरज काय? आपली प्रत्येक गोष्ट मराठी पाठोपाठ हिंदीत सांगणारा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला मुख्यमंत्री. हे परत आले तर हिंदी ही महाराष्ट्राची दुसरी राजभाषा म्हणून जाहीर होईल.

ओ, ते ठाकरेसाहेब पण हिंदीतल्या प्रश्नांना हिंदीतूनच उत्तरे देत होते की काल!
का काय सापडले नाही म्हणून कश्यावरूनही टीका करायची?

>>> ते ठाकरेसाहेब पण हिंदीतल्या प्रश्नांना हिंदीतूनच उत्तरे देत होते की काल! >>>

ते हिंदीत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हिंदीतून दिल्यानंतर तेच उत्तर मराठीतूनही देत होते का?

हिंदी न मराठी या दोन्ही भाषेत एकच निवेदन वाचून दाखवायला ते काय राष्ट्रपती किंवा राज्यपालांचं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दूरदर्शनवरून वाचून दाखवले जाणारं अभिभाषण आहे का?

परंतु त्यांचं हिंदी प्रेम चीड आणणारं आहे.
>>>>>
अगदी सहमत.
प्रचार सुरू असताना सुद्धा आपले मराठी नेते मोदी उपस्थित असले तर हिंदीत भाषण करायचे.

कोण येईल तो येईल पक्ष निवडून .
पण सरकार स्थापन करण्यास राजकीय पक्ष समर्थ नसतील तर ताबडतोप फेर निवडणुका घेणे इष्ट आहे.
राष्ट्रपती राजवट युद्ध पातळीवर राज्यातून हटवली जावी.
राष्ट्रपती राजवट लोकशाही ला कलंक असल्यासारखी च आहे

फडण२० च्या घरी कोणालाच मराठी येत नाही. त्यांच्या बायकोचं मराठी भयाण आहे. हे एक ट्विट बघा- दांपत्याने हे चुकीचं मराठी सुधारण्याचाही प्रयत्न केला नाही इतका कोडगेपणा आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1189513612148105217

त्यांच्यावर करप्शनचे उघड आरोप नाहीत हे खरं आहे व ते चांगलंही आहे. पण त्यांच्या बायकोला ५ वर्ष ज्या संधी मिळाल्या त्या फुकट संधी उपलब्ध करुन देणार्‍या लोकांनी बदल्यात काहीतरी हवं असल्याशिवाय या संधी दिल्या का हा प्रश्न पडतोच. उदा- अमेरिका-युरोपचे अनेक सदिच्छा दौरे, अनेक अ‍ॅवॉर्ड्स (फॉर व्हॉट ?), बिग बीसोबत म्युझिक व्हिडियो. हा सर्व पदाचा गैरवापरच की. स्विस दौर्‍यात बाई आजतकच्या पत्रकाराला मुलाखत देता देता अल्लडपणे स्नोचे गोळे करुन त्याच्या अंगावर फेकत होत्या. जस्ट हु डु दे थिंक दे आर?
एखादा माणूस अशाप्रकारे सीएमच्या पदाचे पर्क्स आपल्या कुटुंबाला स त त वापरु देत असेल तर मग तत्वनिष्ठ, निष्कलंक हे शब्द वापरताच येत नाहीत.

सेना-राष्ट्रवादीने ५ वर्ष सरकार चालवून या लोकांना खरोखर धडा शिकवावा.

सेना-राष्ट्रवादीने ५ वर्ष सरकार चालवून या लोकांना खरोखर धडा शिकवावा.

नवीन Submitted by सनव on 13 November, 2019 - 21:30 >>>

अगदी बरोबर या फाशी देण्याच्या बरोबरीच्या गुन्ह्यासाठी या माणसाला सत्तेबाहेर बाशिवले पायजे.

भलेही त्यासाठी चोर सत्तेत येऊंदे

Submitted by सनव on 13 November, 2019 - 11:00>> पदाचा मान आहे तो, perks काय त्यात? मुख्यमंत्र्यांच्या representative म्हणुन नुसते वजन टाकून अनेक कामे मार्गी लावता येतात. हेच जर एका वयस्कर मुख्यमंत्र्यांचा राजकारणातला मुलगा असता तर त्या मुलाने वाजवून रुबाब आणि perks मिळवले असते?
उलट ह्या निर्ढावलेल्या पुरुषांच्या व्यवसायात त्या पुरूषाची मिरवणारी सावली न होता आत्मविश्वासाने वावरू शकल्या ही मोठीच गोष्ट आहे.

उलट ह्या निर्ढावलेल्या पुरुषांच्या व्यवसायात त्या पुरूषाची मिरवणारी सावली न होता आत्मविश्वासाने वावरू शकल्या ही मोठीच गोष्ट आहे.

त्यांचा आत्मविश्वास 2०१४ नंतरच बरा वाढला. बाई अॅक्सिस बँकेत मोठ्या हुद्द्यावर आहेत म्हणे?

बाकी बाईंच्या आत्मविश्वासाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. काय आवाज! वाह.

माहिया ना आया मेरा
माहीया ना आया
रांझना ना आया मेरा
रांझना ना आया.

Pages