दिठी

Submitted by वरदा on 11 November, 2019 - 08:47

दिठी'

दहा बारा वर्षांपूर्वी मला पहिल्यांदा 'रामजी' भेटला होता. मंगळवेढ्याच्या हिवाळ्यातही वैराण रुक्ष खडकाळ असलेल्या माळरानांमध्ये. मी माझ्या पांढरीच्या तपासासाठी झाडोरा तुडवत माळरान पायाखालून घालत होते तिथे शेरडं चारायला आला होता. मला माहिती द्यायची म्हणून माझ्याशेजारी बसून बोलताबोलता त्याची कहाणी सांगितली. धड पीक न देणारा जमिनीचा तुकडा पदरात असल्याने ऊसतोडणी मजुरीवर जाणारं त्याचं घरदार. एकुलता एक हातातोंडाशी आलेला तरणाताठी मुलगा आकस्मिक गेला आणि बायको वेडी झाली. आता त्या वेडीला सांभाळत देह जगवायचा म्हणून इथेच गावात राहून दुसर्‍याच्या शेळ्या रोजंदारीवर राखतो. बाकी त्याचं आयुष्य त्या अतीव दु:खाच्या क्षणीच संपून गेलं. तो क्षण अजून त्याच्या डोळ्यात थिजून राहिला होता. एरवी गावोगाव हिंडून दुष्काळी दारिद्र्य पाहून निर्ढावत चाललेली मी एकदम गलबलून गेलेली आठवतेय. कितीतरी दिवस त्याचा तो चेहरा डोळ्यापुढून हलत नव्हता.
परवा परत एकदा तेच काळीज चरत जाणारं गोठल्या नजरेतलं कडेलोटी दु:ख सामोरं आलं. सुमित्रा भावेंच्या 'दिठी' या चित्रपटात.
दि बा मोकाशींची मराठी साहित्यातील अभिजात म्हणून गणली गेलेली ही मूळ कथा अगदी ओळखीची असली तरी त्याचे माध्यमांतर करून दृश्य स्वरूपात कशी उभी राहिली आहे याचे कुतुहल सगळ्यांना असते तसेच मलाही होते. मुळात कथा एका वेगळ्या विषयावरची, अध्यात्म-तत्वज्ञान-अमृतानुभव या मार्गावरची. एका तरण्याताठ्या मुलाला गमावून सुन्न झालेल्या, स्वत:च्या पुण्याची काही किंमत आहे की नाही/ देव तरी आहे की नाही असे प्रश्न पडलेल्या वयस्क वारकरी रामजी लोहाराची. जन्म-मरणाचं अतूट नातं, त्यातलं अद्वैत, जीवनचक्र त्याच्या परत एकदा अनुभूतीला येऊन त्याचं गोठलेलं दु:ख निचरा होऊन हळूहळू ते वितळायला लागतं या प्रवासाचा आलेख टिपणारी. अतिशय मर्यादित काळाच्या संकुचित अवकाशात घडणारी ही कथा अतिशय ताकदीने जशी लिहिली गेलीये तेवढ्याच ताकदीने ती पडद्यावर आणण्यात यश आलं आहे.
सुरूपासून संततधार असलेला पाऊस यातलं एक महत्वाचं पात्र बनून जातो. दु:खाच्या मळभाशी एकाकार होऊन. मला चित्रपटाची तांत्रिक भाषा अजिबात कळत नाही, पण सुरुवातीपासूनच कमालीच्या ताकदीचा दृश्यपोत मात्र तीव्रतेने जाणवत राहिला. शेतं, शिवारं, गावातली घरं, चिखल, घरातले मिणमिणते उजेड देणारे कंदील आणि चिमण्या सगळ्या कथेच्या भावना गडद करत राहतात. अनेक सुरात पडत राहणारा न संपणारा कोंदून राहिलेला पाऊस आणि यात वावरणारी मोजकी साताठ पात्रं. त्यांच्यातले ताणेबाणे. सगळंच कसं प्रेक्षकाच्या अवतीभवती जिवंत होऊन येतं. अभिनय सगळ्यांचेच उत्तम आहेत, पण रामजी झालेल्या किशोर कदमांनी अविस्मरणीय भूमिका केली आहे. अभिनय नाही तर खरोखर भूमिका जगले आहेत, ते रामजीच आहेत असं क्षणोक्षणी वाटत राहतं. त्यांची देहबोली, संवादफेक, सगळंच परकायाप्रवेश असावा असं वाटतं. यापरतं मी आणखी या चित्रपटाबद्दल लिहूच शकत नाहीये.
चित्रपटात अर्थातच छोटेमोठे खाचखळगे आहेत, थोडं कमीजास्त जाणवतं. पण शेवटी क्लायमॅक्सला सगळं इतकं ताकदीने जुळून आलं आहे की त्या सगळ्या बाबी कुठच्याकुठे मागे पडतात. छोट्याशा परिघातली सामान्य माणसांची वैश्विक गोष्ट सांगणार्‍या पथेर पांचाली चित्रपटाच्या जातकुळीतला हा चित्रपट आहे. भोग्य आणि भोक्ता यांच्या अद्वैताचं अमृतानुभवाचं तत्वज्ञान शेवटी सगुण होऊन आपल्यापर्यंत येतं तेव्हा आपल्यात आणि चित्रपटातही काही अंतर उरलेलं नसतं. आपणही त्या कथेचेच एक भाग झालेलो आहोत, प्रेक्षकच प्रेक्ष्य झाला आहे हे उमगतं. इतक्या समर्थपणे अनुभव देणारे मराठी चित्रपट क्वचितच (माझ्या) पाहण्यात आले आहेत.

