राहिल्या त्या काही आठवणी (कोकण) - १

Submitted by 'सिद्धि' on 13 September, 2019 - 06:27

कोकण म्हणजे ओल्या मतीचा गंध,
कोकण म्हणजे हळुवार मनाचा बंध,
कोकण म्हणजे कोवळी पहाट स्वच्छंद,
माझ्या मनातील कोकण म्हणजे... एक लहर बेधुंद ॥

हिरव्यागार रान पसार्‍याच्या मधुन कुठुन तरी सुर्य नारायणाचा चोरटा कटाक्ष पडत होता. त्याच्या उदयाची चाहूल होती ती. त्या कटाक्षाने वातावरणात पसरलेले धुके किंचीतसे दूर पळू लागले होते. सळसळत्या गवतपात्यावरील दवबिंदू चमचम करत होते.
कुणीतरी विस्तवावर फुंकनीने फुऊsssss, फुऊsss,,,, फुऊss,,,, अशी फुंकर घाली त्याचा आवाज, आणि त्यातच भर म्हणुन, मधुन येणारा जळक्या कोर्‍या चहाचा गोडूस वास.... चालत असताना बाजूला रस्त्यालगत असणार्या, एका घरासमोरील खळ्यात माझी नजर गेली. मस्त शेणाच्या सारवणावर, राखेच्या करड्या भुकटीने झरझरती रांगोळी आकारली होती. कोण्या साठीपार आजीचे थरथरते हात या मागे असावे. (लाकुड जळाल्या नतर जी सफेद, करडी भुकटी मागे शील्लक राहते, त्याचा पुर्वी रांगोळी म्हणुन वापर करत असत.) पाय वाटेचा रस्ता अगदीच कच्चा होता. गावच्या लोकांच्या जीवनात जे खाचखळगे असतात आणि एवढ्या खाच-खळग्यातही ते आनंदी रहातात याच जणू प्रतिक म्हणजे हे रस्ते. मातीची नुसतीच भरणी, कधी ओभड-धोबड दगडांची चादर, तर कधी अर्ध्यातच पसरवलेले खडी आणि डांबर. या रस्त्यांची कहानीच वेगळी.

'गाव म्हणजे गावच । शब्दात मांडणे कठीण. दुसरे, तीसरे काही शब्द याला लागू होत नाहीत.'

सकाळचा प्रवास, छे... सकाळ कुठली पहाट, पहाटेचा पाच साडेपाचचा प्रहर. नुकताच बसचा प्रवास करुन, शेवटी आजुबाजुच्या वातावरणाचा कानोसा घेत, आम्ही आमच्या गावच्या मुख्य रस्त्याला लागलो होतो. दुर शेतीबांधा पलीकडे, झरझर वाहणारी आमची थोरली नदी मंजुळ गाणे ऐकवत होती. तर दुर डोंगर कपारीतुन म्याओssss,,,, म्याओ sss,,,, म्याओss,,,, असा मोराचा आवाज कानी पडत होता. खडबडीचा मेन रस्ता संपवून, आम्ही चिखल मातीच्या पाऊलवाटेला लागलो. पाऊलवाट असली तरी गावातील लोकांनी मोठाले दगड वगैरे रचुन ही वाट चालण्यायोग्य केली होती हे एक बरी झाले. मध्येच एखादे बेडकाचे पिटुकले पिल्लू टुनकन उडी मारुन इकडुन तिकडे जाइ. ईथुन चालताना आपला झगा संभाळण्यासाठी मला मात्र कसरत करावी लागत होती. गुडघाभर वाढलेल्या गवताने, लवलव करत माझ्या पायात मस्त फेर धरला होता. आणि त्यावर भरभरुन पसरलेले दवाचे थेंब, माझा पायघोळ झगा कधी भिजवून गेले मला समजले देखिल नाही. बाबांची पॅन्ट देखिल पायालगत थोडी भिजून गेली होती. केव्हा एकदा घरी पोहोचू असे झाले होते.

आता रस्त्याचा दुतर्फा घरे दिसू लागली, आणि मला हायसे वाटले. येणार्‍या जाणार्‍याच्या स्वागता साठी जणू ही घरे प्रथमदर्शनास सज्ज झाली होती. बाजुच्या वेणू काकुच्या कौलारू घरावर धुराची वलय चढत होती. वाटे पळत - पळत जाऊन एक घोट कोरा चहा मागावा..... थोडीशी चहापावडर, साखरेचा किवा गुळाचा नुसता पाक, मापक प्रमानातच पाणी आणि चहाची हिरवी पात, अद्रक असेलच तर फक्त नावाला.... असा कोकणी मानसाच्या गोड स्वभावाप्रमाने गोड चहा... आहा । पहाटेची सुंदर सुरुवात अजुन वेगळी ती काय असणार ? आणि लाल तांदळाचे दोन मऊ-लुसलुशीत घावणे या चहा बरोबर न मागता मिळत, त्याचा आनंद आगळा-वेगळाच.
पण अशा गोड विचारा मध्ये ही, मी पाय ईकडचा तिकडे करायला तयार नव्हते. कारण मला जास्त ओढ होती ती माझ्या स्वतःच्या घरी पोहोचण्याची.

