शितली

Submitted by अजिंक्यराव पाटील on 22 August, 2019 - 08:51

"आपटली रे आपटली आंधळी शितली आपटली" गण्या जोरजोरात हसत शितलीला चिडवत होता.
"गण्या डुचक्या, टरमाळ्या थांब तिथंच" म्हणत शीतल आजूबाजूला खडा शोधू लागली. इतक्यात गण्यानं येऊन तिला चिमटी काढली अन पळून गेला.

गण्या अन शितली, लहानपणापासून शेजारी रहात होते. त्या दोघांच्या आया नळावरच्या भांडणात एजमेकांची आई काढत, पण संध्याकाळी एकमेकींकडे चहा घेत इतर बायकांच्या उखाळ्यापाखाळ्या करीत. त्यात जर काही "कुलकर्णीबाई कशी मुद्दाम आपले नवरे येतांना मुद्दाम पदर मोकळा सोडून अंगण झाडत असते" वगैरे सेन्सिटिव्ह टॉपिक चालू असेल तर या दोघांना अंगणात पिटाळून लावायच्या.. तेव्हापासून गल्लीतल्या मुली गण्याला "पोरीत पोरगा बायला!" म्हणून चिडवायच्या, पण मुलांनी मात्र मोठं मन दाखवून "गण्या गण्या गणपती, गण्याची बायको शितली" असं यमक न जुळणारं वाक्य चिडवत शितलीला स्वीकारलं होतं. या झाल्या चौथीपर्यंतच्या गोष्टी..

पुढे जसं जसं वय वाढत चाललं तसं या दोघातला मोकळेपणा कमी होत गेला. पौगंडावस्था आल्यावर तर गण्या दुरूनच शितलीला पहायचा, दसरा, संक्रांत वगैरेला पाटिलकाकूंनी दिलेले चॉकलेट ती भेटल्यावर तिला द्यायचा. हे झालं आठवी ते दहावीच्या दरम्यान. १० वीला शितलीला जास्त मार्क पडले पण फार शिकवून करायचं काय म्हणत तिच्या बापाने तिला आर्टला धाडली, आणि मिणमिणता असला तरी एकुलता असल्याने गण्याच्या बापाने गण्याला धाडलं सायन्सला.. गण्या होस्टेलवर गेला.
एव्हाना आपण एकमेकांना आवडतो असा साक्षात्कार दोघांना उसाच्या शेतात झाला होता.. गण्या हॉस्टेलवरून घरी आला की त्या दोघांची शेतातली फेरी ठरलेली असायची. थोडाफार वांड असलेल्या गण्याला टरकून गावातली इतर पोरं शितलीकडं बघत नव्हती, आणि शितली पण गण्याची वाट बघत झुरत राहायची. गण्या इंजिनिअर होऊन पुण्यात मोठ्या कंपनीत लागला.. पगार कमी असला तरी गावाला आल्यावर गण्या रॉयल राहायचा. शितलीकडं त्याचं बरंच दुर्लक्ष होत होतं. नाही म्हणायला वाण्याचा सुजय शितलीवर बारीक लक्ष ठेऊन होता.. अन गण्याला हे माहीत असून गण्या त्यावर काहीच action घेत नव्हता.
यावेळी गण्या तीन वर्षांनी गावी येणार होता, आणि शितली आरश्यात 'झाल्या तिन्ही सांजा' म्हणत केस ओढून ओढून एक बट कपाळावर आणायचा प्रयत्न करत होती.
"आमच्या गणुला मोठमोठी स्थळं येत आहेत" गण्याची आई शितलीच्या घरात बसून शितलीच्या आईच्याच हातचा चहा पीत म्हणाली.. "त्याच्यासारखीच एखादी इंजिनेर बघायची आहे, या वर्षी उरकून टाकू" शितलीच्या भुवया आक्रसल्या.. कडवट तोंड करून शितली म्हणली, "साखर बरोबर होती ना काकू चहात, की कमी झाली?"

दुसऱ्या दिवशी गण्या गावात आला.. जरा मोकळा वेळ पाहून त्यानं शितलीला मेसेज टाकला आणि शेतात गेला. शेतात लिंबाच्या मागं जाऊन बघतो तर शितली आधीच तिथं उभी.. यथावकाश सारीपाट खेळून झाल्यावर गण्या आवंढा गिळून, शितलीचा हात धरून म्हणाला "शीतल, डार्लिंग तू इतके वर्षं शहरात नव्हतीस, तुझ्या आठवणीने मी व्याकुळ झालो होतो.. आमच्या हॉस्टेल जवळच्या शर्मा मारवाड्याकडे बिड्या फुंकून फुंकून दिवस काढत असताना मला त्याची मुलगी दिसली, तिनं मला स्माईल दिली आणि मी नकळत तिच्या प्रेमात पडलो.. एव्हाना शितलीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं.. शितली फक्त एकदा वळून जाऊदे म्हणली आणि घराकडं निघून गेली.. 2 दिवस शितलीच्या घरातून "कागज कलम दवा दिला, ओ पिया पिया, सोलह बरस की, शिशे की उम्र, शिशा हो या दिल हो" वगैरे गाणी ऐकू येत होती.. गण्याला तिसऱ्या दिवशीच शितली दिसली, तो म्हणाला "चल सारीपाट खेळू.." शितली, मान फिरवून म्हटली, "जा की, मारवाड्याच्या पोरीसंगं खेळ जा..
गण्या: शीतल प्लिज मला समजून घे तू तरी.. ठीक आहेस ना तू..
शीतल: मला काय धाड भरलीय, हा तुझी वाट पाहत होते, पण तू असा बॉम्ब फोडलास, आता थोडा वेळ तर लागणार ना नीट व्हायला.. जाऊदे, मी होईन ठीक.. तू तुझी काळजी घे म्हणत शितली वाण्याच्या दुकानात गेली..

