वो कौन था ?

Submitted by A M I T on 11 November, 2019 - 00:47

मायबोली हितगुज दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित

***

एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक संध्याकाळ...

ऑफिसातून घरी आलो नि सोफ्यावर बसून पायातील मोजे काढत असतानाच आपल्या पिठानं माखलेल्या हातात पाण्याचा पेला घेऊन आलेल्या सौ.ला पाहताच मी बुचकळ्यात पडलो.
तसं तर काही हवं असेल तेव्हाच सौ.ला सोयिस्करपणे पत्निधर्म आठवतो. नाहीतर एरवी ती 'जगातील नवरे स्वत:ची कामे स्वत: कसे करतात', हे मला ऐकवण्यात धन्यता मानते.
"अगं हातातलं काम टाकून माझ्यासाठी पाणी आणण्याचा त्रास कशाला उगी करून घ्यायचा?" पेल्यातील पाणी पिऊन होताच जरा हुशारी आल्यावर मी सौ.ला विचारले.
"यात कसला आलाय त्रास!" असं म्हणून सोफ्यामागे उभी राहत सौ. नं आपले पिठातले हात माझ्या गळ्यात टाकले.
"आणि खरोखरच तुम्हांला माझी कीव वगैरे येत असेल ना, तर घरी रोबो आणा एखादा", अखेर सौ. मूळ मुद्द्यावर आली.
पोळ्या सोडून ती माझे पैसे लाटण्याचा प्रयत्न करत होती. हा म्हणजे 'सोफ्यामागून आली आणि तिखट झाली' अशातला प्रकार झाला.
"मी असताना आणखी वेगळ्या रोबोची काय गरज आहे?" मी थट्टेच्या मूडमध्ये होतो.
"अहो, हल्ली रोबो किती आवश्यक आहे, माहितीय तुम्हांला? परवा SHE टिव्हीवरच्या 'अब तेरे बिन जी लेंगे हम' या मालिकेतली नायिका करवा चौथचा उपवास करते. तिचा पती काही कामानिमित्त न्यूयॉर्कला गेलेला असतो आणि करवा चौथच्याच संध्याकाळी तो घरी परतणार असतो. पतीला चाळणीतून पाहिल्याशिवाय उपवास सुटणार नाही असा रिवाज आहे. झालं.. ती नायिका आपली पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसते. हे पाहून तिच्या दोन कजाग जावा आपापसांत कुजबुजतात. एक जाऊ दुसरीला म्हणते, "आज जर हिचा पती आला नाही तर हिचाच चौथा करवा लागेल.. आयमीन करावा लागेल." आणि अचानक नायिकेच्या मोबाईलची रिंग वाजते. फोनवर तिचा पती तिला सांगतो की, आज तो येऊ शकणार नाही. मग ती काय करत्ये माहितीय?" कुठलीही गोष्ट सांगताना ऐकणार्‍याला मध्येच एखादा प्रश्न विचारण्याची सौ.ला वाईट खोड आहे.
"फोन कट केला असेल." मी असं म्हटल्यावर सौ. नं माझ्या मालिकेबाबतच्या अज्ञानावर नाक मुरडलं.
"नाही." सौ.
"आमच्यात फोनवर बोलून झाल्यावर फोन कटच करतात." मी.
"हॅलोsssssss.. सेम हिअर" मिसेस भल्लांच्या सोबतीनं सौ.ने चारदोन इंग्रजी शब्द माझ्या तोंडावर मारण्यासाठी शिकून घेतले होते.
"पण मी तुम्हांला उगीच इतकं तपशिलात सांगत नाहीये. तर तिनं नवर्‍यासारख्याच दिसणार्‍या रोबोला चाळणीतून पाहून उपास सोडला."
रोबोखरेदीचं पिल्लू सौ.च्या मनात कुठून शिरलं, तो रस्ता सापडला होता.
मला त्या मालिका-लेखकाच्या कल्पनेची मोठी गंमत वाटली.
"अगं, पण आपल्यात कुठे ते करवा चौथबीथ असतंय?"
"मी फक्त उदाहरण दिलं. मिसेस भल्लांनीपण कालच नवा रोबो विकत आणला. आणि आजच त्यांनी त्याच्याकडून चक्क पराठे करून घेतले." सौ. आपली मागणी रेटून धरत होती.
मी रोबोखरेदी करायचं ठरवलं. तसंही सौ.च्या हातचं जेवून गेली कित्येक वर्षे मी चवीशी समझोता करीत होतो.