विशेष नोंदी -
१. कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवला गेला. विविध कारणांनी मला सदस्यत्व किंवा तिकिट घ्यायला जमलेलं नव्हतं (तिथला गदळ बेशिस्त कारभार हा स्वतंत्र लेखमालिकेचा विषय होऊ शकतो). पण चिन्मय दामले (मायबोलीकर चिनूक्स, चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक)या मित्राने केलेल्या विनंतीखातर निर्माते डॉ. मोहन आगाशे आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी अतिशय आपुलकीने मला प्रेक्षागृहात प्रवेश मिळायची व्यवस्था केली. त्याबद्दल मी या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. आणि हे आभार औपचारिक नाहीत.
२. चित्रपट संपल्यावर तीनचार बर्‍यापैकी वरिष्ठ पोलिस अधिकारी दिग्दर्शिकेची भेट घ्यायला थांबले होते. त्यांना चित्रपट अतीव आवडला हे सांगण्यासाठी. आपल्यापेक्षा जीवनातल्या वाईट, दु:खद पैलूंशी ज्या लोकांचा रोज जवळून संबंध येतो त्यांना हा चित्रपट भाषा, सांस्कृतिक संदर्भ या सगळ्याच्या पल्याड जाऊन इतका आवडावा ही या कलाकृतीबद्दलची खास पोचपावती आहे असं मला वाटतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट पहायची उत्सुकता अजूनच वाढल्ये
परत एकदा जाणवते आहे की उत्कृष्ट साहित्यकृती आणि ताकदीचा दिग्दर्शक हे दोन घटक एकत्र आले तर सकस चित्रपटानुभव मिळण्याची शक्यता जास्त

सुंदर लिहिले आहे. मी मूळ कथा वाचलेली नाही. पण चित्रपट बघायला आवडेल. कुठे मिळेल? किशोर कदम मला प्रचंड आवडतात.

माझ्या माहितीप्रमाणे चित्रपट अजून व्यावसायिक दृष्ट्या 'रीलीज' झालेला नाहीये. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला जात आहे. पुणे, मुंबई, गोवा येथील फेस्टिवल्समध्ये होता
चिनूक्स याबद्दल जास्त माहिती देऊ शकेल.

सुरेख लिहिलं आहे.

चिनूक्स याचा स.दिग्दर्शक आहे हे आज समजलं. (इतके दिवस मला वाटत होतं, की त्यानं या सिनेमात काम केलं आहे.)

मस्त परीक्षण,
सौमित्र नेहमीच आवडत राहिला आहे.
थेटरात कधी येतो ह्याची वाट बघावी लागेल आता

धन्यवाद वरदा. Happy

Filmy, वावे,

चित्रपट प्रदर्शित करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

ललिता-प्रीति,
अभिनयसुद्धा केला होता, पण ते प्रसंग दिग्दर्शिकेनं काढून टाकले. Proud

छान ओळख वरदा. फारसं वास्तववादी काही पहाण्याची हिम्मत माझ्यात आधीही नव्हती. आताही नाहिये. त्यामुळे हा चित्रपट काही पहाणार नाही. पण तरी माहिती मिळाली हेही नसे थोडके.

चिनूक्स सहीच. सहाय्यक दिग्दर्शकाच्या कामाच्या अनुभवाबद्दल काही लिहिलं आहेत का? वाचायला आवडेल.

रच्याकने, दिठी म्हणजे डोळे का? 'का आसवे दिठीत' हे शब्द हा खेळ सावल्यांचा मधल्या गाण्यात ऐकलेत.

अभिनयसुद्धा केला होता, पण ते प्रसंग दिग्दर्शिकेनं काढून टाकले. >> अरे रे डिलीटेड सीन्स म्हणून टाका बघू.

आय एफ एफ आय जे आता नेक्स्ट वीक गोव्यात सुरू होते आहे तिथे दाखवणार आहेत का? फ्लेम कडून काही विद्यार्थी जाणार आहेत. त्यांना दिवसाला तीन सिनेमे बघायचे टार्गेट कॉलेज ने दिले आहे. आवर्जुन बघायला सांगते. प्रॉडक्षन टीम तिथे भेटेल काय? प्रेस कॉन्फरन्स किंवा प्रेक्षकांशी संवाद असेल तर जरूर अपडेट द्या मुलांना भेटायला सांगते.

चित्रपटाची ओळख छानच. ठाणे मुलुंड भागात प्रदर्शित झाल्यास नक्की बघेन.