सातच्या आत घरात

Submitted by आस्वाद on 14 September, 2019 - 22:30

आज घरात वातावरण तंग होतं.

"पण तुम्हाला रात्रीच पार्टी करायची काय गरज आहे? दिवसभर तर सोबतच असता कॉलेज मध्ये. दिवसा करा ना पार्टी."
"अहो पण बर्थडे केक तर रात्री १२ वाजताच कापणार ना? कि तो पण सकाळी कापायचा?"
"हे बघ, मी तुला मित्र मैत्रिणींसोबत जाऊ नकोस, असं नाही म्हणत आहे. पण अंधार व्हायच्या आत घरात ये, इतकंच म्हणतोय."
"पण बाबा, माझ्या सोबत सगळेच असणारे. मी काय एकटी थोडीच येणार रात्री वापस. समीर, संकेत दोघंही घरी पोचवणारेत आम्हा मुलींना."
"एकदा नाही म्हटलंय तुला. परत तेच ते बोलून माझं उत्तर बदलणार नाहीये."
"बाबा प्लिजSSS मग मी तुम्हाला फोन करते, तुम्ही घ्यायला या. "
"ए ,उद्या मला सकाळी उठून ऑफिसला जायचंय. तुमच्यासारखं १० वाजेपर्यंत लोळत नाही पडायचंय सकाळी. रात्री १ वाजता मी अजिबात उठून येणार नाही."
"तुम्ही माझं काहीच ऐकत नाही .... "
"असं करा ना, दिवसभर मस्त पिकनिकला जाऊन या जवळपास कुठे. म्हणजे मस्त तुम्हाला सगळ्यांना एन्जॉय करता येईल. बर्थ "डे" मनवा. "
"You are impossible"
.
.
.
.
.
"अहो पण आता रात्रीचं जायला काही अडलंय का?"
"अगं, सिटी लाईट्स शो रात्री नाही पाहणार तर काय दिवसा पाहू का?"
"हे बघा, तुम्हाला दोघांना फिरायला जायचंय सिटीमध्ये तर जा. तुम्हाला तुमचं बसनी पण जाऊ द्यायला तयार आहे मी. पण अंधार व्हायच्या आत घरी या."
"आम्हाला काय आमचं फिरता नाही येत का? कितवी खेप आहे हि आमची इथली?"
"मी कुठे नाही म्हणतेय. जा ना तुम्ही.. मी तुम्हाला सगळं बुक करून देते. आणि सबवेचा मॅप पण देते. जायला माझी मुळीच हरकत नाहीये. पण तो संध्याकाळचा टूर नाही म्हणतेय फक्त. रात्री घरी यायला ११ वाजून जातील. वीकडे मध्ये इतक्या उशिरा कोणी नसतंय बाहेर. उगाच कशाला रिस्क घ्यायची?"
"बरं, मग आमचा टूर संपला कि तुम्हाला फोन करतो. तुम्ही या घ्यायला. मग तर झालं?"
"ह्या, सकाळी ८ वाजता मीटिंग आहे माझी. याला तर खूपच लवकर उठावं लागतं, माहित आहे ना तुम्हाला. इतक्या उशिरा आम्ही नाही येणार घ्यायला. त्यापेक्षा वीकएंडला जाऊ या ना सगळेच सोबत."

आज परत घरात वातावरण तंग होतं.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहलंय.
काळ सर्वाना बरोबर उत्तर देत असतो.

मुळात ही सफरचंद आणि संत्री अशी तुलना आहे.
"बर्थडे केक तर रात्री १२ वाजताच कापणार ना?" आणि "सिटी लाईट्स शो रात्री नाही पाहणार तर काय दिवसा पाहू का?" >>> या दोन्हीमध्ये फरक आहे. केक दिवसा कापता येतो, दिवे दिवसा लावत नाहीत.

त्यापेक्षा वीकएंडला जाऊ या ना सगळेच सोबत. >>> याच्याशी सहमत.

मस्तच कथा,
केक दिवसा कापता येत असला तरी त्या वयात मित्राचा बड्डे रात्री 12लाच केक कापून सेलिब्रेट करण्याचा आनंद निराळाच,त्याची दिवसा केक कापण्याशी नाही तुलना होऊ शकत,

पालक झाल्यावर??नाही ती तिच्या बाबांशीच बोलतेय न,म्हणजे मी तरी असाच अर्थ काढला की,आई बाबा मुलगी आणि जावयाकडे आलेत, बहुतेक परदेश असावा,त्याना जायचंय शो बघायला आणि ती मुलगी रात्री नको म्हणतेय

छान. आधी मुलगी अल्लड वयाची असते तेव्हा बाबा तिची काळजी करत असतात आणि आता मुलगी मॅच्युअर झाल्यावर आई बाबा लहान मुलासारखा हट्ट करतायेत आणि ती काळजी करतीये.

आदू, तुमच्या दृष्टीकोनातुन कथा परत वाचली..आणि मुळ विचार 'सातच्या आत घरात' हाच आहे..त्यामुळे कथा मनाला आणखीनच भावली.