थोड पुढे गेल्यावर बाजुच्या भात शेतातुन बुजगावणी लावलेले दिसत होती. हिरव्या पिवळ्या शेतामध्ये साधारण आठ-दहा हाताच्या अंतरावर एक- एक असे बुजगावणे लावलेले असत. त्याचे पाय म्हणून दोन जाड बांबू रोवले जात, वरती सुक्या गवताच्या पेंढीवर स्त्री किवा पुरुषाचे रंगीत- संगीत कपडे चढवून देत, आणि त्याचे तोंड म्हणुन त्यावरती घरचाच एखादा फुटका माठ पालथा घातला जाई. त्या माठावर जळके लाकुड विझुवन तयार झालेल्या काळ्या कोळश्याने मस्त दोन डोळे, मधोमध नाक, तोंड .... तसेच तो पुरुष असेल तर जाडजूड मिश्या.... असा एकंदरीत त्या बुजगावण्याचा अवतार असे.

तेवढ्यात पाठीमागे कुठेतरी घुंगूराचा आवाज ऐकु आला म्हणुन मी त्या दिशेने वळले. बाजुने गजुकाकाची बैलगाडी दिमाखात निघुन गेली. वर जाता-जाता " चाकरमाण्यानूssssss , आलाव काय ? मग किती दिसाचा मुकाम ? " अशी जुजबी विचारपुसही त्याच्याकडून झाली. त्याच्या गाडीची बैलजोडी ' सोन्या आणि मोत्या' मला फार आवडे. गळ्यातील सुपारी एवढ्या घुंगूरमाळचा रुणझुण आवाज करत, आणि ती लाल रंगवलेली टोकदार शिंगे दाखवत ते मस्त ऐटीत चालत. विषेश म्हणजे एवढ्या पहाटेच्या धुक्यातही दुरुन सुद्धा उठून दिसत, एवढे पांढरेशुभ्र बैल.

उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १ ॥
'उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ॥
जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥ २ ॥

घंटानादाच्या तालावर असा अभंगाचा आवाज गाव मंदिरातुन येत होता. मंदिरामध्ये सोनार मामानी काकड आरतीची तयारी केली होती. म्हणजे आम्ही आमच्या वाडीच्या अगदी जवळ आलो होतो तर...
मला आठवले.....आषाढ शुद्ध एकदशी च्या दरम्यान काकड आरतीची सुरुवात होते. जेव्हा आजोबा मंदीराचे पुजारी होते. तेव्हा काही वेळा, मी ही आजोबांच्या बरोबर भल्या पहाटे काकड आरतीसाठी जायचे. ‘ ‘त्रिगुण काकडा द्वैतघृते तिंबिला ।’ काठीला चिरगूट गुंडाळून त्यावर तेल ओतून पेटवलेली मशाल म्हणजे काकड. पाहाटे स्नान वगैरे करुन, हा काकडा हाती घेऊन कुडकुडत आम्ही मंदीराची वाट धरायचो. हरिनामाचा गजर करत त्या सावळया माऊलीस ऊठवले जाते. दही-दुध-तुप-लोण्याने अभिषेक करुन विठ्ठल- रखुमाईस अंघोळ घातली जाते. याच दही, दुध, तुपामध्ये मध घालुन पंचामृत केले जाते. विठ्ठल- रखुमाईस तलम रेशमी वस्त्रे आणि अलंकार घातले जातात. हळद, कंकू, गंध, फुले, तुळशी, ऊद, बेल, उदबत्ती, निरांजन, कापुर वगैरे वापरुन मस्त प्रसन्न अशी सांग्रसंगीत पुजा असे.

मला काकड आरती आवडण्याचे अजुन एक कारण म्हणजे, देवाला दाखवण्यासाठी बनवला जाणारा नैवेद्य. गावठी मऊसर शिजवलेला तांदूळ त्याच उभा- आडवा चिरलेला गुळ, असेलच तर एखादीच अखंड वेलची..... अशी भरपुर प्रमाणात दुध घालुन खीर केली जाते. खीर तयार झाल्यानंतर शेवटी त्या मध्ये हलक्या हातानेच, एक छोटासा लोण्याचा गोळा वरुन टाकला जातो. पंचामृत आणि त्या बरोबर ही खीर खाण्यासाठी आम्ही सगळेच उतावीळ असायचो. घरी आईने केव्हा अशी खीर बनवली तरी नैवेद्याच्या खीरीची चव काही औरच.... त्यास कशाची ही सर नाही.
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥

माझ्या मनात काकडा आरतीच्या कितीतरी आठवणी तरळत होत्या, आणि या आठवणीच्या साथीने चालत-चालत मी आमच्या घराच्या खळ्यापुढील पायरीवर पाऊल ठेवले. आम्ही इथवर केव्हा पोहोचलो हे समजले देखिल नाही....

काही निवडक फोटो डकवते. खुप आहेत पण इथे जास्त मावत नाहीत. बाकीचे पुढच्या भागात डकवेन. सगळेच फोटो मी काढलेले नाहीत. पण ज्यानी काढले आहेत त्या माझ्या कोकणवेड्या ग्रुपची पुर्ण परवानगी घेतली आहे.
जुने घर...
IMG_20190913_133438.jpg
.
कौलारू घरावर धुराची वलय चढत होती...
69831660_501746033995682_7982210489281150976_n.jpg
.
म्याओssss,,,, म्याओ sss,,,, म्याओss,,,, असा आवाज करणारा मोर...
71139519_3250426361664797_4250212023083728896_n.jpg
.
71402993_3250426161664817_8613638138549501952_n.jpg
.
झरझर वाहणारी आमची थोरली नदी...
FB_IMG_15694210927441338.jpg
.
हिरवीगार भात शेती...
70506861_2611100532243858_7029844956462186496_n.jpg
.
बैलगाडी..
71138793_2416478775301971_615087952996859904_n.jpg
----------
काही ग्रामीण शब्द-
शेण - गोबर
गवताच्या पेंढीवर- वाळलेला गवताचा छोटा भारा
खळ -अंगण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकण म्हटलं की तिथली भुत आधी आठवतात. लहानपणी सहल गेली होती. तेव्हाच थोड थोड आठवत. आता परत एकदा जायचय बघु भुत भेटतात की वर्णनामध्ये वाचलेल हिरवगार कोकण की तिथल्या आंबा फणसाच्या बागा. एकदातरी कोकण सफरीवर जायचंच आहे.

Akku320 - भुत तर सगळी कडे पहायला मिळतात....त्यासाठी कोकणातच जायला पाहीजे अस काही नाहीय.
बघ आजुबाजुला, एखाद भुत सापडेल सुद्धा. Rofl

गावी जायचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला !!! लहान असताना गावी जाणे हा एक उत्साहाने भरलेला सोहळा असायचा. सहा-सात माणसं एस.टी.पर्यंत सोडायला यायची. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पाठवलेल्या भेटवस्तूंची एक गोणी भरलेली असे. गावी गाडी एकदम सकाळी जात असे आणि तेव्हा रिक्षा नव्हत्या. एस. टी. पोचायच्या अगोदरच काकांनी पाठवलेली वाडीतील बैलगाडी घेऊन चुलत भाऊ हजार असे. प्रवासाचा थकवा कधी जाणवायचाच नाही. थोडासा शीण असायचा तो घरी गेल्यावर चुल्हीवरच्या गरम पाण्याने अंघोळ केल्यावर निघून जायचा. खरोखर... राहिल्या त्या आठवणी.

अक्कु तू नाशकात राहतोस ना बाळा?
मायबोलीवरच एक सगळ्यात मोठं भूत तर नाशकातच राहतं...
Rofl

सिद्धी नेहमीप्रमाणेच लेख अगदी सुरेख आणि छान जमलाय. शशकांच्या लाटेत वाहून जायला नको.
वाहून गेला तरी मी वर काढत राहीन. Lol

धन्यवाद गोल्डफिश आणि महाश्वेता.

महाश्वेता अगदी बरोबर.... Lol
पण नुसती भुतं नाही हो, ईकडे तर दशावतारा प्रमाणे भुतांचे अवतार पहायला मिळतात. रोज नवीन अवताराचा जन्म होतो.
ते म्हणतात ना..... फिरूनी नवा जन्मेन मी. Uhoh

अतिशय चित्रमय लेख आहे. मस्त वाचलं वाचताना. बेडकाचे पिल्लू, गवताने लवलव करत धरलेला फेर, सोन्या-मोत्या जोडीची घुंगुरमाळ सारे नजरेसमोर ऊभे राहीले.
आणि खीरीत टाकलेला लोण्याचा गोळा तर कातिल!! Happy

@महाश्वेता आज्जी बोकलत हे नाशकातले आहेत का?? @सिद्धी आमच्याकडे एकदम साधी भुत असतात. कोकणात तर एकाहुन एक व्हरायटीमध्ये असतात. आणि तसंही इथले भुत बघुन बघुन जाम पकलोय.

गावी जायचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला !!! लहान असताना गावी जाणे हा एक उत्साहाने भरलेला सोहळा असायचा. सहा-सात माणसं एस.टी.पर्यंत सोडायला यायची. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पाठवलेल्या भेटवस्तूंची एक गोणी भरलेली असे. गावी गाडी एकदम सकाळी जात असे आणि तेव्हा रिक्षा नव्हत्या.>>>+++1111

चुलीवरचे जेवण ही फार छान लागतं.
Specially गणपतीतला अळू तर1 no.

छान लेख.. फार आवडला.

नाही ले बाला, बोकलत नाही नाचीकचे. मी दूषल्या भुताविषयी बोलत होते. पण तू झोप बल, भोकाडी तुला पलवून नेईल.
Lol

मस्त वर्णन!
कोकणात नेहमी पर्यटक म्हणून गेलो आहे त्यामुळे वर वर्णन केलेले कोकण कधी पहायला मिळाले नाही.

मस्त लेख, लहानपणीचे दिवस आठवले. आतापण गावी जात असतो अधून मधून पण लहानपणीचे दिवस वेगळेच होते. आता गावाने गावपण सोडून शहरीकरणाचा रस्ता धरलाय, कौलारू घरं आणि अंगण हळूहळू लुप्त व्हायला लागलेत, उन्हाळा आला की प्रत्येक घरासमोर एक मांडव असायचा सावलीसाठी तोही आता दिसेनासा झालाय, लिहायला गेलो तर मोठी लिस्टच तयार होईल असो.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.

बोकलत तुमच्या लिस्ट ची वाट बघते. नक्कीच वाचायला आवडेल.

महाश्वेतादी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Akku320 तुमच्या topic च explanation परत केव्हा तरी करू.... इथे विषयांवर नको.... Bw

>>कोकणात नेहमी पर्यटक म्हणून गेलो आहे त्यामुळे वर वर्णन केलेले कोकण कधी पहायला मिळाले नाही.

खरं आहे. मी तर ह्या वर्षी कोकणात पहिल्यांदा गेले. छान आहे लेख. लेखावर नंबर घातलेत तर बरं होईल. आणि फोटोज टाकू शकलात तर सोनेपे सुहागा. आमच्यासारख्यांना मुंबैत बसल्या बसल्या तुमच्या गावी गेल्याचं समाधान मिळेल. Happy

लेखावर नंबर घातलेत तर बरं होईल. फोटोज टाकू शकलात तर सोनेपे सुहागा.
- प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्वप्नादी... नंबर घातलेला आहे.
जुने फोटोज शोधावे लागतील , पण सापडले की नक्कीच टाकेन. Happy

छान लेख. आवडला.
काय भुत भुत चालवलंय. कुठल्या भुताने सांगितलं कोकणात भुतं असतात? Angry

>> नंबर घातलेला आहे. जुने फोटोज शोधावे लागतील , पण सापडले की नक्कीच टाकेन

धन्यवाद! आणखी एक विनंती....किमान एक स्पेशल एपिसोड तिथल्या खादाडीवर आणि किमान एक तिथल्या खास सणसमारंभांवर असू देत Happy

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.
काय भुत भुत चालवलंय. कुठल्या भुताने सांगितलं कोकणात भुतं असतात? Angry सस्मित + १

धन्यवाद! आणखी एक विनंती....किमान एक स्पेशल एपिसोड तिथल्या खादाडीवर आणि किमान एक तिथल्या खास सणसमारंभांवर असू देत Happy -स्वप्नादी - बघुया प्रयत्न करते.

पुन:प्रत्ययाचा आनंद इतक्या सुरेखपणे दिल्याबद्दल धन्यवाद !!
*काय भुत भुत चालवलंय. कुठल्या भुताने सांगितलं कोकणात भुतं असतात? * -

तात्यानुं, मुंबैकर मुक्काम वाढवतीत म्हणान हयां भुताचां पिल्लू बाकी बरां सोडलास !!20190923_122301.jpg

भाऊकाका धन्यवाद.
तात्यानुं, मुंबैकर मुक्काम वाढवतीत म्हणान हयां भुताचां पिल्लू बाकी बरां सोडलास !! - Rofl
- हयसर व्यंग्यचित्र बाकी भारी असा हा.

Pages