*

दुसर्‍या दिवशी आम्ही रोबो मिळणार्‍या दुकानात गेलो. दुकानात प्रचंड गर्दी होती. तरीही एका सेल्समननं आम्हां नव्या गिर्‍हाईकांना गाठलं.
"या, या,या, यातील आपल्या आवडीचा कुठलाही रोबो निवडा आणि आपलं जीवन आरामदायी बनवा." सेल्समननं यांत्रिक पद्धतीनं स्वागत केलं.
आतापर्यंत कित्येक ग्राहकांपुढे त्यानं ही टेप वाजवली असावी.
"आम्हांला एखादा चांगला, मजबूत आणि टिकाऊ रोबो दाखवा." हे वाक्य अर्थात सौ.शिवाय कुणाला सुचणं शक्यच नव्हतं.
मग त्या सेल्समननं आमचा मोर्चा ओळीने उभ्या केलेल्या रोबोंकडे नेला.
"हे सगळे एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले बॉलीवुडच्या हिरोंच्या नावांचे रोबो आहेत. हा पहा. हा सनी रोबो. हा रिक्शेपासून ट्रकपर्यंत काहीही लीलया उचलू शकतो. याच्या नुसत्या हाताचं वजन ढाई किलो आहे. गंमत म्हणजे गेल्याच आठवड्यात यानं जमिनीतून एक हॅन्डपम्प उखडून काढला." सेल्समननं असं सांगताच इतका वेळ त्या रोबोला जवळून निरखणारी सौ. चार पावले मागे आली.
"तुम्हांला काही उपयोगाचा नाही हा रोबो. बांधकाम व्यवसायात याचा वापर जास्त होतो."
नंतर सेल्समननं आणखी बर्‍याच हिरोंच्या नावांचे रोबो दाखवून त्यांची उपयुक्तता सांगितली.
तेवढ्यात सौ.चं लक्ष या तमाम रोबोंपासून दूर उभ्या असलेल्या एका तिसर्‍याच रोबोकडे गेलं.
"हा रोबो काय काय कामं करतो?" सौ. साड्यांच्या दुकानात आल्यासारखी वागत होती.
"हा रोबो सगळं काही करतो. जगातली कुठलीही गोष्ट याच्यासाठी अशक्य नाही. म्हणूनच हा इथला सर्वांत महागडा रोबो आहे."
"नाव काय याचं?" माझी उत्सुकता टिपेला की कुठे म्हणतात ना तिथे पोचली होती.
"रजनीकांत."
कवायतीत पीछे मुड म्हटल्यावर जशी गिरकी मारतात तशी आम्ही 'दक्षिणेकडून' उत्तरेकडे गिरकी मारली.
"एखादा घरगुती कामं करणारा रोबो दाखवा." आमचा पतंग अखेर जमिनीवर आला.
एखाद्या महागड्या कपड्यांच्या दुकानात जाऊन बरमुडा मागितल्यावर तिथला दुकानदार ज्या नजरेनं आपल्याकडे पाहील, तशाच नजरेनं इथल्या सेल्समननं माझ्याकडे पाहिलं.
"हो. आणि दिवाळीपण तोंडावर आलीय. मला दिवाळीचा फराळ करायला बरीच मदत होईल." सौ.ला आनंदाच्या 'बोनस' उकळ्या फुटत होत्या.
सेल्समन आम्हांला एका कोपर्‍यात अदबीनं उभ्या असलेल्या रोबोकडे घेऊन गेला.
"हा रोबो घरगुती कामं करतो. हा ऐनवेळी कामवाल्या बाईसारख्या दांड्या मारत नाही. कारण मरण पावायला याचे कुणी नातेवाईकच नसतात. हा रोबो न थकता अगदी मनापासून कामं करतो. कामवाल्या बाईसारखी कामं 'उरकत' नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला तुम्ही साहेबांसोबत घरात एकटं सोडून बाहेर कुठेही निर्धास्त जाऊ शकता." असं म्हणून सेल्समन आडवातिडवा हसला.
