भरली कंटोळी (रानभाजी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 August, 2019 - 06:44

सध्या बाजारात चांगली रानातील कंटोळी येत आहेत. भाजी नेहमी करतो पण आता जरा तीच कंटोळी भरून अधीक रुचकर बनवूया.

साहित्यः
कंटोळी तीन-चार जुड्या किंवा पाव किलो
दोन मध्यम कांदे चिरून
अर्धा वाटी सुके खोबरे किसून
१ चमचा जीरं
२ चमचे धणे
२ चमचे तीळ
१ छोटा चमचा राई
१ चमचा हळद
१ चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला किंवा आवडत असेल तर गोडा मसाला
थोडी चिंच
चिंचेच्या प्रमाणात गुळ म्हणजे चव आंबट गोड मिक्स होईल अशी.
दोन-तीन चमचे ओलं खोबरं
तेल
मिठ

1)

2)

3)

कृती
कंटोळी धुवून, देठ काढून त्याला मध्ये एका बाजूने चीर द्या व आतील बी सुरीच्या सहाय्याने काढून टाका.

4)

तव्यावर किंवा पॅनमध्ये कांदा, धणे, तीळ व सुके खोबरे खमंग भाजून घ्या व त्याचे मिक्सरमध्ये वाटण करा. वरील साहित्यातील तेल व मोहरी सोडून, चिंचेचा कोळ करून सगळे साहित्य एकत्र करा.

5)

आता हे मिश्रण कंटोळीमध्ये चांगल दाबून भरा.
6)

पॅनमध्ये तेल गरम करून राईची फोडणी द्या व त्यावर ही कंटोळी सोडा जर मिश्रण उरल असेल तर तेही तव्यात सोडा व शिजण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण ठेउन शिजूद्या.
7)

गॅस कमी फ्लेमवर ठेवा मध्ये मध्ये परतवा व २०-२५ मिनीटे शिजवून गॅस बंद करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Wow recipe.

मस्त पाकृ आणि फोटो
रच्याकने, मला ते कंटोळी जे आहे ना ते कंटाळा असच वाचलं जातंय

सुरेख!
रानभाजीला इतकं नटवलेलं पहिल्यांदाच पाहीलं. कंटोळी/करटुल्यांची आमच्याकडे नेहेमी कापं करून नुसत्या तेल मीठ मिरचीवर परतून भाजी होते. चवीचा अंदाज येत नाहीय यारेस्पी वरून. करून पाहायला पाहीजे एकदा.

वाह सुंदर रेसिपी. तोंपासू
मी पण योकु म्हणाले तशीच भाजी करते. अशी करून बघते.

छोट्या कारल्याच असंच भरीत करता येत पण पाणी न वापरता सुख केल तर कडु पणा थोडा कमी होतो.

कंटोळी/करटुल्यांची आमच्याकडे नेहेमी कापं करून नुसत्या तेल मीठ मिरचीवर परतून भाजी होते.>>>>>> हो पातळ काप्,हि.मि., कांदा,अगदी चिमूटभर साखर आणि ओले खोबरे वरून शिवरलेले.
आता जागूच्या पद्धतीने करून पहायला हवी.रच्याकने तिचे सादरीकरण मस्त असते.

मस्त आहे रेसीपी. माझ्याकडे परवल (पडवळ नाही) आहेत, ती सुद्धा याच रेसिपीने करता येतील. उद्या फुरसदीचा दिवस आहे, उद्या करून पहाते

कोणाला माहीत आहे का कंटोळी ला विन्ग्लिश मध्ये काय म्हणतात ?
बहुतेक उस गावात भारतीय दुकानामध्ये पाहिल्या सारखे वाटताय

आहाहा मस्त आहे.

करायला हवी अशी. याला आम्ही करटोली म्हणतो.

जास्त करून काचऱ्या करते मी, फोडणी आणि नुसतं तिखट मीठ घालून, किंचित मिरपूड ओवा पण मस्त लागतो, खरपूस करायच्या.

वा मस्तच बनवलि आहे.. छान पध्दत.. आंम्ही साध्या पध्दतीने तव्यावर परतुन वरुन खोबरं शिवरुन करतो.. तिही छान होते.. पावसात हि भाजी खुप चांगली खाण्यासाठी. Happy
आंम्ही फागलं म्हणतो यांना.

मी पहिल्यांदाच ऐकल हे नाव आणि भाजी पण पहिल्यांदाच पाहीली. रेसीपी आणि फोटो एकदम कातील.
कधी करणे - खाणे होइल माहीत नाही Happy

मस्त ! पण कर्टुल्याची मूळ चव झाकली जाईल ह्यात. फार आवडते ही भाजी मला. वर काहींनी लिहिल्याप्रमाणे आम्हीही कर्टुलं म्हणतो ह्याला आणि काचर्‍या परतून ओलं खोबरं-भरपूर कोथिंबीर घालून काचर्‍या करतो.

कुठल्या भाजिच्या आसपास चव असते याची?? >>> कारलं मायनस कडूपणा असं म्हणता येईल पण ही सुद्धा किंचित कडसर असतात आणि कार्ल्यापेक्षा करकरीत असतात Happy

अजून कुठेही पाहिली नाहीत पण फक्त आमच्या इथला एक भाजीवाला मोठी टोमॅटोच्या आकारातली हायब्रीड कर्टुली आणतो. नाहीतर कर्टुली छोटी छोटी असतात. ही मोठी कर्टुली अजिबात कडू नसतात आणि कापायला सोपे जाते म्हणून मिळतील तेव्हा ती आणतेच. महाग मात्र काहीच्याकाही असतात आमच्याइथे. पन्नास रु पाव होती गेल्या आठवड्यात. ती फार तर पस्तीस-चाळीस पर्यंत खाली येतील पण गॅरेंटी नाही Sad

अगो कर्टुली पहिल्यापासून महागचं असतात, मी लहान होते तेव्हापासून बघितलं आहे. कमी व्हायची त्यामुळे आमच्याकडे पण या मोसमात खावी म्हणतात.

मी शक्यतो जवळच्या गावातून विकायला येतात त्यांच्याकडून घेते किंवा बदलापुर पाईपलाईन रोडवर फिरायला बाहेर पडलो की तिकडे गावातली लोकं भाजी stall टाकून बसलेली असतात त्यांच्याकडून घेते. महाग असतात पण छोटी छोटी गावरान असतात. यंदा अजून आणली नाही ही भाजी.

Pages