रगताची नाती

Submitted by अर्मोह on 3 September, 2019 - 07:14

इसरु लागली कशी ही नाती,
कधी काळी रगताची जी व्हती,
मायबापानं ज्यानला आपल मानलं,
तिच नाती बघ निघाली खोती,
तिच नाती बघ निघाली खोती ..

फोडा परीस बघ जपल हो जीनं,
बोट धरुन चालाया शिकिवलं ओ तीनं
तीच माय आता रडाया लागली,
भिताड धरुन बघ चालाया लागली ..

इसरु लागली अशी ही नाती ..

खाऊसाठी रोज रुपाया दिला हो जीनं,
हिशेब प्रेमाचा न्हायी मागितला ओ तीनं,
आतुरलेली माय ती नातवांच्या भेटीसाठी,
महाग झालीय बघ साद्या औषिदासाठी ..

इसरु लागली अशी ही नाती ..

सवता मरुन जगाया शिकिवलं ज्यानं,
पोट आवळुन खाया घातलं हो त्यानं,
त्योच बाप आता कन्हाया लागला,
भाकरी पायी बघ झुराया लागला ..

इसरु लागली अशी ही नाती ..

सवताचा ना कधी इचार हो केला,
दुख्ख: इसरुन नेहमी आनंद ओ दिला,
त्योच बाप बघ बनला आडकाठी,
गुन्हा त्याचा का जलम देउन पोटी.

इसरु लागली अशी ही नाती ..

झटत्यात मायबाप एकमेकाच्या सुखासाठी,
जगत्यात ओ कसतरी एकमेकाच्या प्रेमापोटी,
आस लावुन धरलीया जगन्याची खोती,
वाट बघत्यात बघ मरनाच्या काठी ..

इसरु लागली कशी ही नाती,
कधी काळी रगताची जी व्हती,
मायबापानं ज्यानला आपल मानलं,
तिच नाती बघ निघाली खोती,
तिच नाती बघ निघाली खोती ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रगताची नाती इसरू लागली......
नातीगोती ही गोतावळ होऊ लागली.......

खोल वर मनात रुजली
आपली कविता फारच सुंदर
छान

मायेची ती पाखरं
मोठी झाली
मायबापाच्या
पंखाखाली स्वतंत्र
आभाळ शोधु लागली
एक दिवस
मुक्त भरारी घेऊन
घरट्यातुन निघुन गेली
घरटयापासुन दुर
स्वतंत्र आभाळात
आता मात्र मायेची
ती ऊब शोधु लागली
(Dipti Bhagat)

धन्यावाद मन्या S (दिप्तीजी), आपण खूपच छान प्रतिकिया मांडली आहे.
हि कविता लिहताना जाणीव पूर्वक गावाकडची बोली भाषा वापरली आहे, जेणेकरून वाचताना ती तळमळ जाणवेल आणि वाचणाऱ्या पर्यंत सहज पोहचेल.