सौ.नं माझ्याकडे एक संशयग्रस्त कटाक्ष टाकला.
इंटरनेटवरच्या टुकार पीजेवर पोसलेला सेल्समन विनोदाच्या चांगल्या जागा घेत होता, याचं मला अपार दु:ख होत होतं.
"तसं तर हा कसलीही कुरकुर न करता बिगरघरगुती कामंही करतो. उदा. पूर्वी लोक आपली पाठ खाजवण्यासाठी कंगवा वापरायचे, आता रोबो वापरतात. डोकं दुखत असेल तर डोक्याला बाम लावून देणं, पाय चेपून देणं वगैरे वगैरे... " सेल्समन आपलं कसब पणाला लावत होता.
"अय्या ! खरं की काय? अजबच आहे." सौ.ला या गोष्टीचं मोठं अप्रूप वाटत होतं.
"मी तुम्हांला हा रोबो ऑपरेट कसा करायचा या संबंधीची माहिती देतोय. याच्या काखेत एक चिप बसवलेली आहे."
"काखेत?" माझा आणि सौ.चा कोरस.
"तरी बरंय. जुन्या रोबोंमध्ये ही जागा कुठे होती, हे विचारू नका."
"अहो, मग सरळ म्हणा की गप'चीप' बसा म्हणून." मी एक चीप कोटी करून घेतली.
"ही चिप काढून तीत कॉम्प्यूटरमधून दिवसभराच्या कामांची लिस्ट अपलोड करायची. मग तिला तिच्या जागी बसवायची आणि निश्चिंत व्हायचं. तुम्हांला अगदी कोथिंबीर निवडायचीही तकलिफ नाही."
"अगं बाई..! आणि याच्या जेवणाचं काय?" सौ. नं आपल्या अज्ञानाची झाकली मूठ उघडली.
सेल्समन सौ.च्या जिज्ञासेची खिल्ली उडवीत होता.
"याचं जेवण म्हणजे वीज. किमान तीन तासांपर्यंत याला चार्ज करा."
"त्याचं काये, माझ्या बायकोला विज्ञानात गती नाही", मी सेल्समनच्या कानाशी लागलो.
"माझ्या बायकोला तर असं वाटतयं की आपण अजून अश्मयुगात जगतोय." माझं दु:ख ऐकून आपसूक सेल्समनच्या दु:खाला वाचा फुटली.
"असं का वाटतंय तुम्हांला?"
"ताटात रोज अर्ध्याकच्च्या भाज्या मिळाल्यावर आणि काय बोलणार?" असं म्हणून त्यानं एक दीर्घ उसासा सोडला.
"म्हणजे तुमच्या घरी अजून आगीचा शोध लागायचाय!" मी एकाचवेळी त्याच्याबद्दल सहानुभूती आणि त्याच्या विनोदावर कडी करून दाखवली.
"आम्हांला हाच रोबो हवाय." सौ.
"सध्या आमच्याकडे हा रोबो उपलब्ध नाहीये. तीनचार दिवसांत आम्ही आपल्या घरी रोबोची डिलीवरी करू. तुम्ही त्या काऊंटरवर अ‍ॅडव्हान्स भरा आणि आपला पत्ता नोंदवा", सेल्समन एका काऊंटरकडे बोट दाखवत म्हणाला.
"काय हो? एखाद्या माणसाला विशेषत: बाईमाणसाला रोबोत कन्व्हर्ट करण्याचा कारखाना नाहीए का हो कुठे?" अ‍ॅडव्हान्स भरून झाल्यावर काऊंटर सोडता सोडता मी त्या काऊंटरवरल्या माणसाला विचारले.
बॅटरी संपलेल्या रोबोसारखा खिळून तो माझ्याकडे एकटक पहातच राहिला.