तिच्या कॅसेट्सचा सप्लायर वाण्याचा सुजाच होता. तिनं सुजाला कॅसेट दिली.. नेमका सुजय गूळ काढायला माळ्यावर चढत होता. "ठेव तिथं आणि ती निळी कॅसेट घेऊन जा, तू सांगितलेली गाणी आहेत त्यात"
"कुठं आहे निळी? जाऊ दे ही लाल घेऊन जाती मी"
"अगं नको ती नको नेऊस" सुजानं तिला आडवेस्तोवर शितली रस्त्याला लागली होती. सुजय माळ्याहून गडबडीत खाली उतरला पण तोवर शितली दिसेनाशी झाली होती.

संध्याकाळी गण्या गावातून निघून गेला, आणि शितली पुन्हा वाण्याच्या दुकानापाशी पोचली. सुजा बेचैन होऊन पायरीवर बसला होता.
"काय रे सुजा, ही काय भानगड आणि?"
मागल्या आळीतल्या चार साळकाया दुकानाच्या सूरज बडजात्यानं शिकवल्यागत कोपऱ्यावर खिदळत होत्या. सुजय अजूनच कावरा बावरा झाला, आणि शितलीला दुकानाच्या आतल्या पारावर बोलवून म्हणाला, "त्यांच्यासमोर का ओरडलीस?"
"आरं पण ही भानगड काय नेमकी? आय लव्ह यु s म्हणजे कोण?"
"कोण न्हाय"
"असं कसं, आता लिहिलंय तर काहीतरी तर अर्थ असलच की याला"
"नाही काही नाही"
शीतल: "सॉरी सुजय, या गण्याच्या नादात तुझ्याकडे लक्षच नाही गेलं माझं.. माझ्या प्रत्येक वळणावर तू मला साथ दिलीस.."
'गण्याची शहरी भाषा शिकली का काय ही' ( सुजय मनातल्या मनात)
शीतल: माझ्या मूडला ओळखून तू क्याशेटी दिल्यास मला.. 'भरो मांग मेरी भरो' तर पार शहरात जाऊन आणलं होतं तू! (गण्याचं आवडतं गाणं - शितली मनातल्या मनात)
सुजा: मला आधीच सांगायचं होतं तुला, पण तू त्या गण्यासोबत-
शीतल: त्याचा विषय सोड, आता तूच माझा खरा मित्र
सुजा: मग मैत्रिणीकडून काही भेटल का नाही?
शीतल: उद्या ये की सारीपाट खेळायला शेतावर..
सुजा: तूच ये इथं दुकानात, दुपारून..
हसत हसत शीतल निघून गेली आणि सुजानं टेप लावला..

'भरो, मांग मेरी भरो...

-अजिंक्यराव पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

_/\_

प्रेरणा: म्हणून सुरवातीलाच लिंक देऊन टाका https://www.maayboli.com/node/71119 शामली ची.

आणि सुचेल, वेळ मिळेल तसं नियमीत लिहायला चालू करा, प्रेरणा मिळत राहतीलच :D.

धन्यवाद सर्वांना!

प्रेरणा मिळत राहतीलच Lol <<< हो, सध्या काही कमतरताच नाहीये प्रेरणांची मायबोलीवर!

>>>कोण कोण प्रेरणा आहेत? मला तरी या नावाने आयडी दिसले नाहीत ‌ Sad<<< Lol

आहेत आहेत नीट शोधा, सापडेल

मस्त...मजा आली वाचून. विडंबन छान आहे.

लहानपणी बर्‍याच गोष्टीत "राजा-राणी सारीपाट खेळत असतात. अचानक प्रधान येऊन राजाला काहीतरी महत्वाची बातमी सांगतो. राजा मात्र सारीपाटाचा डाव मोडला म्हणून रागावतो" असे काही वाचले होते. त्यावेळी कळायचे नाही की एवढी महत्वाची बातमी प्रधानजींनी आणली तरी राजा सारीपाटाचा डाव मोडला म्हणून काय रागावलाय. आज कळलं की राजाला का राग यायचा ते.