अनेक नाती जगी परंतू

Submitted by निशिकांत on 7 September, 2019 - 00:35

अनेक नाती जगी परंतू

गोंधळलेल्या जिवा कळेना
कुणास अपुले किती म्हणावे?
अनेक नाती जगी परंतू
व्याख्या त्यांची मला न ठावे

जात्यावरती भल्या पहाटे
सुरेल ओव्या जिने गाइल्या
थकलेली पण तिच्या गळ्यातुन
अंगाईच्या सरी बरसल्या
मायेचा मखमली उबारा
या नात्याचे सूत्र असावे
अनेक नाती जगी परंतू
व्याख्या त्यांची मला न ठावे

ऊन घेउनी अंगावरती
पिलास छाया प्रदान करतो
घरास द्याया सदा सुरक्षा
घाम गाळतो, घाव झेलतो
आईच्या झोतात कशाला
बाबा दुय्यम फिके दिसावे?
अनेक नाती जगी परंतू
व्याख्या त्यांची मला न ठावे

असो यशस्वी, असो पराजित
पुरुषामागे उभी राहते
मनी मुलायम, प्रसंग येता
साथ द्यावया, पदर खोचते
पत्नीने अन्याय पचवुनी
घर उभारण्या सदा झिजावे
अनेक नाती जगी परंतू
व्याख्या त्यांची मला न ठावे

रक्ताच्या नात्यात नसोनी
आप्तांपेक्षा जवळ वाटतो
निस्पृह नाते अपेक्षेविना
म्हणून तो आपला वाटतो
अशाच मित्रासवे वाटते
गूज मनीचे व्यक्त करावे
अनेक नाती जगी परंतू
व्याख्या त्यांची मला न ठावे

युगांतरीचा शोध संपला
काय हवे ते मला मिळाले
जगात नश्वर एकाएकी
शाश्वत आहे काय? कळाले
नाते जुडता परमेशाशी
प्रपंचात का व्यर्थ फसावे?
अनेक नाती जगी परंतू
व्याख्या त्यांची मला न ठावे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users