*

रोबो बूक केल्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. दार उघडलं तेव्हा दारात एक कुरीयर बॉय माझ्या नावाचं भलंमोठं पार्सल घेऊन उभा होता.
"काये?"
"आपण रोबो ऑर्डर केला होतात ना. तोच घेऊन आलोय."
"पण तो तर तीनचार दिवसांनंतर मिळणार होता."
"त्याचं काये साहेब, आत्ता ज्या घरी मी या रोबोची डिलीवरी द्यायला गेलो होतो ना, त्यांना म्हाडाच्या सोडतीत चंद्रावर एक फ्लॅट लागलाय. ते म्हणाले की, ते आता तिकडेच नवा रोबो घेतील. म्हणून हा रोबो आम्ही तुमच्याकडे वळवला. आता तुमची हरकत असेल तर...."
रोबोची उर्वरित देय रक्कम चुकवून ते पार्सल मी ताब्यात घेतले. सौ.च्या साक्षीनं ते पार्सल उघडलं. आत रोबो होता... पण हा दिसायला आम्ही बूक केलेल्या रोबोसारखा नव्हता. डिस्कवरी वा नॅशनल जिओग्राफीक चॅनेलवरदेखील कधी पाहायला मिळाला नसेल, अशा विचित्र प्राण्यासारखा तो दिसत होता. तो आपल्या मोठ्ठाल्या चमकदार डोळ्यांनी आम्हां उभयतांकडे आळीपाळीनं पाहत होता.
भात्याच्या पेटीवरील पांढरी एक दाबल्यावर जे स्वर ऐकू येतील, त्या स्वरात तो काहीतरी अगम्य पुटपुटला.
"कुठली भाषा बोलतोय हा?" सौ. नं भारावलेल्या स्वरात विचारलं.
"मला काय माहीत? खाली सबटायटल्सपण नाहीयेत." माझा विनोद सौ.ला बंपर गेला असावा.
सौ.नं त्याची हळदकुंकू लावून पूजा केली. त्यानंही शरीराची हालचाल न करता ती गोड मानून घेतली.
"काढा याची चिप आणि जुंपा याला कामाला." सौ.ला धीर धरवत नव्हता.
मिसेस भल्लांसारखं नुसतं सोफ्यावर बसून चहाचे घोट घेत टिव्हीवरल्या रटाळ मालिका पाहत बसण्याची सौ.ला घाई झाली होती.
मी त्या रोबोचा उजवा हात वर करून त्याच्या काखेत आपल्या बोटांनी चिप शोधू लागलो. चिप काही सापडली नाही, पण त्या चिपची शोधमोहीम सुरू असताना त्या रोबोनं अचानक माझ्या कानशिलात लगावून माझ्याविरूद्ध युद्धमोहीम उघडल्याचे स्पष्ट संकेत दिले.
हा प्रहार इतका तीव्र होता की, सौ. माझ्याशी काय बोलू पाहत होती हे मला काही क्षण ऐकूच येईना. गावातील कुठल्याही समारंभात भर कार्यक्रमाच्यावेळी व्यासपीठावरील माईक जी एक विशिष्ट शीळ आळवतो, तशीच शीळ माझ्या कानात अखंड घुमत राहिली होती.
"याच्या संवेदनांच्या प्रातांत आनंदीआनंद आहे. अरे, काखेत बोट लावल्यावर एखाद्याला गुदगुल्या होतील. याला वेदना होतात!" माझ्या गालानं रंग आणि आकार बदलायला सुरुवात केली होती.
तो रोबो पुन्हा आपल्या अगम्य मातृभाषेत काहीतरी बडबडला.
"मला वाटतं ती चिप याच्या डाव्या काखेत असेल. कदाचित हा तेच सांगण्याचा प्रयत्न करीत असावा." आपण काढलेल्या निष्कर्षावर सौ. खूश दिसत होती.
"अस्सं ! मग तूच काढ ती चिप." माझ्या सहनशक्तीचा आजच्या दिवसाचा कोटा संपला, हे सौ.नं ताडलं असावं. ती गप्प बसली.
घरी रोबो आला तरी सौ.ची नित्याची घरगुती कामं कमी झाली नव्हती. त्या रोबोचा कुठल्याही कामासाठी कसलाच उपयोग तर होत नव्हताच, उलट उपद्रवच जास्त होत होता. म्हणजे त्याला एखादं काम सांगितलं तर तो आपल्या अगम्य मातृभाषेत काहीतरी बडबडायचा आणि त्याच्या या स्वभावाला वैतागून आपण त्याच्यावर खेकसलो वा अंगावर धावून गेलो तर आपल्या गालावर चपराक ठरलेली.
अशाच आणीबाणीच्या दिवसांत सौ.च्या बंधूंचं आमच्या घरी आगमन झालं. हे स्वत:स समाजसुधारक म्हणवतात. त्यांनी कधी एखादं लोकहिताचं काम केल्याचं माझ्यातरी ऐकण्यात आलेलं नाही. वास्तविक रोज संध्याकाळी आपल्या मद्यपी मित्रांसमवेत फुकटची दारू ढोसणे, हा त्यांचा दिनक्रम. याच कारणास्तव मी खाजगीत यांचा उल्लेख 'समाजसुधारक' असा करण्याऐवजी 'समाजसुधाकर' असा करतो.
हे बंधू आमच्या घरी आले की आपल्या घरी लवकर जाण्याचं नाव घेत नाहीत आणि म्हणूनच मला हा मनुष्य अजिबात आवडत नाही.
"भाऊराव, मी ऑफीसला जातोय. एक गोष्ट आपल्या लक्षात असू द्या, चुकूनदेखील त्या रोबोच्या काखेत गुदगुल्या करू नका." सौ.च्या बंधूंना धोक्याची सूचना देऊन मी ऑफीसला रवाना झालो.
मुळात या सूचनेमागील माझा हेतू दुष्ट होता.
माणसाला एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितली, तर ती गोष्ट तो हमखास करून पाहतोच, ही मानवी प्रवृत्ती आहे आणि याच प्रवृत्तीचा मी फायदा घेतला.
'आता हा प्राणी काही आपल्या घरात अधिक काळ टिकत नाही' या एकमेव आनंदात माझा ऑफिसातील सबंध दिवस मोठ्या मजेत गेला.

सायंकाळी जेव्हा घरी परतलो तेव्हा माझा कट यशस्वी झाल्याची खूण बंधूंच्या नाकावर बँडेडरूपानं दृष्टीस पडली.
सगळं माहीत असूनही 'हे कसं काय झालं?' वगैरे विचारायचं म्हणून मी विचारलं. बंधू त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरलेल्या त्या घटनेचा वृत्तांत सांगत असतानाच अचानक माझा मोबाईल वाजला. फोन रोबो विकणार्‍या दुकानातून आला होता. आम्ही ऑर्डर केलेला रोबो आम्हांला आणखी आठ दिवसांनंतर मिळणार होता आणि आमच्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरीबिलगिरी व्यक्त केली होती. पण सध्या आमच्या घरी जो रोबो होता त्याबद्दल त्यांनी चकार शब्दही कसा काढला नाही, या प्रश्नानं मला भंडावून सोडलं. 'जाऊ दे, नवा रोबो घेऊन येतील तेव्हा हा रोबो परत करू', अशी मी मनाची समजूत काढली.
मालिकांचं वादळ शमलं तेव्हा सौ.कडून रिमोट माझ्या हाती आला. मी कुठलंतरी न्यूज चॅनल लावलं. त्यावरील एक बातमी पाहून आम्हा तिघांना धक्काच बसला.
ती धक्कादायक बातमी होती...

'शहरात एलियन्सचा सुळसुळाट'

गेले तीनचार दिवस आमच्या घरात रोबो म्हणून वावरणार्‍या एलियनकडे आम्ही तिघांनी जरा घाबरतच पाहिले.
तो पुन्हा आपला अगम्य मातृभाषेत काहीतरी पुटपुटला.

***

http://kolaantudya.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults